agriculture news in marathi success story citronella farming of a farmer from washim district | Agrowon

पारंपरिक शेतीला सिट्रोनेलाची साथ

गोपाल हागे
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून कारंजा (जि.वाशीम) येथील धनंजय गहाणकरी यांनी सिट्रोनेला या सुगंधी गवताची लागवड आणि त्यापासून तेल निर्मितीसाठी लघू उद्योग उभारला आहे.

पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून कारंजा (जि.वाशीम) येथील धनंजय गहाणकरी यांनी सिट्रोनेला या सुगंधी गवताची लागवड आणि त्यापासून तेल निर्मितीसाठी लघू उद्योग उभारला आहे. सध्या आठ एकरामध्ये सिट्रोनेलाची लागवड आहे. अडचणींवर मात करीत त्यांनी या शेतीत सातत्य टिकवून ठेवले आहे.

कारंजा (जि.वाशीम) येथील धनंजय माणिकचंद गहाणकरी यांची १५ एकर शेती आहे. विहीर आणि कूपनलिकेच्या माध्यमातून त्यांनी हंगामी ओलिताची सोय केली आहे. दरवर्षी गहाणकरी सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस, तूर या पिकांची लागवड करतात. चार वर्षांपूर्वी त्यांनी सिट्रोनेला या सुगंधी गवताची लागवड करून पीक बदलास सुरुवात केली. सध्या आठ एकरामध्ये सिट्रोनेलाची लागवड आहे.

सिट्रोनेला लागवडीला सुरुवात

  • पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून धनंजय गहाणकरी यांनी सिट्रोनेला या सुगंधी गवताची लागवड आणि त्यापासून तेल निर्मितीचा लघू उद्योग उभारला. या उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये त्यांचा मुलगा धीरज याची चांगली साथ मिळाली. पीक बदलाबाबत धीरज गहाणकरी म्हणाले की, आम्ही पहिल्यांदा सिट्रोनेला पिकाचा अभ्यास केला. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये दरवर्षी जानेवारीत भरणाऱ्या औषधी, सुगंधी वनस्पती प्रदर्शनामध्ये जाऊन प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठांची माहिती घेतली. साधारणपणे २०१५ मध्ये आम्ही पहिल्यांदा सहा एकरावर सिट्रोनेला गवताच्या जावा जातीची लागवड केली. जमिनीची चांगली मशागत करून ३ बाय ३ फूट या अंतराने गवताचे ठोंब लावले. पहिल्यांदा पाट पाणी देत होतो. आता पिकाची चांगली वाढ झाल्यावर तुषार सिंचनाने पाणी देतो. या पिकाला फारसे व्यवस्थापन नाही.
  • लागवड केल्यानंतर सहा महिन्यांनी पहिली कापणी येते. त्यानंतर दर दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने कापणी केली जाते. पाण्याच्या उपलब्धतेवर पिकाची वाढ अवलंबून आहे. लागवडीच्या पहिल्या वर्षात साधारणतः तीन वेळा गवत कापणी होते. एका कापणीमध्ये एकरी सरासरी २ ते ३ टन गवताचे उत्पादन मिळते. दुसऱ्या वर्षापासून गवताचे उत्पादन वाढते. साधारणपणे पाच वर्षे हे पीक ठेवले जाते. त्यानंतर यातील ठोंब काढून दुसऱ्या क्षेत्रात आम्ही लागवड करणार आहोत. एक वर्ष पीक फेरपालट करून पुन्हा त्याच क्षेत्रात या गवताची लागवड करण्याचे नियोजन आहे.
  • उन्हाळ्यात एका एकरातील सिट्रोनेला गवतापासून सात ते आठ किलो तेल मिळते. पावसाळ्यात हेच प्रमाण तीन ते चार किलो असते. उन्हाळ्यात तेल अधिक येत असले तरी गवताचे प्रमाण कमी झालेले असते. ही पीकपद्धती प्रत्येक वेळी नवीन शिकवत आहे. गवताची वाढ जास्त दिवस झाल्यास तुरे येतात. तुरे आलेल्या गवतापासून कमी प्रमाणात तेल निर्मिती होते. काहीवेळा तेल काढताना यंत्रणा बंद पडली तर तळाला तेल साठून राहते. परिणामी नुकसान सोसावे लागते.

किफायतशीर सिट्रोनेला

  • धनंजय गहाणकरी यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सिट्रोनेला गवताची लागवड आठ एकरापर्यंत वाढवली आहे. या गवताला कुठल्याही जनावरांचा त्रास होत नाही. पीक वाढीसाठी रासायनिक खतांची मात्रा तसेच कीडनाशक फवारणीची गरज नसल्याने खर्च वाचतो. या पिकासाठी लागवडीनंतर बाजारातून काहीही विकत आणायची गरज नाही. केवळ मजुरीचा खर्च होतो.
  • गहाणकरी यांचा हा प्रयोग वाशिम जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरला आहे. परिसरातील शेतकरी या प्रकल्पाला भेट देतात. कृषी विभागानेदेखील सिट्रोनेला लागवडीला चालना देण्यासाठी गहाणकरी यांच्या शेताला भेट आणि लागवड ते प्रक्रियेबाबत प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे.

