फळपिकातून शाश्वत झाली शेती

राजूरा बुद्रूक (ता.मुखेड,जि.नांदेड) येथील प्रयोगशील शेतकरी उदयराव तुकाराम झरे-पाटील यांनी पारंपरिक पिकांच्या बरोबरीने बाजारपेठेचा अभ्यास करून कलिंगड,पपई,सीताफळ,पेरू तसेच औषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर दिला.
Quality production of papaya
Quality production of papaya

राजूरा बुद्रूक (ता.मुखेड,जि.नांदेड) येथील प्रयोगशील शेतकरी उदयराव तुकाराम झरे-पाटील यांनी पारंपरिक पिकांच्या बरोबरीने बाजारपेठेचा अभ्यास करून कलिंगड,पपई,सीताफळ,पेरू तसेच औषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर दिला. पीक बदलातून त्यांनी शेती किफायतशीर केली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका हा अवर्षण प्रवण डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो. चांगला पाऊस झाला तरच हंगामी पिकांच्या उत्पादनांची शाश्वती ठरलेली. या भागातील शेतकऱ्यांना बहुतांश वेळा पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या तालुक्यातील राजुरा बुद्रुक येथील प्रयोगशील शेतकरी उदयराव तुकाराम झरे-पाटील यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून पारंपारिक पिकांना फळबागेची जोड दिली. दहावीपर्यंत शिक्षण झालेले उदयराव झरे यांनी १९९७ पासून  कुटुंबाच्या शेती नियोजनात लक्ष देण्यास सुरूवात केली. केवळ एक फळपीक पद्धतीवर न थांबता झरे यांनी कलिंगड,टरबूज,पपई, सीताफळ, पेरू या फळपिकांच्याबरोबरीने  शतावरी, अश्वगंधा या औषधी वनस्पतींचीही यशस्वी लागवड केली. यासोबतच बाजारपेठेचा अंदाज घेत मिरची, टोमॅटो उत्पादनामध्येही वेगळी ओळख तयार केली आहे.  उदयराव आणि त्यांचे थोरले बंधू हणमंतराव यांचे एकत्रित कुटुंब आहे. झरे कुटुंबाकडे राजुरा येथे ६५ एकर, लोनाळ येथे १०० एकर आणि तडखेड येथे १६  एकर शेती आहे. बहुतांश शेतीमध्ये उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा, गहू, करडई, भुईमूग या हंगामी पिकांची लागवड असायची.सहा सालगडी आणि बैलजोड्यांच्या माध्यमातून पावसाच्या भरवशावर शेती करताना उत्पादन आणि खर्चाचा मेळ बसता नव्हता. यामुळे पीक बदलाच्यादृष्टीने उदयराव झरे यांनी बाजारपेठ लक्षात घेऊन सहा वर्षांपासून कलिंगड, खरबूज लागवडीला सुरू केली. सुरवातीला तीन एकरावर असलेली ही लागवड आता दरवर्षी दहा एकरांवर पोहोचली आहे. हळूहळू वार्षिक तसेच बहुवार्षिक कोरडवाहू आणि बागायती फळपिकांच्या लागवडीचे नियोजन त्यांनी सुरू केले.  फळपिकांच्या लागवडीला सुरूवात  राजुरा येथील शेतात पाण्याची सोय नव्हती. केवळ पावसाच्या पाण्यावर हंगामी पिकांची लागवड होत असे. पाणी उपलब्धतेच्यादृष्टीने झरे बंधूंनी शेतीमध्ये एक विहीर तसेच दोन कूपनलिका घेतल्या. याला चांगले पाणी लागल्यामुळे बागायती पिकांची सोय झाली. प्रारंभी तीन एकरावर कलिंगड, टरबुजाची लागवड सुरु केली. मागील सहा वर्षांपासून डिसेंबर ते मार्च या कालावधीत दहा एकरावर टप्याटप्याने कलिंगड लागवडीचे नियोजन असते. एकरी तीस ते पस्तीस टन उत्पादन मिळते. कलिंगडाची विक्री निजामाबाद, हैदराबाद बाजारपेठेत होते. सरासरी सात ते आठ रुपये प्रति किलो दर मिळतो. कलिंगड पिकातून बऱ्यापैकी आर्थिक नफा मिळू लागल्याने झरे बंधूंनी विविध फळपिकांच्या लागवडीस सुरवात केली.  सीताफळात पपईचे आंतरपीक 

