शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
यशोगाथा
आग्या मधमाशी संवर्धनासोबतच स्थानिकांना रोजगार
परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांचे संवर्धनासोबतच आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम वर्धा येथील डॉ. गोपाल व सुनिता पालिवाल यांनी राबविला आहे. संस्थेद्वारे वर्षभरात तब्बल ११० क्विंटल मधावर प्रक्रिया केली जाते.
परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांचे संवर्धनासोबतच आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम वर्धा येथील डॉ. गोपाल व सुनिता पालिवाल यांनी राबविला आहे. संस्थेद्वारे वर्षभरात तब्बल ११० क्विंटल मधावर प्रक्रिया केली जाते. यातून स्थानिकांना स्वयंरोजगाराचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
वर्ध्यातील डॉ. गोपाल पालीवाल यांनी आग्या मधमाश्यांच्या कार्यपद्धतीवर पीएच. डी. पदवी मिळवली असून, त्यांच्या पत्नी डॉ. सुनीता यांनी मधाची गुणवत्ता विकसित करण्यासंदर्भात पीएच. डी. मिळवली आहे. या दांपत्याने प्रामुख्याने चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांतील जंगल परिसरात आढळणाऱ्या आग्या मधमाश्यांच्या संवर्धनासाठी काम सुरू केले. पूर्वी येथील आदिवासी आग्या मधमाश्यांच्या पोळ्यातील मध काढून बाजारात विक्री करत. मात्र, अशास्त्रीय पद्धतीने पोळ्याला धोका पोचत असे. मधाची गुणवत्ताही कमी होई. पालीवाल दांपत्याने मध काढण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, आग्या मधमाश्यांचे संवर्धन हा उद्देश ठेवून सन २००० मध्ये "मधमाशी विकास केंद्राची'' स्थापना केली. या उपक्रमाला खादी ग्रामोद्योग मंडळ, नाबार्ड, कपार्ट, आदिवासी विकास विभाग आणि भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सहकार्य मिळाले.
नाबार्ड निधीतून यंत्रसामुग्री
- सेवाग्राम निसर्ग हनी केंद्रातील यंत्रसामग्रीसाठी े पाच लाख रुपयांचा खर्च झाला. त्यासोबतच मधाच्या खरेदीसाठीही खेळत्या भांडवलाची गरज होती. हा निधीही नाबार्डकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध झाला. या कर्जाची परतफेड करण्यात आली आहे. त्यासोबतच चेन्नई येथील पोलारीज फाउंडेशन यांनीही आर्थिक मदत केली होती.
- वर्षभरात १५० आदिवासींकडून ११० क्विंटल मधाची उपलब्धता होते.
- प्रक्रिया, मजुरी यावरील खर्च वजा जाता एक किलोची बॉटल सरासरी ३१० दहा रूपयाला पडते, असे त्यांनी सांगितले.
- चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातील आदिवासींकडून मधाचा पुरवठा होतो. गोपाल यांच्या पत्नी सुनिता पालिवाल यांच्याकडे मधाची गुणवत्ता पडताळणीचे काम आहे. सचिन खंडाते व शशिकला बोरकर यांच्याकडे मार्केटिंग व मधाची प्रक्रिया करण्याची जबाबदारी आहे.
मधमाशांचे संवर्धन
अशास्त्रीय पद्धतीने मध काढल्याने वर्षाकाठी सरासरी आठ ते दहा हजार आग्या मोहोळाचे पोळ नामशेष होतात. आग्या मधमाशांच्या संवर्धनासाठी गोपाल पालीवाल यांनी पुढाकार घेतला. देशभरातील २९ जिल्ह्यांमध्ये २२ संस्थांसोबत आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र या राज्यांत मधमाशी संवर्धनाचे काम करतात. या राज्यातील आदिवासींना मधमाशी संवर्धन व शास्त्रोक्त मध संकलनाचे प्रशिक्षण दिले जाते.
आग्या मधमाश्यांविषयी...
