agriculture news in Marathi, success story of goat farming by women farmers company, Sinner,Dist.Nashik | Agrowon

शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी घेतली आघाडी

मुकुंद पिंगळे
सोमवार, 22 जुलै 2019

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त तालुका. या भागातील युवा मित्र संस्थेने महिला उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण महिलांना बरोबर घेऊन पारंपरिक शेळीपालनाला व्यावसायिक स्वरूप दिले. महिलांनी एकत्र येत सावित्रीबाई फुले शेळीपालक प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. शेळीपालन, खरेदी-विक्रीच्या बरोबरीने कंपनी शेळीचे दूध आणि चीज विक्रीत उतरली आहे. महिलांची मालकी आणि महिला चालवीत असलेला आशिया खंडातील पहिल्या शेळी दुग्ध प्रक्रिया उद्योगाने एक नवी दिशा पकडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त तालुका. या भागातील युवा मित्र संस्थेने महिला उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण महिलांना बरोबर घेऊन पारंपरिक शेळीपालनाला व्यावसायिक स्वरूप दिले. महिलांनी एकत्र येत सावित्रीबाई फुले शेळीपालक प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. शेळीपालन, खरेदी-विक्रीच्या बरोबरीने कंपनी शेळीचे दूध आणि चीज विक्रीत उतरली आहे. महिलांची मालकी आणि महिला चालवीत असलेला आशिया खंडातील पहिल्या शेळी दुग्ध प्रक्रिया उद्योगाने एक नवी दिशा पकडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांचे अर्थकारण हे केवळ शेळीच्या अवतीभवती फिरते. पारंपरिक शेळीपालनाला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी २०१५ मध्ये युवा मित्र संस्थेने महिलांसाठी शेळीपालन व्यवसायाची आखणी केली. संस्थेने सिन्नर तालुक्यातील ३० गावांच्यामध्ये प्रत्येकी पाच महिलांचे समूह तयार केले. शेळीपालनाबाबत मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन रुजविला. प्रकल्प आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यासाठी आर्थिक मदतीशिवाय पर्याय नव्हता. यासाठी युवा मित्र संस्थेने ‘दि नालंदा फाउंडेशन (IL&FS Group)’ यांच्याकडे मदतीचा प्रस्ताव सदर केला. त्यांच्याकडून बारा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली. यातून शेळ्या खरेदीसाठी महिला सभासदाला प्रत्येकी दहा हजार रुपये मदत दिली. त्यामध्ये महिलांनी स्वतःकडील काही रक्कम जमा करत दोन शेळ्या खरेदी केल्या. ज्या महिलांकडे शेळ्यांसाठी गोठ्याची सोय नाही त्यांनाही परतफेडीच्या बोलीवर दहा हजार रुपयांची अधिक मदत बिनव्याजी करण्यात आली. दिलेले दहा हजार रुपये तीन महिन्यानंतर एका वर्षाच्या आत मिळणाऱ्या उत्पन्नावर फेडणे अनिवार्य होते. यातूनच आर्थिक बचत, व्यावसायिक कामकाज सुरू झाले. यातून तालुक्यातील महिला व्यवसायाभिमुख व आर्थिक साक्षर झाल्या आहेत. 

 एकाच छताखाली पूरक व्यवसायाला चालना 
 शेळीपालनाच्या नियोजनाबाबत कंपनीच्या संचालिका मनीषा सुनील पोटे म्हणाल्या की, साधारणपणे २०१६ साली महिलांनी शेळीपालनाला सुरुवात केली. सुरुवातीला प्रमुख संचालक मंडळातील महिलांनी भागभांडवल तयार करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यातून १००० रुपये प्रमाणे १६०० महिलांनी शेअर्स विकत घेतले. यातून २२ लाख रुपये भागभांडवल उभे राहिले. आजमितीला या कंपनीसोबत तीस गावातील २६०० महिला जोडल्या गेल्या आहेत. यातून संघटित आणि व्यावसायिक स्वरूपात सावित्रीबाई फुले शेळीपालक प्रोड्यूसर कंपनी नावारूपास आली. कंपनी स्थापन करण्यासाठी नॅबकिसान कडून ७५ लाख रूपयांचे अर्थसाह्य मिळाले. मात्र कर्ज मंजूर होण्यापूर्वी अनेकांनी बिनव्याजी मदत केली. त्यामुळे कामकाज सुरळीत चालू शकले.

