चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्ड

कोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर चवदारपणाला अतिशय महत्व आहे. यासाठी चटणी आणि मसाला हा महत्त्वाचा भाग. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेऊन यवलूज पडळ (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील सौ. शैलजा जगन्नाथ राऊत यांनी कोल्हापूर शहरात स्वादिष्ट चटणी आणि मसाला निर्मितीचा उद्योग उभारून स्वतःचा ब्रॅण्ड तयार केला आहे.
Shailja makes spices with the help of his mother and female colleagues.
Shailja makes spices with the help of his mother and female colleagues.

कोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर चवदारपणाला अतिशय महत्व आहे. यासाठी चटणी आणि मसाला हा महत्त्वाचा भाग. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेऊन यवलूज पडळ (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील सौ. शैलजा जगन्नाथ राऊत यांनी कोल्हापूर शहरात स्वादिष्ट चटणी आणि मसाला निर्मितीचा उद्योग उभारून स्वतःचा ब्रॅण्ड तयार केला आहे. यवलूज पडळ (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील सौ. शैलजा जगन्नाथ राऊत या शेतकरी कुटुंबातील गृहिणी. त्यांचे पती बॅंकेत नोकरीला असल्याने त्या कोल्हापूर शहरात स्थायिक झाल्या. शहरात आल्यानंतर काही तरी पूरक उद्योग करायचा हा उद्देश ठेवून त्यांनी घरगुती मसाले निर्मितीला प्राधान्य दिले. त्यांच्या माहेरची पार्श्‍वभूमी हॉटेल व्यवसायाची तसेच किराणा दुकानही होते. त्यांच्या आई शशिकला या पूर्वी चटणी करून विकत असत. यामुळे शैलजाताईंनीही मसाला निर्मिती व्यवसायाला सुरुवात केली. आई शाशिकला यांनी लेकीच्या इच्छेला प्रोत्साहन दिले. स्वत: जवळचे दागिने गहाण ठेवून त्यांनी शैलजाताईंना भांडवल उभारून दिले. शैलजाताईंनीदेखील स्वत:चे दागिने गहाण ठेवून या भांडवलात भर घातली. साडेतीन वर्षांपूर्वी सुमारे अडीच लाख रुपये गुंतवून शैलजाताईंनी छोटेखानी मसाला प्रक्रिया उद्योग सुरू केला. जागेसाठी त्यांचे भाऊ संग्राम आणि शिरीष यांनी मदत केली. कोल्हापुरातील बिंदू चौक परिसरात शैलजाताईंनी माहेरच्या मदतीवर व्यवसाय सुरू केला. पती जगन्नाथ, मुलगा तुषार आणि मुलगी ऋतुजा यांच्या साथीने त्यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. प्रक्रिया उद्योगाला सुरुवात  शैलजाताईंनी रोस्टर, ग्राइंडर, पल्व्हरायझर आदी यंत्रांची खरेदी करून मसाले आणि चटणीनिर्मितीस प्रारंभ केला. पहिल्यांदा कांदा-लसूण मसाला चटणीपासून सुरुवात केली. आठवड्यातील चार दिवस चटणी आणि उर्वरित कालावधीत मसाला तयार केला जातो. चटणीसाठी त्या खास करून गुंटूर, ब्याडगी मिरचीला प्राधान्य देतात. कर्नाटकातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून तिथे मिरच्यांची खरेदी केली जाते. तेथेच मिरची पावडर तयार करून ती कोल्हापुरात आणली जाते. महिन्याला किमान एक टन मिरची पावडरपासून त्या चटणी तयार करतात. मिरची सोडून इतर मसाल्यांची खरेदी स्थानिक बाजारपेठेत केली जाते. ही खरेदी करताना दर्जेदार कच्चा माल निवडला जातो. कारण यावरच चटणी, विविध मसाल्यांची चव अवलंबून असते. हॉटेल व्यावसायिकांकडून पसंती  शैलजाताईंनी तयार केलेली कांदा- लसूण मसाला चटणीबरोबरच गरम आणि गोडा मसालाही शहरातील हॉटेल व्यवसायिकांच्या पसंतीस उतरला आहे. केवळ लाल भडक तिखट म्हणजे ‘कोल्हापुरी‘ ही व्याख्या चुकीची असल्याचे शैलजाताई सांगतात. त्यांनी बनविलेल्या कोल्हापुरी चटणीला स्वाद आणि रुचकरपणा असल्याने नामवंत हॉटेलचालकांनी त्यांच्या चटणीला पसंती दिली आहे. सुरुवातीला काही तरी कारणे सांगून चटणी नाकारणाऱ्यांनी परत स्वत:हून चटणी खरेदीस प्राधान्य दिल्याचे त्या अभिमानाने सांगतात. पहिले सहा महिने हॉटेल व्यावसायिकांना हवी