agriculture news in marathi success story of cashew processing unit of mr. chandrakant mandavkar from chafe village district ratnagiri | Agrowon

काजू प्रक्रिया उद्योगात तयार केली ओळख

राजेश कळंबटे
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर काजू बी प्रक्रिया उद्योगातून उदरनिर्वाह करताना गावातील लोकांना रोजगाराची संधी मिळवून देण्यात चाफे (ता.जि.रत्नागिरी) गावातील चंद्रकांत महादेव मांडवकर यशस्वी ठरले आहेत.  

व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर काजू बी प्रक्रिया उद्योगातून उदरनिर्वाह करताना गावातील लोकांना रोजगाराची संधी मिळवून देण्यात चाफे (ता.जि.रत्नागिरी) गावातील चंद्रकांत महादेव मांडवकर यशस्वी ठरले आहेत.बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी पारंपरिक काजू गराबरोबरीने खारा, मसाला चवीच्या काजू गर निर्मितीमध्ये वेगळी ओळख तयार केली आहे.

चाफे (ता.जि.रत्नागिरी) गावामध्ये चंद्रकांत मांडवकर यांचा काजू प्रक्रिया उद्योग आहे. चंद्रकांत यांचे वडील महादेव मांडवकर हे रोहा (जि.रायगड) येथे खासगी कंपनीत कामाला होते. त्यामुळे त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण तिकडेच झाले. मुलगा इंजिनिअर व्हावा अशी वडिलांची इच्छा होती; परंतु कृषी क्षेत्राची आवड असल्यामुळे चंद्रकांत यांचा कल शेतीकडे होता. रत्नागिरी जिल्ह्यातील चाफे गावामध्ये वडिलोपार्जित जमीन होती. १९९५ मध्ये महादेव मांडवकर हे चाफे गावी परतले. मुलाने व्यावसायिक व्हावे असा त्यांचा प्रयत्न होता. चर्चेतून काजू प्रक्रिया उद्योगाची संकल्पना पुढे आली. यातून १९९८ मध्ये मांडवकर यांनी घरामध्ये प्राथमिक स्तरावर काजू प्रकल्प सुरु केला.

बारावी सायन्सपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चंद्रकांत मांडवकर यांनी काजू प्रक्रिया उद्योग सुरु करण्यापूर्वी वेंगुर्ले येथील एका खासगी काजू कारखान्यात सहा महिने प्रशिक्षण घेतले. काजू बी वर प्रक्रिया करण्यापूर्वी काय करावे लागते, गुणवत्ता कशी सांभाळायची,  विक्रीचे नियोजन कसे करायचे याबाबत सविस्तर अभ्यास केल्यानंतर स्वतःच्या घरी काजू प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली. प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत त्यांना अनुदान मिळाले. 

काजू प्रक्रिया उद्योगाला सुरूवात 

  • मांडवकर यांनी १९९८ मध्ये घरगुती स्तरावर काजू प्रक्रिया उद्योगाला सुरवात केली. यासाठी गाव परिसरातील काजू बागायतदारांकडून गावठी आणि वेंगुर्ला जातीची काजू बी प्रक्रियेसाठी खरेदी केली. पहिल्या वर्षी चार टन काजू बी वर प्रक्रिया करण्यात आली. उत्पादित काजू गराला बाजारपेठेत चांगली मागणी मिळाल्याने त्यांनी प्रक्रिया उद्योग वाढीला चालना दिली.
  • काजू प्रक्रिया उद्योगाच्या कामकाजाबाबत चंद्रकांत मांडवकर म्हणाले की, काजू बी खरेदीला फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यात सुरवात होते. ही खरेदी १० जून पर्यंत चालते. चाफे गावासह आजूबाजूच्या गावातील गावठी काजू, वेंगुर्ला-४ आणि वेंगुर्ला-७ या जातीच्या बियांची खरेदी केली जाते.
  • जूननंतर पुढे आठ महिने काजू प्रकिया उद्योग सुरु ठेवायचा असल्याने खरेदी केलेली काजू बी एप्रिल-मे महिन्यात उन्हात चांगली वाळवली जाते. वाळविलेली काजू बी गोदामामध्ये योग्य पद्धतीने साठविली जाते. काजू बी वर प्रक्रिया केल्यास गावठी काजू बी मधून २५ ते २८ टक्के आणि वेंगुर्ला जातीच्या बियातून २५ ते ३० टक्के गर मिळतो.

कुटुंबाची मिळाली साथ 
काजू प्रक्रिया उद्योगाचा पाया चंद्रकांत यांच्या वडिलांनी रचला. घरगुती स्तरावर सुरू झालेल्या या उद्योगाने आता व्यावसायिक स्वरूप घेतले आहे. या प्रक्रिया उद्योगामध्ये चंद्रकांत यांना त्यांच्या आई सुभद्रा आणि पत्नी सौ. चित्रा यांची चांगली साथ मिळाली आहे.  काजू बी फोडण्यापासून ते प्रतवारीच्या नियोजनात या दोघींचा चांगला सहभाग असतो. त्यामुळे काजू गराची गुणवत्ता राखण्यास चांगला फायदा झाला आहे.  

