शेती. शिक्षण, विकासकामांतून पुढारलेले भाटपुरा

भाटपुरा (जि.धुळे) गावाने सिंचनाचे शाश्‍वत स्त्रोत निर्माण होण्यासाठी जलसंधारणावर भर देत शिवार हिरवेगार केले. आरोग्य, मूलभूत सुविधा यावर सातत्याने गावातील मंडळी काम करीत आहेत. शेतरस्ते, निर्जंतुकीकरण, शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा नियमीत पुरवठा, वाय - फाय आणि स्पर्धा परीक्षांसाठी अद्ययावत अशी अभ्यासिका असे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम गावाने राबवले आहेत. शेतीसह, शिक्षणात गाव अग्रेसर आहे.
groundnut crop plot in bhatpura village
groundnut crop plot in bhatpura village

भाटपुरा (जि.धुळे) गावाने सिंचनाचे शाश्‍वत स्त्रोत निर्माण होण्यासाठी जलसंधारणावर भर देत शिवार हिरवेगार केले. आरोग्य, मूलभूत सुविधा यावर सातत्याने गावातील मंडळी काम करीत आहेत. शेतरस्ते, निर्जंतुकीकरण, शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा नियमीत पुरवठा, वाय - फाय आणि स्पर्धा परीक्षांसाठी अद्ययावत अशी अभ्यासिका असे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम गावाने राबवले आहेत. शेतीसह, शिक्षणात गाव अग्रेसर आहे. भाटपुरा (ता.शिरपूर, जि.धुळे) सातपुडा पर्वतापासून नजिक आहे. शिरपूर ही जवळची प्रमुख बाजारपेठ आहे. मुंबई-आग्रा महामार्ग, बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर राज्यमार्गाचा चांगला लाभ या गावाला होत आहे. गावातील शेतमाल गुजरात, मध्य प्रदेश व पुढे मुंबईपर्यंत लवकर पोचण्यास या मार्गांमुळे मोठी मदत होते. अनेर व तापी नदीच्या मध्यभागी हे गाव आहे. शिवारात काळी कसदार जमीन आहे. एकूण लोकसंख्या सुमारे साडेसात हजार असून शिवार ४५० हेक्‍टर आहे.

जलसंधारण अनेर प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ होतो. सातपुडा पर्वताकडून येणाऱ्या चार किलोमीटरच्या नाल्यावर १३ शिरपूर पॅटर्नच्या बंधाऱ्यांची निर्मिती गावाने केली आहे. प्रति बंधाऱ्यात पावसाळ्यात दोन हजार कोटी लीटर पाणी साठते. या बंधाऱ्यांमुळे लगतच्या शिवारातील विहिरी, कूपनलिकांच्या पुनर्भरणासाठी मोठी मदत झाली आहे. सुमारे २२५ हेक्‍टर क्षेत्राला पुरेसे पाणी उपलब्ध होऊन बारमाही बागायती वाढली आहे.

विकास मंचचा पुढाकार गावातील युवकांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी, पुस्तके गावातच उपलब्ध व्हावीत यासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्चून गावात अद्ययावत अभ्यासिका ग्रामपंचायतीच्या मालकीच्या इमारतीत उभारण्यात आली. भाटपुरा विकास मंचने त्यासाठी पुढाकार घेतला. या मंचची स्थापना डॉ.राधेश्‍याम चौधरी यांनी केली. या मंचमध्ये डॉ.प्रवीणकुमार देवरे (अतिरिक्त आयुक्त, पुणे पालिका), मधुकर पाटकर (विकास, पुणे), प्रकाश पाटील (पाटबंधारे विभागातील अभियंता), पांडुरंग पाटील (वन क्षेत्र अधिकारी), डॉ.रवींद्र देवरे (विक्रीकर, उपायुक्त, ठाणे), रमेश चौधरी (डाएट, अधिव्याख्याता, नंदुरबार) , अनिल बाविस्कर (केंद्र पर्यवेक्षक, शिरपूर), प्रदीप जाधव (सीए, पुणे) ही मूळची भाटपुऱ्याची मंडळी सहभागी आहेत. अभ्यासिकेत संगणक प्रयोगशाळा, १० वी ते स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके उपलब्ध आहेत. दरवर्षी असंख्य विद्यार्थी त्याचा लाभ घेतात. अत्याधुनिक व्यायामशाळाही स्थापन झाली आहे.

