agriculture news in marathi success story of cashew grower farmer from mhalunge village district sindhudurg | Agrowon

पडीक जमिनीत फुलवली साडेतीन हजार झाडांची काजूबाग

एकनाथ पवार
गुरुवार, 4 जून 2020

माहुळंगे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील अनिल साटम यांनी अत्यंत बिकट व पडीक अशा जमिनीत काजू लागवड यशस्वी केली आहे. त्यांच्याकडे सुमारे साडेतीन हजार झाडे आहेत. त्यांच्यापासून एकूण १४ ते १९ टनांपर्यंत उत्पादन ते घेऊ लागले आहेत. काजू बियांची विक्री करण्यापेक्षा प्रक्रिया करून काजूगराची विक्री करून नफ्यात त्यांनी मूल्यवृद्धी केली आहे.
 

माहुळंगे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील अनिल साटम यांनी अत्यंत बिकट व पडीक अशा जमिनीत काजू लागवड यशस्वी केली आहे. त्यांच्याकडे सुमारे साडेतीन हजार झाडे आहेत. त्यांच्यापासून एकूण १४ ते १९ टनांपर्यंत उत्पादन ते घेऊ लागले आहेत. काजू बियांची विक्री करण्यापेक्षा प्रक्रिया करून काजूगराची विक्री करून नफ्यात त्यांनी मूल्यवृद्धी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला आंबा, काजू, नारळ तसेच एकूणच निसर्गाचे वरदान लाभले आहे. येथील शेतकरी हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध फळबागांचे उत्पादन घेत असतात. माहुळंगे (ता. देवगड) येथील अनिल बाळकृष्ण साटम हे त्यापैकीच एक शेतकरी होत. शिरगाव-फणसगाव मार्गावर असलेल्या या गावातील साटम यांचे पत्नी आणि दोन मुले यांच्यासहितचे कुटुंब आहे. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनाही मुंबईत उदरनिर्वाहाच्या अनुषंगाने जाण्यासाठी घरातील मंडळी आग्रह करू लागली. परंतु साटम यांना लहानपणापासून शेतीतीच ओढ होती. वडिलोपार्जित ५० एकर जमीन असताना आपण मुंबईला का जायचे असा विचार करून त्यांनी शेतीतच प्रगती करण्याचे ठरवले. वडील, काका यांनी लागवड केलेली अनेक आंबा झाडे बागेत होती. साटम यांनीही साडेतीनशेच्या आसपास त्यात भर घातली. आई-वडिलांच्या शेतीतील अनुभवाचाही फायदा झाला.

काजू लागवडीचा निर्णय

  • सुरुवातीला एक दोन वर्षे राबल्यानंतर केलेला खर्च आणि मिळणारे उत्पादन यांचा मेळ दिसला नाही. मिळणारा नफा तुटपुंजा होता. सन २००१ मध्ये तर आंबा बागेतूनही म्हणावे तसे उत्पन्न मिळाले नाही. मग काजू पिकाचे अर्थकारण तपासले. लागवडीचा निर्णय घेतला. दरम्यान काजूच्या वेंगुर्ला ७ या वाणाची रोपे जिल्हयात लागवडीसाठी उत्कृष्ट असल्याची चर्चा सुरू होती. अधिक अभ्यासाअंती सुरुवातीला ११० झाडांची लागवड केली. त्यानंतर २००५ मध्ये १५ एकरांत त्याचा विस्तार केला.
  • काजूची ही बाग घरापासून चार किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात आहे. यातील चार किलोमीटरपैकी दीड किलोमीटरची पायवाट तर अतिशय खडतर आणि बिकट होती. परंतु पडीक जमीन लागवडीखाली आणण्याचा साटम यांनी चंगच बांधला होता. अनुभव येत गेला तसा ते लागवड वाढवत गेले. आजमितीला काजूची साडेतीन हजार झाडे आहेत. त्यापैकी सुमारे दोनहजार झाडे १५ वर्षे वयापूर्वीची आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लागवड झालेली झाडे आहेत.
  • सन १९९८ मध्ये अकरावी इयत्तेत शिकत असताना साटम यांनी ३० काजूरोपांची लागवड केली होती. रोपे लावलेल्या ठिकाणी पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. मात्र महाविद्यालयातून आल्यानंतर झाडांना पाणी देणे, खते देणे, यापासून कुंपण करण्यापर्यंतची सर्व कामे ते नियमित करीत. कष्टाचे फळ त्यांना आज मिळते आहे.

