agriculture news in marathi success story of animal husbandry and poultry of farmer from solapur district | Agrowon

शेतीला मिळाली पशुपालन, पोल्ट्रीची जोड

सुदर्शन सुतार
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

अवघी अडीच एकर शेती. मात्र बाजारपेठ लक्षात घेऊन टोमॅटो, ढोबळी मिरची उत्पादनात  हातखंडा मिळविला. शेतीला पोल्ट्री, दुग्धव्यवसायाची जोड देत शाश्वत उत्पन्नाची हमी मिळवण्यामध्ये रानमसले (जि.सोलापूर) येथील सुधाकर दादाराव सिरसट यशस्वी झाले आहेत.
 

अवघी अडीच एकर शेती. मात्र बाजारपेठ लक्षात घेऊन टोमॅटो, ढोबळी मिरची उत्पादनात  हातखंडा मिळविला. शेतीला पोल्ट्री, दुग्धव्यवसायाची जोड देत शाश्वत उत्पन्नाची हमी मिळवण्यामध्ये रानमसले (जि.सोलापूर) येथील सुधाकर दादाराव सिरसट यशस्वी झाले आहेत.

सोलापूर-बार्शी महामार्गावरील वडाळा गावापासून ५ किलोमीटरवर उत्तर सोलापूर तालुक्यात रानमसले हे गाव आहे. हे गाव कांदा आणि भाजीपाला पिकासाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. साहजिकच अनेक प्रयोगशील शेतकरी या गावामध्ये आहेत. त्यापैकीच एक सुधाकर सिरसट. सुधाकर यांची घरची परिaस्थिती तशी बेताचीच. वडील दादाराव दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करत. सुधाकर यांनीही १९९६ मध्ये बारावीचे शिक्षण झाल्यानंतर वडिलांप्रमाणे मजुरी सुरू केली. लहानपणापासून त्यांना शेतीची आवड होती. पण घरची शेती नसल्याने मजुरीशिवाय पर्याय नव्हता. शेतीच्या आवडीने त्यांनी मजुरी करत १९९८ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठातून उद्यानविद्या पदविका घेतली. स्वतःची शेती घेण्याची त्यांची फार इच्छा होती. परंतु कौटुंबिक परिस्थितीत एवढे आर्थिक धाडस शक्य नव्हते. त्यामुळे मजुरी करणे एवढाच पर्याय त्यांच्यासमोर होता आणि तेच ते करत राहिले. 

शेतीचं स्वप्न झालं साकार 
सुधाकर हे कष्टाची तयारी असणारे व्यक्तिमत्त्व. उद्यानविद्या पदविकेनंतर त्यांनी शेळी-मेंढीपालन उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. पण त्यातून काहीच साध्य झाले नाही. शेवटी बँकेच्या साह्याने कर्ज घेऊन गावात सायकल दुकान आणि नंतर किराणा दुकान सुरू केले. नऊ वर्षे अशीच गेली. त्यातून चांगले पैसे मिळाले. उद्योगामध्ये चांगली पत निर्माण झाली. पत आणि पैशातून त्यांनी  शेतीचे स्वप्न अखेर साकारले. २००४ च्या सुमारास गावालगतच अडीच एकर शेती त्यांनी विकत घेतली. 

या शेतात पाण्याची काहीच व्यवस्था नव्हती. पण शेती घेतली, हा आनंद त्यांच्यासाठी मोठा होता. २००८ मध्ये शेतात कूपनलिका घेतली. नंतर शासनाच्या रोजगार हमी योजनेतून विहीर मिळाली, पाण्याची चांगली सोय झाली. सुधाकर यांनी कलिंगड, खरबूज, कांदा आणि भाजीपाला लागवड सुरू केली. या पिकात काही वेळा नुकसान झाले,तर काही वेळा फायदादेखील झाला. शेतीचा उत्साह त्यांनी काही केल्या कमी होऊ दिला नाही. शेती आणि पूरक व्यवसायाच्या दैनंदिन नियोजनामध्ये पत्नी सौ. सत्यशिला, आई प्रयागबाई, मुलगी गायत्री आणि मुलगा प्रसाद यांची चांगली मदत झाल्याने शेती व्यवस्थापनात फारसे मजूर त्यांना लागत नाहीत.

ढोबळी मिरची, टोमॅटोत हातखंडा
 गेल्या दहा वर्षांपासून सुधाकर सिरसट शेतीमध्ये स्थिरस्थावर झाले.  बाजारपेठेचा अंदाज घेत गेल्या सहा वर्षापासून ते एक एकरावर ढोबळी मिरची लागवड करत आहेत. सातत्यपूर्ण एकच पीक निवडल्याने त्यात त्यांचा हातखंडा झाला आहे. गाव परिसरातील ढोबळी मिरचीतील प्रगतिशील शेतकरी अशी त्यांची ओळख झाली आहे. दरवर्षी एकरी सरासरी ३० टनाचे उत्पादन घेतात. एकरी दीड लाखांपर्यंत मिरची व्यवस्थापनाचा खर्च येतो.

