शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून यशस्वी वाटचाल

शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी एकापाठोपाठ एक पूरक व्यवसायांची जोड देत औरंगाबाद जिल्ह्यातील बाभूळगाव येथील आग्रे कुटुंबाने यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.
Santosh Agra's goat rearing and dogs rearing
Santosh Agra's goat rearing and dogs rearing

शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी एकापाठोपाठ एक पूरक व्यवसायांची जोड देत औरंगाबाद जिल्ह्यातील बाभूळगाव येथील आग्रे कुटुंबाने यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. एकत्रित कुटुंबाचे बळ, नेटके व्यवस्थापन व परिश्रम यांच्या जोरावर कुटुंबाने ही प्रगती साधली. आता भाडेतत्त्वावर कडबा कुट्टी करून देण्याच्या माध्यमातून कुटुंबाने उत्पन्नाचे स्त्रोतही वाढवले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातील बाभूळगाव येथील संतोष रंगनाथ आग्रे या युवकाने सुमारे दहा वर्षे औरंगाबाद शहरात खासगी कंपनीत नोकरी केली. परंतु जेमतेम वेतनामुळे हाती काही उरत नव्हते. मग काही वर्षांपूर्वी गड्या आपुला गाव बरा’ असं म्हणत त्यानं परतीचा रस्ता धरला. पहिल्याच वर्षी घरची केलेली शेती तोट्यात आली. मग चार काकांच्या कुटुंबातील साऱ्या भावंडांची मदत घेत शेती फायद्यात आणण्यास सुरुवात केली. शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला. एकत्रित कुटुंबाच्या या कामाची दखल ॲग्रोवनने यशकथेच्या रूपाने घेतल्याने साऱ्या सदस्यांचा उत्साहही दुणावला. एकी अजून घट्ट झाली. मग शेतीचे अर्थकारण अजून मजबूत करण्याचे मार्ग कुटुंबातील प्रत्येकजण करू लागला. एका शेळीपासून पूरक व्यवसायाला सुरुवात कुटुंबातील संतोष यांच्याकडे आईने घेतलेली गावरान शेळी होती. हाच व्यवसाय वाढवताना संतोष यांनी जातिवंत शेळ्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. सन २०१७ मध्ये गावरान शेळीसह सिरोही जातीच्या चार शेळ्या व एक बोकड यांची जोड देत बंदिस्त शेळीपालन सुरू केले. काही कालावधीनंतर त्यांची संख्या आठवर पोहोचली. पाहता पाहता उत्तम व्यवस्थापनातून सिरोही शेळ्यांची संख्याही चार वर्षांत जवळपास चाळीसपर्यंत नेली. आज घडीला २४ शेळ्या व दोन बोकड आहेत. दहा बोकड व सात ते आठ पाटींची विक्री केली. किलोला साडेतीनशे रुपये असा दर मिळून सुमारे एक लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. श्‍वानपालन संतोष यांच्या पाहुण्यांकडे ‘लासा' जातीचा नर व मादी असे दोन श्वान होते. मात्र सांभाळणे शक्य होत नसल्याने त्यांची संगोपनाची जबाबदारी संतोष यांच्याकडे दिली. प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक व मन लावून करण्याची सवय असलेल्या संतोष यांनी उत्तमरीत्या संगोपन केले. त्यातून २० पर्यंत पिल्लांची संख्या झाली. पैकी १९ विकली. संतोष यांचे बंधू कल्याण श्वानांची मुख्य जबाबदारी सांभाळतात. प्रत्येक पिल्लाला किमान सात ते नऊ हजार रुपये दर मिळाला. सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. श्वानपालनाचे महत्त्व लक्षात घेऊन पामोलीयन जातीचे श्वानही पाळण्यास घेतले आहे. येत्या काळात ‘जर्मन शेफर्ड' जातीचे श्वान पाळून त्याचीही उत्पत्ती वाढविण्याचे नियोजन आहे. श्वानाचे संगोपन

  • पिल्लू एक महिन्याचे होईपर्यंत दररोज सकाळी व सायंकाळी प्रत्येकी दोन अंडी व एक पोळी असा खुराक
  • वर्षातून आवश्यकतेनुसार लसीकरण
  • मादी विण्याच्या स्थितीत आल्यानंतर जीवनसत्त्वयुक्त खाद्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने देण्यात येते.
  • गरजेतून कुकूटपालन शेतीबरोबर पूरक व्यवसायांचा विस्तार करू पाहणाऱ्या आग्रे कुटुंबाला श्‍वानासाठी दररोज अंड्यांची गरज भासायची. सतत विकत घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे चार देशी कोंबड्या व एक कोंबडा अशी खरेदी केली. आता त्यांचाही विस्तार होईल. चिनी जातीच्या 'गिनी फॉल' पक्षाचीही जोड दिली आहे. भाडेतत्त्वावर कडबाकुट्टी व्यवसाय

  • संतोष यांचे चुलत बंधू राजू प्रभाकर आग्रे यांच्याकडे दोन वर्षांपासून ट्रॅक्टरचलित कडबा कुट्टी यंत्र आहे.
  • त्यातूनही उत्पन्नाचा स्रोत कुटुंबाने शोधला आहे. त्याद्वारे तीन हजार रुपये प्रति ट्रॉली या दराने शेतकऱ्यांना कुट्टी करून दिली जाते. एका एकरात सुमारे चार ट्रॉली कडबा वा मक्याची कुट्टी उपलब्ध होते.
  • सुमारे १५ लोक कापणीपासून कुट्टी व घरपोच पुरवठा करण्याच्या कामांत गुंतले आहेत.
  • पैकी निम्मे घरचेच सदस्य आहेत. पंधरा जणांना सहा महिने रोजगार या व्यवसायातून उपलब्ध झाला आहे.
  • सुमारे २५०० ते तीनहजार बॅग्जपर्यंतचे उत्पादन मागील रब्बी हंगामानंतर झाले. बॅगेचे पाच ते १० क्विंटलपर्यत वजन असते.
  • ॲग्रोवनने दिले पाठबळ ॲग्रोवनचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आमच्या एकत्रित कुटुंबाच्या शेतीची दखल ॲग्रोवनने घेत मोठे पाठबळ दिले. आता कुटुंबातील जिव्हाळा व एकमेकांपासून वेगळे न होता एकसंधपणानेच शेतीत पुढे जायचे हा विचार अधिक दृढ झाला अशी प्रतिक्रिया संतोष यांनी व्यक्त केली. प्रतिक्रिया पूर्वी खाजगी कंपनीत नोकरी करायचो. मात्र त्यापेक्षाही चांगले उत्पन्न शेती व पूरक व्यवसायातून मिळत आहे. नोकरीत विनाकारण नऊ वर्षांचा काळ व्यतीत केला असे आता वाटते. कष्ट व सामूहिक बळातून शेती निश्‍चित सुकर होते. - संतोष रंगनाथ आग्रे- ९६२३७१७०८१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com