सुमारे १९ टनांपर्यंत उत्पादन
साटम सांगतात की काजूचे उत्पादन सुमारे चार वर्षांपासून सुरू होते. मात्र गुंतवलेले भांडवल व व्यावसायिक उत्पादन यांचा विचार करता सहा ते सात वर्षे जावी लागतात. आता बहुतांश झाडे उत्पादनक्षम होत आहेत. काजूच्या पानांचा सडा जमिनीवर मोठ्या प्रमाणात पडतो. त्याचे उत्तम खत वापरात येते. त्यासोबतही रासायनिक खतांची मात्रा वेळेत दिल्याने झाडांनी चांगले उत्पन्न देण्यास सुरुवात केली. एकरी सुमारे ८० झाडे बसतात. मात्र आमच्याकडे ती शंभरपर्यंत आहेत. मोठी झाडे प्रति १२ किलोनुसार उत्पादन देतात. गेल्या तीन वर्षांच्या काळात एकूण झाडांपासून १४ टनांपासून ते १९ टनांपर्यंत उत्पादन साटम घेऊ लागले आहेत.

काजूगराची विक्री

  • साटम सांगतात की काजूचे बी विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून विक्री केल्यास अधिक नफा म्हणजे सुमारे ३० टक्के अधिक नफा मिळतो. गावातीलच एका कारखान्यातून ही प्रक्रिया करून घेण्यात येते.
  • एक किलोपासून ते २०० ग्रॅम वजनाची पाकिटे तयार करण्यात येते. साटम यांचे बंधू मुंबई येथे असतात. त्यांच्या मदतीने काजूगरांची विक्री मुंबई येथील व्यापाऱ्यांना करण्यात येते.
  • काजू बी विकली असती तर सरासरी दर किलोला १३० रुपयांपर्यंत मिळाला असता. परंतु काजूगराला हा दर किलोला ८०० रुपये मिळतो असे साटम सांगतात. पक्व झालेल्या बोंडापासूनच काजू घेत असल्याने त्याला वेगळा नैसर्गिक स्वाद असतो. त्यामुळेच अधिक दर मिळतो. पुढील काळात प्रकिया युनिट सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
  • कोरोनामुळे यावर्षी लॉकडाऊनचे संकट होते. तसेच मध्येच पाऊसही झाला. मध्यस्थांनी काजू बीचे दर १४० रुपयांवरून ७० ते ८० रुपयांपर्यंत खाली आणले होते. त्यामुळे काजू बागायतदार हवालदिल झाले. साटम यांचा काजू विक्रीसाठी अद्याप तयार व्हायचा आहे. मात्र दर्जा उत्तम असल्याने सर्व काजूला मुंबईतील व्यापाऱ्यांकडून मागणी असल्याचे ते सांगतात.

अन्य पिके
काजू हे प्रमुख पीक असले तरी आंबा, कोकम, नारळ आदींचेही उत्पादन घेण्यात येते. खरिपात भात लागवड असतेच. गेल्यावर्षी थोड्या क्षेत्रापुरता बासमती भाताचा प्रयोग त्यांनी केला होता. घरगुती वापरांसाठी नाचणी, मिरची, पालेभाज्या देखील पिकविण्यात येतात. त्यातून अन्नाबाबत स्वयंपूर्णतः मिळवणे शक्य होते. दोन गायी, एक म्हैस आहे. त्याचे दूध उपलब्ध होतेच. शिवाय शेणखतही उपलब्ध होते. साटम वेगवेगळ्या प्रयोगांत व्यस्त असतात. आंब्याच्या झाडांवर मिरी लागवडीचाही त्यांनी प्रयोग केला आहे. आम्रपाली, रत्ना, केशर आणि दशेहरी या जातींचे आंबे त्यांच्याकडे पाहण्यास मिळतात.

शेतीतून प्रगती
साटम यांनी शेतीतील उत्पन्नातून प्रगती साधताना ट्रॅक्टर तसेच चारचाकी खरेदी केली. त्यावर अभिमानाने शेतकरी असे लिहिले आहे. काजू साठवण करून ठेवणे आणि नियोजतील प्रकिया युनिट उभारण्यासाठी १० लाख रुपये खर्चून मोठी इमारत बांधली आहे. दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले आहे. चारचाकी गाडी खरेदी केली आहे. साडेतीन हजार झाडांची देखभाल करण्यासाठी दररोज १२ स्थानिक कामगार कायमस्वरूपी काम करतात. याशिवाय काजू बी गोळा करण्यासाठी आणखी १० ते १२ स्थानिक मजुरांना रोजगार मिळतो.

संपर्क- अनिल साटम, ९४०५७२८३३६


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...
दुग्धप्रक्रिया उद्योगातून कमावला...सांगली येथील माळी कुटुंबीय गेल्या काही...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
फिरत्या प्रक्रिया उद्योगाची राबवली...लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा...
पोल्ट्रीसह खाद्यनिर्मितीतून व्यवसायात...परभणी येथील प्रकाशराव देशमुख यांनी केवळ शेती...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...
सेंद्रिय भाजीपाला, केळीसह मूल्यवर्धित...कोल्हापूर जिल्हा म्हटलं की ऊस आणि भात शेती समोर...
विदर्भामध्ये कडधान्य, फळबाग, भाजीपाला...विदर्भात कापूस, सोयाबीन, संत्रा या पारंपरिक...
सिंधुदुर्गात काजू लागवड, प्रक्रिया...डोंगर-उताराची जमीन, पोषक वातावरण, काजू बीचे...