agriculture news in marathi success story of a farmer from kadbanwadi district pune doing profitable farming of Bell pepper | Agrowon

संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...

संदीप नवले
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कडबनवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील कृषी पदवीधर असलेल्या विजयराव पवार यांनी पॉलिहाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले आहे. त्यातून उत्तम दर्जाचा शेतीमाल उत्पादित करून राज्यासह परराज्यातील बाजारपेठेपर्यंत पाठवत आहेत.

वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान यामुळे शेतीतून शाश्वत उत्पादन मिळवण्यात अडचणी येत आहेत. अशा वेळी पाणी टंचाईसोबतच हवामानातून येणाऱ्या विविध आपत्तीवर मात करण्यासाठी आधुनिक संरक्षित शेती उपयोगी ठरू शकते. कडबनवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील कृषी पदवीधर असलेल्या विजयराव पवार यांनी पॉलिहाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले आहे. त्यातून उत्तम दर्जाचा शेतीमाल उत्पादित करून राज्यासह परराज्यातील बाजारपेठेपर्यंत पाठवत आहेत.

पुणे जिल्ह्यात कडबनवाडी (ता. इंदापूर) हे सुमारे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथील विजयराव पवार यांची कडबनवाडी परिसरात एकूण ६० एकर शेती आहे. त्यातील पाच कि.मी. अंतरावरील शेळगावमध्ये ३० एकर क्षेत्र आहे. येथे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असले तरी भाटघर धरणाचा निरा डावा कालवा शेळगावमधून जातो. त्यामुळे पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने डाळिंब व त्यापाठोपाठ ऊस शेती प्राधान्याने केली जाते. या शेतीसोबतच गावातील तरुण शेतकरी संरक्षित व आधुनिक शेतीकडे वळत आहेत. शेडनेट, पॉलीहाऊससह ठिबक सिंचन, मल्चिंगचा वापर केला जात असल्याने शेळगावची वेगळी ओळख निर्माण होत आहे. 

२०१० मध्ये कृषी पदवीधर झाल्यानंतर विजयराव पवार यांनी सुरवातीचा तीन चार वर्षे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला. त्यानंतर गेल्या चार ते पाच वर्षापासून पूर्णवेळ शेती करत आहेत. शेतीतील सर्व नियोजन ते करतात. यामध्ये डाळिंब, सीताफळ, पेरू, संत्रा, ऊस अशी विविध पिके ते घेतात. पारंपरिक पिकातून शाश्वत उत्पन्न मिळत नसल्याने २०१६ मध्ये पॉलिहाऊस उभारणीचा निर्णय घेतला. वेगाने पावले उचलत पॉलिहाऊसची एक एकर क्षेत्रावर उभारणी केली. 

शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून उभारलेल्या पॉलिहाऊसमध्ये पहिल्या वर्षी रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली. त्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेत सुमारे ३७ लाख रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक केली आहे. आवश्यक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, आत्माचे विजय बोडके यांचे मार्गदर्शन मिळाले. साधारणपणे ९ महिन्यांचे हे पीक असून, बाजारपेठेतील मागणीचा विचार करून लागवडीपासून काढणीचे नियोजन केले जाते. गेल्या तीन वर्षापासून प्रामुख्याने लाल व पिवळ्या रंगाच्या ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत असल्याने व्यवस्थापनातील बारकावे माहीत झाले आहेत. 

लागवड व्यवस्थापन 

  • साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिरचीची रोपे तयार करून गादीवाफ्यावर लागवड केली जाते. पिकांची लागवड करण्यापूर्वी शेणखत एकरी आठ ते दहा टेलर, भाताचा तूस चार टन आणि तीन टन साखर कारखान्यातील काळ्या राखेचा वापर केला जातो. त्यानंतर रोटावेटरद्वारे एकत्र करून मजुरांद्वारे बेड तयार केले जातात. पिकांच्या लागवडीपूर्वी बेडवर निंबोळी पेड व इतर रासायनिक खतांचा वापर केला जातो. काळ्या राखेच्या वापरामुळे पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होत असल्याचे त्यांचा अनुभव आहे. 
  • संरक्षित शेतीमध्ये आर्द्रता, तापमान व पाऊस अशा गोष्टीवर नियंत्रण ठेवता येते. परिणामी पावसाळ्यातही पिकांची चांगल्या प्रकारे देखभाल करता येते. लागवडीनंतर आवश्यकतेनुसार ट्रायकोडर्मा व अन्य जैविक बुरशीनाशकाची आळवणी घेतली जाते. ठिबक द्वारे रासायनिक खतांचे नियोजन केले जाते. परिणामी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. फळाची प्रत चांगली टिकून राहते. 

पाणी व्यवस्थापन
सिंचनासाठी शेतात एक विहीर आणि शेततळे आहे. विहिरीला बऱ्यापैकी पाण्याची उपलब्ध असते. मात्र, उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या काळात शेततळ्यातील पाण्याचा वापर केला जातो. सध्या पॉलिहाऊसमधील पिकांना ठिबक सिंचनाद्वारे वातावरणानुसार दररोज ३० ते ६० मिनिटे पाणी दिले जाते. पाण्याची बचत होत असल्याने वर्षभर पिकांचे नियोजन करणे सोपे जाते. संरक्षित पद्धतीने रंगीत ढोबळी मिरची पिकांमध्ये विविध कामासाठी त्यांच्याकडे पाच ते सहा मजूर कायमस्वरूपी काम करतात. सलग काम करत असल्यामुळे मजुरांमध्येही विविध कौशल्ये विकसित होण्यास मदत झाल्याचे विजयरावा यांनी सांगितले. 