 आज सावित्रीबाई फुले शेळीपालक प्रोड्यूसर कंपनी ही महाराष्ट्रातील पहिली शेळी पालनावर आधारित उत्पादक कंपनी आहे. नाशिक-पुणे बायपासलगत सिन्नरजवळील बेलांबे शिवारात कंपनीचे कार्यालय आणि शेळी संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षात महिलांनी नियोजन व व्यवस्थापनातून अनेक व्यावसयिक टप्पे पार केले आहेत. महिलांनी शेळीपालन क्षेत्रात सुरू केलेला आशिया खंडातील हा पहिला प्रकल्प आहे. अवघ्या तीन वर्षात महिलांच्या या कंपनीने शेळ्यांची खरेदी-विक्री, दूध विक्री याचबरोबरीने चीजनिर्मितीतून स्वतःची वेगळी ओळख तयार केली. कंपनीला आएसओ ९००१ः२०१५ हे प्रमाण पत्रदेखील मिळाले आहे.

वजनावर शेळीची विक्री 
 महिला पारंपरिक शेळीपालनात पारंगत होत्या. शेळ्यांच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी युवा मित्र संस्थेने महिलांना व्यावसायिक शेळीपालनाचे प्रशिक्षण दिले. कंपनीने उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळीपालनावर भर दिला आहे. प्रशिक्षणामध्ये शेळ्यांचे संगोपन, निगा, दूध संकलनाबाबत मार्गदर्शन केले. शेळ्या, बोकड खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता आली. 
पूर्वी व्यवसायिक अज्ञान असल्याने शेळी खरेदी-विक्रीत महिलांची फसवणूक होत असे. मात्र कंपनीच्या माध्यमातून प्रति किलोस २१० रुपये या दराने शेळ्या विक्रीस सुरुवात झाली. पारंपरिक पद्धतीने नगाप्रमाणे होणारा व्यवहार किलोप्रमाणे होऊ लागला. तीन-साडेतीन हजारांमध्ये विकली जाणारी शेळी सहा-सात हजारांपर्यंत विकली जाऊ लागली. यातून शाश्वत खरेदी-विक्री व्यवस्था निर्माण झाली. संस्थेने गावात वजन काटे दिले. महिला स्वत: शेळ्यांच्या वजनाची नोंद घेतात. त्यानुसार विक्री करतात. त्यामुळे स्थानिक मटण विक्रेते, व्यापारी यांची मक्तेदारी संपली. महिला पुढे येऊन खरेदी-विक्रीत उतरल्या. हिशेब करू लागल्या. त्यामुळे आर्थिक सक्षमतेसह बाजारपेठेत त्यांची पत मोठ्या प्रमाणावर वाढली.

दूध संकलन केंद्र आणि चीजनिर्मितीला सुरवात 
ग्रामीण तसेच शहरी भागात शेळी दूध विक्रीसाठी वेगळी व्यवस्था नसल्याने पहिल्यांदा महिलांना  गावातील संकलन केंद्रामध्ये दूध विकावे लागत होते. त्यामुळे शेळीच्या दुधाला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळत होता. हे लक्षात घेऊन कंपनीने विक्री व्यवस्थेतील बारकावे तपासले. या अभ्यासातून शेळी दुधाला स्वतंत्र बाजारपेठ आहे, त्यातील पोषक मूल्ये, औषधी गुणधर्म यामुळे चांगली मागणी आहे, त्याचबरोबरीने शहरी भागात दरही चांगला मिळतो हे लक्षात आले. 
कंपनीने स्वतंत्रपणे मिठसागरे या गावात दूध संकलन केंद्र सुरू केले. या ठिकाणी दररोज २५० लिटर दूध संकलित केले जाते. या ठिकाणी कंपनीने बल्क मिल्क कुलर बसविला आहे. प्रयोगशाळेत फॅट, प्रथिने तपासणी यंत्रे आहेत. दूध आल्यांनतर त्याची गुणवत्ता तपासणी केली जाते. चार अंश सेल्सिअस तापमानावर दूध थंड केले जाते. त्यानंतर कंपनीच्या प्रक्रिया केंद्रात पाठविले जाते. कुशल मनुष्यबळ कंपनीने नियुक्त केल्याने गुणवत्तापूर्ण कामकाज होते. स्वतंत्र संकलन व्यवस्थेमुळे आता शेळीच्या दुधाचा दर २० ते २५ रुपयांवरून ४५ रुपयांवर गेला आहे. केवळ दूध विक्रीवर न थांबता शेळी दुधापासून चीज बनविण्याचा प्रकल्प कंपनीने सुरू केला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मागणीनुसार दर आठवड्याला दहा किलो चीज निर्मिती केली जाते.

