agriculture news in marathi success story of a farmer from jalna district doing successful goat and poultry farming business | Agrowon

शेळी, कोंबडीपालनातून बसवली शेतीची घडी

संतोष मुंढे
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

शेतीला जोड म्हणून केलेल्या शेळीपालन, कोंबडीपालन या व्यवसायातून हिवरा रोषणगाव (जि. जालना) येथील जगन्नाथ निलखन यांनी आपल्‍या शेती आणि उत्पन्नाची घडी बसवली आहे.

नेमके काय करायचे याची स्पष्टता असली की शेती किंवा कोणताही पूरक व्यवसाय यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. शेतीला जोड म्हणून केलेल्या शेळीपालन, कोंबडीपालन या व्यवसायातून हिवरा रोषणगाव (जि. जालना) येथील जगन्नाथ निलखन यांनी आपल्‍या शेती आणि उत्पन्नाची घडी बसवली आहे. शेती सुपीक आणि शाश्वत करण्यासाठी त्यांचे शेळी व कोंबडीपालन अनेकार्थाने महत्त्वाचे ठरत आहे.

हिवरा रोषणगाव (ता. जि. जालना) येथील जगन्नाथ मुक्ताराम निलखन यांनी शिक्षणशास्त्र (डी.एड) पदविका घेतली. त्यानंतर मुक्त विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतानाच स्थापत्य विषयातील पदविकाही मिळवली. शिक्षणानंतर दोन ते तीन वर्षे नोकरीसाठी प्रयत्न केले. मात्र, उत्तम नोकरी मिळत नसल्याचे लक्षात येताच २०१६ मध्ये शेतीमध्ये लक्ष घातले. निलखन कुटुंबीयांकडे १९ एकर शेती असून, आई-वडिलांसह, पत्नी, मुलगी अशा पाच व्यक्ती आहेत. खरिपात सोयाबीन, कपाशी, तूर, कपाशीत आंतरपीक म्हणून मूग व उडीद तर रब्बीमध्ये हरभरा, ज्वारी व घरगुती वापरापुरता गहू अशी साधारण दोन्ही हंगामाची पीकपद्धती आहे. याशिवाय शेळीपालनाला सुरुवात केल्यापासून अर्धा एकरामध्ये मेथी घास, नेपियर गवत, बांधावर सुबाभूळ, बोर, बाभूळ, भोकर, आदी झाडांचे संगोपन जगन्नाथराव यांनी केले आहे. 

शेळीपालनाची सुरुवात
शेतीला जोड म्हणून उद्योगाच्या शोधात असलेल्या जगन्नाथरावांना शेळीपालनाने आकर्षित केले. त्यांनी २३ एप्रिल २०१६ ला १ गाभण शेळी व १ पाट विकत घेतली. पहिल्याच वेळी या शेळीने २ पाटी व १ बोकड या प्रमाणे ३ पिल्ले दिली. शेळीसोबत घेतलेल्या पाटीलाही १ बोकड झाला. म्हणजे ३ महिन्यात त्यांच्याकडे ४ पिल्ले व २ शेळ्या असे एकूण ६ नग तयार झाले. इथूनच त्यांच्या शेळीपालनाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी शेळ्या न विकता केवळ बोकडाची विक्री केली. शेळ्या व त्यापासून मिळणाऱ्या पिल्लांचे संगोपन करत शेळीपालन वाढवत नेले. आजपर्यंत त्यांनी ७२ नगाची विक्री केली. दर वर्षी बकरी ईदला २ या प्रमाणे आजवर ६ मोठे बोकड विकले.  आज त्यांच्याकडे ११ बोकड, ६ पाटी, ९ मोठ्या शेळ्या व १ मोठा बोकड असे एकूण २७ नग आहेत. संपूर्णपणे बंदिस्त पद्धतीने शेळीपालन केले जाते. 

गावरान कोंबडीपालनाचा प्रवास
जगन्नाथ निलखन यांनी दोन वर्षांपूर्वी गावरान कोंबडीपालनाचा निर्णय घेतला. सुरवातीला त्यांनी ९ कोंबड्या व २ कोंबडे असे एकूण ११ नग विकत घेतले. दोन महिन्याच्या संगोपनानंतर या कोंबड्या अंडी देऊ लागल्या. कोंबडी खुडूक झाली की अंड्यावर बसवून पिल्ले मिळवण्याचे धोरण ठेवले. सुरवातीला ९ पैकी ६ कोंबड्या पिल्ले काढण्यासाठी बसविल्या. या ६ कोंबड्यापासून प्रत्येकी ११ ते १४ या प्रमाणे ७४ पिल्ले मिळाली. चार महिन्यातच त्यांच्याकडे सुरवातीच्या ११ व ७४ पिल्ले असे ८५  नग तयार झाले. सुमारे ४ महिने सांभाळल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यातील केवळ कोंबडे विक्री केली. पुढे जगन्नाथराव यांच्या कोंबडीपालनाचा विस्तार वाढत चालल्यानंतर त्यातील सांभाळता येईल, इतक्याच कोंबड्या शेडमध्ये ठेवत अन्य विक्री करण्याचे धोरण राबवले. त्यांच्याकडे पिल्ले ११० असून, मोठे पक्षी ८५ आहेत.

