agriculture news in marathi success story of Chudava village from parbhani district became a cluster of silk farms | Page 3 ||| Agrowon

चुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टर

माणिक रासवे
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

चुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करत रेशीम शेतीला सुरवात केला. या गाव परिसरातील सहा गावांनी गेल्या काही वर्षात ‘रेशीम क्लस्टर' म्हणून वेगळी ओळख तयार केली आहे.

चुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करत रेशीम शेतीला सुरवात केला. या गाव परिसरातील सहा गावांनी गेल्या काही वर्षात ‘रेशीम क्लस्टर' म्हणून वेगळी ओळख तयार केली आहे. चुडावा हे गाव दर्जेदार मोसंबी, संत्रा फळबागांसाठीदेखील ओळखले जाते. रेशीम शेती तसेच दुग्ध व्यवसायामुळे गावाच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळाली आहे.

पूर्णा- नांदेड राज्य मार्गावरील चुडावा हे सुमारे साडेसहा हजार लोकसंख्येचे गाव. गावशिवारात प्रवेश केल्यानंतर ग्रामदैवत चुडेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर दृष्टीस येते.मंदिराच्या मागे तलाव आहे.दरवर्षी आमली बारसीला ग्रामदैवताची यात्रा भरते. ग्रामस्थांनी लोकवर्गणी संकलित करून या मंदिराचा जीर्णोधार केला आहे.या मंदिराशेजारी भवानी माता तसेच हनुमान मंदिर आहे.या परिसरातच ग्रामपंचायत कार्यालय आहे.

ग्रामपंचायतीतर्फे लोकाभिमुख उपक्रम राबविले जातात.गावात सिमेंट रस्ता तसेच नाली बांधकामे झालेली आहेत. जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते दहावी तर संस्थेची पहिली ते सातवी पर्यंत शाळा आहे. गावामध्ये चार अंगणवाड्या असून त्याव्दारे माता तसेच लहान मुलांच्या पोषण विकासाचे उपक्रम राबविले जातात. गावामध्ये विविध योजनांच्याअंतर्गंत २५ महिला स्वंयसहाय्यता बचत गटांची स्थापना करण्यात आलेली आहे. यामुळे महिलांना बचतीची सवय लागली आहे.गटांतर्गंत देवाण घेवाणीचे व्यवहार केले जातात. लग्न, आजारपण,गृहउद्योग आदींसाठी बचत गटांच्या सदस्यांना पतपुरवठा केला जातो. दर गुरुवारी गावामध्ये आठवडे बाजार भरतो.त्यादिवशी गाव तसेच परिसरातील शेतकरी फळे, भाजीपाला, धान्य विक्रीसाठी घेऊन येतात.

गावाचे शेती क्षेत्र 
परभणी-हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पूर्णा नदीवरील येलदरी-सिद्धेश्वर प्रकल्पाच्या कालव्याव्दारे चुडावा गावशिवारात रब्बी तसेच उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. परंतु गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरण भरण्याची खात्री राहिली नाही. यंदा धरण शंभर टक्के भरल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील काही वर्षे सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्यामुळे गावशिवारातील बागायती क्षेत्राचे प्रमाण कमी झाले. ऊस, केळीकडून शेतकरी सोयाबीन, कापूस,तूर आदी जिरायती पिकांकडे वळले आहेत.

गावशिवातील एकूण लागवडीयोग्य क्षेत्र १ हजार २०७ हेक्टर आहे.त्यामध्ये सोयाबीन ७३३ हेक्टर, तूर, मूग, उडीद १४९ हेक्टर, कपाशी २३५ हेक्टर आणि उसाचे ४० हेक्टर क्षेत्र आहे.कालव्यामुळे हंगामी सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. विहिरीव्दारे अनेक शेतकऱ्यांनी बारमाही सिंचनाची सुविधा केली आहे. काही शेतकऱ्यांनी मोसंबी, संत्रा,पेरु, डाळिंब आदी फळपिके तसेच हळदीची लागवड केली आहे.

