अंजीर पिकात मास्टर अन् मार्गदर्शकही

पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील दीपक जगताप यांच्या स्वभावातच संशोधकाची वृत्ती दिसून येते. स्वावलंबनातून स्थैर्याकडे, श्रमातून समृद्धीकडे, शास्त्रीय ज्ञान, अनुभवातून प्रगतीकडे आणि शेतीतून समग्र परीवर्तनाकडे असा त्यांचा दृष्टिकोन आहे.
fig harvesting
fig harvesting

पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील दीपक जगताप यांच्या स्वभावातच संशोधकाची वृत्ती दिसून येते. स्वावलंबनातून स्थैर्याकडे, श्रमातून समृद्धीकडे, शास्त्रीय ज्ञान, अनुभवातून प्रगतीकडे आणि शेतीतून समग्र परीवर्तनाकडे असा त्यांचा दृष्टिकोन आहे. याच पद्धतीने सहा एकरांत दर्जेदार अंजिराची शेती यशस्वी करून त्यातील मास्टर व मार्गदर्शक म्हणून त्यांनी ओळख मिळवली आहे. पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत हे जवळपास पाच हजार लोकसंख्येचे गाव. या भागातील बहुतांश जमीन जिरायती प्रकारची आहे. गावातील गणेश व दीपक या जगताप बंधूंनी अथक परिश्रमातून वडिलोपार्जित माळरानावर अंजिराची बाग फुलविली आहे. माळरानावरील चढउतार, खडकाळ जमीन, छोटे-मोठे दगडगोटे दूर करून त्यांनी माळरानाचे सपाटीकरण केले. त्यासाठी पाच लाख रुपये खर्च आला. रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन हेक्टरसाठी पस्तीस हजार अनुदान मिळाले. वीर धरणातील कालव्याजवळ त्यांचे एक क्षेत्र आहे. तेथील विहिरीवरून दोन किलोमीटर अंतरावरून माळरानावर पाणी आणले. त्यात भाजीपाला, ऊस आदी पिके घेण्यास सुरुवात केली. परंतु दरांतील चढउतार व खर्चाची मोठी समस्या जाणवली. अंजिराची निवड

  • दीपक हे अभ्यासूवृत्तीचे शेतकरी आहेत. त्यांनी हंगामी पिकांऐवजी फळबागा व त्यांचे अर्थकारण याचा विचार केला. डाळिंब, संत्रा, मोसंबी व अंजीर यांची निवड केली. संत्रा फळाला हवामान मानवले नाही. डाळिंब चांगले आले. मात्र तेलकट डाग व मर रोग यामुळे या पिकातही म्हणावे असे यश आले नाही.
  • अंजीर मात्र हवामानाच्या दृष्टीने किफायतशीर वाटले. मग तेच पीक घेण्याचा मनापासून निर्धार केला.
  • थोरले बंधू गणेश देखील पुण्यातील नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीत उतरले. दिवस-रात्र एक करून सर्व कुटुंबासहित मन लावून जोपासना करण्यास सुरुवात केली. दीपक यांनी सुरुवातीला अंजिराच्या पट्ट्यात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून समाधानकारक माहिती फार न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तरीही मिळत असलेले ज्ञान व अनुभवाच्या कसोटीवर त्यांनी व्यवस्थापन सुरू ठेवले. चिकाटी व सातत्य ठेवले. त्यातूनच सन २००६ मध्ये एक एकर लागवडीपासून केलेली सुरुवात आज साडेसहा एकरांपर्यंत पोचली आहे.
  • व्यवस्थापनातील टिप्स

  • एकरी २०० झाडे. सुरुवातीची लागवड १५ बाय १५ फुटांवर होती. नवी लागवड १८ बाय १८ फुटांवर केली आहे.
  • वाण - दिनकर व पूना फिग
  • खट्टा आणि मीठा अशा दोन्ही बहरांत उत्पादन घेतले जाते.
  • हार्ड छाटणी या तंत्रावर अधिक भर दिला आहे. यात खट्टा बहरात मे-जूनमध्ये छाटणी केली जाते.
  • साधारण साडेचार महिन्यांनंतर फळ तोडणीस सुरुवात होते.
  • मीठा बहरासाठी पुढील छाटणी सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये होते. याचीही तोडणी साडेचार महिन्यानंतर सुरुवात होते.
  • दीपक सांगतात की या पद्धतीमुळे वर्षातील काही महिने प्लॉट सुरू राहतो. इतरांच्या तुलनेत एक महिना फळ आधी बाजारात येते. त्याच पद्धतीने एक महिना उशिरापर्यंत राहते. त्यामुळे दर चांगला मिळतो.
  • पानांचे महत्त्व दीपक सांगतात, की अंजिराचे पान शेवटपर्यंत मोठे, चमकदार दिसले पाहिजे. तरच फळही चमकदार तयार होते. पानांची काळजी घ्यायला हवी. काही शेतकरी पॅकिंगमध्ये पाने ठेवतात. उन्हाळ्यात मग पानगळ होते. सूर्यप्रकाश थेट झाडांच्या खोड-सालीवर पोचतो. झाड कमकुवत व रोगट होते.

  • रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर. त्यामुळे मालाला चमक, गोडवा व टिकाऊपणा चांगल्या प्रकारे मिळतो. जिवामृत, घन जिवामृत, दशपर्णी अर्क, कडुनिंबावर आधारित घटक आदींचा वापर. काही निविष्ठा शेतातच बनवतात.
  • पाचटाचा वापर करून लाभदायक जिवाणूंची संख्या वाढवली.
  • मातीचा प्रकार, पाण्याचा निचरा या बाबीही महत्त्वाच्या. जास्त दलदल ठवू नये असे दीपक सांगतात.
  • हार्ड छाटणीवेळी नत्राचे प्रमाण अधिक नको. अन्यथा शेंडा चालतो. फळांचा लाग कमी राहतो.
  • यांत्रिकीकरणावर भर. तोडणी केलेला माल डोक्यावरून वाहून नेण्यापेक्षा छोट्या ट्रॅक्टर ट्रॉलीने किंवा बुलेटच्या ट्रॉलीद्वारे बागेतून बाहेर काढण्यात येतो. फवारणीसाठी आधुनिक यंत्र वापरतात.
  • रोगांचे नियंत्रण

  • मागील वर्षी व यंदा अतिवृष्टीमुळे अंजिराचे आगार असणाऱ्या शेजारील पुरंदर तालुक्यातील अनेक बागांचे नुकसान करपा आणि तांबेरा या रोगांमुळे झाले. दीपक सांगतात, की या पिकात शत्रूकीटकांचे प्रमाण कमी असते. मात्र हे दोन रोग अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे सर्वांत महत्त्वाचे असते. अशावेळी फवारण्यांची संख्या व त्यातील अंतरदेखील संतुलित करावे लागते.
  • पाण्याचा निचरा योग्य केल्यामुळे अतिवृष्टीमुळेही काही नुकसान झाले नाही.
  • उत्पादन, उत्पन्न व दर

  • अलीकडील काळात एकरी १८ ते १९ टनांपर्यंत. यंदा २० टन उत्पादनाचे उद्दिष्ट.
  • एकरी २०० झाडे. प्रति खोड सुमारे ३० ते ४० फळे ठेवण्याचा प्रयत्न.
  • दोन्ही बहरांत मिळणारा दर- किलोला ४० रुपयांपासून ते ८० रुपये.
  • उत्पादन खर्च- एकरी दोन लाख रुपयांपर्यंत
  • विक्री व्यवस्था प्रामुख्याने सांगली, मिरज, कोल्हापूर भागांत विक्री होते. बारामती भागातून या भागासाठी रेल्वे वाहतूक सोयीची असल्याचे दीपक सांगतात. शिवाय दर देखील पुण्याच्या तुलनेत कमी नाहीत. यंदा महाबळेश्‍वर, वाई, पाचगणी आदी भागांत विक्री केली आहे. मार्गदर्शकाच्या भूमिकेत

  • खरे तर पुरंदर हा अंजिराचा हुकमी पट्टा. मात्र तेथील तसेच जालना, नाशिक, सोलापूर, पुणे, जळगाव आदी भागांतील शेतकरी, कृषी अधिकारी दीपक यांची बाग पाहण्यास येतात व मार्गदर्शन घेतात.
  • कोरोना विषाणू लॉकडाऊउनच्या काळात अनेक जण बेरोजगार झाले. दीपक यांनी मात्र यातील मार्च ते मे या तीन महिन्यांत सुमारे पावणेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. कृषी विभागाने त्यांना वाहतुकीची परवानगी दिली होती. या पिकाने जगताप कुटुंबाला आर्थिक सक्षमता दिली आहे.
  • बारा ते पंधरा जणांना रोजगार मिळाला आहे. रघुनाथ चौसष्टे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन या कुटुंबाला मिळाले आहे.
  • पुरस्काराने सन्मानित

  • अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधक संघाचे दीपक संचालक आहेत.
  • संघाच्या २०१८ मध्ये अंजीरररत्न पुरस्काराने तसेच शासनाचा उद्यानपंडित पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.
  • एका संस्थेनेही कृषी भूषण पुरस्कार त्यांना दिला आहे.
  • विक्रीचा अनुभव लहानपणी आईने शेवग्याच्या शेंगांची विक्री करून येण्यास सांगितले. त्या वेळी दहा किलो माल हाती होता. विक्रीअखेर १६० रुपये हाती येणे अपेक्षित असताना ९६ रुपयेच मिळाले. तेव्हापासून विक्री, हिशेब, दर आदींची सवय व जाण आल्याचे दीपक म्हणाले. संपर्कः दीपक जगताप, ९७६३४३७४०७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com