कोरडवाहू शेतीत रुजला खजूर

झाडाला लगडलेले खजूर
झाडाला लगडलेले खजूर

माळेगाव हवेली (ता. संगमनेर, जि. नगर) येथील रावसाहेब गायकवाड यांनी चार वर्षांपूर्वी दीड एकर क्षेत्रापैकी प्रायोगिक तत्त्वावर वीस गुंठ्यांवर खजुराच्या बरी वाणाची लागवड केली. यंदाच्या वर्षी त्यांना पहिले उत्पादन मिळाले. स्थानिक पातळीवर त्यांनी खजूर विक्रीचे नियोजन करून वेगळी दिशा पकडली आहे.

न गर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील माळेगाव हवेली हा भाग तसा कोरडवाहू. हलकी जमीन आणि पाणी कमतरतेमुळे पीक उत्पादनात फारशी शाश्वती नाही. पावसाच्या पाण्यावरच शेती अवलंबून आहे. याच गावातील रावसाहेब मोगल गायकवाड हे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी. दोन भावांचा कुटुंबाचा विस्तार. पत्नी चारुलता याही शिक्षण विस्तार अधिकारी आहेत.  मुलगा योगीराज पदवी तर पुतण्या सागर अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहे. भावजय सुनीता या माध्यमिक शिक्षक आहेत. भाऊ हयात नसल्याने सारे कुटुंब एकत्रच आहे. घरातील सर्वजण नोकरीला असल्याने कोरडवाहू शेतीकडे दुर्लक्ष झालेले. पण, सेवानिवृती नंतर गायकवाड यांनी दीड एकर शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. 

शेती प्रयोगांना सुरवात  रावसाहेब गायकवाड यांना वडिलोपार्जित दीड एकर शेती. त्यात माळेगाव हवेली परिसरात पाण्याची तीव्र टंचाई. परिसरात डाळिंबाची लागवड  असली तरी सातत्याने पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. गायकवाड  परिवारातील सर्व सदस्य नोकरीला असल्याने घरच्या शेतीकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु, सेवानिवृत्तीनंतर गायकवाड यांनी शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. पहिल्यांदा परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा केली. विविध पीक पद्धतींचा अभ्यास केला. त्यानुसार त्यांनी शेती विकासाचे नियोजन केले. शेतात कूपनलिका घेतली. त्याला बऱ्यापैकी पाणी लागले. पाणी साठवणीसाठी सोळा हजार लिटर क्षमतेची टाकी बांधली. शेती नियोजनाबाबत रावसाहेब गायकवाड म्हणाले, की मी २०१७ साली निवृत्त झालो. परंतु, शेती विकासाच्यादृष्टीने एक वर्ष अगोदरच नियोजन केले. या दरम्यान सकाळ माध्यम समूहाच्या साम वाहिनीवरील सावी थंगावेल यांच्या यशोगाथेने खजूर लागवडीचा मार्ग दाखवला. अत्यंत कमी पाण्यावर येत असलेल्या खजुराला उष्ण वातावरण लागते. त्यामुळे संगमनेर भागात खजुराची झाडे वाढतील की नाही याची चिंता होती. त्यामुळे पहिल्यांदा झिल्पी (जि. नागपूर) येथील सावी थंगावेल यांच्या खजूर लागवडीची पहाणी केली. त्यांचे अनुभव लक्षात घेऊन मी ५ मे २०१६ रोजी वीस गुंठ्यांवर २५ फूट बाय २५ फूट अंतरावर  बरी जातीच्या ३२ खजूर रोपांची लागवड केली. यामध्ये परागीकरणाच्यादृष्टीने दोन नर  आणि ३० मादी रोपांची लागवड आहे. ही रोपे थंगावेल यांच्याकडून खरेदी केली. मला घरपोच प्रती रोप सहा हजार रुपये  खर्च आला. माझी २० गुंठे खजूर लागवडीमध्ये दोन लाखांची गुंतवणूक झाली. प्रायोगिक तत्त्वावर खजुराची  लागवड करताना आर्थिक धोकाही मी पत्कारला, कारण हे पीक तसे नवीनच  आहे. तसेच आपल्याकडील कृषी तज्ज्ञांना फारशी माहिती देखील नाही.

