agriculture news in Marathi, success story of Anil Pakhre, Revgav,Dist.Jalna | Agrowon

फळबागा, मिश्रपिके, सिंचनासह शेती केली किफायतशीर
डॉ. टी. एस. मोटे
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

अनिल पाखरे आमच्या केंद्राशी अनेक वर्षांपासून जोडले गेले आहेत. येथे घेतलेल्या ज्ञानाची ते कायम अंमलबजावणी करतात. कमी खर्चाची शेती ते करतात. सर्व कुटुंब शेतावरच राहते. प्रामाणिक, कामसू व जिद्दी शेतकरी अशी त्यांची ओळख आहे. विक्री व्यवस्थापनाचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे. 
- श्रीकृष्ण सोनुने,वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना

मौजे रेवगाव (ता. जि. जालना) येथील अनिल व विनोद या पाखरे पितापुत्रांनी कमी खर्चिक शेती पध्दतीचा अंगीकार केला आहे. इंच-इंच जागा पिकांखाली आणत त्यांनी उत्पन्नासाठी मिश्र पिकांचा आधार घेतला. विविध फळबागांची लागवड करीत वृक्षसंपदा जपली. कायम अवर्षणाची स्थिती असल्याने सिंचन व्यवस्था सक्षम करताना शेततळे, चर खोदणे असे प्रयोगही केले. कृषी विज्ञान केंद्राच्या सान्निध्यात राहून त्यांनी ज्ञान घेत त्याचा प्रत्यक्ष वापर शेतीत केला आहे.  

जालना हा कायम दुष्काळी स्थिती अनुभवणारा जिल्हा आहे. मात्र, संकटांशी कायम सामना करीत येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करण्याचे धाडस करीत असतात. जालना तालुक्यातील अनिल व विनोद या पाखरे पितापुत्रांची शेती हे त्यापैकीच उदाहरण म्हणावे लागेल. त्यांची जमीन अत्यंत हलकी आहे. एकूण १२ एकर शेतीपैकी साडेचार एकरावर केवळ गवतच उगवते. सेंद्रिय घटकांचा वापर करून त्यांनी ही शेती जिवंत केली आहे. जल व मृदसंधारणाचा वापर करून कमी पाण्यात बांधावर फळझाडे, वनझाडे जोपासत भविष्यातील उत्पादनाची सोय केली आहे. 

हंगामी पिकांसह फळझाडांची शेती 
यंदा चार एकर कापूस, दीड एकर तूर व एक एकर मका आहे. शेताच्या बाजूला असलेला ओढ्यातील गाळ दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियानातून काढला. तो त्यांच्या शेतात पडला. साधारण पाच फूट रुंदीचा व २०० फूट लांबीचा बांध आहे. त्याचा उपयोग विविध फळझाडे लावण्यासाठी नावीन्यपूर्ण पध्दतीने केला. सीताफळाची सुमारे २००, जांभळाची ३० ते ३५, आंब्याची शंभरपर्यंत झाडे आहेत. सीताफळाचे उत्पन्न यावर्षी सुरू होईल. लिंबू, पेरू यांचीही झाडे आहेत. फळझाडांमध्ये गजराज गवताचे ठोंब लावले आहेत. त्यांचा वापर जनावरांसाठी करण्यात येतो. या गवतामुळे बांधाची माती खाली घसरत नाही. लागवडीखालील सात एकरांपैकी जवळपास दीड एकर क्षेत्रावर वर्षातील सुमारे नऊ महिने भाजीपाला पिके असतात. 

