फळबाग, यांत्रिकीकरणातून शेतीला मिळाली नवी दिशा

मोसंबी बागेमध्ये दिगंबरराव गिराम  आणि दत्तात्रय गिराम.
मोसंबी बागेमध्ये दिगंबरराव गिराम आणि दत्तात्रय गिराम.

निपाणी टाकळी (ता. सेलू, जि. परभणी) येथील दत्तात्रय गिराम हे पोलिस दलात कार्यरत आहेत. नोकरीनिमित्त बाहेर गावी असले तरी त्यांनी शेतीशी नाळ कायम ठेवली. पारंपरिक पीकपद्धतीला फळबागेची जोड दिली. शेततळ्यामधील पाणीसाठ्याचा काटेकोर वापर केल्यामुळे दुष्काळी स्थितीतही मोसंबी आणि लिंबू फळबाग चांगली बहरली आहे. निपाणी टाकळी (जि. परभणी) येथील दिगंबरराव गिराम यांना चार मुले. थोरले प्रभाकर वकील आहेत. दत्तात्रय आणि रमेश हे दोघे पोलिस दलात कार्यरत आहेत आणि रामेश्वर शेती करतात. नोकरी, व्यवसायानिमित्त परगावी असलेले गिराम बंधू रविवारी मात्र शेतावर एकत्र येतात. त्या वेळी शेती कामे, पीक व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा केली जाते. त्यातून पुढील आठवडाभरात करावयाच्या शेती कामांचे नियोजन केले जाते. दत्तात्रय गिराम यांची २००६ मध्ये नांदेड पोलिस दलात नियुक्ती झाली. शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतरही त्यांनी शेतीची आवड कायम ठेवली. सुरवातीच्या काळात गावापासून दूर ठिकाणी कर्तव्यावर असल्यामुळे शेतावर जाण्यासाठी फारसा वेळ मिळत नसे. मात्र सुटीच्या कालावधीत गावी आल्यावर दत्तात्रय गिराम हे भावांच्याबरोबरीने शेती नियोजनात सहभागी व्हायचे. तीन वर्षांपू्र्वी त्यांची बदली परभणी जिल्ह्यात झाली. सध्या ते चारठाणा (ता. जिंतूर) येथील पोलिस ठाण्यात पोलिस नाईक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे  गिराम प्रत्येक साप्ताहिक सुटीच्या दिवशी म्हणजेच रविवारी शेतीसाठी पूर्णवेळ देतात. दत्तात्रय गिराम यांना शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान, विविध पीकपध्दती याबद्दल माहिती जाणून घेण्याची आवड आहे. ते नेहमी विविध ठिकाणची कृषी प्रदर्शने, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये होणारे खरीप आणि रब्बी पीक शेतकरी मेळावे यांना आवर्जुन हजेरी लावतात. नवीन तंत्रज्ञान, पीकपद्धती याची कृषी तज्ज्ञांकडून माहिती घेतात. त्याचप्रमाणे परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन त्यांचेही अनुभव जाणून घेत असतात. या माहितीचा वापर स्वतःच्या शेतीमध्ये करून पीक उत्पादन वाढ साधली आहे. वडील दिगंबरराव तसेच बंधूंशी विचार विनिमय करून पीक व्यवस्थापनाबाबत निर्णय घेतले जातात. 

असे आहे पीक नियोजन  निपाणी टाकळी शिवारात गिराम कुटुंबीयांची ५० एकर मध्यम ते भारी प्रकारची जमीन आहे. सिंचनासाठी विहीर तसेच कूपनलिकेची सुविधा आहे. तसेच एक बैलजोडी आहे.  सध्या २५ एकरांवर कपाशी, एक एकरावर चारा पीक, अडीच एकरावर मूग आणि एकोणीस एकरातील मोसंबी आणि लिंबू बागेत सोयाबीनचे आंतरपीक घेतले आहे. शेती व्यवस्थापनासाठी दोन सालगडी आहेत.   कपाशी लागवडीबाबत गिराम म्हणाले की, काही वर्षांपूर्वी कपाशीच्या दोन ओळी आणि दोन झाडातील आंतर साडे तीन बाय साडे तीन फूट ठेवून लागवड करत होतो. त्या वेळी एकरी ५ ते ६ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असे. गेल्या सहा वर्षांपासून सुधारित पद्धतीने दोन ओळीतील आंतर ५ फूट आणि दोन झाडांतील आंतर २ फूट ठेवून कपाशीची लागवड करत आहे.  कपाशी व्यवस्थापन करताना परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सातत्याने सल्ला घेतला जातो. अंतर वाढविल्यामुळे  ट्रॅक्टरद्वारे आंतरमशागत तसेच पेरणीयंत्राद्वारे खताची पेरणी करता येत आहे. उत्पादनातही एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळते. जमीन सुपिकतेसाठी सेंद्रिय खतांचा वापर, एकात्मिक पद्धतीने कीडरोग नियंत्रणावर भर दिला आहे. त्यामुळे कपाशीचे चांगले उत्पादन मिळते. प्रयोगशील शेतकऱ्यांचा पीक व्यवस्थापनात सल्ला घेतला जातो. सोयाबीनचे एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळते. 

