केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक उत्पन्नाचे साधन

सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण शिवाजी धुमाळ यांची सुमारे नऊ ते १० एकर शेती आहे. आपल्या शेतात केळी पिकवण्याबरोबर काही वर्षांपूर्वी त्यांनी रायपनिंग चेंबरची उभारणी केली. परिसरात ५० हून अधिक शेतकऱ्यांकडून ते केळी खरेदी करून ती पिकवण्याची प्रक्रिया पार पाडतात. त्यांची विक्रीही करतात. त्याद्वारे शेतकऱ्यांसाठीही जागेवरच विक्री व्यवस्था तयार झाली आहे.
pravin dhumals banana orchard and his banana ripening chamber
pravin dhumals banana orchard and his banana ripening chamber

सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण शिवाजी धुमाळ यांची सुमारे नऊ ते १० एकर शेती आहे. आपल्या शेतात केळी पिकवण्याबरोबर काही वर्षांपूर्वी त्यांनी रायपनिंग चेंबरची उभारणी केली. परिसरात ५० हून अधिक शेतकऱ्यांकडून ते केळी खरेदी करून ती पिकवण्याची प्रक्रिया पार पाडतात. त्यांची विक्रीही करतात. त्याद्वारे शेतकऱ्यांसाठीही जागेवरच विक्री व्यवस्था तयार झाली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात केळीचे पीक घेतले जाते. तालुक्यातील अनवडी येथील प्रवीण शिवाजी धुमाळ हे प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांची नऊ ते १० एकर बागायत शेती आहे. यात ते हळद, ऊस व केळी ही प्रमुख पिके घेतात. पीकबदल म्हणून त्यांनी १५ वर्षांपूर्वी केळी घेण्यास सुरवात केली. ग्रॅंडनैन वाणाची उतीसंवर्धित रोपे आणून दोन एकरांत लागवड केली. व्यवस्थापन नेटके ठेवल्याने सरासरी २५ ते ३० किलो वजनाचा घड तयार करण्यापर्यंत त्यांचे कौशल्य पोचले.

विक्रीत आलेल्या अडचणी केळीची शेती चांगली होऊ लागली. पण विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कच्ची केळी मुंबई येथील व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला. अपेक्षित दर मिळत नव्हता. तरीही या पिकात सातत्य ठेवले. माल जास्त प्रमाणात असेल तर व्यापाऱ्यांकडून मालाची उचल चांगली होते व दरही चांगला मिळू शकतो हे लक्षात आले. मग परिसरातील शेतकऱ्यांचा कच्चा माल खरेदी करण्यास सुरुवात केली. स्वतःकडील व अन्य शेतकऱ्यांचा माल एकत्र करून विक्री केल्यामुळे दरातही सुधारणा होऊ लागली.

रायपनिंग चेंबरची उभारणी विक्रीचा प्रश्‍न मार्गी लागला असला तरी अंतिम टप्प्यात राहिलेला कच्चा माल घेतला जात नसल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी दिसून येऊ लागली. यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न धुमाळ यांनी सुरू केले. अभ्यास व शोधवृत्तीतून रायपनिंग चेंबरची उभारणी करण्याचे त्यांना सुचले. यासाठीचे आवश्यक ज्ञान घेण्यास सुरुवात केली. अन्य चेंबरला केळी नेऊन ती पक्व करून घेतली. यासाठी होणारा खर्च, वेळ याबाबत सविस्तर ज्ञान मिळवले. अखेर २०१६-१७ मध्ये चेंबरची उभारणी करण्याचे प्रयत्न फळास आले.

