जिद्द द्राक्षबाग फुलवण्याची

देवरे यांच्या बागेतील दर्जेदार द्राक्षे
देवरे यांच्या बागेतील दर्जेदार द्राक्षे

नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक ‘अर्ली’ हंगाम घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तालुक्यातील पारनेर हे गाव करंजांडी खोऱ्यात मोडते. येथील देवरे कुटुंबाने दर्जेदार द्राक्षे पिकवून त्यास किलोला १०० रुपये वा त्याहून अधिक दर मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. डाळिंबाची बाग नुकसानीत गेली तरी प्रयत्न न सोडता द्राक्षबाग उभारून त्यांनी जिद्दीचे दर्शन घडवले आहे. नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात पारनेर हा भाग तालुक्यातील बहुतांशी दुष्काळी मानला जातो. द्राक्ष हेच या भागातील मुख्य पीक आहे. प्रतिकूल परिस्थितीतही या भागातील शेतकऱ्यांची वेगवेगळी पिके घेण्याची धडपड सुरू असते. देवरे यांची द्राक्षशेती गावातील अभिमन नथू देवरे यांची वडिलोपार्जित सुमारे सात एकर जमीन आहे. ते पूर्वी पारंपारिक पद्धतीने शेती करायचे. शेतीत मुलगा प्रदीप वडिलांना हातभार लावत असे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पारंपरिक पद्धतीने शेती व्हायची. मात्र परिस्थितीत बदल करण्यासाठी शेती पद्धतीत बदल करणे गरजेचे असल्याचे देवरे यांना वाटायचे. काही वर्षांपूर्वी वडिलांचा विश्वास संपादन करून नव्या पिढीने शेतीची सूत्रे स्वीकारली. डाळिंबाचा प्रयोग सुरवातीला डाळिंबाची लागवड केली. या पिकाने चांगल्या प्रकारे साथही दिली. मात्र संपूर्ण कसमादे पट्ट्यात तेल्या, मर सारख्या रोगांचा प्रादुर्भाव हाताबाहेर जाऊ लागला. परिसरातील डाळिंबाच्या बागा नाहीशा होऊ लागल्या. देवरे यांच्याही बागेवर रोगाने आक्रमण केले. संपूर्ण बाग मुळासकट उपटून टाकण्यापलीकडे दुसरा मार्ग नव्हता. त्यानंतर एक ते दोन वर्षे पुन्हा पारंपरिक पद्धतीने पिके घेतली त्यानंतर मुलगा प्रदीप यांनी तीन ते चार वर्षांपूर्वी द्राक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला. द्राक्षाची शेती सुमारे सात एकर क्षेत्रांपैकी पाच एकर क्षेत्र द्राक्षशेतीला दिले आहे. यात थाॅमसन, एक एकर क्षेत्रात सोनाका व तीन एकर क्षेत्रात सुधाकर या जातींची लागवड केली आहे. लागवडीचे अंतर मुख्यतः ८ बाय ६ फूट ठेवले आहे. नियोजन करून एक जूनच्या सुमारास गोड्या छाटणीचे म्हणजे ‘अर्ली’ हंगामाचे नियोजन केले जाते. दरवर्षी साधारण सप्टेंबर १५ च्या दरम्यान द्राक्षे बाजारात येतात. या वेळी बाजारात द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणात होत नसल्याने साहजिकच दरांचा फायदा घेता येतो. जागेवरच मिळवले मार्केट देवरे यांनी बांगलादेश, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली या बाजारपेठा मिळवल्या आहेत. व्यापाऱ्यांमार्फत या ठिकाणी मालाची विक्री केली जाते. डाळिंबाची बाग असल्यापासून व्यापारी जोडले असल्याने जागेवरच येऊनच शक्यतो मालाची खरेदी होते. यंदाही येत्या सप्टेंबरमध्ये माल काढणीस येईल. दरवर्षी किलोला १००, ११०, ११८ रुपये असे दर मिळवण्यात प्रदीप यशस्वी होतात. एकेवेळी रशियाला ९० रुपये प्रतिकिलो दरानेही त्यांनी व्यापाऱ्यांमार्फत माल निर्यात केला होता. दरवर्षी एकरी एकरी आठ ते दहा टनांपर्यंत उत्पादन त्यांना मिळते. चढा दर मिळत असल्याने एकरी पाच लाख रुपयांपर्यंत नफा मिळवण्याची संधी राहते. नियोजनातील काही बाबी

  • पारनेर भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई राहते. ही समस्या लक्षात घेऊन डोंगराच्या पायथ्याशी शेततळे तयार केले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात बागा वाचवणे शक्य होते.
  • दोन विहिरी, पाच बोअरवेल्सची सुविधा केली. पैकी दोन बोअरवेल्सच्या आधारे शेततळे भरणे सुरू आहे. तर उर्वरित तीन बोअरवेल्सचा उपयोग विहिरीत पाणी साठवण्यासाठी होतो.
  • दरवर्षी मजुरबळाचे टेंडर दिले जाते. त्यासाठी एकरी ३० हजार रुपये दिले जातात. साधारण २० ते २५ मजूर येऊन अर्ली छाटणी करतात. या पद्धतीमुळे मजूरटंचाई कमी केली जाते.
  • द्राक्षाची गुणवत्ता जपण्यासाठी स्लरीचा वापर केला जातो. यात शेणखत, गोमूत्र,
  • गूळ, कडधान्याची स्लरी आदींचे मिश्रण भिजवून आठ दिवस ठेवले जाते. प्रत्येक झाडाला ती एक लिटर याप्रमाणे दिली जाते.
  • संपर्क- प्रदीप देवरे- ९४२१७७६६४२, ९८२२४४७२४५.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com