एकीमुळे सुधारित तंत्रज्ञान वापराला मिळाली चालना

नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील शेतकरी राजा पुरुष गटाने कृषी विभागाच्या मदतीने शेती अवजारे बॅंक तयार केली आहे. गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या वापरातून कष्ट, वेळ आणि आर्थिक बचतही साधत आहे.
 farmers group from rahuri formed an Agricultural Tools Bank
farmers group from rahuri formed an Agricultural Tools Bank

नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील शेतकरी राजा पुरुष गटाने कृषी विभागाच्या मदतीने शेती अवजारे बॅंक तयार केली आहे. गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या वापरातून कष्ट, वेळ आणि आर्थिक बचतही साधत आहे. सदस्यांच्या एकीमुळे एकत्रित खरेदीसह विविध उपक्रम शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहेत. नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील शेतकरी राजा पुरुष बचतगटाने दोन वर्षापूर्वी कृषी विभागाच्या मदतीने अवजारे बॅंक स्थापन केली. त्यात कृषी विभागातून टॅक्टर, लेमकीन पलटी नांगर, मळणी यंत्र अनुदानावर मिळाले. तर सदस्यांनी जमा केलेल्या बचत व नफ्यातून २५ हजार रुपये खर्च करून पेरणी यंत्र, ताग काढणी यंत्र, कल्टीवेटर, धसकट काढणी यंत्र, पंजी, सब सॉयलर, पाचफणी, कांदा बी पेरणी यंत्र अशी सात यंत्रे खरेदी केली. ही सर्व यंत्रे गटातील सदस्यांना प्रति औजार प्रति दिन शंभर रुपये, तर गावांतील व परिसरातील अन्य शेतकऱ्यांना १५० रुपये भाडेतत्वावर दिली जातात. परिसरातील शेतकऱ्यांना सहजपणे अवजारांची उपलब्धता होते. त्यांचा वेळ आणि पैशाचीही बचत होते. गटातील बहुतांश सदस्यांचे ऊस हे मुख्य पीक आहे. उसाच्या सरीतील तीन फुटापर्यंतची माती मोकळी करण्यासाठी सब सॉयलरचा वापर सुमारे तीन वर्षापासून शेतकरी करत आहेत. ऊस तोडणीनंतर शिल्लक राहणारे पाचट न जाळण्यासाविषयी सदस्यांना गटाने बंदी केली आहे. सात वर्षापासून पाचट न जाळता ते जमिनीत गाडले जाते. ते गाडण्यासाठी पाच वर्षापूर्वी पाचट कुट्टी मशिन (तव्याचा नांगर) खरेदी केला आहे.

  •  गटातील सदस्यांनी सिंचनासाठी ठिबकचा वापर करतात. त्याद्वारे विद्राव्य खते दिली जातात. तीन वर्षापूर्वी तुषार सिंचनवर कांदा उत्पादन सुरु केले. तुषार सिंचनावर कांदा रोपे तयार करणे, त्यांची गादीवाफ्यावर लागवड केली जाते. सुधारित पद्धतीच्या वापरामुळे पूर्वी एकरी ८ टनापर्यंत असलेले कांद्याचे उत्पादन १६ ते १८ टनांवर पोचले आहे.
  • तीन वर्षापासून मक्याचेही उत्पादन गादीवाफ्यावर टोकन पद्धत व ठिबक सिंचन वापरातून एकरी उत्पादन तीस टनापर्यंत नेले आहे.
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी राजा पुरुष शेतकरी गटातील सदस्य फुले विक्रम हरभऱ्याचे दोन वर्षापासून बिजोत्पादन घेतात. त्याची हरभऱ्याची पाच इंचावर टोकन पद्धतीने लागवड केली. काही शेतकऱ्यांनी बारा इंच बाय ५ फूट अंतरावर सलग पेरणीतून एकरी १५ ते १६ क्विंटल उत्पादन झाले. नेहमीपेक्षा उत्पादनात सात ते आठ क्विंटलने वाढ मिळाली.
  • ऊस उत्पादनाचे मिशन १५०

