निर्यातक्षम उत्पादन, बाजारपेठांचा शोध हेच ठरलं प्रगतीचं सूत्र

नाशिक जिल्ह्यातील नैताळे (ता.निफाड) येथील आत्माराम बोरगुडे यांची प्रगतिशील शेतकरी अशी ओळख आहे. कष्ट, धाडस, चिकाटी, निर्यातक्षम द्राक्षउत्पादन, देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यात, गुंतवलेल्या भांडवलातून योग्य परतावा मिळवण्याचे नियोजन, बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब, एकत्रित कुटुंबपद्धती या त्यांच्या भक्कम बाजू आहेत. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा शेतीत त्यांनी प्रगती साधली आहे.
Grapes ready for export to Saudi Arabia during the lockdown period
Grapes ready for export to Saudi Arabia during the lockdown period

नाशिक जिल्ह्यातील नैताळे (ता.निफाड) येथील आत्माराम बोरगुडे यांची प्रगतिशील शेतकरी अशी ओळख आहे. कष्ट, धाडस, चिकाटी, निर्यातक्षम द्राक्षउत्पादन, देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यात, गुंतवलेल्या भांडवलातून योग्य परतावा मिळवण्याचे नियोजन, बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब, एकत्रित कुटुंबपद्धती या त्यांच्या भक्कम बाजू आहेत. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा शेतीत त्यांनी प्रगती साधली आहे. नाशिक जिल्ह्यातील नैताळे (ता.निफाड) येथील कै.रामकृष्ण यशवंत बोरगुडे यांची प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी अशी ओळख होती. त्यांचा मुलगा आत्माराम आज वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. सुरुवातीच्या काळात ऊस, कांदा हे प्रमुख पिके होती. पुढे नावीन्यपूर्ण प्रयोग करीत १९८० च्या दरम्यान पीकपद्धतीत बदल केला. तीन एकर द्राक्षबागेची लागवड केली. आज हेच क्षेत्र ३० एकरांपर्यंत आणले आहे. सुरुवातीच्या काळात वाहतूक सुविधा व मार्केटिंगअभावी मागणी मर्यादित होती. हे आव्हान पेलून आत्माराम यांनी दमदारपणे शेतीचा विस्तार केला आहे.

बाजारपेठा व भक्कम विक्री व्यवस्था सुरुवातीला उत्तरप्रदेशात माल जायचा. ट्रॅक्टरमध्ये भरून रेल्वेद्वारे मनमाड स्टेशनवरून पाठवला जायचा. चार किलो वजनाचे द्राक्षाचा बॉक्स असायचाय पुढे ० किलो वजनाचे क्रेट आले. वाहतूक व्यवस्था सुधारली. त्यामुळे कामकाजात अजून गती आली. मग उत्तर भारतात प्रत्यक्ष आत्माराम यांच्या वडिलांनी नव्या बाजारपेठा व व्यापारी शोधण्यास सुरुवात केली. त्यामुळेच उत्पादक व व्यापारी यांची दुसरी पिढी त्याच विश्वासाने नियमित व्यवहार करीत असल्याचे आत्माराम अभिमानाने सांगतात. पंचवीस पेक्षा अधिक व्यापाऱ्यांशी त्यांचे व्यावसायिक संबंध टिकून आहेत. पुढे २०१४ साली ‘क्लोन’सारख्या नवीन द्राक्ष वाणांची लागवड करून निर्यातीला सुरुवात केली. शेती विस्तार व प्रगती

  • द्राक्ष- ३० एकर
  • वाण- (एकरांत)- सोनाका ३, क्लोन ५, थॉंमसन १९, नानासाहेब पर्पल १.५, काळी सोनाका १.५ एकर
  • द्राक्षाच्या जोडीला उन्हाळी कांदा
  • जोखीम न पत्करता बहुपीकपद्धतीवर भर
  • नैताळे, धारणगाव व शिवरे अशा तीन गावांमध्ये क्षेत्रविस्तार
  • तीनही ठिकाणी जलवाहिन्यांद्वारे सिंचन सुविधा
  • एक कोटी लीटर क्षमतेच्या शेततळ्याची निर्मिती
  • गावात पाणीटंचाई असल्यास गावालाही पाणीपुरवठा करतात.
  • कमी मनुष्यबळात अधिक काम होण्यासाठी यांत्रिकीकरण
  • नव्या प्रयोगांची अंमलबजावणी करून व्यवस्थापन
  • कौटुंबिक एकीतून विकास

  • एकत्रित कुटुंब असून प्रत्येकाकडे स्वतंत्र जबाबदारी आहे. ती अशी.
  • आत्माराम-आर्थिक व्यवहार, भांडवल व पुरवठा, शेती व्यवस्थापन व विक्री
  • कविता (पत्नी)-मजूर व फवारणी व्यवस्थापन
  • नवनाथ (भाऊ)- शेती व्यवस्थापन
  • आत्माराम गावचे पोलीस पाटील आहेत. दोघे बंधू सामाजिक व आध्यात्मिक कार्यात नेहमी सहभागी असतात.
  • द्राक्ष नियोजनातील प्रमुख मुद्दे