ढोबळी मिरचीचे नियोजन 

 • मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागवड. दोन ओळीत पाच फूट आणि दोन रोपात सव्वा फूट अंतर.
 • लागवडीच्या बेडमध्ये मिश्रखत, शेणखत, सूक्ष्मअन्नद्रव्यांचा बेसल डोस मिसळला जातो. त्यानंतर आच्छादन करून रोपांची लागवड. पाणी आणि विद्राव्य खतासाठी ठिबक सिंचनाचा वापर.
 • वाढीच्या टप्यात शिफारशीनुसार बुरशीनाशक, कीटकनाशकांची फवारणी. एकात्मिक कीड,रोग नियंत्रणावर भर. शेतामध्ये ठिकठिकाणी चिकट सापळ्यांचा वापर.
 • गरजेनुसार वाढीच्या टप्यात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर.
 • लागवडीनंतर ४५ दिवसांनी पहिला तोडा सुरू. दर आठ दिवसांनी तोड्यामध्ये सातत्य. गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर.
 • साधारणपणे नोव्हेंबर पर्यंत उत्पादन. एकरी ३० टनाची सरासरी.
 • जागेवरच हैद्राबाद, पुणे येथील व्यापाऱ्यांना विक्री. कोरूगेटेड बॉक्स आणि प्लॅस्टिक पिशवीमध्ये पॅकिंग.
 • प्रति किलो १० ते २० रुपये दरात सातत्य.

टोमॅटो नियोजन

 • गेल्या तीन वर्षांपासून सिरसट हे एक एकर टोमॅटो लागवड करत आहेत. एकरी ६५ ते ७० हजारांपर्यंत खर्च होतो. एकरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळते. 
 • मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमिनीची मशागत करून त्यामध्ये रासायनिक खत, शेणखत, सूक्ष्मअन्नद्रव्यांची मात्रा मिसळून बेसल डोस दिला जातो. 
 • दोन बेडमध्ये सहा फूट आणि दोन रोपात सव्वा फूट अंतर. बेडवर आच्छादन, ठिबककरून  रोपांची लागवड.  
 • रोपवाढीच्या टप्यात विद्राव्य खते, सूक्ष्मअन्नद्रव्यांचा ठिबक सिंचनातून वापर.
 • शिफारशीप्रमाणे कीडनाशकांचा वापर. एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर भर. चिकट सापळे, सेंद्रिय कीडनाशकांचा जास्तीत जास्त वापर.
 • लागवडीनंतर सव्वा दोन महिन्यांनी पहिल्या तोड्यास सुरुवात. दर चार दिवसाने तोडा, टप्याटप्याने उत्पादनात वाढ.
 • सप्टेंबर पर्यंत चांगले उत्पादन. त्यानंतर पिकाला पुन्हा विद्राव्य खतांची मात्रा देऊन पुढील बहर घेतला जातो. त्यामुळे  आणखी दोन महिने उत्पादनात सातत्य. 
 • एकरी ३५ ते ४० टन उत्पादनाचे ध्येय. विक्री मोडनिंब, शेटफळ येथील व्यापाऱ्यांना केली जाते. तेथून दिल्ली बाजारपेठेत टोमॅटो जातो. सरासरी ८ ते १५ रुपये किलो दर. सध्या मागणीत वाढ झाल्याने ३४ रुपयापर्यंत दर.
 • टोमॅटो काढणीनंतर यंदा प्रयोग म्हणून त्याच बेडवर कारले लागवडीचे नियोजन.

ॲग्रोवन मार्गदर्शक...

 • सुधाकर सिरसट हे शेती करण्यापूर्वी सायकल दुकान चालवायचे.त्यावेळी त्यांच्याकडे पेपर एजन्सीदेखील होती. गावातील शेतकऱ्यांना ते ॲग्रोवनचे वाटप करायचे. त्यामुळे दररोज शेतीविषयक माहिती त्यांना होत गेली. नवीन प्रयोग, शेतकरी आणि कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी संपर्क झाला. 
 • दहा वर्षापूर्वी गावातील शेतकऱ्यांना ॲग्रोवन वाटत होतो, आता त्याच दैनिकात स्वतःच्या शेतीमधील प्रयोगांची यशोगाथा प्रकाशित होत असल्याचा वेगळा आनंद आहे, असे सिरसट सांगतात. येत्या काळात भाजीपाला रोपवाटिका सुरू करण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.

शाश्वत उत्पन्नासाठी पशुपालन 

 • चार वर्षांपासून शेतीला दुग्धव्यवसायाची जोड.
 • मुक्त संचार पद्धतीचा गोठा. नऊ संकरित गाई आणि दोन खिलार गाईंचे संगोपन.
 • एक संकरित गाय प्रतिदिन ८ ते १० लिटर दूध देते. प्रतिदिन ४० लिटर दूध डेअरीला पाठवले जाते. 
 • जनावरांच्या संगोपनामुळे शेतीला पुरेसे शेणखत मिळते. दूध विक्रीतून ठरावीक दिवसांनी पैसा हाती येतो.

कोंबडीपालनाची जोड

 • यंदाच्या वर्षीपासून सुधारित गावरान कोंबड्यांचे संगोपन.
 • पोल्ट्री शेडची उभारणी. सध्या १००० कोंबड्यांचे संगोपन.
 • परिसरातील कोंबडीपालकाच्या सल्याने व्यवस्थापन.
 • दीड किलोची कोंबडी अडीचशे रुपये आणि कोंबडा साडेतीनशे रुपयांना जागेवर विक्री. 
 • एक-दोन दिवसाआड उत्पन्नाचा स्रोत सुरू.
 • वर्षातून तीन बॅचेचे नियोजन.

संपर्क-  सुधाकर सिरसट, ९७६३८७०५४७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
औरंगाबाद जिल्ह्यात करटोलीची व्यावसायिक...कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील...
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे...योग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
भात शेतीला मिळाली कुक्कटपालनाची जोडनिवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) येथील मारुती सहदेव...
शेळी, कोंबडीपालनातून बसवली शेतीची घडीनेमके काय करायचे याची स्पष्टता असली की शेती किंवा...
गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना...कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक...
शाश्वत ग्राम, शेती अन कौशल्य विकासावर भरशाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि...
एका वर्षात दुबार द्राक्ष काढणीचा ‘आरा...द्राक्षशेतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जोखीम वाढत...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...