विदर्भात रूजतोय काबुली हरभरा

उटी (जि.यवतमाळ ) येथील विनोद मैंद यांचे बहरलेले हरभरा पीक.
उटी (जि.यवतमाळ ) येथील विनोद मैंद यांचे बहरलेले हरभरा पीक.

काबुली हरभऱ्याला देशभरातील बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे विदर्भात गेल्या काही वर्षांत पारंपरिक हरभऱ्याच्या तुलनेत काबुली हरभऱ्याचे क्षेत्र वाढीस लागले आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती जिल्ह्यांत काबुली हरभऱ्याच्या क्षेत्रासोबतच बाजारपेठेचाही विस्तार होत आहे. राज्य, परराज्यांतील व्यापारी या बाजारपेठेत हरभऱ्याच्या खरेदीला येत असल्याने शेतकऱ्यांना दरही चांगला मिळू लागला आहे. 

गेल्या काही वर्षांत अमरावती, अकोला, धामणगाव रेल्वे येथील बाजार समिती या साध्या हरभऱ्याच्या बरोबरीने काबुली हरभऱ्याच्या खरेदी विक्रीची मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपास आल्या आहेत. विदर्भात काबुली हरभऱ्याची सर्वाधिक उलाढाल अकोला बाजार समितीत होते. अकोला बाजार समितीत सध्या दररोज ४५० ते ५०० क्‍विंटल हरभऱ्याची आवक होत आहे. काबुली हरभऱ्याचा रंग चांगला राहतो. या हरभऱ्याला लहान आकाराच्या हरभऱ्याच्या तुलनेत प्रती क्‍विंटल २०० ते ३०० रुपये जादा दर मिळतो. बेसन तसेच खाद्य पदार्थासाठी काबुली हरभऱ्याला चांगली मागणी आहे. काबुली हरभऱ्याचे दर त्याच्या काउंटवरून ठरतो. सध्याच्या काळात मागणीनुसार साध्या हरभऱ्यापेक्षा क्‍विंटलमागे २०० ते ५०० रुपये जास्त दर मिळत आहे. सध्या साध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४१०० ते ४२०० रूपये तर काबुली हरभऱ्याला ५००० ते ५५०० रुपये दर आहे. परराज्यातील मागणीनुसार दरात चढ उतार होतात, अशी माहिती अकोला बाजार समितीमधील व्यापारी प्रफुल्ल मुंदडा यांनी दिली. 

उत्तर भारतात वाढती मागणी  महाराष्ट्रात उत्पादित  होणाऱ्या साध्या तसेच काबुली हरभऱ्याला परराज्यातून मागणी वाढत आहे. गेल्या काही वर्षांत मध्यप्रदेशात काबुली हरभरा लागवडीखालील क्षेत्र वाढत लागले  आहे. विशेषतः इंदूर बाजारपेठेत हरभऱ्याची उलाढाल वाढली आहे. या ठिकाणी हरभऱ्याची रोजची आवक १० हजार क्‍विंटलपेक्षा जास्त असते. गेल्या काही वर्षांपासून दिल्ली, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड राज्यांतून काबुली हरभऱ्याला वाढती मागणी आहे. या राज्यात खाद्य पदार्थ आणि प्रक्रिया उद्योगामध्ये काबुली हरभरा मोठ्या प्रमाणात वापरला जात असल्याने मागणी टिकून आहे.  

फायद्याचा सौदा बाजारात काबुली हरभऱ्याला त्या वेळी जो दर असेल त्याच दराने बाजारात बियाणे उपलब्ध राहते. त्यामुळे हरभरा दरातील चढउतार हे बियाणे दरावर परिणाम करणारा घटक ठरत असल्याने उत्पादन खर्चदेखील कमी जास्त होत राहतो. तरीदेखील गावरानच्या तुलनेत चांगल्या दरामुळे काबुली हरभऱ्याचे पीक फायद्याचे ठरते. गेल्या काही वर्षांतील बाजारपेठेतील दराचा अंदाज घेता असे दिसते की, गावरान हरभऱ्याला प्रति क्विंटल ४२०० रुपये  दर बाजारात असताना काबुली हरभऱ्याचा दर ५४०० ते ५८०० रुपये मिळाला आहे. काबुली हरभरा प्रतवारी करून बाजारात पाठविल्यास प्रतिक्विंटलला ६४०० रुपये दर मिळाल्याचे हरभरा उत्पादक सांगतात.

