मुखवासनिर्मितीतून अर्थकारणाला बळ

मुखवासनिर्मितीसाठी कच्च्या मालावर प्रक्रिया करताना अनिता महाजन आणि सहकारी महिला.
मुखवासनिर्मितीसाठी कच्च्या मालावर प्रक्रिया करताना अनिता महाजन आणि सहकारी महिला.

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जळगावमधील अनिता दगा महाजन यांनी जवस, तीळ, बडिशोप, ओवा मिश्रीत मुखवास निर्मिती लघुउद्योगाच्या माध्यमातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल केली आहे. या उद्योगात तीन  महिलांना बारमाही रोजगारही मिळाला आहे. शेतमाल प्रक्रिया उद्योगातून अनिता महाजन यांनी वेगळी ओळख तयार केली आहे.

अनिता आणि दगा महाजन हे दांम्पत्य मूळचे दहिवद (ता.अमळनेर, जि.जळगाव) येथील आहे. दगा यांचे वडील हिंमत हे काही वर्षांपूर्वी जळगावात स्थायिक झाले. ते जळगाव शहरात लसूण, जिरे आदींची हातविक्री करायचे. दगा यांची आई सुशीलाबाई यादेखील सुटे मसाले, जिरे आदी विक्रीसाठी जळगाव शहरातील विविध भागात जायच्या. कमी वयात दगा यांच्यावर घराची जबाबदारी आल्याने शिक्षण बारावीपर्यंत झाले. अनिता यांच्याशी विवाह झाल्यानंतर दगा यांनी मोठे बंधू बापू महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार पंधरा वर्षांपूर्वी तीळ, ओवा, जवस, बडिशोप यांचे मिश्रण असलेल्या मुखवासाची निर्मिती करून शहरात किरकोळ विक्री सुरू केली. अनिता या मुखवास निर्मिती करायच्या आणि दगा महाजन हे जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये मुखवासाची विक्री करायचे. मात्र काही वर्षांत बाजारपेठेची मागणी आणि प्रक्रिया व्यवसायातील संधी लक्षात घेता तो वाढविण्याचे नियोजन दगा महाजन यांनी केले. घरावरील ८०० चौरस फुटांच्या गच्चीवर त्यांनी मुखवास निर्मितीस सुरवात केली. 

वाढविला प्रक्रिया उद्योग   अनिता महाजन यांनी प्रक्रिया उद्योगासाठी घराच्या गच्चीवर छोटेखानी पत्र्याचे मजबूत शेड तयार केले. तेथे मुखवासासाठी लागणारा कच्चा माल भाजणे आणि प्रतवारी यंत्रणा आहे. घरातील एका खोलीत पॅकिंगची यंत्रणा बसविली आहे. प्रक्रिया उद्योग आणि पॅकिंगसाठी लागणाऱ्या यंत्रणेचा अभ्यास महाजन दांपत्याने केला. दगा महाजन यांचे बंधू बापू हे एका मसाले निर्मितीच्या लघुउद्योगात काम करतात. तेथील अनुभवाचा लाभ मुखवास निर्मितीच्या उद्योगासाठी झाला. अनिता महाजन यांनी कच्चा माल भाजणे व प्रतवारीची यंत्रणा कोल्हापुरातून आणली. तसेच विविध आकारांतील पुड्यांमध्ये मुखवास पॅकिंग लवकर व्हावे, यासाठी फरिदाबाद येथून स्वयंचलित यंत्रणा खरेदी केली. यासाठी सुरवातीला चार लाखांची गुंतवणूक करावी लागली. किरकोळ विक्रीमुळे या व्यवसायातील मार्केटींगची साखळी, आव्हाने याची जाणीव दगा यांना होती. त्यानुसार ग्राहकवर्ग वाढविला. 

