गोशाळेतून गवसली आर्थिक विकासाची वाट

गोमूत्र अर्क तयार करताना सौ.उमा औटे
गोमूत्र अर्क तयार करताना सौ.उमा औटे

बीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत परिवाराच्या सहकार्याने गोशाळा उभी केली आहे. गाईंच्या संगोपनाच्या बरोबरीने दूध विक्री, गोमूत्र अर्क तसेच विविध प्रक्रिया उत्पादने औटे कुटुंबीय तयार करतात. गोशाळेत परिसरातील शेतकरी महिलांना गोसंगोपन, जीवामृतनिर्मिती, गांडूळखत निर्मिती प्रशिक्षणाचे आयोजनदेखील केले जाते. त्याचा चांगला फायदा होत आहे.

सुशीवडगाव (ता. गेवराई, जि. बीड) हे मूळ गाव सोडून बीडमधील शिंदे नगरात सहा वर्षांपूर्वी सुनील आणि सौ. उमा औटे कुटुंब स्थायिक झाले. गोसेवेचा ध्यास घेतलेल्या या दाम्पत्याचे पहिल्यांदा स्वत:च्या घरासमोरील मोकळ्या जागेत पाच गीर गाईंचे संगोपन सुरू केले. सहा महिन्यांपूर्वी बीड शहरातील मुनोत परिवाराच्या सहा एकर शेतीमध्ये त्यांच्याच मदतीने ‘सार्थक-सिद्धी’ गोशाळेची उभारणी केली. या गोशाळेची नोंदणीही करण्यात आली आहे. केवळ गो संगोपन न करता ‘सार्थक-सिद्धी’ ब्रॅन्डने दूध विक्री, गोमूत्र अर्क, गांडूळखतनिर्मिती केली जाते. गोशाळेत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सौ. उमा औटे करतात. 

गोपालनाला सुरवात   उमाताईंचे पती सुनील हे राज्य परिवहन मंडळाच्या गेवराई डेपोमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे पहिल्यापासून गाईंच्या संगोपनाची जबाबदारी उमाताईंकडेच आली. उमाताईंचे शिक्षण डी.एड. पर्यंत झाले आहे. सासरी आल्यानंतर त्यांनी गेवराईतील खासगी शाळेत दोन वर्ष नोकरी केली. नोकरीत संधी असली तरी सुनीलरावांच्या गोसेवेच्या ध्यासात मदतीची तयारी त्यांनी दाखविली. गोसेवेच्या माध्यमातून काहीतरी करून दाखविण्याच्या उमेदीने गोशाळा सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सुशीवडगावमधून औटे कुटुंबीय बीडमध्ये स्थायिक झाले. बीडमधील स्वमालकीच्या घरासमोरच औटे दाम्पत्याने सहा वर्षांपूर्वी पाच गीर गाईंचे संगोपन सुरू केले. गाईंच्या संगोपनासोबत दुधासह शेण, गोमूत्रापासून विविध घटकांची निर्मिती त्यांनी सुरू केली. गाईच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत उपयोगाची आहे हे अधोरेखित करत प्रत्येकाने गोपालन करावे यासाठीच औटे कुटुंबीय प्रयत्नशील आहे. समाजातील दानशुरांच्या मदतीवरच गोशाळेचा संपूर्ण डोलारा अवलंबून असल्याचे औटे कुटुंबीय प्रामाणिकपणे सांगतात. 

प्रशिक्षणातून पूरक उद्योगाला सुरवात  उमाताईंनी दूध, शेणखत व गोमूत्राद्वारे विविध उत्पादनांच्या निर्मितीसाठी प्रशिक्षण घेतले आहे. यासाठी नागपूर येथील देवलापार, कोल्हापूर जिल्ह्यांतील कणेरी मठ आणि गुजरात, राजस्थानमधील गोशाळेत जाऊन प्रशिक्षण घेतले. यासाठी गिरीश शहा यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.      उत्पादनाच्या निर्मितीबाबत उमाताई म्हणाल्या, की मिळालेल्या प्रशिक्षणाचा फायदा घेत तीन वर्षांपासून गोमूत्र अर्क, तुलसी अर्क, अर्जून साल अर्क, दंतमंजन, फेस पॅक, साबण, गोमूत्र स्प्रे, गोनाईलनिर्मिती केली जाते. गोमूत्र अर्कनिर्मितीसाठी चाळीस हजार रुपयांचे अर्कनिर्मिती यंत्र घेतले आहे. प्रक्रिया उत्पादननिर्मितीसाठी वर्षभर तीन महिलांना रोजगार मिळाला आहे. येत्या काळात उत्पादनांसाठी प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या लोकांच्या माध्यमातूनच उत्पादनांची विक्री केली जाते. कुटुंब सांभाळून इतरांना रोजगार देत किमान दर महा सात  हजार रुपयांची मिळकत होते.    