सिंचनाची सुविधा 
शेताच्या वरच्या बाजूला पाझर तलाव आहे. त्याचे पाणी पाझरुन बोअर चालते. परंतु एप्रिल, मे व जून या महिन्यांत झाडे कशी जगवायची याची चिंता असते. उन्हाळ्यात बोअर कमी कालावधीसाठी चालते. त्यातील पाणी सुमारे दोनहजार लिटरच्या प्लॅस्टिक टाकीत साठवण्यात येते. टाकीच्या खालील बाजूस नळी बसविली आहे. फळझाडांना बसवलेल्या ठिबकला नळी जोडून सिंचन सुरू करण्यात येते. या पध्दतीमुळे सर्व झाडे चांगल्याप्रकारे जगलीच. शिवाय त्यांची वाढही उत्तम झाली आहे.

स्वखर्चाने चर 
जलयुक्त शिवार अभियानातून शेतालगतच्या ओढ्यातील गाळ काढल्याने पडलेल्या बांधावर फळबाग लागवड केल्याचा चांगला फायदा होत आहे. फळबाग किंवा वनवृक्षांची लागवड वाढविण्यासाठी दोन ठिकाणी उताराला आडवा चर स्वखर्चाने खोदला आहे. यातून चार फुटांचा बांध तयार केला आहे. त्यातून जल व मृदसंधारण होते आहे. शिवाय बांधावर लावलेल्या चिंच, सीताफळ व कडुलिंबास पाणी मिळत आहे. पाचशे फुटाच्या चराच्या बांधावर ३० फूट अंतरावर चिंचेची सुमारे ५०, चिंचामध्ये सीताफळाची झाडे लावली आहेत. दोनशे फुटाच्या चरात कडुलिंबाची शंभर झाडे लावली आहेत. अत्यंत खडकाळ जमिनीत ही झाडे जोपासण्यात येत आहेत. उन्हाळ्यातील सिंचनासाठी त्यांना चुलत्यांनी घेतलेल्या सामूहिक शेततळ्याचा फायदा होत आहे. शेततळ्यात उन्हाळ्यात प्लॅस्टिक पेपरचा वापर करून टॅंकरचे पाणी साठविण्यात येते. सायफन पध्दतीने नळीच्या सहाय्याने ते फळझाडांना देण्यात येते. 

भाजीपाला पिकांची शेती 
पाखरे विविध प्रकारचा भाजीपाला घेत असल्याने सतत ताजा पैसा हाती राहतो. थोड्या थोड्या क्षेत्रात भाजीपाल्याचे क्षेत्र असते. सलग लागवडीबरोबरच मिश्र पध्दतीनेही भाजीपाला लागवड असते. अगदी बांधाच्या कडेनेही काही ओळी लावल्या असतात. फळझाडांच्या सावलीतही काही भाजीपाला असतो. कांदा, मिरची, वांगे यांसारखा भाजीपाला असतो. एकाच जागेत मिरची, कांदा व गवार अशी तीन पिके त्यांनी घेतली. मिरची हे त्यांचे मुख्य पीक आहे. 

विक्री व निश्‍चित ग्राहक 
भाजीपाला व चिंचाची विक्री ठरावीक ग्राहकांना होते. अनेक ग्राहक पाखरे यांनी बांधून ठेवले आहेत. सध्या कांदापातीची विक्री सुरू आहे. कांद्याच्या प्रतिजुडीला पाच रुपये दर मिळत आहे. पाखरे यांच्या शेतात सुमारे ३५ वर्षांचे चिंचेचे झाड आहे. त्यापासून वर्षाला १० ते १५ हजार रुपये उत्पन्न मिळते. चिंच फोडून त्याची अर्धा ते एक किलोची पाकिटे करून ती ठरलेल्या ग्राहकांना विकण्यात येतात. चिंचोके तव्यावर भाजून, त्याची टरफल काढून प्लॅस्टिक पाऊचमध्ये त्याचे पॅकिंग करतात. प्लॅस्टिकच्या एका पाऊचमध्ये पाच चिंचोके असतात. प्रति पाऊचला ते एक रुपया आकारतात. किराणा दुकानदार, टपरीवर त्यांची विक्री होते. 

