पेरू फळबाग ठरतेय फायदेशीर

पुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्याच्या हद्दीवर असलेले तळेगाव ढमढेरे येथील अनेक पेरू उत्पादक किरकोळ व्यापाऱ्यांना पेरूची थेट विक्री करतात. यापैकीच एक आहेत प्रयोगशील युवा शेतकरी गिरीश भुजबळ.
Quality guavas are sold directly from the garden.
Quality guavas are sold directly from the garden.

पुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्याच्या हद्दीवर असलेले तळेगाव ढमढेरे येथील अनेक पेरू उत्पादक किरकोळ व्यापाऱ्यांना पेरूची थेट विक्री करतात. यापैकीच एक आहेत प्रयोगशील युवा शेतकरी गिरीश भुजबळ. पेरूच्या थेट विक्रीतून चांगला दर मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याचबरोबरीने विविध हंगामी पिकांच्या लागवडीतून त्यांनी उत्पन्नाचा स्रोत वाढविला आहे. पुणे शहरातील गुलटेकडी मार्केट आणि पेरणे फाटा येथे पेरू विक्रीसाठी चांगल्या सुविधा आहे. त्यामुळे तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर,जि.पुणे) परिसरातील शेतकऱ्यांचा पेरू लागवडीकडे कल वाढत आहे. तळेगाव ढमढेरे येथील पेरू उत्पादक युवा शेतकरी गिरीश आनंदराव भुजबळ यांची बारा एकर शेती आहे. त्यामध्ये मिरची, सोयाबीन, तूर, कोथिंबीर, मेथी, शेवगा, बटाटा या पिकांची ते लागवड करतात. संपूर्ण शेतीच्या बांधावर त्यांनी सीताफळाची लागवड केलेली आहे. याचबरोबरीने शेवगा एक एकर, पेरू एक एकर लागवड आहे. २००२ मध्ये त्यांनी पेरूच्या सरदार जातीची लागवड केली. साधरणपणे तीन वर्षानंतर पेरूचे उत्पादन सुरू झाले. योग्य मशागत आणि बागेच्या व्यवस्थापनामुळे दर्जेदार पेरूचे वाढू लागले. बागेच्या व्यवस्थापनात वडील आनंदराव, आई सौ.रतनबाई आणि पत्नी सौ.सारिका यांची चांगली मदत होते. शेतीच्या व्यवस्थापनासाठी ४ कायमस्वरूपी मजूर आहेत. पेरू बागेचे व्यवस्थापन

  • दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई भासत असल्याने बागेमध्ये पाचट आच्छादनावर भर.
  • शाश्वत सिंचनासाठी शेतामध्ये ४० लाख लिटर क्षमतेचे शेततळे. पावसाळ्यात हे शेततळे भरून ठेवले जाते. शेततळ्यातील पाणी ठिबकद्वारे पेरू आणि शेवगा बागेला दिले जाते.
  • पेरूच्या दर्जेदार उत्पादनावर भर. खत व्यवस्थापन, एकात्मिक पद्धतीने कीड,रोग नियंत्रणावर भर. फळबागेला ६० टक्के सेंद्रिय खते आणि ४० टक्के रासायनिक खतांचा वापर. बागेला जीवामृताचा वापर केला जातो. जमीन सुपिकतेवर भर.
  • बागेचे योग्य नियोजन केल्यामुळे मोठे व्यापारी तसेच किरकोळ व्यापाऱ्यांच्याकडून मागणीत वाढ. सध्या पेरूला चांगले दर मिळत आहेत.
  • विक्रीचे नियोजन 

