agriculture news in marathi success story a farmer from sangli district produced various agricultural equipment's | Agrowon

संशोधनवृत्तीला सातत्याची जोड शेतीउपयोगी यंत्रातून समस्यांवर तोड

अभिजित डाके
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

प्रत्येक माणसात एक संशोधक दडलेला असतो. अगदी खेळणी खोलण्यातून सुरू झालेल्या कुतूहलाला संशोधन वृत्तीची जोड मिळाल्याने शिक्षण कमी असतानाही कुंभारी (जि. सांगली) येथील दाजी पाटील यांनी शेतीउपयोगी अनेक छोटी यंत्रे, उपकरणे तयार केली.

प्रत्येक माणसात एक संशोधक दडलेला असतो. अगदी खेळणी खोलण्यातून सुरू झालेल्या कुतूहलाला संशोधन वृत्तीची जोड मिळाल्याने शिक्षण कमी असतानाही कुंभारी (जि. सांगली) येथील दाजी पाटील यांनी शेतीउपयोगी अनेक छोटी यंत्रे, उपकरणे तयार केली. ऊस लागवडीचे यंत्र, मल्चिंग पेपर अंथरण्याचे यंत्र, सायकलचलित फवारणी अशा यंत्रांतून कामाचा वेळ, श्रम, पैसे यात बचत होत आहे.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी अशी ओळख असलेल्या जत तालुक्यातील शेतकरी कष्टाळू आणि प्रयोगशील. जत-कऱ्हाड मार्गावर वसलेल्या कुंभारी गावची लोकसंख्या पाच हजार. गेल्या आठ वर्षांपूर्वी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कृष्णेचे पाणी दुष्काळी ३० ते ३५ गावांत आले. त्यामुळे ऊस, डाळिंब, द्राक्ष, केळी अशी नगदी पिके शिवारात फुलली. त्यांनी शेतकऱ्यांची समृद्धी तर वाढवलीच, पण प्रयोगशीलतेलाही वाव मिळाला. याच गावातील दाजी अप्पाणा पाटील यांनी प्रयोगशीलतेला दिली सातत्याची जोड.

दाजी पाटील सांगतात, ‘‘आमचं ५० जणांचे कुटुंब. शेती असूनही पाण्याअभावी फुलत नव्हती. शेतात राब राब राबूनही परिस्थिती तशी बेताचीच. मोठ्या कुटुंबात प्रत्येकावर येतात तशा जबाबदाऱ्या आम्हा भावंडांवरही होत्या. शिक्षण सुरू असतानाच आईसह मीही काळ्या आईच्या सेवेत सामील झालो. दहावीपर्यंत कसंबसं शिक्षण पूर्ण केलं. मनात अनेक कल्पना येत. समोर दिसलेल्या प्रत्येक वस्तूविषयी दांडगे कुतूहल. ती कशी बनली असेल, असं विचारचक्र फिरायचं. त्यातील बारकावे टिपून तशीच वस्तू बनवायची घडपड सुरू व्हायची. इतरांना वेडेपणा वाटला तरी मला त्यात आनंद मिळायचा.

आजोबांच्या काळात ऊस शेती होती. पारंपरिक गुऱ्हाळ घराचंही भलतंच नवल वाटे. छोट्या कारखान्यातील विविध यंत्र, सामग्री, अवजारे कशी चालवतात, याचं अप्रूप. शेती म्हणजे प्रयोगशाळाच वाटायची. पंधरा वर्षांपूर्वी आम्ही विभक्त झालो. वडिलोपार्जित वीस एकर शेतीत माझ्या डोक्यातील कल्पनांना वाव मिळू लागला. ऊस, कलिंगड, मिरची अशा पिकांची लागवड ते काढणीपर्यंतचे कष्ट, खर्च कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले.’’

यंत्र बनविण्याची धडपड
लहान वयापासून यंत्र व त्यामागील तंत्र जाणण्याची दाजी पाटील यांना हौस. त्यांनी विहिरीतील गाळ काढण्याचे एक छोटेसे यंत्र बनवले. त्यानंतर जिन्यावरून चालताना लाइट लागणे, टेप रेकॉर्डरला टायमरचे घड्याळ जोडणे, टेपरेकॉर्डरमधील मोटारीच्या साह्याने पाण्याचा हातपंप असे लहान मोठे प्रयोग यशस्वी होऊ लागले. उत्साहाने गणेशोत्सवाच्या वेळी मंडळांसाठी फिरत्या गाडीच्या देखावा तयार केला. ग्रामीण भागात तयार केलेल्या देखाव्याला दादही मोठी मिळाली.