तशी चटणी तयार करण्यासाठी शैलजाताईंना बरेच कष्ट करावे लागले. पण एकदा घटकांच्या प्रमाणाचे गणित तयार झाल्यानंतर आता त्यामध्ये कुशलता आली आहे. प्रशिक्षणातून बारकावे  उपजत धडपडीचा गुण असलेल्या शैलजाताईंनी कोल्हापुरातील उद्योग भवन येथे मसाले निर्मितीबाबत गंधाली दिंडे यांच्याकडून प्राथमिक प्रशिक्षण घेतले. इन्स्टंट मसाला तयार करण्याबरोबर मटण, चिकन बिर्याणी मसाले तयार करण्याची खासियत शिकून घेतली. याचा उपयोग व्यवसाय वृद्धीसाठी झाला. आता कितीही मोठी आर्डर असली तरी त्या सहजपणे मसाला निर्मिती करून देतात. मसालेनिर्मिती उद्योगात त्यांना कुटुंबाची चांगली साथ मिळाली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी कोल्हापुरी पांढरा रस्सा, दम बिर्याणी, सांबार, अंडा करी, पावभाजी, पनीर टिक्का, बिर्याणी पुलाव, मटण, फिश फ्राय, मालवणी चिकन मसाल्यांची निर्मिती सुरू केली आहे. संकट काळातही व्यवसाय सुरू  गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर यंदा कोरोनाने बाजारपेठ अडचणीत आली. या दोन्ही संकटांतही शैलजाताईंनी मसाला निर्मिती सुरूच ठेवली. भगीरथी, कणेरी मठ यांसारख्या संस्थांनी नागरिकांना मदत म्हणून गृहउपयोगी साहित्य दिले. यामध्ये चटणी पॅकेटचाही समावेश होता. दोन्ही संस्थांनी शैलजाताईकडून चटणी घेऊनच ती नागरिकांना वाटली. यामुळे व्यवसायाची उलाढाल कायम राहिली. अनेक समूह, शासकीय संस्था महिलांच्या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करतात. या माध्यमातून त्या ग्राहकांशी संवाद साधतात. सध्या मुलगा तुषार याच्याकडे मार्केटिंगची जबाबदारी आहे. प्रक्रिया उद्योगाची वाढ  गेल्या साडेतीन वर्षांत मसाला निर्मिती व्यवसायातून झालेल्या नफ्यातून शैलजाताईंनी मसाले उत्पादन वाढ आणि प्रक्रिया यंत्रणेमध्ये गुंतवणूक केली. सध्याची जागा अपुरी पडू लागल्याने बालिंगा पाडळी येथे त्यांनी प्रशस्त जागा खरेदी करुन नवा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दररोज एक टन चटणी तयार करण्याची क्षमता असणारी यंत्रणा खरेदी करण्याचे त्यांचे नियोजन आहे. महिन्याला आठशे किलो चटणी निर्मिती  शैलजाताईंनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन १०० ग्रॅम ते एक किलो पॅकिंगमध्ये चटणी उपलब्ध करून दिली आहे. सध्या २०० ते ३०० रुपये किलो दराने चटणी विकली जाते. इतर मसाले दहा रुपयांच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत. महिन्याला आठशे किलो चटणी आणि विविध प्रकारच्या मसाल्यांची १०० ते १२५ किलोपर्यंत विक्री होते. महिन्याला दीड लाख रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होते. यातून पंचवीस टक्‍यांपर्यंत नफा राहतो. मसाला निर्मिती उद्योगात तीन महिलांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला आहे. त्यांच्याबरोबर स्वत: शैलजाताई दैनंदिन काम पाहतात. ग्राहकांच्या मागणीनुसार चटणी बनवून दिली जाते. साधारणत: उन्हाळ्यात चटणी आणि मसाल्यांना चांगली मागणी असते. मसाल्याचा ‘तुषार मसाले‘ ब्रॅंड  मुलगा तुषार याच्या नावावरुन शैलजाताईंनी ‘तुषार मसाले‘ हा ब्रॅंन्ड तयार केला आहे. मसाल्याचे प्रमाण जास्त असणारी ‘स्पेशल' चटणी, मध्यम मसाल्याचा वापर असणारी ‘रॉयल’ मसाला चटणी, कमी मसाला आणि तिखटपणा जास्त असणारी ‘क्‍लासिक’ मसाला चटणी असे प्रकार त्यांनी तयार केले आहेत. ग्राहकांना हवी तशी चटणी तातडीने उपलब्ध करून देण्याचा शैलजाताईंचा प्रयत्न असतो. परदेशातही मसाल्याची ख्याती  कोल्हापुरातील अनेक लोक परदेशात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे अनेक जण परदेशात जाताना शैलजाताईंकडून मसाला चटणी घेऊन जातात किंवा त्यांचे नातेवाईक कुरिअरनेही मसाला चटणी परदेशी पाठवतात. संपर्क ः शैलजा राऊत, ७०५८६०७७३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com