मोसंबी आणि लिंबाची बाग   लागवडीचे मोठे क्षेत्र आणि  कमी पाण्याच्या उपलब्धतेमुळे गिराम यांनी पारंपरिक पिकांपेक्षा मोसंबी आणि लिंबू लागवडीकडे लक्ष केंद्रित केले. जालना जिल्ह्यातील शिंदे वडगाव येथील गणेश जाधव हे दत्ता गिराम यांचे साडू आहेत. गणेश जाधव यांच्याकडे मोसंबी, लिंबू, डाळिंब लागवड आहे. या फळपिकांतून शाश्वत उत्पादन मिळत असल्याने दत्ता गिराम यांनी देखील घरच्या शेतात फळबागेचे नियोजन केले. लागवडीपूर्वी परिसरातील फळबाग उत्पादकांशी चर्चा केली. फळबागांनाही भेटी दिल्या. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला. २०१६ मध्ये १५ एकर क्षेत्रावर मोसंबीच्या न्युसेलर जात आणि चार एकरावर लिंबाच्या साई सरबती जातीची लागवड केली. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाचा मोसंबीच्या आंबे बहराचे त्यांनी नियोजन केले आहे. 

फळबागेसाठी शेततळ्यातील संरक्षित पाणी  

गिराम यांनी तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानअंतर्गत सुमारे एकर क्षेत्रावर शेततळे खोदले. शेततळ्याला प्लॅस्टिक अस्तरीकरण करण्यात आले. विहीर तसेच कूपनलिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असते,  त्या वेळी शेततळे भरून घेतले जाते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात आलेल्या पावसाच्या खंड काळात तुषार संचाव्दारे सोयाबीनला संरक्षित पाणी देता आले. त्यामुळे एकरी ८ ते ९ क्विंटल उत्पादन मिळाले. यंदाच्या एप्रिल महिन्यापासून शेततळ्यांतील पाणी ठिबक सिंचनाव्दारे १९ एकरवरील फळबागेला देण्यात येत आहे. त्यामुळे गंभीर दुष्काळातही मोसंबी आणि लिंबू फळबाग चांगल्या पद्धतीने जोपासली आहे.

यांत्रिकीकरणावर भर 

  •  मजुरांच्या समस्यामुळे शेती कामासाठी अडचणी येत आहेत. पेरणी, मशागतीच्या कामांसाठी वेळेवर मजूर मिळत नसल्याने नुकसान होते. त्यामुळे  गिराम यांनी शेतीमध्ये यांत्रिकीकरण करण्यावर भर दिला. ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, नांगर, वखर आदी अवजारांचा वापर सुरू केला. त्यामुळे मजुरांच्या समस्येवर मात करता आली. आंतरमशागतीच्या कामासाठी एक बैलजोडी आहे. 
  •  वीज भारनियमनाच्या काळात विहिरीत पाणी उपलब्ध असतानादेखील पिकांना देता येत नाही. यावर उपाय म्हणून त्यांनी लोखंडी सांगड्यावर जनरेटर बसवून त्याला दोन चाके लावली. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे हा जनरेटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतो. भारनियमाच्या काळात कृषीपंप जनरेटवर चालविला जातो. त्यामुळे पिकांच्या गरजेच्यावेळी पाणी देता येते. त्याचा पीक उत्पादनवाढीला फायदा होतो. 
  • गिराम यांनी फळबागेमध्ये फवारणीसाठी बूम स्प्रेअर आणला आहे. सातत्याने नवीन तंत्राचा अवलंब करत असल्याने पीक उत्पादन तसेच गुणवत्तेतही वाढ होत आहे.
  • विहीर पुनर्भरणामुळे पाण्याची उपलब्धता

    गिराम यांच्या शेतातील विहीर शंभर फूट खोल आहे. शेतातून वाहून जाणारे पावसाचे पाणी त्यांनी नालीद्वारे विहिरीपर्यंत आणले. हे पाणी त्यांनी पुनर्भरण तंत्राने विहिरीत सोडल्याने पाणी पातळीत वाढ झाली. यंदाच्या गंभीर दुष्काळी स्थितीमध्ये परिसरातील विहिरी आटलेल्या आहेत. परंतु गिराम यांच्या विहिरीमध्ये सद्यस्थितीत पाणी उपलब्ध होत आहे. त्यावर दररोज १५ ते २० मिनिटे पंप चालतो. ठिबक सिंचन संचाद्वारे फळबागेला पाणी दिले जाते. विहिरीच्या बरोबरीने त्यांनी कूपनलिकेचेही पुनर्भरण केले आहे. त्यामुळे कूपनलिकेची पाणीपातळी टिकून आहे.

    शेती व्यवस्थापनाची सूत्रे

  •  जमीन सुपिकतेसाठी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर.
  •   मोसंबी, लिंबू बागेसाठी ठिबक सिंचन, फळबागेत आंतरपिकांची लागवड.
  •   एकात्मिक पद्धतीने कीड,रोग नियंत्रण.
  •  पीक व्यवस्थापनात प्रयोगशील शेतकरी, कृषी तज्ज्ञांचा सल्ला.
  •   कापूस उत्पादकांचा गट.चर्चेतून पीक उत्पादनवाढीला हातभार.
  • यांत्रिकीकरणातून मजूर टंचाईवर मात.
  • - दत्तात्रय गिराम, ८८८८८९७२७८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com