सामुहिक शक्तीतून साकारले व्यावसायिक शेती प्रकल्प

सातारा जिल्ह्यातील पेरले येथील जिजामाता शेतकरी स्वयंसहायता समूह दुग्धव्यवसाय युनिट, यंत्राद्वारे मूरघास निर्मिती- विक्री, अवजारे बँक आदी व्यावसायिक उपक्रमांतून सक्रिय झाला आहे. सुमारे ३६ शेतकरी सदस्य असलेल्या या समुहाने प्रकल्पांच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.
Vijay Singh Bhosale in the silage unit
Vijay Singh Bhosale in the silage unit

सातारा जिल्ह्यातील पेरले येथील जिजामाता शेतकरी स्वयंसहायता समूह दुग्धव्यवसाय युनिट, यंत्राद्वारे मूरघास निर्मिती- विक्री, अवजारे बँक आदी व्यावसायिक उपक्रमांतून सक्रिय झाला आहे. सुमारे ३६ शेतकरी सदस्य असलेल्या या समुहाने प्रकल्पांच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यातील पेरले हे कृष्णा काठावरील गाव आहे. येथील बहुतांशी शेती बागायत असून ऊस, आले आदींचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. गावातील विजयसिंह पोपटराव भोसले यांची प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख आहे. एमएससी ॲग्रीचे शिक्षण घेतलेल्या विजयसिंह यांनी जयवंतराव भोसले कृष्णा महाविद्यालयात सहा वर्षे प्राध्यापक म्हणून तर दोन वर्षे वाईन निर्मिती कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम केले. मात्र नोकरीपेक्षाही समूहाद्वारे एकत्र येऊन विविध उपक्रम राबवल्यास सर्वाचेच अर्थकारण अधिक सक्षम होऊ शकते असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनीही गटशेतीचा सल्ला दिला. अखेर पूर्ण विचार व तयारीनिशी विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी पाऊलेही टाकण्यास सुरुवात केली. समूहाची स्थापना गटशेतीसाठी प्रयोगशील व एकसमान विचाराच्या सहकाऱ्यांना संघटित करून भोसले यांनी जिजामाता शेतकरी स्वयंसहायता समूहाची स्थापना सप्टेंबर, २०१७ मध्ये केली. अध्यक्षपदाची जबाबदारीही स्वकारली. त्यांच्यासोबत अंकुश सिताराम हजारे, शरद अशोक चव्हाण, तानाजी बाबाजी जाधव, संतोष सदाशिव भोसले, विनोद जयवंत सूर्यंवशी आदींचाही समावेश राहिला. प्रकल्प उभारणी

  • सेंद्रिय शेती हा मुख्य उद्देश ठेवला.
  • त्या दृष्टीने गोठा, दूधसंकलन, शीतकरण प्रकल्प, मूरघास निर्मिती, अवजारे बँक या प्रकल्पांची आखणी केली. त्याचा अहवाल तयार करून कृषी विभागाकडे सादर केला.
  • समूहासाठी २५ वर्षांच्या भाडेतत्वावर जागा घेण्यात आली.
  • असे आहेत प्रकल्प दूध संकलन