  • उन्हाळ्यात शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध होण्याची खात्री झाल्यानंतर झरे बंधूंनी २०१७ पासून पपई लागवडीस सुरूवात केली. पहिल्यांदा चार एकरावर असलेली पपई लागवड आता सहा एकरावर पोहोचली आहे. सीताफळ आणि पपई आंतरपीक लागवडीबाबत उदयराव झरे म्हणाले की, गेल्या जानेवारी महिन्यात सहा एकरावर १६ फूट बाय ८ फूट अंतराने सीताफळाच्या एनएमके वन सुपर गोल्डन जातीची लागवड केली. या लागवडीमध्ये मार्च महिन्यात आंतर पीक म्हणून पपई लागवड केली. सीताफळाच्या दोन ओळीत पपईच्या दोन रांगा तसेच दुसऱ्या ओळीत झिगझॅग पद्धतीने गादीवाफ्यावर पपई रोपाची लागवड केली.
  • माती परिक्षणानुसार सेंद्रिय आणि रासायनिक खत मात्रा तसेच सूक्ष्मअन्नद्रव्याचे काटेकोर नियोजन केले. लागवडीनंतर आठ दिवसांनी विद्राव्य खताची मात्रा सुरु केली. पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन ठेवले. फळाची वाढ चांगली व्हावी, यादृष्टीने महिन्यातून दोन वेळा कॅल्शिअम, बोरॉनची शिफारशीत मात्रा दिली जाते. मार्च, २०१९ मध्ये लागवड केलेल्या पपईची सध्या काढणी सुरु आहे.
  • यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे उत्पादन कमी येण्याची शक्यता होती. परंतु पिकाची योग्य काळजी घेतल्यामुळे उत्पादनात फारसा फरक पडलेला नाही. यंदाही फळांची संख्या चांगली आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाडा विभागात अनेक ठिकाणी पपई बागांचे नुकसान झाले असल्याने बाजारपेठेत आवक कमी आहे. त्यामुळे दरात सुधारणा झाल्यामुळे प्रति किलोस बारा रुपये दर मिळत आहे. यावर्षी एकरी २५ ते ३० टन उत्पादन होईल.  सध्या दिल्ली बाजारपेठेत पपई जात आहे. मागील वर्षी मला पपई फळांना प्रति किलो १६ ते २५ रुपयांपर्यंत दर मिळाला होता. एकरी २५ ते ३० टन पपईचे उत्पादन मिळाले होते. त्यामुळे या पिकाने चांगली आर्थिक साथ दिली आहे. 
  • पेरू, सफरचंदाची लागवड राजुरा शिवारामध्ये उदयराव झरे यांनी जानेवारी महिन्यात  सहा एकरावर पेरूच्या व्हीएनआर जातीची लागवड केली. याचबरोबरीने प्रयोग म्हणून ३० गुंठे क्षेत्रावर हिमाचल प्रदेशमधून आणलेली सफरचंदाच्या ‘हरीमन ९९’ या जातीची लागवड केली आहे. सध्या दोन्ही पिकांची चांगली वाढ होत आहे. मुले झाली कृषी पदवीधर  शेती उत्पादनातून चांगला आर्थिक नफा मिळू लागल्याने झरे कुटुंबाने मुलांना उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. उदयराव झरे यांचा मुलगा निखिल याचे कृषी पदवी पर्यंत शिक्षण झाले आहे. हणमंतराव झरे यांचा मुलगा प्रमोद यांचे शिक्षण कृषी पदवी आणि एमबीएपर्यंत आणि प्रताप यांचे अभियांत्रिकीपर्यंत शिक्षण झाले आहे. शतावरी, अश्वगंधाची लागवड उदयराव झरे यांनी पीक बदलामध्ये सातत्य ठेवत दोन वर्षांपूर्वी दोन एकरावर करार पद्धतीने शतावरीची दहा बाय पाच फूट अंतराने लागवड केली. शतावरीच्या दोन ओळीमध्ये अश्वगंधाच्या तीन ओळीत लागवड केली. यंदा या दोन्ही पिकांची काढणी केली आहे. शतावरीचे ३२ टन आणि आंतरपीक असलेल्या अश्वगंधाचे दोन क्विंटल उत्पादन मिळाले. कंपनीनेच उत्पादनांची खरेदी केली आहे.  टोमॅटो, मका लागवड  सध्या दीड एकर क्षेत्रातील टोमॅटो काढणी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत बाराशे क्रेट उत्पादन मिळाले. सध्या प्रति क्रेट पाचशे ते सातशे रुपये दर मिळत आहे. मागील उन्हाळ्यात झरे यांनी बारा एकरावर मका लागवड केली होती.  एकरी सरासरी ३५ क्विंटल उत्पादन मिळाले. त्यामुळे टोमॅटो आणि मका ही देखील आर्थिक उत्पन्न वाढीला फायदेशीर ठरली आहेत. संपर्क-  उदयराव झरे-पाटील ९८९०८२१७७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com