agriculture news in marathi, success story of Dr.Prashant Rajput,Virwade,Dit.Ja;gaon | Agrowon

रुग्णसेवेसह शेतीतही जपले वेगळेपण

चंद्रकांत जाधव
रविवार, 23 डिसेंबर 2018

मुंबई येथील प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जयेंद्रसिंग राजपूत यांनी विरवाडे (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये सुधारित तंत्राने केळी आणि हळद लागवड यशस्वी केली. मुंबईमध्ये हळद पावडर, सेंद्रीय ज्वारीसाठी ग्राहक तयार केले. वैद्यकीयपेशा सांभाळून पीक उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान वापरावर त्यांनी भर दिला आहे.

मुंबई येथील प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जयेंद्रसिंग राजपूत यांनी विरवाडे (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये सुधारित तंत्राने केळी आणि हळद लागवड यशस्वी केली. मुंबईमध्ये हळद पावडर, सेंद्रीय ज्वारीसाठी ग्राहक तयार केले. वैद्यकीयपेशा सांभाळून पीक उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान वापरावर त्यांनी भर दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील विरवाडे (ता. चोपडा) गावामध्ये डॉ. प्रशांत राजपूत यांची वडिलोपार्जित ३६ एकर शेती आहे. गावशिवारातील जमीन हलकी, काळी कसदार स्वरूपाची असून केळी लागवड मोठ्या प्रमाणात आहे. सध्या डॉ. राजपूत हे मुंबई येथे कार्यरत असून निष्णात किडनी तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. शालेय शिक्षणापासून डॉ. राजपूत घरापासून दूरच होते. महाविद्यालयातील सुट्यांमध्ये त्यांना घरच्या शेतीवर जायला मिळायचे. डॉ. राजपूत यांचे वडील जयेंद्रसिंग हे प्रयोगशील शेतकरी. सुटीच्या काळात डॉ. प्रशांत वडिलांच्याबरोबरीने शेतीवर जाऊन केळी लागवडीतील प्रयोग, ठिबक सिंचन, उत्पादन आणि बाजारपेठेबाबत चर्चा करायचे. जयेंद्रसिंग हे केळी आणि हंगामी पिकांच्या उत्पादनात अग्रेसर होते. शेतीमध्ये ते वेगवेगळे प्रयोग करायचे. १९९० मध्ये त्यांनी केळीसाठी अमेरिकेतील कंपनीकडून ठिबक संच मागवला होता. या दरम्यानच्या काळात सिंचन तंत्रज्ञानासंबंधीच्या कंपनीतील तज्ज्ञांशी जयेंद्रसिंग यांची पीक व्यवस्थापनाविषयी चर्चा सुरू झाली. डॉ. प्रशांत घरात एकटे असल्याने वडिलांच्या निधनानंतर शेतीची जबाबदारी आली.

शेतीमध्ये केले बदल 
शेतीची जबाबदारी आल्यानंतर मुंबई येथे राहात असलेल्या डॉ. प्रशांत राजपूत यांनी ३६ एकर क्षेत्रांतील पीक लागवड आणि व्यवस्थापनाचे नियोजन केले. यासाठी चुलतभाऊ नितीन राजपूत यांची चांगली मदत झाली. डॉ. प्रशांत यांची आई विजयाबाई या विरवाडे येथेच राहतात. मुंबईमधील वैद्यकीय व्यवसायामुळे डॉ. प्रशांत यांना वारंवार गावी येणे जमत नसल्याने त्यांनी संपूर्ण शेतीच्या नियोजनासाठी आठ सालगडी आणि एक चालक नेमला. डॉ. राजपूत यांच्या शेतीमध्ये शाश्वत सिंचनासाठी दोन कूपनलिका आहेत.   

डॉ. प्रशांत हे महिन्यातून एकदा मुंबईहून जळगाव शहरातील एका रुग्णालयात किडनी विकार असलेले रुग्ण तपासणीसाठी येतात. याच दरम्यान केळी तज्ज्ञ के. बी. पाटील हे एका रुग्णास तपासणीसाठी डॉ. राजपूत यांच्याकडे घेऊन आले होते. या संपर्कातून डॉ. राजपूत यांनी केळी पिकातील सुधारित तंत्र, व्यवस्थापनाची माहिती घेण्यास सुरवात केली. 

शेतीसाठी क्लास 
केळी तज्ज्ञ के. बी. पाटील यांनी दिलेल्या माहितीमुळे डॉ. प्रशांत यांचा केळीच्या सुधारित लागवडीबाबत रस वाढला. ज्या दिवशी डॉ. प्रशांत जळगाव शहरात रुग्ण तपासणीसाठी येतात तेव्हा ते खास दोन तासांचा वेगळा वेळ ठेऊन के. बी. पाटील यांच्याकडे नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी जातात. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचा दर महिन्याला दोन तासांचा शेतीविषयक क्लास सुरू आहे. 

मुंबईत घरून रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी डॉ. प्रशांत यांना एक तास लागतो. या प्रवासादरम्यान व्हिडिओ कॉलिंगद्वारे श्री. पाटील तसेच केळीमधील प्रयोगशील शेतकऱ्यांची ते संपर्क साधतात. केळीसंबंधी काही छायाचित्रे असली तर ती त्यांना पाठवून अधिक माहिती घेतात. याचबरोबरीने स्वतःच्या केळी बागेत तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून पीक व्यवस्थापनातील सुधारणा समाजावून घेतात. वनस्पतीशास्त्र व इतर बाबींविषयी ऑक्‍सफर्ड, पेनसिल्व्हानिया विद्यापीठाचे अभ्यासक्रम, इक्वेडोर, फिलीपीन्समधील केळी लागवड तंत्र, इस्त्राईलमधील पाणी व्यवस्थापन, पॅकेजिंग, विक्री व्यवस्थापनातील तांत्रिक माहिती इंटरनेटवरून घेतात. 