  • समूहामार्फत गाय व म्हशीच्या दुधाचे संकलन केले जाते. सुमारे ६० शेतकऱ्यांचे नेटवर्क उभारले आहे. शीतकरण युनिट बसवले आहे. दररोज सुमारे ४५० लीटर दूध संकलन होते.
  • गायीचे दूध बारामती येथील कंपनीला तर म्हशीचे दूध कोयना सहकारी दूध संघाला दिले जाते. सध्या महिन्याला सुमारे तीन लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
  • मुरघास निर्मिती अलीकडील वर्षांचा चाऱ्याची टंचाई लक्षात घेता मूरघास निर्मिती व विक्री प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी यंत्राची खरेदी केली आहे. हंगामात गरजेनुसार ५० ते ६० बेल्स अथवा गठ्ठे तयार केले जातात. परिसरातील १२ ते १५ शेतकऱ्यांकडून २२०० ते २८०० रुपये प्रति टन दराने मका खरेदी केला जाते. वर्षाकाठी ३०० ते ४०० टन मुरघास विक्री साडेसहा हजार रुपये प्रति टन दराने होते. दर्जेदार उत्पादनामुळे मागणी चांगली राहते. या उपक्रमातून समूहाला सुमारे १५ ते २० टक्के नफा शिल्लक राहतो. देशी गाई संगोपन गटाची मुख्य संकल्पना ही सेंद्रीय शेती असल्याने या युनिटमध्ये देशी गाईचा गोटा करण्यात आला आहे. या गोठ्यात 13 देशी गाई व दोन खोंडे आहेत. या देशी गाईचे गोमूत्र फवारणीसाठी 20 रुपये लीटरने विक्री जाते. जीवामृत करण्यासाठी नवीन युनिट बसवण्यात आले आहे. देशी गाईमुळे सेंद्रीय शेती करणे शक्य होणार असल्याचे श्री. भोसले सांगतात. अवजारे बँक अलीकडील काळातील मजूरटंचाई लक्षात घेता कृषी विभागाच्या सहकार्यातून अवजारे बँक तयार केली आहे. यामध्ये टॅक्ट्रर, पल्टी नांगर, फणपाळी, हलगी, रोटर, पेरणी यंत्र, एचटीपी पंप आदींचा समावेश आहे. यात पॉवर हॅरोसारख्या यंत्राचाही समावेश असून मशागतीसाठी त्याचा वापर सुलभ होतो. समूहासह अन्य शेतकऱ्यांना अवजारे भाडेतत्वावर देण्यात येतात. समूहाची कार्यपद्धती

  • एकूण ३६ सदस्य संख्या.
  • एक कोटी सहा लाख रुपये प्रकल्प किंमत. कृषी विभागाचे ६२ लाख रुपयांचे अनुदान.
  • व्यवहार पारदर्शक ठेवले जातात.
  • समूहातील शेतकऱ्यांना अवजारे शुल्कात सवलत.
  • शेतीसाठी लागणारी खते, बियाणे आदी निविष्ठांची एकत्र खरेदी
  • दूध उत्पादकांना चांगला दर देण्याचा प्रयत्न
  • लॉकडाऊनच्या काळात थेट विक्री

  • समुहाने आपली उपक्रमशीलता व प्रयत्नवाद कोरोना लॉकडाऊनच्या काळातही सिद्ध केला. सातारा कृषी विभागाने पुणे, मुंबई येथे भाजीपाला पुरवण्यासाठी या काळात शेतकरी बचत गटांना प्रोत्साहन दिले होते. ‘जीजामाता’ समुहाचीही त्यानुसार एमसीडीसी (महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह डेव्हलपमेंट कार्पोरेशन) नोंदणी करण्यात आली. त्यानुसार परिसरातील सुमारे १४ गावांतील शेतमाल बांधावर जाऊन खरेदी करण्यात आला.
  • एका खेपेत १३०० ते १४०० किलो माल घेऊन त्याची थेट विक्री व्हायची. एकूण सुमारे २५ टन मालाची अशा रितीने थेट विक्री झाली. भविष्यातही विक्रीची साखळी सुरू ठेवणार असून त्यासाठी पीक नियोजन सुरू केले असल्याचे भोसले यांनी सांगितले. या उपक्रमासाठी पणन विभागाचे अधिकारी संजय पांढरे, ‘महाएफपीओ, पुणे यांची मदत झाली.
  • सहकार्य तत्कालीन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, सुनील बोरकर, अमोल धुमाळ, किरण कांबळे, पृथ्वीराज ऐटणे, काशीळ येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी अभिषेक पवार यांचे सहकार्य समूहाला लाभले आहे. भविष्यात शेतकरी उत्पादक कंपनीची उभारणी करून एका छत्राखाली सर्व संकल्पना राबवण्याचा विचार आहे. संपर्क- विजयसिंह भोसले, ९५०३५०११३३ अध्यक्ष, जीजामाता समूह

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com