व्यवसाय सांभाळून शेतीमध्ये वाढविली गुंतवणूक

खासगी नोकरी सोडून आपला पेपर प्रॉडक्‍ट, प्लॅस्टीक उत्पादनाच्या व्यवसाय उभा करणाऱ्या समाधान रतन पाटील (रा. टिळकनगर, जळगाव) यांनी आपल्या वडीलोपीर्जीत शेतीमध्येही गुंतवणूक वाढवली आहे. आपले बंधू अंबादास यांच्यासह पॉलीहाऊसमध्ये गुलाब, ढोबळी मिरची, काकडी यांची शेती करतात. दुग्ध उत्पादनासोबत विक्रीचेही नियोजन बसवले आहे. विविध शेतीपुरक व्यवसायातून १५ जणांना बारमाही रोजगार उपलब्ध केला आहे.
Roses in polyhouse
Roses in polyhouse

खासगी नोकरी सोडून आपला पेपर प्रॉडक्‍ट, प्लॅस्टीक उत्पादनाच्या व्यवसाय उभा करणाऱ्या समाधान रतन पाटील (रा. टिळकनगर, जळगाव) यांनी आपल्या वडीलोपीर्जीत शेतीमध्येही गुंतवणूक वाढवली आहे. आपले बंधू अंबादास यांच्यासह पॉलीहाऊसमध्ये गुलाब, ढोबळी मिरची, काकडी यांची शेती करतात. दुग्ध उत्पादनासोबत विक्रीचेही नियोजन बसवले आहे. विविध शेतीपुरक व्यवसायातून १५ जणांना बारमाही रोजगार उपलब्ध केला आहे. समाधान पाटील यांचे मूळ गाव आव्हाणे (ता. जि.जळगाव) हे आहे. बालपणीच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे वडिलोपार्जित चार एकर शेती आणि खासगी नोकरी करता करता मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवली. सुमारे १७ वर्ष खासगी कंपनीत नोकरी केली. मात्र, स्वतःचा व्यवसाय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१७ मध्ये नोकरीचा राजिनामा दिला. त्यांचे लहान बंधू अंबादास हे उच्च शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे शेतीत गुंतवणूक वाढवण्याचाही विचार केला. नोकरी सुरू असतानाच त्यांनी २०१५-१६ मध्ये पॉलीहाऊस उभारले होते. त्यामध्ये दैनंदिन कामकाजाचे नियोजन हे अंबादास बघतात. पुढे नोकरी सोडल्यानंतर समाधान यांनी पेपर आणि प्लॅस्टिक पेपरचा लघू उद्योग सुरू केला. याबरोबरच जळगाव शहरात दूध, फुले मार्केटींगचे कामही ते पाहतात. या साऱ्या वाटचालीमध्ये वीज वितरण कंपनीत अभियंतापदावर कार्यरत असलेल्या पत्नी सौ. प्रतिभा यांची समर्थ साथ मिळते.

प्लॅस्टिक व पेपर उत्पादनांची निर्मिती, विक्री 

  • जळगाव शहरात समाधान यांचे कार्यालय व विक्री केंद्र आहे. एका कंपनीकडून प्लॅस्टीक टाक्यांची निर्मिती करून घेऊन विक्री (मार्केटींग) ते करतात. यासोबत प्लंबिंग मटेरियल व इतर प्लॅस्टीक वस्तूंची विक्री करतात. या व्यवसायात दोन जणांना रोजगार दिला आहे. दरमहा तीन ते चार लाखांची उलाढाल या विक्री व्यवसायातून होते.
  • समाधान यांनी जळगाव शहरालगत आव्हाणे शिवारात जागा खरेदी करून पेपर प्रॉडक्‍ट निर्मितीचा लघुउद्योग सुरू केला. चहा, दूधाचे डिस्पोजेबल कप, पाण्याचे कप ते तयार करतात. प्रतिमहिना ८० हजारांपर्यंतचा खर्च येतो, तर किमान ३० ते ३५ हजार रुपये नफा सुटतो. त्यात एक अभियंता व इतर दोघांना बारमाही रोजगार उपलब्ध केला आहे.
  • व्यवसाय सांभाळतानाच शेतीकडेही लक्ष २०५६ चौरस मीटरचे पॉलिहाऊस असून, त्यात डच गुलाब, काकडी व ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतात. डच गुलाबाच्या विक्रीसाठी जळगाव शहरात त्यांनी विक्रेत्यांशी सतत संपर्क वाढविला. तसेच पुणे, नागपुरलाही फुले ते पाठतात. काकडी व ढोबळी मिरचीची विक्रीदेखील परजिल्ह्यासह स्थानिक बाजारात ते करतात. पॉलिहाऊसमध्ये प्रतिमहिना मजुरी व इतर बाबींचा एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च त्यांना येतो. तर किमान ३० हजारांवर नफा ते मिळवितात.

