गाजर उत्पादन, बियाणे निर्मितीत तयार केली ओळख

गाजर बुडक्यांची लागवड.
गाजर बुडक्यांची लागवड.

बाजारपेठेतील मागणी लक्षात घेत गेल्या पाच वर्षांपासून गावरान जातीचे गाजर उत्पादन, तसेच दर्जेदार बियाणे निर्मितीमध्ये कवलापूर (जि. सांगली) येथील बाजीराव पाटील यांनी वेगळी ओळख तयार केली आहे. दर्जेदार बियाणे उत्पादनाबरोबरीने बाजीराव पाटील शेतकऱ्यांना गाजर तसेच कोथिंबीर पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शनदेखील करतात.

सांगली- तासगाव राज्यमार्गावर वसलेले कवलापूर हे गाव गाजर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पादन मिळत असल्याने येथील शेतकरी एक एकरापासून ते तीन एकरांपर्यंत गाजर लागवड करतोच. गाजराची जागेवरून खरेदी होत असल्याचे व्यापाऱ्यांच्या स्पर्धेतून चांगले दर मिळतात. गाजर लागवडीच्या बरोबरीने काही शेतकरी ऊस, द्राक्ष लागवडदेखील करतात.  याच गावातील बाजीराव तुकाराम पाटील हे प्रयोगशील शेतकरी. त्यांचे बी.कॉम.पर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरीला सुरवात केली, याचबरोबरीने ते वडिलोपार्जित शेतीचे नियोजनही पहात होते. शेती व्यवस्थापनात आई श्रीमती यशोदा पाटील, पत्नी सारिका, मुलगा प्रज्वल, स्वराज यांची मदत होतीच. १९९५ मध्ये पाटील हे खासगी नोकरी करू लागले. त्या वेळी त्यांना महिना २,००० रुपये पगार होता. नोकरी असली तरी घरची आर्थिक परिस्थिती नाजूकच होती. दोन पैसे मिळवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पाटील यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती; पण पाणी नसल्याने पीक उत्पादन बेभरवशाचे. त्या वेळी ज्वारी लागवड असायची; परंतु यातून आर्थिक मिळकत फारच कमी, कसाबसा प्रपंच चालायचा. परंतु शेतीविकासाचे प्रयत्न पाटील यांनी सोडले नाहीत. पीक बदलाला सुरवात  साधारणपणे १९८० च्या दरम्यान बाजीराव पाटील यांच्या वडिलांनी बाजारपेठ लक्षात घेऊन गावरान जातीच्या गाजर लागवडीला सुरवात केली. मुळात पाण्याची कमतरता, परंतु दुसऱ्या शेतकऱ्यांकडून पाणी घेऊन त्यांनी गाजर लागवडीचे नियोजन केले. मात्र गाजर शेतीतून अपेक्षित नफा होत नव्हता, त्यामुळे त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन गाजर बियाणे उत्पादनाचा निर्णय घेतला. सुरवातीच्या काळात गाजराचा बियाणे प्लॉट केला, शेजाऱ्यांकडून पाणी घेतले. गाजर उत्पादन आणि बियाणे विक्री करून आर्थिक स्तर उंचावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु काही वर्षांत पाण्याची कमतरता जाणवू लागल्याने त्यांनी गाजर लागवड बंद केली. या दरम्यानच्या काळात परिसरातील शेती बदलत होती. केवळ शेतीत बदल करून चालणार नव्हते, दोन पैसे मिळावेत यादृष्टीने पाटील यांनी ऊस लागवडीचा निर्णय घेतला. सन २००४ पासून त्यांनी ऊस लागवडीस सुरवात केली. पाण्यासाठी कूपनलिका घेतली. त्यानंतर पाच एकरांत पाइपलाइन केली. शाश्वत पाण्याची सोय झाली. सुमारे दहा वर्षे ऊस शेती केली; परंतु उसाचा वाढता खर्च आणि पैसे मिळण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी, यामुळे प्रत्यक्ष नफा कमी राहू लागला. कोथिंबीर लागवडीतून वाढवला नफा

  •   तीन एकरांवर लागवड, जुलैपासून ते ऑक्टोबरपर्यंत हंगाम.
  •   वीस गुंठ्यांचा एक प्लॉट. दररोज ३०० ते ४०० पेंडीची विक्री.
  •   प्रतिपेंडी सरासरी ५ रुपये दर. हातविक्रीचा दर दहा रुपये पेंडी.
  •    कोथिंबीर लागवडीबाबत पाटील म्हणाले, की मी दरवर्षी तीन एकरांवर गावरान जातीच्या कोथिंबीरीची लागवड करतो. या जातीला स्वाद असल्याने चांगली मागणी असते. बाजारपेठेत कोथिंबीर दरात सातत्याने चढ-उतार असतात; परंतु हा धोका पत्करल्याशिवाय आर्थिक यश मिळत नाही. एकरी खर्च वजा जाता मला सरासरी वीस हजारांचा नफा मिळतो. काही वेळा तोटादेखील झाला आहे. माझ्या यशाचे गमक गाजर आणि कोथिंबीर पीक आहे, या पिकांच्या उत्पन्नातून शेती मशागतीसाठी मी लहान ट्रॅक्टर घेतला आहे.

