भात शेतीला मिळाली कुक्कटपालनाची जोड

निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) येथील मारुती सहदेव जाधव यांनी भातशेतीला कुक्कटपालनाची चांगली जोड दिली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी कुक्कटपालनामध्ये टप्प्या-टप्प्याने वाढ केली.
poultry farm of mr. maruti jadhav
poultry farm of mr. maruti jadhav

निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) येथील मारुती सहदेव जाधव यांनी भातशेतीला कुक्कटपालनाची चांगली जोड दिली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी कुक्कटपालनामध्ये टप्प्या-टप्प्याने वाढ केली. आर्थिक मिळकतीतून शाश्वत पाणी पुरवठ्याची सोय करून शेती विकासाला चालना दिली आहे.   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे हे निसर्गसंपन्न गाव. या गावातील काजराठवाडीमध्ये मारुती जाधव यांचे घर आहे.पत्नी,दोन मुले आणि वडील असा त्यांचा परिवार आहे. जाधव यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले.त्यानंतर त्यांनी आयटीआयचे शिक्षण घेतले.घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे शिक्षण पूर्ण होताच नोकरीसाठी पुणे गाठले. तीन वर्ष एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यांना पगार देखील चांगला होता.परंतु तेथे त्यांचे मन रमत नव्हते. गावी शेतजमीन असल्याने त्यांनी २००९ मध्ये गावी परतण्याचा निर्णय घेतला.  बायोगॅस बांधणीतून रोजगार   मारुती जाधव यांची सात एकर जमीन आहे.त्यापैकी पाच एकरावर भात शेती आहे. गावी आल्यानंतर जाधव यांनी  एक वर्ष पारंपरिक पद्धतीने भातशेती करण्यास सुरवात केली. याच कालावधीत ग्रामविकासामध्ये कार्यरत असणाऱ्या भगीरथ प्रतिष्ठान संस्थेचे  डॉ.प्रसाद देवधर यांच्याशी संपर्क आला. भगीरथ संस्थेने जाधव यांच्यासमोर फेरो सिमेंट बायोगॅस बांधणीचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार त्यांनी १५ दिवसांचे प्रशिक्षण घेतले. पंचक्रोशीत जाधव यांना बायोगॅस बांधणीचे काम मिळू लागले. एक बायोगॅस बांधकामाकरीता त्यावेळी त्यांना सुमारे ३ हजार ८०० रुपये मिळत होते.त्यानंतर त्यामध्ये वाढ होत ही रक्कम पाच हजार रुपयांवर  पोहोचली. साधारणपणे चार दिवस बायोगॅस उभारणीसाठी लागतात. बायोगॅस बांधणीतून त्यांना चांगला रोजगार उपलब्ध झाला. २००९ ते २०१८ पर्यंत गावातील  ५० टक्के बायोगॅसची बांधणी जाधव यांनी केली आहे. एसआरआय पद्धतीने भात लागवड  जाधव हे गेल्या तीन वर्षांपासून पाच एकर शेतीमध्ये एसआरआय पद्धतीने भात लागवड करीत आहेत. सुधारित पद्धतीमुळे खर्चात बचत होऊन पीक उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. यापूर्वी त्यांना पाच एकरात १५ क्विंटल भात उत्पादन मिळायचे. परंतु आता ४० क्विंटल भात उत्पादन मिळते. घरात लागणारे भात राखून जाधव दरवर्षी २५ क्विंटल भात विक्री करतात. खर्च वजा जाता भात शेतीतून पन्नास हजाराचे उत्पन्न मिळते.  माळ जमिनीत बांबू,भाजीपाला लागवड  जाधव यांच्याकडे एक एकर खडकाळ जमीन आहे. त्यामध्ये मुरमाचे प्रमाण अधिक असल्यामुळे फळ लागवडीला अडचण येते. त्यामुळे त्यांनी यातील २० गुंठे क्षेत्रावर माती टाकून यंदाच्यावर्षी बांबू लागवड केली. उर्वरित २० गुंठे जमिनीमध्ये सुधारणा करून यंदाच्या खरिपात त्यांनी भेंडी,दोडका, कारली लागवड केली. मात्र अतिपावसामुळे दोडका पीक पूर्णतः वाया गेले. परंतु भेंडी पिकाचे उत्पादन सुरू झाले आहे. घरातूनच भाजीपाल्याची विक्री केली जाते.   वाढविल्या पायाभूत सुविधा  योग्य नियोजन आणि घरच्यांच्या सहकार्यातून जाधव यांना शेती आणि कुक्कटपालनातून प्रत्येक वर्षी अपेक्षित नफा मिळू लागला. या नफ्यातून त्यांनी शेती आणि कुक्कुटपालनासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधांची उभारणी सुरू केली. जाधव यांच्या शेतीच्या परिसरात वर्षभर पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे सुरवातीला त्यांनी एक विहीर खोदली.त्याचबरोबरीने ३० फूट बाय १५ फूट बाय १० फूट आकारमानाचे शेततळे घेतले. तरी देखील एप्रिल,मे महिन्यात पाण्याची कमतरता भासत होती.त्यामुळे त्यांनी आता एक कूपनलिका खोदली आहे. राहाण्यासाठी चांगल्या पध्दतीचे घर बांधले आहे. पत्नी, मुलांची भक्कम साथ शेती आणि कुक्कुटपालन व्यवसायात जाधव यांना पत्नी सौ. मानसी यांची पहिल्यापासून चांगली साथ मिळाली. घरातील सर्व कामे करून त्या पोल्ट्री शेडची स्वच्छता, कोंबड्यांना खाद्य देणे ही कामे करतात. याशिवाय पूरक उद्योग म्हणून लहानशी गिरणी चालवितात. यातून त्यांना वर्षभरात दहा हजारांची मिळकत होते. याचबरोबरीने शेती आणि पोल्ट्री कामात मुलगी दिपिका आणि मुलगा प्रज्वल हे शाळेचा अभ्यास सांभाळून चांगली मदत करतात.  कुक्कटपालनाला सुरूवात पारंपरिक भातशेती, बायोगॅस बांधणी तसेच सुतारकाम अशी विविध कामे करत जाधव  कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु त्यांना अपेक्षित आर्थिक स्थैर्य मिळत नव्हते.त्यामुळे  जाधव यांनी ब्रॉयलर कुक्कुटपालन करण्याचा निश्‍चय केला. कुक्कुटपालन करण्यापूर्वी प्रशिक्षण घेतले. भगीरथ संस्थेच्या माध्यमातून गोवा येथील एक कंपनी करार पद्धतीने कुक्कुटपालनांसाठी तयार झाली. कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जाधव यांनी काही कुक्कुटपालन व्यावसायिकांबरोबरीने शेड उभारणी, कोंबड्यांचे व्यवस्थापन, बाजारपेठ याबाबत सविस्तर चर्चा केली. यातून त्यांनी दोन हजार ब्रॉयलर कोंबड्यांच्या संगोपनासाठी शेड बांधण्याचे ठरविले. शेड आणि इतर साहित्याकरिता दोन लाख स्व गुंतवणूक आणि उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात उभी केली.