रेशीम शेतीचा श्रीगणेशा 
जिरायती क्षेत्रातील उत्पादन तसेच उत्पन्नाची हमी नसल्यामुळे गावातील शेतकरी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या शोधात होते. २०१५-१६ मध्ये गावातील सुरेश देसाई, चंद्रकांत देसाई, अंगद देसाई, नितीन देसाई, बाळासाहेब देसाई या पाच शेतकऱ्यांना जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडून रेशीम शेतीबाबत माहिती मिळाली. या पाच शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रत्येकी एक एकर तुती लागवड करून गावामध्ये रेशीम शेतीचा श्री गणेशा केला.

फळांची बागेतून विक्री 
या गावात मोसंबी, संत्रा लागवड देखील चांगल्या प्रकारे झालेली आहे. व्यापारी थेट बागेत येऊन फळांची खरेदी करतात. गावातून अन्य राज्यातील बाजारपेठेत फळे पाठविली जातात. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांनी पेरु, सीताफळ लागवडीला चालना दिली आहे.

दुग्धव्यवसायाची साथ 
गावातील दहा ते पंधरा शेतकरी दुग्धव्यवसाय करतात.गावापासून नांदेड शहर जवळ असल्यामुळे तेथे दुधाची चांगली मागणी आहे. या शेतकऱ्यांनी म्हशी तसेच संकरित गाईंचे संगोपन केले आहे. गावातील बस थांब्याजवळ एका डेअरीचे दूध संकलन केंद्र आहे. त्यामुळे दूध विक्रीची चांगली सोय झाली आहे.

‘रेशीम क्लस्टर'चा विकास 
गावातील पाच प्रयोगशील शेतकऱ्यांनी रेशीम कोष उत्पादनास सुरवात केली. कर्नाटकातील रामनगरम येथील बाजारपेठेत कोषांची विक्री होऊ लागली. या कोषांना त्यावेळी प्रति किलो कमाल ६०० रुपयांपर्यंत दर मिळत होते.अन्य पिकांच्या तुलनेत रेशीम कोषापासून चांगले उत्पन्न मिळू लागले होते.या शेतकऱ्यांच्या अनुभवामुळे २०१६-१७ मध्ये गावातील इतर शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्रित आले.

  • महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २४ शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली. २०१७-१८ या वर्षी २७ शेतकरी आणि २०१९-२० मध्ये ४५ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली.दरम्यानच्या काळात दर कमी झाल्यामुळे तसेच दुष्काळी स्थितीमुळे काही शेतकऱ्यांना तुती लागवड काढावी लागली. त्यामुळे सध्या ३३ शेतकऱ्यांकडे ३७ एकरावर तुतीच्या व्हि-१ जातीची लागवड आहे.
  • शेतकरी बायव्होल्टाईन जातीच्या रेशीम किटकांचे संगोपन करतात.त्यासाठी २४ बाय १०० फूट आकाराचे सिमेंट विटांचा वापर करत पक्क्या संगोपनगृहाचे बांधकाम काही शेतकऱ्यांनी केले आहे.
  • गावापासून जवळच असलेल्या बरबडी येथील प्रयोगशील शेतकरी श्रीधर सोलव यांच्या बाल्य रेशीम किटक संगोपनगृहातून (चॉकी) घेऊन त्यांचे संगोपन करतात. यामुळे वेळेमध्ये बचत होते.
  • गावातील प्रत्येक शेतकरी सरासरी १०० अंडीपुंजांपासून ७५ ते ८० किलो कोष उत्पादन घेतात. वर्षभरात ६०० ते ७०० किलो कोष उत्पादन घेतले जाते. त्यापासून एकरी वार्षिक सरासरी दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी आणि जीवनमानात सुधारणा होण्यास मदत झाली.
  • चुडावा येथील शेतकऱ्यांच्या रेशीम शेतीमधील यशस्वी वाटचालीपासून प्रेरणा घेत परिसरातील आलेगाव, कावलगाव, बरबडी, कंठेश्वर, पिंपळा येथील शेतकरी देखील रेशीम शेती करु लागले आहेत. या गावांच्या सहभागाने रेशीम क्लस्टर विकसित झाले आहे.या क्लस्टरमधील सहा गावांमध्ये एकूण दोनशे एकरावर तुती लागवड झालेली आहे.

पूर्णा रेशीम कोष मार्केटमुळे फायदा 
गावापासून दहा किलोमीटरवरील तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पूर्णा येथे गतवर्षी रेशीम कोष मार्केट सुरु झाले आहे. येथे सध्या रामनगर तसेच अन्य मार्केटच्या तुलनेत थोडे दर कमी मिळतात. परंतु वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे.