कमी खर्चातून शेडची उभारणी

 • शेळीपालन व कुक्कुट पालनासाठी शेडची गरज भासू लागली. त्यासाठी अधिक खर्चात न पडता स्थानिक पातळीवर उपलब्ध लाकडासह नेट व ताडपत्रीच्या वापरातून स्वतः वडिलांसह शेडची उभारणी केली. निलखन यांचे शेळ्यांसाठी २५ बाय ४० फूट आकाराचे शेड, तर कोंबड्यांसाठी ७ बाय १० फूट आकाराचे शेड आहे. दोन्ही शेडला ६ फुटाच्या जाळीसह हिरव्या नेटने वेढलेले आहे. उन्हाळ्यातील उष्णतामान कमी करण्यासाठी दोन्ही शेडभोवती झाडांची लागवड केली.
 • प्रशिक्षण शेळीपालनाचा विचार आल्यानंतर त्याविषयीचे शास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी जगन्नाथ यांचे प्रयत्न सुरू झाले. खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या शेतीपूरक उद्योगाच्या प्रशिक्षणात भाग घेतला.तिथे जगन्नाथ निलखन यांना विषय विशेषज्ञ डॉ. हनुमंत आगे यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे आवश्यकतेनुसार त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरत असल्याचे जगन्नाथ  यांनी सांगितले.

खाद्य व्यवस्थापन
शेळीपालन हे पूर्णपणे बंदिस्त पद्धतीने करतात. त्यामुळे आवश्यक चारा उत्पादनासाठी अर्धा एकर शेतामध्ये मेथी घास, नेपियर गवत यांची लागवड केली आहे. बांधावरही विविध झाडे लावली आहे. विविध झाडांचा पाला व प्रति शेळी २०० ग्रॅम मका खाद्य म्हणून दिले जाते. कोंबड्यांना मका, बाजरी, ज्वारी, गहू, तांदूळ, गूळ आदींचा मिसळून तयार केलेला भरडा देतात. प्रति दिवस दोन किलो व दिवसाला दीड किलो तांदूळ शिजवून केलेला भात कोंबड्यांना दिला जातो. 

कोंबडीपालन अर्थशास्त्र
कोंबडीपालनातील गुंतवणूक

 • ९ कोंबड्या : ४००० रुपये
 • २ कोंबडे : १००० रुपये
 • शेड खर्च : ४५०० रुपये
 • खाद्य खर्च : १०,००० रुपये 
 • इतर खर्च :  ५००० रुपये
 • एकूण खर्च :  २४,५०० रुपये

उत्पन्न

 • कोंबडे विक्री संख्या : ४० नग
 • मिळालेला सरासरी दर प्रति नग :  ५०० रुपये
 • एकूण मिळकत : २०००० रुपये

आजच्या घडीला तयार भांडवल

 • मोठे कुक्कुटपक्षी : ८५
 • अपेक्षित दर : ५०० प्रति नग
 • एकूण अपेक्षित उत्पन्न :  ४२५०० रुपये
 • तयार छोटे कुकुटपक्षी : ११०
 • विक्री दर : २५ रुपये प्रति नग
 • एकूण अपेक्षित उत्पन्न :  २७५० रुपये
 • अपेक्षित रक्कम : ४५२५० रुपये
 • एकूण नफा : एकूण मिळकत ६५२५०- एकूण खर्च २४५००= नफा ४०७५० रुपये.

शेळीपालनाचे अर्थशास्त्र
शेळीपालनातील गुंतवणूक 

 •   एक शेळी किंमत : ८००० रुपये
 •   एका पाटीची किंमत : ५००० रुपये
 •   एकूण गुंतवणूक :  १३,००० रुपये
 •   शेड उभारणी:  ८५०० रुपये
 •   इतर खर्च : १०,००० रुपये
 •   चारा शेतीतील असल्याने त्याचा खर्च धरलेला नाही.
 •   एकूण खर्च  : ३१,५०० रुपये
 •   आजवरची विक्री : ७२ नग
 •   सरासरी मिळालेला दर : ५००० रुपये प्रति नग
 •   एकूण उत्पन्न : ३,६०,००० रुपये
 •   आजचे भांडवल : २७ नग
 •   सरासरी दर : ५००० रुपये
 •   एकूण जमा भांडवलः १,३५,००० रुपये
 •   उद्योगातील एकूण मिळकतः ४,९५,००० रुपये
 •  एकूण नफा = ४,९५,०००-३१,५००= ४,६३,५०० रुपये

व्यवस्थापनातील महत्त्वाचे...

 • पावसाळ्याच्या सुरवातीला शेळ्यांचे लसीकरण केले जाते.
 • दोन बैल, २ गाई, म्हैस, दोन वासरांचीही जोड
 • शेडच्या भोवती वेळू, मुंगनी, कडुनिंब, जांभूळ, शेवगा, आंबा, पेरू, आवळा इ. २५ झाडांची लागवड केली आहे. 
 • सोयाबीन, उडीद, मूग, गहू, हरभरा इ. पिकांचे अवशेष जनावरांसाठी खाद्य म्हणून उपयुक्त. 
 • कोंबड्यांसोबतच दररोज २०० रुपयांच्या गावरान अंड्यांचीही विक्री
 • जीवनसत्त्वे व खनिजांचाही खाद्यामध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याने समावेश केला जातो. 

शेतीसमोरील आव्हाने वाढत आहे. कधी अल्पवृष्टी तर कधी अतिवृष्टी या आपत्तीसोबत कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतातून मिळणारे उत्पन्न भरवशाचे राहिलेले नाही. अशा वेळी शेतीला जोड म्हणून पूरक व्यवसाय फायदेशीर राहू शकतो. जगन्नाथ निलखन यांच्याप्रमाणे कमी भांडवलात पूरक व्यवसाय केल्यास दैनंदिन उत्पन्नांची हमी मिळू शकते. 
— डॉ. हनुमंत आगे, ७३५००१३१८१
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना.)

संपर्क- जगन्नाथ निलखन, ९९२१७७६१११


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
औरंगाबाद जिल्ह्यात करटोलीची व्यावसायिक...कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील...
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे...योग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
भात शेतीला मिळाली कुक्कटपालनाची जोडनिवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) येथील मारुती सहदेव...