  • सन २०११ मध्ये ८० फूट  लांब आणि २५ फूट रुंद शेडचे बांधकाम केले. याशिवाय कुक्कुटपालनाकरीता आवश्‍यक असलेली भांडी आणि इतर साहित्याची खरेदी केली.
  • करार पद्धतीने कंपनीकडून दोन हजार ब्रॉयलर कोंबड्या, खाद्य,लसीकरणाची औषधे मिळाली.
  • कुक्कुटपालनाचा कोणताही पूर्वानुभव नसताना त्यांनी अतिशय काटेकोरपणे कंपनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने कोंबड्यांचे संगोपन केले. ४२ दिवसानंतर कोंबड्यांचे वजन कंपनीला हवे असलेल्या वजनापेक्षा अधिक झाले.त्यामुळे पहिल्या बॅचमधून त्यांना खर्च वजा जाता पंधरा हजारांचा नफा झाला. 
  • वर्षभराच्या अनुभवानंतर कुक्कुटपालनात वाढ करण्याचा निर्णय. २०१२ मध्ये तीन लाख रुपये खर्चून ११० फूट लांब आणि ३० फूट रुंदीची शेडची उभारणी. दोन्ही शेडची क्षमता पाच हजार कोंबड्या.
  • सलग सहा वर्ष जाधव यांनी प्रति वर्ष सरासरी चार ते पाच बॅच घेतल्या.
  • २०१९ मध्ये गावातील पाच हजार कोंबड्यांची क्षमता असलेल्या दोन शेड भाडेतत्वावर  घेतल्या. वर्षभरासाठी शेडचे भाडे ७० हजार रुपये निश्‍चित केले. परंतु कोरोना लॉकडाऊनमध्ये मोठा आर्थिक फटका जाधव यांना बसला. सुरवातीला कोंबड्यांना मागणी नव्हती.त्यामुळे निव्वळ खाद्य देऊन कोंबड्यांना जगवावे लागले.असे असले तरी ते डगमगलेले नाहीत. त्यांनी नव्याने व्यवसायात जम बसविला.त्यामुळे सद्यःस्थितीत पोल्ट्री शेडची संख्या चार झाली असून त्यामध्ये दहा हजार कोंबड्यांचे संगोपन केले जाते.
  • प्रति वर्ष कोंबड्यांच्या व्यवस्थापनाचा खर्च वजा जाता दोन लाखांचा नफा.
  • कुक्कुटपालनाचा चांगला अनुभव आल्यानंतर गावामध्ये चिकन सेंटर सुरू करण्याचे नियोजन.
  •  संपर्क मारुती जाधव, ७०५७९१७७२६ / ९४०५८२६७२६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com