    गाजर शेतीला सुरवात  बाजारपेठेतील गावरान जातीच्या गाजराची मागणी लक्षात घेऊन पाटील यांनी गाजर लागवड आणि बियाणे उत्पादनाला नव्याने सुरवात केली. याबाबत ते म्हणाले, की वडिलांमुळे गाजर लागवड आणि बियाणे निर्मितीची माहिती होतीच. मी २०१४ पासून पुन्हा गाजर लागवडीकडे वळलो. लागवडीच्या बरोबरीने हळूहळू गाजर बियाणे निर्मितीस सुरवात केली. वडिलांच्या काळापासून शेतकऱ्यांना बियाणे निर्मितीची माहिती असल्याने विक्रीसाठी पुन्हा फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत. शेतकरी आमच्याकडे बियाणे उपलब्धीबाबत विचारणा करायचे, त्यामुळे बियाणे विक्री वाढू लागली. गाजर लागवड, बियाणे उत्पादन  अ) गाजर लागवड क्षेत्र ः चार एकर 

  •   दोन टप्प्यात गाजर लागवड. पहिला टप्पा १५ ते २० सप्टेंबर, दुसरा टप्पा ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर. 
  •   जमिनीची मशागत करून शेणखत, रासायनिक खते मिसळून बियाणे विस्कटून पेरणी, त्यानंतर सरी आणि वाकुरे केले जातात. पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन.
  •   बाजारपेठेच्या मागणीनुसार डिसेंबरपासून ते एप्रिलपर्यंत काढणी. व्यापाऱ्याला थेट विक्री. खर्च वजा जाता एकरी साठ हजारांचा नफा.
  • ब) गाजर बियाणे उत्पादन क्षेत्र ः एक एकर 

  •  एकरी दोन ट्रॉली शेणखत मिसळून जमीन तयार केली जाते. पंधरा ते तीस डिसेंबर दरम्यान गाजराच्या बुडख्यांची लागवड.
  •  लागवडीसाठी वाफा पद्धतीचा अवलंब. लागवडीपूर्वी वाफ्यात एकरी ५० किलो डीएपी मिसळले जाते.
  •  बियाणेनिर्मितीसाठी लाल रंगाच्या लांब गावरान गाजराच्या बुडक्यांचा वापर.
  •  एकरी सरासरी २०० वाफे. एक वाफा १५ बाय ८ फूट आकाराचा.
  •  वाफ्यात दोन बुडक्यांतील अंतर २ फूट, दोन ओळींतील अंतर २ फूट.
  •  एका वाफ्यात ४० बुडक्यांची लागवड. एकरी ८ ते १० हजार बुडक्यांची लागवड.
  •  पिकाच्या गरजेनुसार पाणी नियोजन. दर पंधरा दिवसाला पाणी. एकूण सहा ते सात पाण्याच्या पाळ्या.
  •   सर्व कुटुंब शेतीत राबते, त्यामुळे फारसे मजुरांवर अवलंबून राहावे लागत नाही.
  •   एप्रिल-मे महिन्यात बियाणे उत्पादन. एकरी २५ हजार रुपये बियाणे उत्पादन खर्च.
  •   बियाणे विक्री ः सोलापूर, बक्षीहिप्परगी, डोंबरजवळगे, सौंदत्ती, संकेश्वर, विजापूर.
  • शेतकऱ्यांकडून वाढती मागणी

    बियाणे विक्रीबाबत पाटील म्हणाले, की बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही लागवडीबाबतदेखील तांत्रिक मार्गदर्शन करतो, त्यामुळे आमच्याबाबत विश्वास तयार झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा बियाणे खरेदी करण्यासाठी येताना आणखी दोन नवीन शेतकरी घेऊन येतात. गावातील संजय तोडकर, सचिन पाटील, सुभाष पाटील, बबन गावडे, चंद्रकांत लाडे, प्रकाश पाटील, विनायक संकपाळ हे माझे शेतकरी मित्र बियाणे विक्रीसाठी मला मदत करतात. बियाणे खरेदी करताना काही शेतकरी मला म्हणतात, की तुमचे बियाणे महाग आहे, कमी दरात द्या; परंतु बियाणे गुणवत्ता चांगली असल्याने मी दरात तडजोड करत नाही. बियाण्याची खात्री देतो. मी स्वतः शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करतो, त्यामुळे पिकाबद्दल खात्री पटते.

    -  बाजीराव पाटील, ९३२५९६३८३८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com