तेल निर्मिती प्रकल्प 

  • सिट्रोनिला गवतापासून तेल काढण्यासाठी गहाणकरी यांनी शेतामध्येच शेड उभारून तेल निर्मिती उद्योगाची उभारणी केली. शेडसहीत प्रक्रिया यंत्रणेचा एकूण खर्च पाच लाख रुपयांपर्यंत आला. यासाठी त्यांनी स्वतः जवळील पैसा खर्च केला. प्रकल्पासाठी शासनाचे कुठलेही अनुदान घेतले नाही.
  • सिट्रोनेला गवतापासून तेल काढण्यासाठी स्टीम डिस्टिलेशन युनिट उभारलेले आहे. या यंत्रणेमध्ये गवत टाकून योग्य प्रक्रियेच्या माध्यमातून तेल निर्मिती केली जाते. तेल निर्मिती प्रक्रियेसाठी भट्टी लावली जाते. एका भट्टीसाठी १५० ते २०० किलो लाकूड लागते. यासाठी ८०० रुपये खर्च येतो. गवत कापणी, जनरेटरसाठी ३०० रुपयांचे पेट्रोल लागते. दोन गड्यांची मजुरी ४०० रुपये होते. असा एका भट्टीसाठी १५०० रुपये खर्च येतो.
  • प्रत्येक भट्टीपासून कमीत कमी ३ ते ७ किलोपर्यंत तेल मिळते. पावसाळा आणि हिवाळ्यात तेलाचे प्रमाण कमी निघते. तर उन्हाळ्यात तेल जास्त मिळते. मात्र उन्हाळ्याच्या काळात गवताचे उत्पादन कमी मिळते.

विक्रीचे नियोजन 

  • तेल उत्पादन आणि विक्रीबाबत धीरज गहाणकरी म्हणाले की, सिनॅप अंतर्गत लखनौ येथे दरवर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या औषधी व सुगंधी वनस्पती प्रदर्शनात मी सहभागी झालो होतो. याठिकाणी मला सिट्रोनेला तेलाची विक्री कशी करायची याची माहिती मिळाली. सिट्रोनेला सुगंधी तेलास लखनौ, कानपूर भागातील व्यापाऱ्यांकडून मागणी असते. तेल तयार झाले की त्याचा नमुना व्यापाऱ्यांना पाठविला जातो. त्याची गुणवत्ता पाहून व्यापारी तेलाचा दर सांगतात. त्यानुसार तेलाची विक्री होते.
  • सिट्रोनेला लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी आम्हांला आठ एकरातील सिट्रोनेलापासून ३८० ते ४०० किलो तेल मिळाले. त्यावर्षी तेलाचा दर ८०० रुपये प्रति किलो होता. दुसऱ्या वर्षी गवत अधिक निघाल्याने ६४० ते ६५० किलो तेल निघाले. तेव्हा ८३० रुपये प्रति किलो दर होता. तिसऱ्या वर्षी ६५० किलोपर्यंत तेल मिळाले. यावेळी तेलाला ९०० रुपये दर मिळाला. मागील हंगामात ६०० किलो तेल निघाले. त्याला ८५० रुपये दर मिळाला. यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत १५० किलो तेल उत्पादन आहे. एका एकरातील एका कापणीमध्ये २ ते ३ टन गवत मिळते. यापासून सरासरी १८ ते २० किलोपर्यंत तेल उत्पादित होते. आम्हांला खर्च वजा जाता सिट्रोनेला पिकापासून प्रति एकरी प्रति वर्ष सरासरी तीस हजारांचे निव्वळ उत्पन्न मिळते. हे उत्पन्न तेलाला मिळणाऱ्या दरावर अवलंबून आहे.

आम्ही मेहनत करतो, सुविधा द्या
गहाणकरी यांनी सिट्रोनेला सुगंधी तेल निर्मितीत सातत्य ठेवले आहे. हे काम पुढे नेताना असंख्य अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. प्रामुख्याने विद्युत पुरवठा ही मोठी समस्या आहे. पुरेशी वीज मिळत नसल्याने त्यांना तेल काढण्याची यंत्रणा चालविण्यासाठी काहीवेळा पेट्रोल-डिझेलसाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. वीज पुरवठ्यात सातत्य राहिले तर खर्च मर्यादित राहून नफा अधिक मिळू शकतो.

संपर्क - धीरज गहाणकरी, ७०२००१४४२


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
औरंगाबाद जिल्ह्यात करटोलीची व्यावसायिक...कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील...
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे...योग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
भात शेतीला मिळाली कुक्कटपालनाची जोडनिवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) येथील मारुती सहदेव...
शेळी, कोंबडीपालनातून बसवली शेतीची घडीनेमके काय करायचे याची स्पष्टता असली की शेती किंवा...
गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना...कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक...
शाश्वत ग्राम, शेती अन कौशल्य विकासावर भरशाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि...
एका वर्षात दुबार द्राक्ष काढणीचा ‘आरा...द्राक्षशेतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जोखीम वाढत...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...