मधमाश्यांच्याबाबत माहिती देताना डॉ. पालीवाल म्हणाले, की सातेरी मधमाश्यांचे पेट्यांमध्ये पालन करता येते. फुलोरी मधमाश्या खाद्य जास्त असलेल्या म्हणजेच फळबागांच्या परिसरात पोळे बनवितात. आग्या मधमाश्या परिसरातील फुलोऱ्याप्रमाणे उंच झाडे, डोंगरातील कड्या कपारी, उंच भिंती, नदी नाले पूल, जंगलात पोळे बांधतात. विशेषतः पाण्याच्या आडोशाने असलेल्या मोठ्या झाडांवर त्यांची पोळी असतात. यांचे संगोपन शक्य नाही. त्यामुळे संस्थेतर्फे आग्या मधमाश्यांच्या संवर्धनाचे काम हाती घेतले. आग्या मधमाश्या या पावसाळ्यात जंगली भागातून शेती किंवा पठाराकडे येतात. नोव्हेंबर ते जानेवारी आणि मार्च ते जून या दोन टप्प्यांत मध गोळा केला जातो. वर्षभरात तीन ते पाच वेळा मधाची उपलब्धता एकाच पोळ्यापासून होते.
मध संकलनातून रोजगारनिर्मिती
- या नव्या शास्त्रोक्त पद्धतीने चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील प्रशिक्षित आदिवासींकडून मध संकलनाचे काम होते. त्याकरिता त्यांना विशेष गणवेशही पुरविण्यात आला आहे. एका आग्यामोहोळापासून सरासरी तीन ते पाच किलो मध मिळतो. दोनशे रुपये प्रति किलोचा असा दर मध संकलनकर्त्यांना दिला जातो. त्यातून मधाशिवाय मिळणारे मेणही दोनशे रुपये प्रति किलो दराने खरेदी केले जाते. १०० किलो मधापासून साधारणपणे दहा किलो मेण मिळते.
- मधाची गुणवत्ता कायम राखण्यासाठी त्याची वाहतूक २५ किलो क्षमतेच्या प्लॅस्टिक कॅनमधून केली जाते. गरजेनुसार आदिवासींना पुरविल्या जाणाऱ्या कॅन, चाकू, अंगावर घालण्याकरता संरक्षक गणवेश, दोर व अन्य आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जातो.
- तीन दिवसाच्या कालावधीत एक हजार रुपयांपासून ते ५५ हजार रुपयाचा मध आदिवासींकडून संकलित होतो. यातील मध आणि मेणाची नोंद रजिस्टरमध्ये घेऊन तत्काळ रक्कम दिली जाते.
विक्रीसाठी प्रयत्न
- मधमाशी संवर्धन केंद्राद्वारे ‘सेवाग्राम निसर्ग हनी’ या ब्रँड खाली संकलित मधाची विक्री होते.
- मधाची गुणवत्ता जपण्यासाठी वारलेली प्रयोगशाळा प्रमाणित आहे. भारत सरकारच्या ॲगमार्क द्वारे "मधु गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा" अशी ओळख तिला मिळाली आहे.
- कृषी प्रदर्शने, खादी ग्रामोद्योग मंडळ, औषधे दुकाने (मेडिकल), किराणा दुकानातून या मधाची विक्री होते.
- अनेक ग्राहकांना थेट विक्रीही केंद्राद्वारे केली जाते. सध्या ३३० रुपये प्रति किलो दराने मधाची विक्री केली जाते.
- या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आता पन्नास लाख रुपयांवर पोचली आहे. त्यावरूनच या व्यवसायाचा आवाका लक्षात येतो.
मध संकलनासाठी पोळ्याची हानी नाही
- आदिवासींना मधमाश्यांच्या वसाहती नष्ट न करता तंत्रशुद्धपणे केवळ मधाचा कांदा काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
- पोळ्यात मध साठवलेला भाग हा फांदीला चिकटून असतो. केवळ मधाने भरलेला भाग कापून घेतला जातो. पोळे तसेच ठेवले जाते. मधमाशा कापलेल्या भागात महिनाभरात पुन्हा मध साठवतात. त्यानंतर तीन ते चार महिन्याने पुन्हा मध भरलेला भाग कापला जातो. अशा प्रकारे एकाच पोळ्यापासून वर्षभरात तीन वेळा मधाची उपलब्धता होऊ शकते.
- मधाने भरलेल्या भागाला योग्य काप देऊन चाळणीवर ठेवून मध भांड्यात गोळा केला जातो.
- उर्वरित वसाहत तशीच शिल्लक ठेवली जात असल्याने मधमाश्यांना अजिबात हानी पोचत नाही. त्यानंतर मधाचे प्रमाणही दिड ते दुपटीने वाढते.
संपर्कः डॉ. गोपाल पालीवाल, ९४२३४२०४८५
फोटो गॅलरी
- 1 of 91
- ››