वर्कशॉपचा मिळाला आधार
सुरुवातीला पाटील गावातील एका छोट्या कार्यशाळेत आपल्या कल्पनांनुसार काम करत. तिथेच त्यांनी विविध यंत्रे वापरण्याचे कौशल्य शिकले. प्रारंभी वेल्डिंग मशिनपासून हळूहळू एकेक यंत्र जमवत गेले. आज त्यांच्याकडे लोखंड कापण्याचे यंत्र, ड्रील मशिन यासह आवश्यक अशा यंत्रांनीयुक्त कार्यशाळा आहे. त्याआधारे शेतातील मोकळ्या रानातच त्यांचे प्रयोग सुरू असतात.

यंत्राची निर्मिती टाकाऊपासून

 • पाटील यांच्या घरी शेतीसाठी ट्रॅक्टर व अवजारेही होती. ती ठरावीक कारणांसाठी वापरली जात. एकदा सहज लोखंड, भंगार सामग्रीच्या बाजारात गेलो असताना स्वस्तामध्ये यंत्रे निर्मितीच्या विचाराला चालना मिळाली. तिथून विविध खराब झालेल्या वस्तू घरी आणून त्यातून नवीन निर्मिती करू लागलो. बहुउपयोगी ऊस लागवड यंत्र तसेच बनवले आहे.
 • सुरुवातीला त्यातून उसाची कांडी जमिनीत योग्य खोलीवर पडत नव्हती. या कांड्यावर माती कधी कमी, तर कधी अधिक पडत असे. यामुळे कांडी उगवण्यात अडचणी येत. सातत्याने प्रयत्न करत यंत्रातील सगळ्या त्रुटी दूर केल्या. आता योग्य अंतरावर, खोलीवर उसाच्या कांड्या पडतात. त्यावर योग्य प्रमाणात मातीही पडते.
 • यंत्र बनविण्यासाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च आला. पुढे या ऊस लागवड यंत्राचे दाजी पाटील यांनी पेटंटही घेतले आहे. ऊस लागवड यंत्रनिर्मितीसाठी एका कंपनीसोबत करारही केला आहे. दाजी पाटील यांच्या अशा प्रयोगशीलतेची दखल घेत सन २००० मध्येच आकाशवाणीवर मुलाखत प्रसिद्ध झाली.

बहुविध ऊस लागवड यंत्राची वैशिष्ट्ये

 • सरी पाडली जाते. त्यात योग्य खोलीवर ऊस कांडी लागवड होते.
 • लागवडीवेळीच जमिनीमध्ये गाडून खत टाकता येते.
 • यामुळे खतांचा ऱ्हास होत नाही. वेळ व कष्ट वाचतात.
 • त्यावर माती टाकली जाते.
 • वरून ठिबकची लॅटरल अंथरली जाते.

खर्चात होते खूप बचत

 • पारंपरिक पद्धतीत मजुरांद्वारे सरी सोडण्यासाठी एकरी खर्च पंधराशे ते दोन हजार रुपये येतो.
 • ऊस लागवडीचा कालावधी एकरासाठी तीन दिवस असतो. मजुरांची संख्या १० ते १५ धरली व मजुरीची रक्कम ३०० ते ४०० रुपये धरली तर तीन दिवसांसाठी हा खर्च किमान १० ते १२ हजार रुपये येतो.
 • या तुलनेत यंत्राद्वारे सरी आणि लागवड ही कामे एकाच वेळी होतात. दोन मजुरात सुमारे तीन तासांत व केवळ दीड हजारात हे काम होते. एका दिवसात सात एकर उसाची लागवड शक्य होते. ट्रॅक्टर स्वतःचा असेल, तर केवळ २.५ लिटर डिझेल प्रति एकरसाठी पुरेसे होते.

नावीन्यतेचा शोध थांबत नाही

 • शेतीमध्ये कोणतीही समस्या दिसली की त्यावर कसा मार्ग काढता येईल, याचा विचार दाजी यांच्या मनात येतो. त्यावर तोड काढल्याशिवाय या हरहुन्नरी माणसाला चैनच पडत नाही. या वृत्तीमुळे ऊस शेतीत आमूलाग्र बदल घडवणाऱ्या उसाचा डोळा काढणी यंत्र, ऊस तोडणीनंतर राहिलेला पाला मातीआड करण्याचे अवजार यांची निर्मिती केली.
 • सोबतच गादी वाफा तयार करणारे ब्लेडही तितकेच उपयुक्त ठरत आहे.

