शोभिवंत मत्स्यपालनातून तयार केली ओळख

विक्रीसाठी तयार केलेले ॲक्वॅरियम.
विक्रीसाठी तयार केलेले ॲक्वॅरियम.

खराळा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील गौरव विनोद बोंडे याने शेतीच्या बरोबरीने शोभिवंत मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू केला. विविध रंगीबिरंगी माशांच्या संगोपनाबरोबरीने त्याने विक्री व्यवसायातही गती घेतली. गेल्या पाच वर्षांत त्याची मत्स्यपालनात वेगळी ओळख तयार झाली आहे. त्याचबरोबरीने रोपवाटिका व्यवसायातही चांगला जम बसविला आहे. 

उच्च शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता गौरव विनोद बोंडे याने शोभिवंत मासेपालनासारख्या आगळ्यावेगळ्या क्षेत्रात करिअर केले आहे. या व्यवसायाला आता रोपवाटिका व्यवसायाची जोड दिली आहे. गौरव यांचे वडील विनोद रामकृष्ण बोंडे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून खराळा (जि. अमरावती) गावामध्ये मत्स्यपालनाला सुरवात केली होती. या प्रकल्पाकरिता एम्पिडाकडून साडेसहा लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते. विदर्भात शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळावी, या उद्देशाने त्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर दुग्धोत्पादन व्यवसायाचे नियोजन होते. परंतु, या दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता गौरवने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. गौरवच्या वडिलांनी मत्स्यपालन प्रकल्पाच्या उभारणीकरिता २०११ साली खराळा (ता. चांदूरबाजार जि. अमरावती) शिवारात सहा एकर शेती खरेदी केली होती. विदर्भात अशाप्रकारच्या नवख्या व्यवसायात रुजताना अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागणार होता. त्यामुळे गौरवने एका मत्स्य व्यवसायिकाकडे जेमतेम मेहतान्यावर काम करण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष त्याच्याकडे काम केल्यानंतर मत्स्यपालन व्यवसायातील बारकावे कळाल्यानंतर गौरवने खऱ्या अर्थाने शेततळ्यातील मत्स्यपालन आणि शोभिवंत मत्स्यपालनास सुरवात केली. मत्स्यपालनाला सुरवात 