चाऱ्यासाठी सुबाभुळ 
कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी (जालना) येथे मिळालेल्या ज्ञानाचा फायदा घेऊन जनावरांच्या चाऱ्यांसाठी सुबाभुळाची ३०० झाडे लावली आहेत. त्याची उंची चार फुटांवर स्थिर ठेवली आहे. आलेले फुटवे नियमित तोडून ते जनावरांना देण्यात येतात. त्यामुळे जनावरांना हिरवा चारा नियमित मिळतो.

चौदा जनावरांचा सांभाळ 
लहान-मोठ्या १० देशी गाई, दोन बैल, दोन गोऱ्हे अशी एकूण १४ जनावरे आहेत. पाखरे यांचा सेंद्रिय पध्दतीवरच अधिक भर आहे. त्यामुळे शेतीला शेणखत व गोमूत्र चांगल्या प्रकारे देणे शक्य होते. पहाटे पाच वाजता उठून गोमुत्राचे संकलन होते. ते कॅनमध्ये साठविण्यात येते. 

दोनदा जिंकले चांदीचे नाणे 
खरपुडी केव्हीकेतर्फे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मासिक चर्चासत्र असते. त्याला जिल्ह्याभरातून शेतकरी नित्यनियमाने हजेरी लावतात. कोणत्या विषयावर मार्गदर्शन ठेवायचे हे शेतकरीच ठरवतात. प्रत्येक चर्चासत्रात पाठीमागे झालेल्या सत्रातील विषयावर पाच प्रश्न शेतकऱ्यांना विचारण्यात येतात. जो शेतकरी पाचही प्रश्नांची उत्तरे अचूक देईल त्याला चांदीची नाणे बक्षीस दिले जाते. अशाप्रकारे पाखरे यांनी दोनवेळा चांदीची नाणे जिंकली आहेत. बारा वर्षांपासून त्यांनी चर्चासत्रला हजेरी लावण्याचा नेम ठेवला आहे. केव्हीकेशी संपर्क आल्याने शेती सुधारण्यास मदत झाल्याचे ते सांगतात. 

-  विनोद पाखरे,९०४९३९३०७० 
(लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...
पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...
बांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...
पुणे बाजार समितीत आवळा खातोय भाव,...‘क’ जीवनसत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि...
काजू, आंबा, कोकम प्रक्रिया उद्योगाची...नाधवडे (जि. सिंधुदुर्ग) येथील भालचंद्र भिकाजी...
जळगावचे उडीद मार्केट यंदा पोचले...उडीद उत्पादनात खानदेश अग्रेसर आहे. जळगावच्या...
पेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटापुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या...
दोडका पिकाने उंचावले अर्थकारणधामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत...
ग्रामपरिवर्तनाची दिशा दाखविणारे शेंदोळा...जन्म, मृत्यू, विवाहनोंदणी प्रमाणपत्र हवे असेल; तर...
साठ देशी गायींच्या संवर्धनाचा आदर्शपुणे जिल्ह्यातील मंचर येथील सोनेचांदीचे पारंपरिक...
अवर्षणग्रस्त माळरानावर फुलवली प्रगतशील...नगर जिल्ह्यात कायम अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील...
कृषी कौशल्य प्रशिक्षणांद्वारे उभी...केंद्र शासनाची प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना २....
शेती, शिक्षण अन ग्रामविकासामध्ये...समानता, स्वातंत्र्य आणि सहानुभूतीमुळेच व्यक्तीचा...
हळद पावडर उद्योगात तयार केली ओळखसांगलीची बाजारपेठ हळकुंड आणि हळद पावडरीसाठी देश-...
फळबागा केंद्रीत कोरडवाहू शेतीचा साधला...परभणी जिल्ह्यातील उजळंबा येथील प्रगतिशील शेतकरी...
सुरळीच्या अनुप यांनी जपली प्रयोगशीलता...अमरावती जिल्ह्यातील सुरळी (ता. चांदूरबाजार) येथील...