दर्जेदार काजू निर्मिती 

  • काजू गर निर्मितीबाबत चंद्रकांत मांडवकर म्हणाले की, पहिल्यांदा काजू बी ९० ते १०० अंश सेल्सिअस तापमानाला बॉयलरच्या वाफेवर भाजली जाते. त्यानंतर ती कटिंग करण्यासाठी येते. आम्ही पहिली दोन,चार वर्षे हाताने काजू बी कटिंग करत होतो. आता कटिंगसाठी इलेक्ट्रीक यंत्रणेचा वापर करतो. या यंत्राच्या वापरातून काजू गर वेगळा केला जातो. यानंतर काजू गर ७० अंश सेल्सिअस तापमानाला आठ तास वाळविला जातो. त्यानंतर पिलींग करून त्याची टरफले काढली जातात.
  • काजू गर तयार झाल्यानंतर प्रतवारी महत्त्वाची असते. काजू गराची आठ वेगवेगळ्या प्रकारात प्रतवारी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने  डब्ल्यू १८०, २१०, २४०, २८०, ३२०, ४०० असे प्रकार असतात. डब्ल्यू १८० ग्रेडमध्ये ४६ ग्रॅममध्ये १८ काजू गर बसतात. प्रतवारी केलेले काजू गर हे यंत्राद्वारे पॅकिंग केले जातात. बाजारपेठेच्या मागणीनुसार पाव किलो ते पाच किलोपर्यंतच्या पिशव्यांमध्ये काजू गराचे पॅकिंग केले जाते.
  • होलसेल बाजारपेठेत काजू गराच्या प्रतवारीनुसार प्रति किलोस ६०० ते १००० रुपयांपर्यंत दर मिळतो. बाजारपेठेनुसार या दरात बदल होत राहतात. वर्षभरात काजू प्रक्रिया उद्योगामध्ये तीस ते चाळीस लाखांची उलाढाल होते. काजू बी खरेदी, प्रक्रिया उद्योगात कामगारांची मजुरी, वीज बिल, वाहतूक खर्च यासाठी येणारा खर्च वजा जाता बाजारपेठेतील दरानुसार २५ ते ३० टक्के नफा  मिळतो.
  • या प्रक्रिया उद्योगामध्ये गावातील दहा जणांना कायमस्वरूपी रोजगार दिला आहे. काजू बी फोडणे, प्रतवारी करणे यासाठी गरजेनुसार गावातील लोकांना रोजगार दिला जातो, असे मांडवकर सांगतात. 

विविध शहरात काजू विक्री 
प्रक्रिया केलेल्या काजू गराला देशभरातील बाजारपेठेत चांगली मागणी आहे.  काजू गराच्या दर्जानुसार ग्राहक शोधण्याचे आव्हान असते. गणपतीपुळे हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. हे लक्षात घेऊन तेथील दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांच्याशी संपर्क साधून मांडवकर यांनी काजूगरासाठी बाजारपेठ शोधली. १९९८ मध्ये पहिल्या वर्षी चाफे परिसरातच काजू गराची विक्री झाली. त्यानंतर रत्नागिरी शहरातील दुकानदारांबरोबर त्यांनी समन्वय साधला. हळूहळू मुंबई, पुणे, रायगड जिल्ह्यातील दुकानदारांशी संपर्क साधत त्यांनी बाजारपेठेचा विस्तार केला. दरवर्षी किमान ३० टन काजू बी वर प्रक्रिया केली जाते.

टरफलांपासून तेल निर्मिती 
काजू गर काढल्यानंतर राहिलेल्या काजू टरफलांची विक्री परिसरातील तेल निर्मिती कंपनीला केली जाते. एक किलो टरफलांना सरासरी ४ ते ५ रुपये दर मिळतो. एक टन काजू बी वर प्रक्रिया केल्यावर त्यापासून ७५० किलो टरफले निघतात. टरफलांच्या विक्रीतूनही एक लाखापर्यंत मिळकत होते. 

काजूचे नवीन फ्लेवर्स 
काजू बी वर प्रक्रिया केल्यानंतर साध्या काजूगराबरोबरच बाजारात मागणी असलेल्या खारा आणि मसाल्याच्या चवीचा काजू गर मांडवकर तयार करतात. हॉटेलमध्ये याला चांगली मागणी आहे. येत्या काळात बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन विविध स्वादाचे काजू गर निर्मितीचे नियोजन मांडवकर यांनी केले आहे. 

संपर्क- चंद्रकांत मांडवकर, ८००७२९२३६२,७५१७२५८३६१


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
बिजोत्पादनातून ‘गौरीनंदन’ची उलाढाल...नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील...
पूरक व्यवसायातून स्वयंपूर्णतेचा धडादुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि परसबागेतील...
परसातील ‘ग्रामप्रिया’ कोंबडीपालन...औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील काही...
‘व्हर्जिन कोकोनट ऑइल’ अन सुकवलेली पावडरसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील अभिजित...
अभ्यासू, प्रयोगशील द्राक्षबागायतरांचे...महाराष्‍ट्रातील द्राक्ष बागायतदार अत्यंत...
कष्टपूर्वक नियोजनबध्द विकसित केली...परभणी येथील मिलिंद डुब्बेवार यांनी व्यावसायिक...
यांत्रिकीकरणातून होताहेत आदिवासी आर्थिक...पालघर जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी पाड्यांतील...
पंडागे कुटुंबाची भाजीपाला शेतीत कुशलतापारंपरिक पिकांच्या जोडीने कानशिवणी (जि. अकोला)...
शेळीपालन, मळणीयंत्र व्यवसायातून बसवली...पडसाळी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथील...
शाळेबरोबरच शेतीमध्येही उपक्रमशीलजळगाव येथील शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी आपले...
महिला बचत गटांची दुग्धव्यवसायात भरारीखडकूत गावातील बचतगटांना महिला आर्थिक ...
शेतीला मिळाली शेळीपालनाची साथशिंदेवाडी(ता.करवीर,जि.कोल्हापूर) येथील पंकज...