पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळ

पापड उद्योग निर्मितीमध्ये रमलेल्या आशा आणि रोहिणी पाटील
पापड उद्योग निर्मितीमध्ये रमलेल्या आशा आणि रोहिणी पाटील

कहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व रोहिणी पाटील या जावांनी घरची शेती संभाळत पापडनिर्मिती उद्योगातून अर्थकारणाला चांगली दिशा दिली आहे. या उद्योगातून दहा महिलांना कायमस्वरूपाची रोजगार मिळाला आहे  ‘वृंदावन पापड' या ब्रॅण्डने उडदासह, ज्वारी, नागली, तांदळाच्या पापडांची विक्री नंदुरबार, धुळे जिल्ह्यांसह नाशिक, पुणे, मुंबई येथे केली जाते.

कहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) हे शेतीप्रधान गाव, काळीकसदार जमीन या भागात आहे. कापूस  हे प्रमुख पीक, त्याचबरोबरीने पपई, रब्बी पिकांची लागवडदेखील वाढली आहे. या गावातील भगवान ओंकार पाटील यांच्याकडे पाच एकर शेती आहे. वीस वर्षांपूर्वी आशा यांच्याशी लग्न झाल्यानंतर पापड उद्योग सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भगवान यांचे शिक्षण गुजरातमध्ये झाले आहे. ते उत्तरचंदा (आणंद, गुजरात) येथे एका पापड उद्योगात १५ वर्षे कार्यरत होते. तेथे त्यांनी पापडाचे विविध प्रकार आणि बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास केला होता. या अनुभवाचा लाभ त्यांना गृह उद्योग सुरू करताना झाला. शहादा येथील खादी ग्रामोद्योग संस्थेने त्यांना २० हजार रुपयांचे कर्ज दिले. त्यातून त्यांनी मिक्‍सर आणि पल्व्हरायझर खरेदी केला. त्याचा उपयोग पापडासाठी पीठनिर्मितीसाठी केला जातो. या कर्जाची परतफेड त्यांनी केली आहे. पापडनिर्मिती उद्योगाची जबाबदारी आशा व त्यांच्या जाऊ रोहिणी पाटील या चांगल्याप्रकारे सांभाळतात. सध्या पापडनिर्मितीसाठी यंत्रणा नाही. त्यामुळे पापड लाटण्यासाठी त्यांनी दहा महिलांना रोजगार दिला आहे. २४ रुपये प्रतिकिलो या दराने महिलांना पापड लाटण्यासाठी मजुरी दिली जाते. एका महिलेला रोज किमान २०० ते २५० रुपये रोजगार मिळतो. संततधार पाऊस किंवा प्रतिकूल वातावरण असले तरच पापड लाटण्याचे काम बंद असते. आशा व रोहिणी पाटील पापडनिर्मितीचे काम घरीच करतात. भगवान पाटील यांना त्यांचे बंधू भरत आणि गणेश यांची पापड विक्रीसाठी मदत होते.