उत्पादनांची विक्री  उमाताईंच्या गोशाळेत सध्या पाच गीर गाई दुधात आहेत. दररोज तीस लिटर दूध उत्पादन होते. बीड शहरातील ग्राहकांना ६० रुपये प्रतिलिटर दराने दुधाची घरपोच विक्री होते. अर्धा लिटर, एक लिटरपर्यंत दुधाची मागणी असलेल ग्राहक गोशाळेशी जोडले गेले आहेत.

  •  दर महिन्याला ४० लिटर गोमूत्राची विक्री. प्रतिलिटर १५ रुपये दर. शेतकरी जीवामृतनिर्मितीसाठी गोमूत्र खरेदी करतात.
  • गोमूत्र अर्काची ३०० रुपये लिटर दराने विक्री.
  • दर महा दोन किलो तुपाची विक्री. प्रतिकिलो दोन हजार रुपये दर. 
  • मागणीनुसार गोवऱ्याची विक्री.
  •  प्रदर्शनामध्ये गोमूत्र अर्क, दंतमंजन,साबण, गोमूत्र स्प्रे(तुलसी व निमार्कसह), गोनाईल या उपउत्पादनांची विक्री. 
  • गाईंचे व्यवस्थापन, गोमूत्र अर्क, जीवामृतनिर्मिती, गांडूळखतनिर्मितीबाबत प्रशिक्षणाचे आयोजन.
  • गोशाळा आणि शेतीचे नियोजन

    बीडमधील मुनोत कुटुंबीयांनी औटे यांना गोशाळेसाठी मदत केली. याबाबत उमाताई म्हणाल्या, की आम्हाला राजेंद्र मुनोत कुटंबीयांनी बीड शहराजवळील त्यांच्या सहा एकर शेतीमध्ये गोशाळा बांधून दिली. शेतीत पाण्यासाठी विहीर खोदली आहे. यास चांगले पाणी लागले आहे. आम्ही पहिल्यापासून ॲग्रोवनचे वाचक आहोत. त्यामुळे देशी गाईंचे संगोपन तसेच पीक व्यवस्थापनाची माहिती आम्ही सातत्याने घेत असतो. सध्या सहा एकर शेती पैकी दोन एकरावर विविध चारा पिकांची लागवड केली आहे. तसेच चार एकरावर शेवगा, मिरची, भूईमुग, बाजरी, ज्वारी लागवडीचे नियोजन मुनोत परिवाराच्या मार्गदर्शनाने केले आहे. सेंद्रिय पद्धतीनेच पीक उत्पादनावर भर दिला आहे. तसेच आमच्या गावाकडील सहा एकर शेतीमध्ये चाऱ्यासाठी बाजरी, ज्वारीची लागवड करतो. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे बाहेरून चारा विकत घ्यावा लागला होता. दुष्काळी परिस्थितीमध्ये मुनोत ग्रुप, गौतम खटोड, गिरीशभाई शहा यांची मदत मिळाली. माझे पती सुनील हे राज्य परिवहन मंडळात वाहकपदाची जबाबदारी सांभाळून गायींच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देतात. शेणाचा वापर गांडूळ खतनिर्मितीसाठी केला जातो. शेणखत, गांडूळखताच्या वापरातून जमीन सुपीकता वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

  •   गोशाळेत गीर, गावरान गाईंची संख्या ३६. गोशाळेत १० ते १४ लिटर दूध देणाऱ्या गीर गाई.
  •   पशूतज्ज्ञांकडून वेळेवर लसीकरण आणि जंतनिर्मूलन. 
  •   प्रत्येक गाईला प्रतिदिन २० ते २५ किलो चारा, दीड किलो खुराक. 
  •   गाईंच्या खुराकामध्ये अश्वगंधा, शतावरी, जेष्ठमधाचा वापर. चाऱ्यासोबत मेथी, कोथिंबीर, कडुनिंबाचा पाल्याचा वापर.
  •   शिफारशीनुसार खनिज मिश्रणाचा वापर.
  •   दिवसातून काही वेळ गाई मोकळ्या सोडल्या जातात. त्यामुळे आरोग्य चांगले राहाते.
  • -  सौ.उमा सुनील औटे, ८८३०५६४०८१ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com