मल्चिंग पेपर अंथरणारे यंत्र
दाजी यांची ऊसशेती दरवर्षी सुमारे १० एकर असते. उर्वरित क्षेत्रावरील कलिंगड, मिरची यांच्यासाठी गादीवाफ्यावर पॉली मल्चिंग केले जाते. त्यासाठी मजुरांद्वारे अधिक खर्च व वेळ लागतो. दाजी पाटील यांनी जुन्या साहित्यातून केवळ पंधरा हजार रुपयांमध्ये मल्चिंग पेपर अंथरणारे यंत्र तयार केले.

त्याचे फायदे
प्रचलित पद्धतीत मल्चिंग करण्यासाठी सुमारे सहा मजुरांची आवश्‍यकता भासते. या यंत्राद्वारे दीड तासात एकरभर क्षेत्रात हे काम केवळ ट्रॅक्‍टरचालकाद्वारे मल्चिंग करता येते. यामुळे मजूरबळासह खर्चातही चांगली बचत साधली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दोन बेडमधील ढेकळेही फोडण्याचे काम या यंत्राद्वारे होत असल्याचे दाजी पाटील सांगतात.

फवारणी यंत्रांची वैशिष्ट्ये

 • सायकलवरील बॅटरीने चालणारे फवारणी यंत्र तयार केले आहे. त्यात आठ नोझल्स बसवले आहेत.
 • या बूमची उंची पिकाच्या गरजेनुसार खालीवर करता येते. नोझल्सदेखील मागे पुढे करता येतात.
 • ही बॅटरी सौरऊर्जा किंवा विद्युत ऊर्जेवर चार्च करता येते.
 • या यंत्राच्या निर्मितीसाठी साधारण १० हजार रुपये खर्च झाला.

घरच्यांची साथ
सुरुवातीला लोकांनी माझ्या संशोधकवृत्तीला टवाळीचे साधन बनवले. अनेक वेळेला प्रयोग फसला, की मन निराश व्हायचं. कोणतेही काम प्रामाणिकपणे कर, जिद्द कधीच सोडू नकोस, यश निश्‍चित मिळेल अशा शब्दात वडील अप्पाण्णा धीर व बळ देत. वडील अप्पाण्णा यांच्यासह आई फुलाबाई, पत्नी ताई यांची मोलाची साथ मिळाल्यानेच शिक्षण कमी असतानाही अनेक प्रयोग साकारू शकल्याचे दाजी पाटील सांगतात. त्यांचा मुलगा स्वप्नील आता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगला आहे. तोही काही प्रयोग करत असल्याचे पाहून अभिमानाने ऊर भरून येत असल्याचे दाजी सांगतात.

शेतीमध्ये काम करतानाच प्रयोग करत गेलो. मी तयार केलेल्या बहुउपयोगी ऊस यंत्राच्या साह्याने परिसरात उसाची लागवड होत आहे. या यंत्राला पेटंटही मिळाल्याचा अभिमान आहे. माझ्या छोट्या मोठ्या यंत्रातून शेतकरी बांधवांचे कष्ट थोडे तरी कमी करू शकलो, याचे समाधान आहे.
- दाजी अप्पाण्णा पाटील, ७३३०३५३०३५
कुंभारी, ता. जत, जि. सांगली


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
गावाने एकी केली अन् जमीन क्षारपडमुक्ती...वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध...
ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदलतुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद...
अंजीर पिकात मास्टर अन् मार्गदर्शकहीपुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
सेंद्रिय प्रमाणित मूल्यवर्धित मालाला...नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटरवरील मालेगाव...
डांगी गायींचे संवर्धन करण्याचे व्रतआंबेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बिन्नर...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
बांबू प्रक्रिया उद्योगात देश-परदेशात...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉनबॅक या संस्थेने...
सुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...
निर्यातक्षम मिरची उत्पादनात हातखंडासुजालपूर (ता.जि.नंदुरबार) येथील अशोक व प्रवीण या...
माडग्याळी मेंढींपालनाचा तीन पिढ्यांचा...येळवी (ता. जि. जत) येथील पवार कुटुंबाच्या तिसरी...
व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...
शेतीपेक्षा ठरले वराहपालन फायदेशीर तळणी (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील जनार्दन व...