विविध चवीचे पापड   आशा व रोहिणी  पाटील यांनी बाजारपेठेतील मागणीचा विचार करून विविध आकार आणि प्रकारच्या पापडनिर्मितीस सुरवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने उडदामध्ये विविध चवीचे पापड आहेत. यामध्ये मेथी पापड, मिरी मसाला पापड, साधा उडीद पापड, ओला लसूण- ओली मिरची पापड, कोरडा लसूण लाल मिरची पापड, तिरंगा पापड असे प्रकार आहेत. याचबरोबरीने नागली, तांदूळ, ज्वारी पापडाची निर्मिती त्या करतात. तिरंगा पापड हे भाजता आणि तळता येतात. हा पापड लहान, मोठ्या आकारात उपलब्ध आहेत. सर्वाधिक मागणी उडीद, तांदूळ व नागली पापडांना असते. गुजराती पद्धतीने पापडांची निर्मिती केले जातात. मागणीनुसार कुरड्यांची निर्मितीदेखील केली जाते. हिवाळ्यात कुरडईनिर्मिती जास्त प्रमाणात होते.     पापडनिर्मितीसाठी दरवर्षी सुमारे १२ क्विंटल नागली, १२ क्विंटल तांदूळ, १५ क्विंटल ज्वारी आणि दर तीन महिन्यामध्ये १० क्विंटल उडदाची खरेदी केली जाते. दरवर्षी आठ ते दहा क्विंटल उडदाची गरज स्वतःच्या शेतातील उत्पादनातून पूर्ण केली जाते. गुजरातमधील नवसारी येथील बाजारातून तांदूळ आणि डांग (गुजरात) येथील बाजारातून नागलीची खरेदी करतात. जशी गरज असते तशी शहादा किंवा नंदुरबारच्या बाजारातून उडदाची खरेदी केली जाते. पापडाचे दर हे कच्च्या मालाची उपलब्धता, बाजारातील दर आणि मजुरीवर ठरविले जातात. साधा उडीद पापड १६० रुपये प्रतिकिलो, मिरी मसाला पापड १८० रुपये प्रतिकिलो, ओला लसूण ओली मिरची पापड २२० रुपये प्रतिकिलो, कोरडा लसूण लाल मिरची पापड २२० रुपये प्रतिकिलो, मेथी पापड २४० रुपये प्रतिकिलो, नागली २४० रुपये प्रतिकिलो, ज्वारी २४० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री केले जातात. पाटील यांना आपल्या पापड उद्योगाचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी गावामध्ये मजबूत शेड व पापडनिर्मितीसाठी यंत्रणा खरेदीचे नियोजन त्यांनी केले आहे.

विविध जिल्ह्यांत पापडाची विक्री  पापडनिर्मितीचे काम आशा व रोहिणी पाटील यांच्याकडे असते. विक्रीची जबाबदारी भगवान व गणेश पाटील पहातात. विविध गावांतील दुकानांच्यामध्ये पापड पोहोच करण्यासाठी भगवान पाटील यांनी एक चारचाकी वाहन घेतले आहे. नाशिक, पुणे येथे दर महिन्याला घरगुती व हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या पापडांची किमान ७५ किलो विक्री केली जाते. या शहरात खासगी बसमधून खरेदीदारांकडे पापड पाठविले जातात. मुंबई येथेही दर महिन्याला किमान ३५ किलो विविध पापडांची विक्री होते. खरेदीदार थेट बॅंक खात्यात पैसे जमा करतात. पापडांचा दर्जा, चव उत्तम असल्याने नाशिक, पुणे, मुंबईतील ग्राहक आपसूकच वाढले आहेत. पापड विक्रीसाठी भगवान स्वतः वहानाने धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार, तळोदा भागांत रोज जातात. या कामात भरत यांची मोठी मदत होते. गाव परिसरासह नाशिकमधील हॉटेलमधून नागली, उडीद पापडांना वाढती मागणी आहे.

हमीचा स्रोत अन्‌ शेतीलाही आधार पाटील  कुटुंबाच्या शेतीला सिंचनाची फारशी सोय नाही. शेतातून कडधान्ये आणि कापूस उत्पादन घेतल्यानंतर इतर हंगामात पाणीटंचाईमुळे लागवड करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतीला पापड उद्योगाची चांगली आर्थिक साथ मिळाली आहे. दर महिन्याला पापड उद्योगातून किमान वीस हजार रुपयांचा नफा मिळतो. याच व्यवसायाच्या बळावर मध्यंतरी पाटील यांनी शेतात कूपनलिका खोदली, परंतु अपेक्षित पाणी उपलब्धता झाली नाही. मुलांचे शालेय शिक्षण तसेच शेतीसाठी रासायनिक खते, मजुरी, बियाणे आदी वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी पापड उद्योगाचा मोठा आधार मिळाला आहे.

- आशा पाटील,  ९९२१६३०६७१  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com