असे आहे रायपनिंग चेंबर

  • चेंबर सुमारे १५०० चौरस मीटर आकाराचा आहे.
  • यात चार विभाग (ब्लॉक्स) आहेत. प्रति विभागात पाच टन याप्रमाणे चार विभागांची मिळून २० टन क्षमता आहे.
  • चेंबर उभारणीसाठी सुमारे ३० लाख रुपये भांडवलाची गरज होती. त्यासाठी बॅंकेचे कर्ज काढले. चेंबरबाबत पूर्वमाहिती घेतल्याने ते सुरू करताना फारशा अडचणी आल्या नाहीत.
  • सुरुवातीच्या काळात प्रतिदिन एक ते दीड टन केळी पक्व केली जायची. टप्प्याटप्प्याने वाढ करत सध्या ती दोन टन व काही वेळा तीन टनांपर्यंत पक्व केली जाते.
  • केळ्यांना वर्षभर मागणी असल्याने हा व्यवसाय कायम सुरू राहतो. शिवशक्ती फ्रूट टेडर्स असे नामकरण केले आहे.
  • विक्री व्यवस्था

  • रायपनिंग चेंबरची सुविधा झाली तरी आपली विक्री यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे धुमाळ यांच्या लक्षात आले होते. अनेक शेतकऱ्यांनाही विक्रीमध्ये समस्या येत होत्या. मग वाई, बारामती तसेच परिसरातील शेतकऱ्यांकडील केळी घेण्यास सुरुवात केली. वाई बाजार समितीत त्यांनी गाळा घेतला आहे. येथील जबाबदारी बंधू संजय धुमाळ यांच्याकडे दिली आहे. येथून स्थानिक विक्रेत्यांना विक्री केली जाते. त्याचबरोबर सातारा येथील सात ते आठ हातगाडी विक्रेत्यांना केळी देण्यात येते. आपल्या वाहनातून ती पोहोच केली जाते. सुमारे ५० शेतकऱ्यांचे संपर्कजाळे धुमाळ यांनी तयार केले आहे. महिन्याला सुमारे ६० व काही प्रसंगी ७० टनांपर्यंत केळी पक्वतेची प्रक्रिया होते.
  • खर्च वजा जाता किलोमागे साधारण एक रूपया शिल्लक राहतो. सद्यःस्थितीत कोरोनाचा फटका काही प्रमाणात बसला आहे. त्यामुळे काही प्रमाणात केळी खराब झाली. त्यातूनही मार्ग काढत विक्रेत्यांपर्यंत केळी पाठवली जात आहे. शिल्लक माल आठवडी बाजार असणाऱ्या गावांत जाऊन कमी- अधिक दरांच्या फरकाने विकला. त्यामुळे माल खराब होण्याचे प्रमाण कमी झाले.
  • व्यवसायासाठी सहकार्य व्यवसाय उभारणीसाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य मिळाले आहे. अमोल धुमाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी मदत झाली आहे. शेतीत ऊस, केळी व हळद ही तीन मुख्य पिके आहेत. या शेतीला पूरक म्हणून रायपनिंग चेंबरचा व्यवसाय फायदेशीर ठरत असून तो बारमाही चालत आहे. तसेच स्थानिकांना यातून रोजगार मिळाला असल्याचे धुमाळ सांगतात.

    रायपनिंग चेंबर- महत्त्वाच्या बाबी

  • चेंबरमध्ये केळी पक्व करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागतो.
  • इथिलीन वायूद्वारे केळी पक्व केली जाते. साधारणपणे १८ तास ती हवाबंद ठेवली जाते.
  • साधारण १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान आवश्‍यक असते.
  • दर सहा तासांनी एक्सॉर्स्ट फॅनद्वारे आतील हवा बाहेर काढली जाते व बाहेरील हवा आत सोडली जाते.
  • चौथ्या दिवशी केळी बाहेर काढली जाते.
  • शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली केळीचे जागेवर किंवा ऑनलाइन पेमेंट केले जाते.
  • शेतकऱ्यांची बाग संपेपर्यत मालाची खरेदी केली जाते.
  • विक्रेत्यांना जागेवर पोच करण्यात येते. यासाठी दोन वाहने आहेत.
  • व्यवहार चोख ठेवले जात असल्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
  • शेतकऱ्यांना किमान सहा रुपये तर सर्वाधिक १५ रुपये प्रति किलोप्रमाणे दर आत्तापर्यंत देऊ केला आहे.
  • संपर्क- प्रवीण धुमाळ- ९८२२६१५३९५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com