सालगड्यांना दिले प्रशिक्षण 
डॉ. राजपूत यांनी सालगड्यांना विविध पिकांतील सुधारित लागवड, खत, पाणी व्यवस्थापनासंबंधीचे तंत्रज्ञान अवगत व्हावे, यासाठी तांदलवाडी (ता. रावेर) येथील प्रशांत महाजन आणि रावेरमधील शेतकरी विशाल अग्रवाल यांच्याकडे प्रशिक्षणाला पाठविले होते. त्याचा शेती नियोजनात फायदा होत आहे. शेतीमधील प्रत्येक जमा-खर्चाचा हिशेब मांडल्यामुळे पुढील वर्षातील नियोजन करणे त्यांना सोपे जाते.

सुधारित तंत्राचा अवलंब 
 डॉ. राजपूत यांनी २०१६ पासून पीक व्यवस्थापनामध्ये बदलास सुरवात केली. महिन्यातून दोनवेळा ते गावी येतात. सालगडी आणि तज्ज्ञांशी चर्चाकरून पुढील पंधरा दिवसांचे नियोजन ठरविले जाते. सध्या राजपूत यांच्याकडे दहा एकर केळी, दहा एकर हळद, चार एकर कापूस आणि इतर हंगामी पिकांची लागवड आहे. दोन एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने ज्वारीचे उत्पादन घेतात. विविध पिकांना सेंंद्रिय खते, किडनाशकांच्या वापरावर त्यांनी भर दिला आहे. गेल्या सहा वर्षांपासून दैनिक ॲग्रोवनमधील माहितीचा पीक व्यवस्थापनामध्ये अवलंब केल्याने पीक उत्पादनात चांगली वाढ मिळाली आहे.

केळी 

 • मे, जूनमध्ये पाच बाय साडेपाच फूट अंतरात उतिसंवर्धित रोपांची लागवड.
 • माती परीक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर. दीड फूट उंच गादीवाफा. मल्‍चिंगमुळे वाफसा कायम. पाण्याचा नियंत्रित वापर. ठिबकमधून जिवामृताचा वापर.
 • घडासाठी स्कर्टिंग बॅग. करपा रोग नियंत्रणासाठी शिफारशीनुसार फवारणी. 
 • यंदा किमान २८ किलो प्रतिघड, अशी रास मिळण्याची अपेक्षा. कंपनीच्या माध्यमातून परदेशात निर्यातीचे नियोजन. निर्यातीच्या केळीला जाहीर होणाऱ्या दरांपेक्षा १५० ते २०० रुपये अधिक दराचा अंदाज.
 • येत्या काळात गावामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी उभारणार.

हळद 

 • सेलम आणि वायगाव जातीची १५ मे दरम्यान लागवड. दीड फुटाचा गादीवाफा. दोन गादीवाफ्यांमधील अंतर पाच फूट. गादीवाफ्यावर दोन ओळीतील अंतर सव्वा फूट.
 • ठिबक सिंचनाने पाणी नियोजन. माती परीक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन. पूर्वीपेक्षा उत्पादनात ४० टक्के वाढ. ठिबक सिंचनातून जीवामृताचा वापर.
 • ओल्या हळदीचे एकरी १५० क्विंटल उत्पादन.
 • मुंबईतील ग्राहकांना हळद पावडरीची २५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री. वैद्यकीय व्यवसायामुळे संपर्कात आलेल्या युरोप, दुबईतील लोकांना दरवर्षी दहा क्विंटल हळद पावडरीची विक्री.
 • हळकुंडांची सांगली बाजारात विक्री. खर्च वजा जाता एकरी दीड लाखांचा नफा.

कापूस 

 • जूनमध्ये ठिबकवर पाच बाय पाच फूट अंतरावर लागवड.
 • माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन. एकात्मिक कीड, रोग नियंत्रणावर भर.
 • एकरी ११ क्विंटल उत्पादन. फरदड घेत नाही.
 • गावातील व्यापाऱ्याला कापसाची विक्री 

 -  डॉ. प्रशांत राजपूत, ९९३०५०७०८२  (रविवारी दुपारी ४ नंतर)

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर नगदी पिके
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...
उसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
ऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ...सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या...
कपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापनमागील दोन वर्षांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
नारळ बागेत मसाला पिकांची लागवड    नारळ बागेमध्ये नारळाच्या...
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...
आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...
ऊस बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी...अलीकडे प्रो ट्रे किंवा पिशव्यांमध्ये उसाची रोपे...
दुष्काळाशी लढा देत हळदीची उत्कृष्ट शेतीअमळनेर (जि. जळगाव) येथील अश्पाक मुनीर पिंजारी व...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खरीप कांदा लागवड तंत्रज्ञानविशेषतः विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे...
खरीप नियोजन : कपाशीतील असमतोल वाढ,...गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ...
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
ऊस पीक व्यवस्थापन सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याचा...
दर्जेदार कृषी उत्पादनासाठी...आपण शेती उत्पादनामध्ये बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झालो...