    दूध व्यवसायाचा विस्तार करणार

  • सध्या पाटिल कुटुंबीयांकडे १० दुधाळ म्हशी आहेत. डेअरीला दूध विक्री करण्यापेक्षाही घरोघर दूध वितरणाचे नियोजन बसवले आहे. जळगाव शहरातील तीन कॉलन्यांमध्ये त्यांचे दुधाचे ग्राहक आहेत. या कॉलन्या जवळजवळ असल्याने दूध वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याला फारसा वेळ खर्च होत नाही. दूधासंबंधीचे व्यवस्थापन समाधान यांचे बंधू व एक कर्मचारी करतात. उत्पादीत होणाऱ्या सुमारे ५० लीटर दुधाला ६० रुपये प्रतिलीटर प्रमाणे दर मिळतो.
  • दूध दर्जेदार असल्याने त्याचे ग्राहक टिकून आहेत. शिवाय मागणी वाढत असल्याने आणखी १० म्हशी खरेदी करण्याचे नियोजन ते करीत आहे. पुढील टप्प्यामध्ये शहरात डेअरी व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • गोठा पॉलिहाऊसनजीकच असल्यामुळे बंधू एका कर्मचाऱ्यासह दोन्ही एकात्मिक व्यवस्थापन करू शकतात. दूध वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोविड१९ संसर्गापासून बचावासाठी मास्क, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझरचा यांचा वापर अनिवार्य केला आहे.
  • अळिंबी उत्पादन एका दांपत्याच्या साह्याने कंत्राटी पद्धतीने अळिंबी उत्पादन घेतले जाते. एका बंदिस्त खोलीमध्ये गव्हाचे काड, आर्द्रता राखण्यासाठी ठिबक नळ्यांचा उपयोग केला आहे. त्यात रोज १० किलो अळिंबीचे उत्पादन घेतात. अळिंबीला २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो असा दर मिळतो. विक्रीचे नियोजन केल्यामुळे किमान १० हजार रुपये प्रतिमहिना उत्पन्न यातून सुरू झाले आहे. शेतीमाल विशेषतः फुलांच्या साठवणीसाठी एक लहान कोल्डस्टोरेज उभारण्याचे नियोजन आहे.

    सौर उर्जेचा वापर वाढवला... अलीकडे समाधान पाटील यांची चार एकर शेती खरेदी केली आहे. त्यात केळीची लागवड केली आहे. चार कृषीपंप आहेत. यातील दोन कृषी पंपांना सौर यंत्रणेद्वारे वीज उपलब्ध होते. सौर उर्जेवर साडेसात अश्‍वशक्तीचा कृषी पंप कार्यान्वित केला आहे. हा पंप दिवसा चालविला जातो. हिवाळ्यात तो सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कार्यरत राहतो. तर उन्हाळ्यात सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत तो कार्यरत असतो. दिवसा पॉलिहाऊसमध्ये सिंचन करता येते. तसेच ड्रीपमधून विद्राव्य खते देता येतात. उष्णतेत पॉलिहाऊसमध्ये तापमान नियंत्रणासंबंधी फॉगर्स सुरू करता येतात. पॉलिहाऊसजवळच गोठा असल्याने या गोठ्यातही दिवसा किंवा उष्णता वाढल्यानंतर फॉगर्स सौर यंत्रणेद्वारे सुरू केले जातात. सौर उर्जेमुळे विजेवरील दरमहा सुमारे ३ हजार रुपयांचा खर्चही वाचला आहे. शिवाय भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी कृषी पंप सुरू करण्याची, सिंचनाची धावपळ अशा समस्या दूर झाल्या आहेत.

    संपर्क- समाधान पाटील, ७५८८०१०९७९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com