व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत यशस्वी शेळीपालन

Pawar-Patil family engaged in goat rearing and the awards they receive
Pawar-Patil family engaged in goat rearing and the awards they receive

पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले वेर्णे (ता. जि. सातारा) गावातील अमोल बळिराम पवार-पाटील हा तरुण आफ्रिकन बोअर व सानेन या शेळ्यांचे साडेचार वर्षांपासून यशस्वी संगोपन करीत आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनाबरोबर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत त्याने या व्यवसायाचा चांगला जम बसविला आहे. वर्णे (ता. जि. सातारा) हे गाव एकेकाळी पॅालिहाउस व फूलशेतीसाठी प्रसिद्ध होते. गावात अडीचशेहून अधिक पॅालिहाउस होती. जरबेरासह विविध फुलांची शेती व्हायची. गावातील अमोल बळिराम पवार-पाटील यांनी ऑटोमोबाईल डिप्लोमाचे शिक्षण घेतले आहे. मुंबई येथे त्यांना ‘बीएसटी’मध्ये नोकरी लागली होती. त्याच दरम्यान गावात पॅालिहाउस शेतीची नुकतीच सुरुवात झाली होती. पवार कुटुंबीयांची सुमारे २२ एकर शेती होती. त्यामुळे वडिलांनी अमोल यांना नोकरी सोडून शेतीच करण्याचा सल्ला दिला. अमोल यांनीही पूर्ण विचारांती शेतीत उतरण्याचे नक्की केले. सुरुवातीला पाच व नंतर दहा असे एकूण १५ पॅालिहाउसची जबाबदारी पाहण्यास सुरुवात केली. जरबेरा फुलांचे चांगले उत्पादन व दरही चांगला मिळत होता. अलीकडे मात्र पाणीटंचाई, दर व अन्य तांत्रिक कारणांमुळे फूलशेती चांगलीच अडचणीत सापडली. मग अमोल यांनी फूलशेती बंद करत मुक्त संचार गोठा पद्धतीने गायीपालन सुरू केले. दोन गायींपासून सुरू केलेला व्यवसाय २० गायींवर पोचला. मात्र, दर आणि शारीरीक कष्ट यांच्यामुळे कालातरांने हा व्यवसाय बंद करावा लागला. शेळीपालनावर सारी भिस्त

  • अमोल जिद्दी व धाडसी होते. त्यांनी मोठ्या उमेदीने वाचन, अभ्यासातून आणि नवे काही करण्याच्या हेतूने शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार व्यवसायाची आखणी केले. आर्थिक नियोजन केले.  
  • गायीच्या गोठ्यातील रचना बदलून १७० बाय १५० फूट आकाराचे शेड तयार केले.  
  • शेळी, करडे यांच्यासाठी स्वतंत्र जागा व मुबलक पाणी यांची व्यवस्था केली. शेळ्यांच्या जातींची आवश्यक माहिती घेतल्यानंतर फलटण येथील निंबकर फार्ममधून सुमारे अडीच लाख किमतीला चार शेळ्या आणल्या. पाटील गोट फार्म असे नामकरण केले.
  • चोख व्यवस्थापन ठेवले

  • व्यवस्थापनातील बारीकसारीक गोष्टी समजून घेतल्या. सुरुवातीच्या काळात विक्री न करता शेळ्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला. नव्या शेळ्यांची वातावरणाला अनुकूल ठरेपर्यंत स्वतंत्र जागेत व्यवस्था केली. टप्पाटप्प्याने चारवरून संख्या ९५ पर्यंत नेली. सध्या मोठ्या ४८ तर १६ पिल्ली आहेत. यात आफ्रिकन बोअर व सानेन जातींचा समावेश आहे.
  • चारा नियोजन

  • मेथी घास, मारवेल, हत्ती घास, मका, तुती, शेवरीची थोड्या- थोड्या क्षेत्रावर लागवड केली आहे. खास करून सर्व बांधावर शेवरी, तुती आहे. घरच्या शेतातील सोयाबीन भुस्सा असतो. तुरीचा भुसा खरेदी केला जातो. गरजेनुसार पाणी पिता यावे यासाठी प्रत्येक विभागात पाण्याची व्यवस्था केली आहे.
  • प्रभावी मार्केटिंग व विक्री

  • शेळी पालनातील मुख्य हेतू पैदास निर्मिती हाच आहे. विक्रीसाठी व्हॉटस ॲप, फेसबुक आदी सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे केला. शेळ्यांची गुणवत्ता व्यवसायात जपलेली प्रामाणिकता यांच्या जोरावर मार्केटमध्ये विश्वासहर्ता निर्माण केली.  
  • खास पैदाशीसाठी तयार केलेल्या शेळ्यांना राज्याबरोबरच उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आदी ठिकाणी मार्केट मिळाले आहे.  
  • शेळ्यांचे वाण शंभर टक्के शुध्द असेल तर किलोला एक हजार रुपये दराने विक्री होते.  
  • वाणाची शुद्धता व प्रतवारी यानुसार किलोला ३५० ते ७०० रुपये दर आकारला जातो.  
  • दरवर्षी शेळ्या, पिल्ले व बोकड मिळून १९० ते २०० संख्येपर्यंत विक्री होते.  
  • वर्षाकाठी १४ ते १६ लाख रुपयांची उलाढाल होते. तर ४० टक्क्यांपर्यंत नफा होतो.
  • व्यवसायातील ठळक बाबी

  • सर्व शेळ्यांची बारीकसारीक निरीक्षणे ठेवण्यात येतात.  
  • शेडमध्ये स्वच्छता ठेवण्यावर तसेच वेळेत चारा देण्यावर भर.  
  • प्रतिवर्षी सुमारे १२ टन लेंडीखत मिळते. त्याचा वापर घरच्या शेतात होतो.  
  • सोबतीला दोन म्हशींचेही संगोपन होते.
  • सन्मान

  • जिल्ह्यातील निसर्ग कृषी प्रदर्शन, यशवंत कृषी प्रदर्शन, सेवागिरी कृषी प्रदर्शन तसेच पुण्यातील किसान प्रदर्शनातून अमोल यांच्या शेळ्यांना पुरस्कार मिळाले आहेत. आफ्रिकन बोअरच्या बोकडास प्रथम क्रमांक मिळाला आहे.
  • सहकार्य

  • व्यवसायात आई-वडील, पत्नी स्वाती, बंधू अजिंक्य यांची मोठी मदत होते. ते ॲग्रोवनचे नियमित वाचक आहेत. व्यवसायातील माहिती मिळण्यास त्याची मदत झाली आहे. भविष्यात व्यवसायाचा विस्तार व दोन मजली शेडचा विचार आहे.
  • संपर्कः अमोल पवार-पाटील,९९७०५४२९७९, ७८२०९७७५८७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com