  • पेरणे फाट्यावर अनेक किरकोळ विक्रेते पेरूची विक्री करतात. त्यामुळे हे विक्रेते भुजबळ यांच्याकडून पेरूची खरेदी करतात. किरकोळ विक्रेते सकाळीच पाच ते आठच्या दरम्यान बागेत पोहचून चांगल्या दर्जाची फळे काढतात. त्यानंतर प्रतवारी करून क्रेटमध्ये पेरू भरली जातात.
  • भुजबळ सुरवातीला पुणे मार्केटमधील व्यापाऱ्यांना थेट पेरूची विक्री करत होते. मात्र, व्यापाऱ्यांकडून मिळणारा कमी दर लक्षात घेऊन त्यांनी गाव परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना बागेमध्येच पेरूची विक्री करण्यास सुरवात केली. त्यामुळे मार्केटपेक्षा दहा ते वीस रुपयांनी अधिकचा दर मिळू लागले. आता पुण्यातील व्यापाऱ्यांना पेरू न देता ते किरकोळ विक्रेत्यांना पेरू विक्रीला प्राधान्य देतात. मागील पाच ते सहा वर्षांपासून किरकोळ विक्रेत्यांना थेट जागेवर विक्री केल्यामुळे वाहतूक, आडत, हमालीचा खर्च वाचला असून उत्पन्नात दहा ते वीस टक्यांनी वाढ झाली आहे. हंगामात २५ ते ३५ प्रति किलो दराने विक्रेत्यांना पेरूची विक्री केली जाते.
  • प्रतवारी करून विक्री 

  • किरकोळ विक्रेते बागेत आल्यानंतर पेरूची काढणी करतात. त्यानंतर आकार आणि वजनानुसार लहान, मध्यम, मोठा आकार आणि पिकलेले पेरू असे चार प्रकारामध्ये प्रतवारी. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून ग्राहकांना हवे तसे पेरू खरेदीसाठी मिळतात.
  • प्रामुख्याने मध्यम ते मोठ्या आकाराच्या पेरूला चांगली मागणी. पिकलेल्या पेरूलाही कमी-अधिक प्रमाणात ग्राहकांच्याकडून मागणी.
  • प्रतवारीनुसार दर २५ ते ३५ रुपये प्रति किलो दर.
  • ऑगस्ट ते ऑक्टोबर सर्वाधिक मागणी  साधारणपणे मार्च महिन्यात बागेची छाटणी केली जाते. त्यानंतर चार महिन्याने पेरू उत्पादन सुरू होते. पेरूचा हंगाम प्रामुख्याने डिसेंबरपर्यंत असतो. मात्र, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधिक मागणी असते. तसेच दरही चांगला मिळतो. पेरूतून चांगली उलाढाल  साधारणपणे जून ते डिसेंबर मुख्य हंगामामध्ये ग्राहकांची पेरूला चांगली असते. या काळात किरकोळ विक्रेते बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सरासरी ३० ते ६० किलो आणि मोठे व्यापारी १०० ते २०० किलोपर्यंत पेरूची खरेदी करतात. हंगामाच्या काळात भुजबळ दर महिन्याला सुमारे दोन टन पेरूची विक्री करतात. त्यातून ५० ते ६० हजार रुपये मिळतात. दरवर्षी पेरूचे एकरी पाच ते सहा टनाचे उत्पादन मिळते. खर्च वजा जाता एका एकरातून साधारणपणे दीड लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न भुजबळ यांना मिळते. इतर पिकातूनही चांगले उत्पन्न सध्या पेरू पिकांव्यतिरिक्त शेवगा, तूर, मिरची, सोयाबीन, कोथिंबीर लागवड भुजबळ यांनी केली आहे. या शेतमालाची विक्री पुणे तसेच वाशी मार्केटमध्ये केली जाते. त्यातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळते. शेवग्याचा फेब्रुवारी ते जून असा हंगाम असतो. पुणे बाजारपेठेत २५ ते ३० रुपये किलोने विक्री होते. दरवर्षी एक एकरावर कोथिंबीर, मेथीची हंगामानुसार लागवड असते. या पालेभाजीतूनही चांगला नफा मिळविण्याचा भुजबळ यांचा प्रयत्न असतो. संपर्क- गिरीश भुजबळ, ९८२२८२४२१८ (संपर्क वेळ संध्याकाळी सात नंतर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com