पावसाळ्यात मुखवासावर प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर त्याची वाळवणूक नैसर्गिक अडचणींमुळे व्यवस्थितपणे करता येत नाही. अशा स्थितीत मुखवास निर्मितीचा वेग कमी होतो. जेव्हा वातावरण अनुकूल नसते तेव्हा कच्चा माल स्वच्छता व प्रक्रिया केलेल्या मुखवासाचे पॅकिंग केले जाते. अनिता महाजन यांच्या प्रक्रिया उद्योगामध्ये तीन महिलांना वर्षभर रोजगार मिळाला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कामकाज चालते. अनिता यांच्याकडे मुखवास निर्मिती, प्राथमिक प्रक्रियेची जबाबदारी आहे. पहाटेपासून सायंकाळपर्यंत त्या व्यस्त असतात. मुखवास निर्मितीसाठी जवस व तीळ पाण्याने भिजविले जात नाही. कारण त्याचा दर्जा घसरतो. मात्र ओवा भिजवून काळे मीठ, हळद लावण्याची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर योग्य प्रमाणात घटक घेऊन मुखवास निर्मिती केली जाते.

जिल्हा, परजिल्ह्यातही विक्री 

  • ग्राहक वाढल्याने महाजन यांनी फुले मार्केटमधील मुखवासाची किरकोळ विक्री बंद केली. आता फक्त घाऊक विक्री केली जाते. जळगाव शहरातील १०० किराणा दुकानांमध्ये मुखवास विक्री केली जाते. जळगाव शहरासह लगतच्या भागात माल पोच करण्यासाठी महाजन यांनी मालवाहू रिक्षा घेतली आहे. स्वतः दगा रिक्षा चालवितात. माल पोचविणे, नवे ग्राहक जोडणे, वित्तीय विषय दगा सांभाळतात. 
  • ग्राहकवर्ग शोधण्यासाठी अनिता महाजन जळगावात दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या बहिणाबाई महोत्सव व गिरणाई महोत्सवात ते मुखवास विक्रीसाठी स्टॉल लावतात. तसेच औरंगाबाद, जालना, नाशिक, बुलडाणा जिल्ह्यातील दुकानांमध्ये मुखवास विक्रीसाठी पाठवितात. तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके, मोठ्या गावांमध्ये मुखवास विक्रीसाठी पाठविला जातो. गेल्या काही वर्षांत प्रक्रिया व्यवसाय वाढत असल्याने जागाही अपुरी पडू लागली आहे. कच्च्या मालावर प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर तो वाळविण्यासाठी लगतच्या एका गच्चीचा उपयोग करतात. तसेच पुढे जागेची समस्या दूर करण्यासंबंधी जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये एक हजार चौरस फूट जागा महाजन यांनी घेतली आहे. या जागेत लवकर ते आपला लघुउद्योग सुरू करणार आहेत. 
  • ग्राहकांच्या मागणीनुसार पॅकिंग  मुखवासाचे पॅकिंग १५, ४०, ५० व ८० ग्रॅमच्या पाकिटात केले जाते. त्याचे दर पाच, १०, २०, ५० रुपये असे आहेत. पॅकिंगसाठीच्या पुड्यांचे रोल गुजरातमधून आणले जातात. मुखवाससाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच ओवा, जवस, तीळ, बडिशोप नंदुरबार, गुजरात व मध्य प्रदेशातून आणतात. या हंगामात तीळ १४० ते १५० रुपये, ओवा १८० ते २०० रुपये आणि जवस २०० रुपये प्रतिकिलो या दराने खरेदी करण्यात आले. कच्च्या मालाचा साठा जळगाव शहरातील एका शीतगृहात केला जातो. प्रक्रियेसाठी जेव्हा कच्च्या मालाची आवश्‍यकता असते, तेव्हा तो शीतगृहातून आणला जातो. यामुळे कच्चा माल किडी व इतर समस्यांपासून सुरक्षित राहतो. पाच टन कच्चामाल साठविण्यासाठी दर महिन्याला ते २३०० रुपये भाडे दिले जाते. हिवाळ्यात मुखवासाला चांगली मागणी असते. वीजबिल, कच्चा माल, मजुरी व इतर खर्च लक्षात घेता दर महिन्याला बऱ्यापैकी नफा या व्यवसायाच्या माध्यमातून मिळतो. 

    - अनिता महाजन,  ८००७७८७२१७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com