विक्री व्यवस्थापन
पिकांचे उत्पादन सुरू झाल्यानंतर पुणे, मुंबई, भोपाळ, कलकत्ता, दिल्ली व पाटणा येथे विक्रीसाठी शेतीमाल पाठविला जातो. त्यासाठी तेथील व्यापाऱ्यांच्या कायम संपर्कात राहावे लागते. मालाची तोडणी करण्यापूर्वी विविध ठिकाणच्या बाजारातील दरांची माहिती घेतात. योग्य दर असलेल्या ठिकाणी दौंड रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने माल पाठविला जातो. रंगीत ढोबळी मिरची ही वीस किलोच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविले जातात. 

माहितीसाठी खुलेपणा

  • शेडनेटमधील शेती करताना तत्कालीन तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव यांच्यासह अनेक शेतकरी, केव्हीके, बारामती येथील विशेषज्ञांचे मार्गदर्शन मिळते. शेडनेटमधील व्यवस्थापन चांगले असल्याने परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या भेटी देण्यासाठी येतात. या प्रत्येक शेतकऱ्यांकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते, असे विजयराव यांनी सांगितले. 
  • पॉलिहाऊसमधील नवीन तंत्रज्ञानाची इंटरनेटवरून माहिती घेऊन आवश्यक ते बदल करतो. शेटनेट, पॉलिहाऊसमध्ये संरक्षित शेती करत असलेल्या शेतकऱ्यांचा समाज माध्यमावर गट तयार केला आहे. त्यात केवळ शेतीविषयी माहिती पाठवली जाते. शेतकऱ्यांमधील माहितीची देवाण घेवाण होण्यास मदत होते.  
  • विजयराव पवार यांनी उर्वरित शेतीपैकी एक एकरवर सेंद्रिय पद्धतीने पिकांची जोपासना केली आहे. त्यांनी आत्माअंतर्गत कृषी उन्नती सेंद्रिय शेती गट तसेच नाबार्डअंतर्गत कृषी संजीवनी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. ते या गट व कंपनीचे प्रमुख आहेत. 

ढोबळी मिरचीचे उत्पादन

  • लागवडीनंतर सुमारे अडीच महिन्यानंतर ढोबळी मिरचीचे उत्पादन सुरू होते. सुमारे आठ ते नऊ महिने उत्पादन मिळते. पहिल्या वर्षी ४२ टन उत्पादन मिळाले, तर दुसऱ्या वर्षी ३६ टन उत्पादन मिळाले. सामान्यतः एकरी सुमारे ३५ ते ४० टनापर्यंत मिरचीचे उत्पादन मिळते. 
  • बाजारातील दरांमध्ये चढउतार मोठी असते. प्रति किलो सरासरी २० ते १७० रुपयांपर्यंत दर मिळतो. विजय यांना पहिल्या व दुसऱ्या वर्षी सरासरी ४० रुपये प्रति किलो दर मिळाला. मात्र, या वर्षी कोरोना व लॉकडाऊन दरम्यान अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांनी नव्या लागवडी न केल्यामुळे चांगला दर मिळत आहे. या वर्षीचा सरासरी ९४ रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे. सर्व खर्च वजा जाता एका एकरामधून ७-८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. 
  • संरक्षित शेतीसाठी प्राथमिक गुंतवणूक जास्त असली तरी जर बदलत्या बाजारपेठेचा आणि लोकांच्या जीवनशैली व मागणीचा विचार केला असता या शेतीलाच भविष्य असल्याचे दिसते, असे मत विजयराव यांनी मांडले. 

संपर्क- विजयराव पवार, ७५८८५९३९२९, ७९७२८२०३२० 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...
एकीमुळे सुधारित तंत्रज्ञान वापराला...नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
बिजोत्पादनातून ‘गौरीनंदन’ची उलाढाल...नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील...
पूरक व्यवसायातून स्वयंपूर्णतेचा धडादुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि परसबागेतील...
परसातील ‘ग्रामप्रिया’ कोंबडीपालन...औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील काही...
‘व्हर्जिन कोकोनट ऑइल’ अन सुकवलेली पावडरसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील अभिजित...
अभ्यासू, प्रयोगशील द्राक्षबागायतरांचे...महाराष्‍ट्रातील द्राक्ष बागायतदार अत्यंत...
कष्टपूर्वक नियोजनबध्द विकसित केली...परभणी येथील मिलिंद डुब्बेवार यांनी व्यावसायिक...
यांत्रिकीकरणातून होताहेत आदिवासी आर्थिक...पालघर जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी पाड्यांतील...
पंडागे कुटुंबाची भाजीपाला शेतीत कुशलतापारंपरिक पिकांच्या जोडीने कानशिवणी (जि. अकोला)...
शेळीपालन, मळणीयंत्र व्यवसायातून बसवली...पडसाळी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथील...
शाळेबरोबरच शेतीमध्येही उपक्रमशीलजळगाव येथील शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी आपले...