  •   बारकावे शिकून घेतल्यानंतर गौरवने दोन एकरावर मत्स्य उत्पादन प्रकल्प उभारला. मत्स्यपालनाकरिता २०० बाय १०० फूट आकाराचे एक आणि १५० बाय १०० फुटाची दोन तळी तयार केली. त्याची खोली पाच ते आठ फूट आहे. या तळ्यासाठी दोन लाखांचा खर्च झाला.
  •   पहिल्या टप्यात रोहू, कटला, सायप्रिनस या माशांच्या उत्पादनावर भर देण्यात आला होता. परंतु, अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने या माशांचे उत्पादन टप्याटप्याने कमी केले. याच दरम्यान गौरवने शोभिवंत मत्स्यपालनाकडे लक्ष देण्यास सुरवात केली.
  •   शोभिवंत मस्त्यपालनासाठी गौरवकडे ५२ लहान छोट्या टाक्या आणि १०० ॲक्वॅरियम आहेत. ॲक्वॅरियम ठेवण्यासाठी २० फूट बाय २२ फूट आकाराचा हॉल बांधलेला आहे. टाक्यांमध्ये तसेच ॲक्वॅरियममध्ये माशांच्या आकारानुसार बीज उत्पादन आणि संगोपन केले जाते. 
  •   तळ्यामध्ये देखील कोयकार्प माशाचे संगोपन केले जाते. या माशाची नगाने विक्री  होते. पाच ते सहा इंचाचा मासा ४५ रुपयांना घाऊक दरात विकला जातो.
  •   मधल्या काळात कूपनलिकेची पाणी पातळी कमी झाल्याने मत्स्य उत्पादनाला फटका बसला तसेच पुरवठादाराने देखील कमी दर्जाचे मासे दिल्याने त्यांचे दगावण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे एके वर्षी उत्पन्नाचा आलेख खालावला होता.
  •   गौरव सध्या एंजल, पंगेशिअस, गोल्ड फिश, गुरामी, रेडकॅप, शुभंकीन, ब्लॅक मोर, कोयाकार्प, गप्पी, आफ्रिकन चिकिल्ड, मॉली, झेब्रा चिकिल्ड या माशांचे संगोपन करतो. यातील काही माशांचे बीज उत्पादन करतो.
  •   रंगीत मासे पालनाकरिता आवश्‍यक बीज हे मुंबई आणि कोलकतावरून आणले जाते. दरवर्षी एक ते दीड लाख मत्स्यबिजांची खरेदी केली जाते.
  •   फिशटॅंककरिता लागणाऱ्या साहित्याची खरेदी देखील कोलकतावरून होते. ॲक्‍वॅरीयम तयार करण्यासाठी दोन कुशल तर दोन अकुशल कामगार गौरवकडे आहेत.   
  •   मत्स्यबिजाचा दर प्रती नग असतो. माशांच्या वर्गवारीनुसार २ ते १४ रुपयांपर्यंत हा दर राहतो. पार्सल साईजमध्ये दुकानदारांना पुरवठा होतो. पाऊण ते एक इंच असा माशांचा आकार असतो. सरासरी दोन इंचापर्यंत त्यांची सरासरी वाढ करून विक्री केली जाते. 
  •   वाढीच्या टप्यात शोभिवंत माशांना हायप्रोटीन फूड दिले जाते. गौरवने स्वतः माशांसाठी खाद्य तयार केले आहे. एक ते दीड महिन्यांत दोन इंचापर्यंत माशांची वाढ होते. 
  •   शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायात कष्ट प्रचंड आहेत. व्यवस्थापनावर काटेकोर लक्ष द्यावे लागते. गेल्या वर्षी या व्यवसायात पंधरा लाखांची उलाढाल झाल्याचे गौरव सांगतो. 
  • विकसित केली बाजारपेठ  गौरवने सुरवातीला कोलकतावरून शोभिवंत मासे खरेदी करून त्याची थेट विक्री करण्यावर भर दिला. मात्र, यास घाऊक ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता, परिणामी उत्पन्नही कमी होत होते. त्यामुळे स्वतःच शोभिवंत मासे उत्पादनाचा निर्णय घेतला. त्याचा चांगला फायदा झाला. सध्या गौरव अमरावती शहराच्याबरोबरीने डोणगाव, मेहकर, नागपूर, परतवाडा, मोर्शी, यवतमाळ या गावांतील सुमारे दहा ते १५ शोभिवंत माशांच्या विक्री करणाऱ्या दुकानदारांना माशांचा पुरवठा करतो. विविध शहरांतील किरकोळ व्यावसायिकांच्या गाठीभेटी घेत त्यांना माहिती दिली जाते. शहरी भागात शोभिवंत माशांना मागणी वाढत असल्याने गौरवच्या व्यवसायाला चालना मिळाली. येत्या काळात अमरावती शहरात शोभिवंत माशांच्या विक्रीसाठी दुकान सुरू करण्याचे नियोजन केले आहे. गौरवची आई माया बोंडे या शोभिवंत माशांच्या विक्रीचे नियोजन पाहणार आहेत. 

    कांदा बीजोत्पादन,  कलिंगड लागवड  गौरव बोंडे यांच्याकडे दोन एकर लागवड क्षेत्र आहे. यामध्ये सोयाबीन, तूर, हरभरा लागवड असते. २०१५ मध्ये गौरवने दोन एकरात कांदा बीजोत्पादन घेतले होते. यातून पाच क्विंटल बियाणे झाले. खासगी कंपनीने ३२ हजार रुपये प्रती क्‍विंटल हमी दराने कांदा बियाणे खरेदी केले होते. २०१६-१७ मध्ये अर्धा एकरावर कलिंगड लागवडदेखील केली होती. यातून एक लाखाचा नफा मिळाला. सध्या अर्धा एकरता केळी लागवड केलेली आहे. शोभिवंत मस्त्यपालन व्यवसाय वाढत असल्याने सध्या पारंपरिक पिकांच्या नियोजनावरच गौरवने भर दिला आहे.

    रोपवाटिकेची दिली जोड  परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेत गौरवने फळझाडे आणि शोभिवंत झाडांच्या विक्रीसाठी रोपवाटिकेची उभारणी केली आहे. २०१७ मध्ये प्राथमिकस्तरावर हा उद्योग छोट्याशा शेडच्या माध्यमातून सुरू झाला. यावर्षी अकरा गुंठ्यांपर्यंत रोपवाटिकेचा विस्तार झाला आहे. झेंडू, गुलाब, पपई यांसह विविध फळे आणि फुलझाडांच्या रोपांची विक्री सुरू झाली आहे. गेल्यावर्षी रोपवाटिका उद्योगातून दीड लाख रुपयांची उलाढाल झाली होती. या रोपवाटिकेसही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. 

     - गौरव बोंडे, ८३९०७६८८३७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com