  • निर्यातीच्या अंगाने युरोपिय मानकांप्रमाणे रासायनिक अवशेषमुक्त पद्धतीने व्यवस्थापन
  • खरड छाटणीदरम्यान शेणखताचा वापर व पाणी व्यवस्थापन
  • माल वेलीवर असताना कडकपणा टिकण्यासाठी तसेच छाटणीनंतर एकसारखा नवीन फुटवा होण्यासाठी शेंगदाणा पेंडीचा वापर
  • माल काढणीनंतर तीन टप्प्यात खरड छाटणी. सुरुवातीला काळे वाण, त्यानंतर सफेद वाणांची छाटणी
  • गरजेनुसार वर्षाआड सेंद्रिय पद्धतीने आच्छादनाचा वापर
  • गोडी बहार छाटणीदरम्यान पान, देठ, माती परीक्षण. गरजेनुसार संतुलित खतांचा वापर
  • हंगाम व्यवस्थापनासाठी गरजेनुसार तांत्रिक सल्लागारांची मदत
  • विक्री व्यवस्था

  • २०१४ मध्ये सर्वप्रथम १०० क्विंटल मालाची निर्यात.
  • आता दरवर्षी १००० क्विंटल निर्यातीचे उद्दिष्ट
  • निर्यातदार कंपनीतर्फे युरोपीय सुपर मार्केटमध्ये पाठवणी.
  • काळा वाण मागणीनुसार बांगलादेशात जातो.
  • देशांतर्गत उत्तरप्रदेशात वाराणसी, अलाहाबाद तर गुजरातमध्ये सुरत व अहमदाबाद येथे पाठवणूक.
  • आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता जागतिक बाजारपेठेतील द्राक्षमागणी व विक्री पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आत्माराम यांनी लंडन सुपरमार्केटसह इंडोनेशिया येथे भेटी दिल्या आहेत. त्यामुळे उत्पादन व गुणवत्ता सुधारणा यावर मुख्य लक्ष असते. हंगामाच्या सुरुवातीपासून ते विक्रीपर्यंत गुणवत्तेचे निकष पाळून कामकाज होते. यात बागेतील स्वच्छता, जैवसुरक्षा, मजुरांचे व्यवस्थापन व आयातदार देशांच्या सूचनेनुसार पारदर्शक कामकाजावर भर असतो.

    लॉकडाऊनमध्ये द्राक्षनिर्यात यंदा लॉकडाऊन दरम्यान द्राक्ष पुरवठा साखळी खंडित झाली. मात्र आत्माराम यांनी निर्यातदारांमार्फत सौदी अरेबियामधील प्रमुख बाजारपेठ असलेल्या ‘दम्माम’ शहरात माल पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याचे असे केले नियोजन:

  • मनुष्यबळाची टंचाई असताना ७० मनुष्यबळ उपलब्धता
  • 'सोशल डिस्टन्स’ पाळून मालाची काढणी
  • निर्यातदारांच्या मार्गदर्शनाखाली रिकाम्या कांदा चाळीत तात्पुरत्या स्वरूपात निकषांप्रमाणे पॅकहाउस उभारणी
  • हाताळणी,प्रतवारी व पॅकिंग करून मंदीतही यशस्वी निर्यात
  • एकूण निर्यात- ९०० क्विंटल
  • दर- प्रति किलो ६० रुपये
  • चालू वर्षी दुय्यम प्रतीच्या मालापासून १० टन बेदाणानिर्मिती केली आहे. हा पहिलाच प्रयोग असून या माध्यमातून दोन पैसे अधिक मिळतील असा विश्वास आहे. व्यापाऱ्यांचा शोध सुरु आहे.
  • कांद्याचा आधार

  • द्राक्षाला आधार म्हणून दरवर्षी १० एकर क्षेत्रावर उन्हाळी कांदा लागवड.
  • या पिकातही नियोजन वाखाणण्यासारखे.
  • ७० बाय ३५ फूट आकाराची कांदाचाळ. त्यात चार कप्पे. दरवर्षी १२०० क्विंटलपर्यंत साठवणूक.
  • कारल्याचा प्रयोग गेल्या दोन वर्षांपासून काढलेल्या द्राक्षबागेच्या पाच एकरांत कांदा व त्यातच आंतरपीक म्हणून कारले (उन्हाळी) घेतले आहे. गुजरात येथून बियाणे आणून स्थानिक भाजीपाला रोपवाटिकेत रोपनिर्मिती केली जाते. द्राक्षबागेच्या मांडवाचा पर्यायी उपयोग केला जातो. यंदा औषध निर्मितीकामी लागणाऱ्या भुकटीसाठी कारले देण्यात येत आहे. रसायन अवशेषमुक्त तपासण्या करून व्यापाऱ्यांशी व्यवहार ठरला आहे. संकटांशी दोन हात सन २००८, २००९ व २०११ साली गारपिटीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. संकटांशी दोन हात करत सावरून पुन्हा उमेदीने काम उभारले. युरोपातील टेस्को सुपरमार्केटच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बागेला भेट दिली आहे. यावेळच्या आदरातिथ्य केलेल्या अनुभवाची दखल लंडनमधील एका प्रसिद्ध मासिकाने घेतली.

    संपर्क: आत्माराम बोरगुडे- ९८२२५४४६६५, ९५६११८२०४२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com