  • शेतकरी राजा पुरुष गटातील सदस्यांनी यंदा ऊस उत्पादन वाढीसाठी कृषिभूषण संजीव माने यांचे मार्गदर्शन घेतले असून, एकरी १५० टनाचे लक्ष्य ठेवून काम केले जात आहे.
  • देवळाली प्रवरा भागात उसाचे क्षेत्र अधिक आहे. पूर्वी शेतकरी तीन सरी पद्धतीने उसाचे उत्पादन घेत. सहा वर्षापूर्वी शेतकरी राजा पुरुष गटाने पुढाकार घेत बदल केले. साडेचार फूट सरीनंतर आता पाच फूट सरीवर ऊस लागवड केली जात आहे. उसासह अन्य पिकांसाठी संपूर्ण क्षेत्रावर गटातील सदस्य दहा वर्षापासून ठिबक, तुषार सिंचनचा वापर करतात.
  • गटातील सदस्य गेल्या आठ वर्षापासून नियमितपणे सुमारे दोनशे एकरावर धैंचा, ताग या हिरवळीच्या खत पिकांची लागवड करतात. ते गाडण्यासाठी पाचट कुट्टी यंत्राचा वापर करतात. एकूणच तंत्रज्ञानाच्या वापरातूनच गटाने उत्पादन वाढीबरोबरच परिसरात नावलौकिक मिळवला असल्याचे आत्माचे तालुका समन्वयक धीरज कदम यांनी सांगितले.
  • एकत्रित खरेदीने दिले प्रोत्साहन

  •  २०११ मध्ये राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, आरडगाव, राहुरी, वळद उंबरगाव, जोगेश्वरी आखाडा, दवणगाव, आंबी गावातील सुशिक्षित तरुणांनी एकत्र येत शेतकरीराजा पुरुष गट स्थापन केला.
  • त्यात शिक्षणासाठी एकत्र असलेल्या नितीन ढूस, संजय डौले, संदीप कोळसे, दिनकर ढूस, विजय ढूस, मारुती बोरुडे, वैभव धुमाळ, सुनील इंगळे, जितेंद्र इंगळे, अविनाश मुसमाडे, प्रशांत मुसमाडे, सुनील वारुळे, वसंत एकीपठारे, भास्कर पठारे, शिवाजी वाणी, मयूर सप्रे, प्रसाद देशमुख, सौरभ कदम, प्रसाद कदम, अमोल साळुंके यांचा समावेश होता. या गटाच्या स्थापनेसाठी नितीन मंजाबापू ढूस यांनी पुढाकार घेतला.
  • प्रति सदस्य प्रति महिना पाचशे रुपये या प्रमाणे केलेल्या बचतीतून आतापर्यंत गटाकडे दहा लाख रुपये स्वभांडवल झाले. गट स्थापनेनंतर सहा महिन्यांत गटाने सदस्यांच्या मागणीनुसार आवश्यक ३ टन बियाणांची खरेदी बांधावर केली. बाजार दरापेक्षा ३०० ते ४०० रुपये स्वस्तात बियाणे मिळाल्याने सर्वांना एकीची ताकद समजली.
  • सहा वर्षापासून गटातील सदस्य खते, बियाणे, कीटकनाशके, ठिबक सिंचन संच यांची खरेदी एकत्रितरीत्या थेट उत्पादक कंपन्यांकडून करतात. परिणामी सवलतीमुळे दरवर्षी खरेदीत सात ते आठ लाखांपर्यंत आर्थिक बचत साधते.
  • गटातील सदस्यांसाठी अन्य उपक्रम

  • गटातील सर्व एकवीस सदस्यांसह कुटुंबाचा प्रत्येकी एक लाखाचा आरोग्य विमा घेतला आहे. गटातील पैशातून विमा हप्ता भरला जातो.
  • गटातील अठरा सदस्यांनी इंधन, वीज बचतीसाठी चार वर्षापूर्वी बायोगॅस युनिट बसवले. यासाठी गटाने प्रत्येक सदस्यांना दहा हजार रुपये एक वर्षाच्या परतफेडीसाठी बिनव्याजी कर्ज दिले. सर्वांचा इंधनाचा खर्च शून्यावर आला आहे.
  • गटातील सदस्यांनी मुलीच्या नावे विमा योजनेत ठेव ठेवल्यास त्या सदस्याला एक वर्षाच्या परतफेडीसाठी बिनव्याजी एक लाखाचे कर्ज दिले जाते. आतापर्यंत १३ सदस्यांना या योजनेतून पैसे वाटप केले आहेत.
  • सरकारी योजनेची वाट न पाहता गटाला मिळणाऱ्या नफ्यातून शेती अभ्यासासाठी विविध दौरे काढले जातात. आतापर्यंत राज्यात व राज्याबाहेर वेगवेगळे सुमारे १३ दौरे गटातील सदस्यांनी केले आहेत.
  • आम्ही तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी गटाची स्थापना केली. गटामार्फत विविध उपक्रमाबरोबरच तंत्रज्ञान वापराला चालना दिली. अवजारे बॅंकेची स्थापना करून, त्याचा दोन वर्षापासून सक्षमपणे वापर करत आहोत. खर्च व कष्टामध्ये बचतीसोबतच उत्पादनामध्ये वाढ होत आहे. आता स्वयंचलित ठिबक यंत्रणा शेतीत बसवण्याचे नियोजन करत आहोत. - नितीन ढूस, ८९९९२९७७२९.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com