सहज’ ब्रॅंडने विक्री

कंपनीने शेळीपालनातून ग्रामीण महिलांना नवीन दिशा दिली. महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण होण्यासाठी प्रयोगशीलता आणली. बाजारपेठेत उत्पादनांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी कंपनीने ‘सहज’ ब्रॅंड तयार केला. 
शेळीचे दूध आणि चीज विक्रीसाठी युवा मित्र संस्थेची संलग्न संस्था ‘कृषकमित्र’ यांच्याकडून मदत घेण्यात आली आहे. ५०० मिलि आणि २०० मिलि बाटलीमध्ये दुधाची विक्री केली जाते. प्रति लिटर १०० रुपये दराने दूध आणि ३००० रुपये प्रति किलो दराने चीज विकले जाते. कंपनी चेडार, येडाम, फेटा या प्रकारचे चीज तयार करते. याचबरोबरीने गांडूळ खत आठ रुपये किलो, व्हर्मी वॉश ५० रुपये लिटर आणि व्हर्मिकल्चर ३०० रुपये किलो दराने विकले जाते. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये दूध आणि चीज विक्री केली जाते. येत्या काळात विविध शहरांतील मॉल तसेच हॉस्पिटलमध्ये दूध विक्रीचे नियोजन कंपनीने केले आहे. लवकरच थेट ग्राहकांच्या घरी दूध पोचविण्याची सुविधा कंपनी देणार आहे.

शेळ्यांसाठी ‘पशुसखी’ आणि ॲम्बुलन्स
सिन्नर तालुक्यातील तीस गावांमध्ये २६०० महिला कंपनीशी संलग्न आहेत. या महिलांकडे सुमारे दहा हजार शेळ्या आहेत. गावपातळीवर व्यावसायिक समन्वय व प्रगत व्यवस्थापनासाठी कंपनीने ‘पशुसखी’ ही अभिनव संकल्पना राबविली. प्रत्येक गावात सखींच्या माध्यमातून शेळ्यांची देखभाल व आजारपणात प्रथमोपचार, उत्पादकांच्या नोंदी, दूध संकलन व पुरवठा तसेच गावनिहाय कंपनीशी संबंधित सर्व कामे या पशुसखी पार पडतात. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. गावात नियुक्त पशुसखीकडून मार्गदर्शन, विम्याचे संरक्षण आणि बाजारपेठेत झालेला बदल यामुळे पहिल्या दोन वर्षातच प्रत्येक सभासदाकडे सरासरी आठ ते दहा शेळ्यांचा कळप तयार झाला. परिणामी शेळी दूध संकलनात चांगली वाढ झाली. आजारी शेळ्यांवर गावामध्येच तातडीने उपचार करण्यासाठी कंपनीने ॲम्बुलन्सची सोय केली आहे. येत्या महिनाभरात ही सेवा सुरू होत आहे. या ॲम्बुलन्समध्ये एक पशुवैद्यक आणि प्रथमोपचारासाठी औषधांची सोय करण्यात आली आहे.

शेळी संशोधन केंद्राची स्थापना 
युवा मित्र संस्थेने जातिवंत शेळी संगोपनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी करार केला आहे. विद्यापीठाकडून जातिवंत बोकड पुरवठा तसेच तांत्रिक मार्गदर्शन मिळते. संस्थेच्या संशोधन प्रकल्पात उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळीबाबत संशोधन केले जाते. या ठिकाणी व्यावसायिक शेळीपालन व्यवसायातील सर्व माहिती मांडण्यात आली आहे. संशोधन केंद्रात सध्या शेळ्यांच्या आठ जाती पहावयास मिळतात. याचबरोबरीने नेपियर गवत, दशरथ गवत, मेथी घास लागवडीचे प्रात्यक्षिक प्रक्षेत्र तयार केले आहे. मुरघास निर्मिती प्रशिक्षण दिले जाते. शेळीपालकांना विविध चारा पिकांचे बियाणे माफक दरात उपलब्ध करून देण्यात येते.

कंपनीची उद्दिष्टे 

 •  भूमिहीन, अल्पभूधारक, मागासवर्गीय, विधवा तसेच सर्वच स्तरातील गरजू महिलांसाठी शेळीपालनावर आधारित उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, त्यांचे सक्षमीकरण करणे.
 •   महिलांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करून सध्याच्या सरासरी वार्षिक उत्पन्नात ५०टक्के वाढ.
 •   शेळ्यांची वजनावर आधारित शाश्वत खरेदी-विक्री व्यवस्था उभारणी.
 •   जातिवंत शेळ्यांचे संगोपन, विक्रीतून उत्पन्न वाढविणे.