कापूस पिकात हातखंडा

  • गावचे कापूस प्रमुख पीक. दरवर्षी सुमारे ३४० हेक्‍टरपर्यंत लागवड
  • कृत्रीम जलसाठे मुबलक असल्याने पूर्वहंगामी क्षेत्र अधिक
  • देशी, सुधारित, बीटी कापूस वाणांना पसंती.
  • गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू केली जाते. यानंतर निश्‍चित वेळेत मर्यादित कीडनाशक फवारण्या, कामगंध सापळ्यांचा वापर. मित्रकिटकांच्या संवर्धनासाठीही कार्यवाही
  • काही शेतकरी जमीन आरोग्यपत्रिकेनुसार ठिबकद्वारे खते व पाण्याच्या कार्यक्षम वापरावर भर
  • कापूस वेचणीवरील खर्च कमी करण्यासाठी अनेक कुटुंबे घरच्या सदस्यांची मदत घेतात. त्यातून क्विंटलमागे ५०० रुपये वेचणीवरील खर्च कमी होण्यास मदत.
  • एकरी ११ क्विंटलपर्यंत सरासरी उत्पादकता
  • कापसाची बहुतांशी विक्री थेट खेडा खरेदीत. शिरपूर येथील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीतही चांगल्या दरात विक्री.
  • अलिकडील वर्षात उच्चशिक्षिक, कृषी पदवीधर युवक शेती व्यवसायात उतरले आहेत.
  • अन्य शेती

  • गावात पपईची शेती केली जाते. दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशातील खरेदीदार थेट शिवारातून खरेदी करतात. मागील दोन हंगामात दर्जेदार उत्पादनासंबंधी प्रति किलो सरासरी सात रुपये दर थेट जागेवरच मिळाला आहे.
  • कारली, मिरची, काकडी, गवार, भेंडी, टोमॅटो यांचीही शेती होते. दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. शिरपूर बाजार समितीतही शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी नेतात. रब्बीत बाजरी, मका, गहू ही पिके असतात.
  • अन्य उपक्रम

  • तीन प्रमुख रस्त्यांची मनरेगा योजनेतून निर्मिती. सुमारे १४ किलोमीटर त्यांची लांबी. उर्वरित लहान रस्त्यांची पाणंद रस्ते योजनेतून निर्मिती. त्यामुळे भाजीपाला, केळी शेती वाढत आहे.
  • संजय गांधी, श्रावण बाळ, विधवा वेतन आदी योजनांचा लाभ. १६८ जण योजनांपासून पात्र असताना वंचित असल्याचे दिसून आले. हे लक्षात घेवून संबंधित ग्रामस्थांची कागदपत्रे संकलित करणे, प्रशासनाकडे सादर करणे, पाठपुरावा करणे यासाठी ग्रामपंचायतीने नाममात्र शुल्क देवून एका युवकाची नियुक्ती केली. कामे गतीने पूर्ण होऊन संबंधितांना योजनांचा लाभ मिळत आहे.
  • सार्वजनिक पाणीपुरवठासंबंधीच्या जलकुंभाला कोरियन बनावटीची पाणी निर्जंतुकीकरण यंत्रणा
  • गावातील ४०० कुटुंबांना पाच रुपयात २० लीटर पाणी दिले जाते. यासंबंधी वॉटर एटीएम सुविधा.
  • जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतही पाणी शुद्धीकरण यंत्रणा.
  • प्राथमिक आरोग्य केंद्राचाही चांगला विकास. त्याचा लाभ गरजवंत रुग्णांना.
  • विधान परिषदेचे माजी आमदार अमरिश पटेल, शिरपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार काशिराम पावरा यांचे ग्रामपंचायतीला सहकार्य, मार्गदर्शन
  • ग्रामपंचायतीची अद्ययावत इमारत. आकर्षक प्रवेशद्वार.
  • स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व्यवस्थित. दाहिनी तयार केली. रस्त्याच्या दुतर्फा शासकीय योजनेतून १५०० झाडे. त्यांना ठिबकद्वारे सिंचन व्यवस्था
  • दीड किलोमीटर परिघासाठी वाय-फाय फ्री उपक्रम राबविला. मात्र तांत्रिक अडचण येत असल्याने उपक्रम मर्यादीत स्वरुपात.
  • स्वच्छतेवर भर देत कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र ड्रेस कोड. शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्यासाठी बायोमेट्रीक हजेरी प्रणाली.
  • गावाच्या विकासात प्रत्येक ग्रामस्थाचा सहभाग आहे. शेतीवर आधारित अर्थकारण लक्षात घेवून जलसंधारण, शेररस्ते विकास व अन्य कामांवर भर देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींचीही चांगली साथ मिळाल्याने विविध योजना गतीने राबविणे शक्‍य झाले. - शैलेश चौधरी (सरपंच), ९४२३५७२७८७

    संपर्क- डॉ.राधेश्‍याम चौधरी - ९४२२७७१४७४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com