खजूर लागवडीचे व्यवस्थापन   खजूर पिकाच्या व्यवस्थापनाबाबत गायकवाड म्हणाले, की मी सेंद्रिय  पद्धतीनेच खजूर रोपांचे व्यवस्थापन ठेवले आहे. लागवडीच्यावेळी प्रत्येक खड्यात शेणखत आणि माती मिश्रण भरून ५ मे २०१६ मध्ये रोपांची लागवड केली. रोपांना पाणी पुरवठ्यासाठी ठिबक सिंचन केले. दर आठ ते दहा दिवसांनी पाणी देण्याचे  नियोजन असते. या पिकाला फारसे पाणी लागत नाही. दरवर्षी मे आणि डिसेंबर महिन्यात प्रतिझाड तीस किलो शेणखत देतो. शेणखत देताना खोडापासून एक फूट अंतरावर लहान चर खणून त्यात शेणखत दिले जाते. पाणीदेखील खोडापासून लांब देतो.  या पिकावर फारसा कीड, रोगाचा प्रादुर्भाव नाही. लागवड केल्यानंतर  वन्यप्राण्याकडून त्रास होऊ नये यासाठी जाळीचे संरक्षण कुंपण केले.  साधारणपणे यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात ३२ झाडापैकी २२ झाडंना फुलोरा आला. या दरम्यान मी हाताने परागीकरण केले. त्याचा फळधारणेला फायदा झाला. याच्या तुऱ्याला फुले, फळे लागतात. साधारणपणे जून महिन्यापासून टप्याटप्याने फळांचे उत्पादन सुरू झाले. पहिल्यादा फळे हिरवट असतात नंतर पिवळी होतात. पिवळ्या रंगाची फळे गोड असतात. अशा फळांची काढणी करण्यास सुरवात केली. पहिली दोन वर्षे खजूर लागवडीच्या मधल्या पट्यात गादीवाफे करून स्टॉबेरीची लागवड केली. हा देखील एक प्रयोग होता. तसेच एक वर्ष हरभऱ्याची लागवड केली होती. ही उत्पादने घरापुरतीच झाली. 

स्थानिक पातळीवर विक्री गायकवाड यांच्या बागेतील ३२ झाडांपैकी २२ झाडांना यंदा पहिल्यांदा खजूर लागले. प्रत्येक झाडांना साधारण तीस ते चाळीस किलो ओल्या खजुरांचे उत्पादन मिळाले. पहिलेच उत्पादन असल्याने गायकवाड यांनी मित्र, नातेवाईकांना बागेत बोलावून १५० किलो फळांचे मोफत वाटप केले. उर्वरित ३०० किलो फळे स्‍थानिक बाजारात २०० ते २५० रुपये प्रती किलो दराने विक्री केली. खजुरांना चांगला मागणी आहे. ओल्या खजुराला मुंबईत चांगले मार्केट आहे. परंतु, स्थानिक बाजारपेठेत अपेक्षित दर आणि मागणी असल्याने सध्या त्यांनी परिसरातच खजूर फळांची विक्री सुरू ठेवली आहे.

एक एकरापर्यंत वाढवणार लागवड येत्या काळातील नियोजनाबाबत गायकवाड म्हणाले, की माझी केवळ दीड एकर शेती असली तरी मी शेतीत वेगवेगळे प्रयोग करतोय. आमचा भाग दुष्काळी आहे. त्यामुळे कमी पाण्यामध्येच शेती करावी लागणार आहे. त्यामुळे प्रयोग म्हणून खजुराची लागवड केली. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. या पिकातील सुधारित तंत्र आत्मसात करून पुढील वर्षी अधिक उत्पादन वाढ कशी करता येईल या प्रयत्नामध्ये मी आहे.   यंदा मला अपेक्षित उत्पादन मिळाले आहे. तसेच ओल्या खजूर फळांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे येत्या काळात एक एकरामध्ये खजुराची लागवड वाढविण्याचे नियोजन करत आहे. यासाठी साधारणपणे पाच ते सहा लाखांची गुंतवणूक करावी लागणार आहे. याचबरोबरीने मी कोंबडी पालन, शेळी पालनासाठी शेतामध्ये शेड तयार केली आहे. दुष्काळी भागात कमी पाण्यावर खजूर लागवड यशस्वी झाल्याने परिसरातील शेतकरी माझ्या शेतीला भेट देत आहेत. आत्तापर्यंत तीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी देऊन या पिकाची माहिती घेतली आहे.   - रावसाहेब गायकवाड, ९९२२९२४७८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com