सभासदांना मिळणाऱ्या सुविधा 

 •   पशुवैद्यकीय सेवा, शेळ्यांना विमा संरक्षण.
 •   संगमनेरी, उस्मानाबादी शेळ्यांसाठी जातिवंत बोकडांचे वितरण. व्यावसायिक शेळीपालन प्रशिक्षण.
 •   व्यवसाय उभारणीसंदर्भात बँक कर्जसंदर्भात मार्गदर्शन.
 •   चारा पिकांचे उत्पादन, चारा नियोजन, मार्गदर्शन.
 •   वजनावर आधारित शेळी विक्री व्यवस्था
 •   शेळीच्या दुधाची विक्री, चीज निर्मिती.
 •   शेळीपालनासाठी आवश्यक निविष्ठांची योग्य दरात विक्री.

प्रकल्पाची फलश्रुती 

 •   तीस गावांतील दोन हजारांहून अधिक महिलांचा कंपनीमध्ये सहभाग, दहा हजार शेळ्यांचे संगोपन.
 •   तीस गावांमध्ये ३८९ गोठ्यांची उभारणी. अजून नव्याने तीस गावे प्रकल्पात समाविष्ट.
 •   शेळ्यांना लसीकरण, विमा सेवेचा सर्वांना लाभ.
 •   पारंपरिक शेलीपालनातील शेळ्यांचा मृत्यूदर ६५ टक्क्यांपेक्षा कमी.
 •   काटेकोर नियोजनातून महिलांच्या सरासरी वार्षिक उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ.
 •   वजनावर आधारित शेळ्यांची विक्री सुरू झाल्याने प्रति शेळी ८०० ते १००० रुपयांचा अधिक नफा.
 •   विमा संरक्षणामुळे शेळी मृत्यूनंतर नुकसानीत घट.
 •   ग्रामीण भागात रोजगाराची शाश्वत संधी.  
 •   ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक प्रगती.

- मनीषा पोटे, ९४२३९७०६५५ 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मुंबईत पावसाची दमदार हजेरी; आज...मुंबई : मुंबईतील अनेक भागांत शुक्रवार (ता.३...
वाढत्या तणावात कापसाच्या होताहेत वातीचालू हंगामातील कापूस वेचणी दोन ते अडीच महिन्यांत...
बाजारपेठा काबीज करण्याची हीच संधीको रोनाच्या वैश्‍विक संकटाशी लढताना जगातील अनेक ...
जिल्हा बॅंकांची थकबाकी २३ हजार कोटींवरसोलापूर : राज्यात कर्जमाफी योजना लागू असली, तरी...
कृषी पदविका, तंत्रनिकेतनच्या अंतिम...पुणे  : राज्यातील कृषी पदविका व तंत्रनिकेतन...
भारतीय अन्न महामंडळाबाबतचा शांता कुमार...पुणे : भारतीय अन्न महामंडळाची (एफसीआय) उपयुक्तता...
पंधरा हजार कोटींची शेतीमाल निर्यात...पुणे : जागतिक कृषी उत्पादनाच्या नकाशावर बलाढ्य...
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोरपुणे  : मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणात दडी...
शेतकऱ्यांनी घोषणापत्र न दिल्यास बँका...पुणे  : खरीप विमा योजनेत सहभागी होण्यासाठी...
अप्रमाणित बियाण्यांबाबत न्यायालयात दावे...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना अप्रमाणित...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजपासून...पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे...
भारत-चीन तणावाचा कापूस निर्यातीला फटकाजळगाव ः जगभरात वस्त्रोद्योगाची चाके फिरण्यास...
खानदेशात कापूस खरेदीला ‘ब्रेक’जळगाव ः शासकीय कापूस खरेदीला खानदेशात मागील...
बोगस बियाणे प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा...पुणे ः सोयाबीनच्या बोगस बियाणेप्रकरणी मुख्यमंत्री...
लॉकडाउनमध्ये १४ लाख क्विंटल फळ,...लातूर ः ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सुरू...
राज्यात ठिबक अनुदानासाठी १९१ कोटी रुपये...सोलापूर : राज्यात यंदा दोन लाख १३ हजार ७५५...
पीककर्ज द्या, अन्यथा पोलिसांत तक्रारसोलापूर : पीककर्जाचे शासकीय नियमानुसार वितरण न...