गुणवत्तापूर्ण सीताफळ उत्पादन हेच ध्येय

बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास सीताफळ बागेतून दर्जेदार उत्पादन मिळविता येते, हे परिंचे (ता.पुरंदर,जि.पुणे) येथील हनुमंत दत्तात्रय सोळसकर यांनी दाखवून दिले आहे. वडिलोपार्जित शेतीमध्ये त्यांच्याकडे सीताफळ बाग आहे.
Solaskar family showing quality custard apple
Solaskar family showing quality custard apple

बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास सीताफळ बागेतून दर्जेदार उत्पादन मिळविता येते, हे परिंचे (ता.पुरंदर,जि.पुणे) येथील हनुमंत दत्तात्रय सोळसकर यांनी दाखवून दिले आहे. वडिलोपार्जित शेतीमध्ये त्यांच्याकडे सीताफळ बाग आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत चांगला दर मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पुणे शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर परिंचे हे साधारणपणे चार हजार लोकसंख्या असलेले गाव. पूर्वी या गावशिवारात मोसंबी लागवड मोठ्या प्रमाणात होती. गेल्या काही वर्षांत पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेती बागायती होऊ लागली आहे. गावाजवळील पिलाणवाडी तलावाचा फायदा शेतीला झाला आहे. गावातील एकूण क्षेत्रापैकी सुमारे ५० एकरावर सीताफळ लागवड आहे.  गावशिवारात पावसाचे प्रमाण कमी अधिक असल्याने दरवर्षी शेतीसाठी पाण्याचा प्रश्न तयार होतो. पावसाळ्यात बहुतांश शेतकरी भाजीपाला, कांदा लागवड करतात. काही शेतकऱ्यांनी फळबागेचे नियोजन केले आहे. बागायती भागात ऊस,केळी लागवड आहे. पावसाळ्यात पाण्याची उपलब्धता होत असली तरी उन्हाळ्यात काही भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येत फळबागांना सूक्ष्म सिंचनाचा अवलंब केला आहे. गावातील ८० टक्के फळबागांना ठिबक सिंचन केलेले आहे. त्यामुळे पाण्याची बचत होऊन कमी पाण्यात फळबागांचे चांगले उत्पादन मिळते. परिंचे गावातील प्रयोगशील शेतकरी हनुमंत दत्तात्रय सोळसकर यांच्याकडे एकूण १५ एकर वडिलोपार्जित शेती आहे. लहानपणापासूनच त्यांना शेतीची आवड आहे. आता शेती नियोजनात त्यांना प्रसाद आणि प्रदुम्न या दोन मुलांची चांगली मदत होते. पाणी पुरवठ्यासाठी दोन विहिरी आणि एक कूपनलिका आहे. बागेचे व्यवस्थापन 

  • सीताफळ बागेच्या व्यवस्थापनाबाबत हनुमंत सोळसकर म्हणाले की, माझे सीताफळ लागवडीचे अडीच एकर क्षेत्र आहे. एक बाग ४० वर्षांची आणि दुसरी बाग २७ वर्षांची आहे. मी उन्हाळी बहर धरतो. यासाठी जानेवारीमध्ये झाडांची छाटणी केली जाते. त्यानंतर जमिनीची चाळणी करून घेतो.  फेब्रुवारी महिन्यात बागेला पाणी सोडतो. पहिले दोन पाणी पाट पद्धतीने दिले जाते. पाणी देण्याच्या अगोदर साधारणपणे एका झाडाला आठ किलो लेंडीखत आणि बारा किलो चांगले कुजलेले शेणखत आळ्यात मिसळून दिले जाते. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमीन सुपीक होते.तसेच फळांची प्रत सुधारून दर्जा आणि रंग चांगला येण्यास मदत होते. बाजारपेठेत चांगला दर मिळतो. 
  • साधारणपणे एप्रिलमध्ये फुलधारणा होते. बागेला ठिबक सिंचनाने पाणी दिले जाते. त्यामुळे प्रत्येक झाडाला पुरेसे पाणी मिळते. जुलैपासून फळधारणा सुरू होते. ऑक्टोबर पर्यंत फळांचे उत्पादन मिळते. बागेची स्वच्छता आणि झाडांची योग्य निगा राखल्याने कीड, रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. मात्र काही वेळा मिलीबग आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. अशावेळी तज्ज्ञांच्या सल्याने शिफारसीत कीडनाशकाची फवारणी केली जाते. शक्यतो सेंद्रिय कीडनाशकांच्या वापरावर भर आहे. फळधारणा सुरू झाल्यापासून दर महिन्याला जीवामृताची आळवणी केली जाते. त्याचाही चांगला फायदा दिसून आला आहे. 
  • गुणवत्तापूर्ण उत्पादन  

  • फळे मोठी आणि पक्व झाल्यानंतर बाजारपेठेचा अंदाज घेऊन काढणी केली जाते.
  • फळांची प्रतवारीकरून करून १५ किलो बॉक्समध्ये फळांचे पॅकिंग केले जाते.
  • गरजेनुसार फळांच्या प्रतवारीकरून २,४ आणि ६ डझन असे बॉक्स पॅकिंग केले जाते.  
  • पहिल्या टप्यात दर चार दिवसांनी ४ ते ६ क्रेट सीताफळाचे उत्पादन मिळते. त्यानंतर मात्र उत्पादन वाढत जाते. त्यावेळी दर चार दिवसांनी १५ ते २० क्रेट उत्पादन मिळते.  
  • फळांची विक्री वाशी बाजारपेठेत केली जाते. प्रतवारी केल्यामुळे सीताफळाला प्रति किलो सरासरी ५० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळतो. एकरी आठ ते दहा टन उत्पादन मिळते. एकरी खर्च वजा जाता दोन लाखांचे उत्पन्न मिळते. दर्जेदार फळांच्या उत्पादनामुळे बाजारपेठेत वेगळी ओळख तयार झाली आहे.
  • पिलाणवाडी तलावाचा फायदा    पिलाणवाडी येथे शासनाने १९७२ साली तलाव बांधला. तलावामुळे  गावशिवारात पाण्याची उपलब्धता झालेली आहे. गावातील विहिरींचा पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे फळबागा आणि रब्बी हंगामातील लागवडीला शाश्वत पाणी उपलब्ध होते. शेतीचे नियोजन 

  • सोळसकर यांच्या वडिलांनी १९८१ च्या दरम्यान दीड एकरावर पुरंदर स्थानिक या सीताफळ जातीची लागवड केली. त्यानंतर हनुमंत यांनी १९९३ साली एक एकरावर नव्याने सीताफळाची लागवड केली. सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापनावर त्यांचा भर आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन त्यांच्याकडे सध्या दोन एकर कांदा आणि आठ एकरावर ऊस लागवड आहे. 
  • रब्बी हंगामात कांद्याची गादीवाफ्यावर लागवड केली जाते. या पिकाला ठिबक सिंचन केले आहे. कांद्याचे एकरी सरासरी १५ टन उत्पादन मिळते. कांद्याची प्रतवारीकरून बेंगलूरू बाजारपेठेत विक्री केली जाते. या बाजारपेठेत चांगला दर मिळतो.
  • उसाचे आठ एकर क्षेत्र असून त्यामध्ये चार एकर लागण आणि चार एकर खोडवा आहे. उसाची पट्टा पद्धतीने लागवड असून ठिबक सिंचन केलेले आहे. एकरी साठ टनांची सरासरी आहे. 
  • संपर्क ः हनुमंत सोळसकर, ९५२७६७२१९०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com