लॉकडाऊनमुळे नुकसान 

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर नांदेड -बेंगलूरू एक्स्प्रेस रेल्वेगाडी बंद झाली.त्यामुळे रामनगरम तसेच अन्य ठिकाणच्या मार्केटमध्ये रेशीम कोष नेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही.
  • स्थानिक मार्केटमधील दरात देखील घसरण झाली आहे.त्यामुळे रेशीम उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.रेशीम शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी केल्यामुळे आर्थिक गुंतवणूक झालेली आहे.आगामी काळात परिस्थिती सामान्य होईल, तेव्हा दरात सुधारणा होईल या अपेक्षेने अनेक शेतकरी रेशीम कोष उत्पादन घेत आहेत.

शेततळ्यांमुळे संरक्षित सिंचन सुविधा 
दुष्काळामुळे पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस तसेच जास्त पाण्याची गरज असलेल्या पिकांचे उत्पादन घेणे अशक्य झाले. मागेल त्याला शेततळे योजना तसेच राष्ट्रीय फलोत्पादन अभियाअंतर्गंत गावातील शेतकऱ्यांनी शेततळ्यांची उभारणी केली. त्यामुळे संरक्षित सिंचनासाठी पाणीसाठा उपलब्ध झाला.उन्हाळ्यामध्ये फळबागा, तुती, भाजीपाला पिकांना पाणी देता येत आहे. काही शेतकऱ्यांनी शेततळ्यामध्ये मत्स्यपालन सुरु केले आहे.त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

प्रतिक्रिया

रेशीम शेती फायद्याची
‘‘राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गंत शेततळ्याची उभारणी केली आहे.
त्यामुळे तुती तसेच हळद,ऊस या पिकांना पाणी देता येते.दोन एकर तुतीपासून वर्षाकाठी दीड लाख रुपये उत्पन्न मिळते.त्यामुळे ही शेती फायदेशीर ठरली आहे.‘‘

- सुरेश देसाई, ७७०९७२००९५

‘‘माझी तुती लागवड आहे. मला रेशीम संगोपनगृहासाठी अनुदान मिळाले आहे.
रामनगरम येथील मार्केटमध्ये चांगले दर होते. त्यावेळी रेशीम शेतीतून आम्हाला चांगला नफा मिळाला होता. इतर पिकांपेक्षा मला रेशीम शेती समाधानकारक वाटते‘‘

- गोविंद देसाई

तुती लागवडीचा विस्तार
माझ्या सरपंचपदाच्या कार्यकाळात गावशिवारात २५ किलोमीटर
शेतरस्त्याची कामे करण्यात आली.त्यामुळे शेतीमाल वाहतुकीचा सोय झाली.
रेशीम शेतीमुळे महिन्याकाठी शाश्वत उत्पन्न मिळत असल्यामुळे गावातील तुती क्षेत्राचा विस्तार झाला. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे रेशीम कोषांचे दर कमी झाल्यामुळे नुकसान सोसावे लागत आहे.

- माणिक शिंदे (माजी सरपंच)

दुग्ध व्यवसायाची जोड
मी शेतीला म्हैसपालनाची जोड दिली आहे. सध्या दररोज २० लिटर दूध उत्पादन आहे. गोठ्यातून प्रति लिटर ४० रुपयेने दुधाची विक्री होते.
- एकनाथ घायाळ

रेशीम शेतीतून शाश्वत उत्पन्न
‘‘सततच्या दुष्काळी स्थितीमुळे ऊस, फळपिकांचे उत्पादन शक्य होत नसल्याने
चुडावा येथील शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजना
तसेच मनरेगातून गटातील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले.शाश्वत उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत झाली.‘‘

- जी.आर.कदम,९४२३०३२४३९
(जिल्हा रेशीम विकास अधिकारी, परभणी)


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
पायाभूत सुविधांसह शेतीतून प्रगतिपथावर...रस्ते, बंधारे उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन,...
पिंपळगाव वाघाच्या शिवारात लोकसहभागातून...कित्येक वर्षापासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
लोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...
चुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...
स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
बारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती,...बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि...
जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील...
डोंगरदऱ्यातील कुमशेत आर्थिक उन्नतीच्या...एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...