अंबोडा ः  हरभऱ्याचे गाव  यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा गावाने गेल्या काही वर्षांत काबुली हरभरा उत्पादक गाव अशी ओळख तयार केली आहे. या गावातील पन्नास टक्क्यांहून अधिक शेतकरी हे काबुली हरभऱ्याची लागवड करतात. या गावात तसेच परिसरात काबुली हरभरा लागवड क्षेत्र वाढत असल्याने या ठिकाणी राज्य तसेच परराज्यातील व्यापारी खरेदीसाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्चही वाचतो. गेल्यावर्षी काबुली हरभऱ्याला  ६२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. बाजारपेठेचा अंदाज घेत येथील शेतकरी हरभरा लागवडीचे नियोजन करतात. हरभऱ्याचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकरी आता सुधारित तंत्राकडे वळले आहेत. त्यामुळे जातींची निवड, खत व्यवस्थापन, पाणी नियोजनातून दर्जेदार हरभरा उत्पादन मिळविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. 

गावामध्येच खरेदी वायदे बाजारात हरभऱ्याचे दर ठरतात, याची माहिती असल्याने शेतकरी व्यापाऱ्याशी मोबाईलवरून संपर्क साधून दराची विचारणा करतात. त्याआधारे विक्रीचा निर्णय घेतला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून विक्रीसाठी हाच पॅटर्न अंबोडा गावाने राबविला आहे. दर आणि विक्रीबाबत एकमत झाल्यानंतर व्यापारी थेट ट्रक घेऊनच गावात पोचतो. त्यानंतर जागेवरच हरभरा खरेदी करून तत्काळ चुकारे देण्याची पध्दत आहे. काहीवेळा बॅंक खात्यात देखील रक्कम भरली जाते.

काबुली हरभऱ्यावर भर गेल्या सहा वर्षांपासून मी काबुली हरभरा लागवडीत सातत्य ठेवले आहे. त्यापूर्वी गावरान हरभरा घेत होतो. काबुली हरभऱ्याचे मला एकरी ११ ते १२ क्‍विंटल उत्पादन मिळते. सध्या बाजारपेठेत काबुली हरभऱ्याच्या दरात चढ उतार दिसून येत आहेत.  - दादाराव ठाकरे

दर्जेदार उत्पादनावर भर

उटी (जि. यवतमाळ) येथील विनोद मैंद हे प्रयोगशील शेतकरी. हरभरा लागवडीबाबत ते म्हणाले, की मी दरवर्षी आठ एकरावर गावरान आणि आठ एकरावर काबुली हरभरा लागवड करतो. घरचेच निवडक बियाणे वापरत असल्याने पीक उत्पादन चांगले मिळते. प्रतिएकरी गावरान हरभऱ्याचे ३० ते ३५ किलो तर काबुली हरभऱ्याचे  ५५ किलो बियाणे लागते. हरभरा लागवडीपूर्वी घनजीवामृत शेतात मिसळून देतो. रासायनिक खतांचा वापर करत नाही. ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने दोन ओळीत अडीच फूट आणि बियाणात ३ इंच अंतर ठेऊन पेरणी करतो. पेरणीनंतर पंचवीस दिवसांनी जीवामृत देतो. त्यानंतर दर पंधरा दिवसांनी जीवामृताची फवारणी करतो. कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. तुषार सिंचनाने पाणी व्यवस्थापन करतो, त्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते. गावरान हरभऱ्याला काबुलीच्या तुलनेत फार कमी पाणी लागते. सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करत असल्याने जमिनीची सुपीकता टिकून आहे, तसेच ओलावाही टिकून राहिल्याने पिकाची चांगली वाढ होते.   योग्य व्यवस्थापनामुळे मला गावरान हरभऱ्याचे एकरी १८ क्विंटल तर काबुली हरभऱ्याचे १६ क्विंटल उत्पादन मिळते. मी दर्जेदार उत्पादन घेत असल्याने मला काबुली हरभऱ्याला सरासरी प्रतिक्विंटल सहा हजारपर्यंत दर मिळाला आहे. तसेच गावरान हरभऱ्याला चार हजार ते पाच हजार दर मिळाला आहे. बियाण्यासाठी बहुतांश हरभऱ्याची विक्री करतो. काबुली हरभऱ्याला मला प्रतिकिलो ५५ रुपये दर मिळाला होता. याचबरोबरीने मी गावरान हरभऱ्याची डाळ करून विकतो. ही डाळ सरासरी ६० रुपये प्रतिकिलो दराने गावातच विकली जाते. त्यामुळे हरभरा पीक मला फायदेशीर ठरते. हरभऱ्याला सारखणी, ढाणकी, वाई, यवतमाळ, अकोला बाजारपेठेत चांगला दर मिळतो. 

   - विनोद मैंद, ९१३०५८३५११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com