agriculture news in marathi success story of kapshi village district nashik | Agrowon

आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले कापशी

मनोज कापडे
शुक्रवार, 24 जुलै 2020

द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक जिल्ह्यातील काही तालुके कधीकाळी कापूस उत्पादनातही आघाडीवर होते. त्यातील एक गाव म्हणजे ‘कापशी’.

द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक जिल्ह्यातील काही तालुके कधीकाळी कापूस उत्पादनातही आघाडीवर होते. त्यातील एक गाव म्हणजे ‘कापशी’. हिवरेबाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनातून गावाचा चेहरामोहरा बदलला. ग्रामस्थांची एकी, एकमेकांतील समन्वय व सामंजस्य, विकासाची तळमळ अशा विविध बाबींमधून गावात झपाट्याने विकासकामे झाली. आदर्श गाव योजनेंतर्गत आज गावाने आपला वेगळा ठसा व ओळख तयार केली आहे.

नाशिक जिल्हा द्राक्ष, डाळिंबात जगात प्रसिद्ध आहे. भाजीपाला उत्पादनातही जिल्ह्याचे नाव अग्रस्थानी आहे. जिल्ह्यात देवळा तालुका एकेकाळी कपाशी पिकासाठी प्रसिद्ध होता. तालुक्यातील भावडबारी घाटाच्या पायथ्याशी वसलेले १३२१ लोकवस्तीचे आणि ६९० हेक्टर क्षेत्राचे ‘कापशी’ गाव आता कापसासाठी नव्हे तर आदर्श गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. गावाला विकासगंगेच्या प्रवाहात आणण्याची मूळ योजना देवळा तालुक्याच्या तत्कालीन गटविकास अधिकारी वैशाली रसाळ यांची. तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्या मदतीने त्यांनी २०१३ मध्ये गावात पहिली बैठक घेतली. गावाला वनखात्यातर्फे संत तुकाराम वनपुरस्कार मिळाला होता. योजनेत समावेश होण्यासाठी सप्तसूत्री कार्यक्रम लागू करण्याचा ठरावही गावाने केला. त्यात कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, नसबंदी,नशाबंदी, बोअरवेल बंदी, लोटाबंदी आणि श्रमदानाचा समावेश होता.

संघर्ष मंडळाचा वाटा मोलाचा
कापशीच्या विकासकामांमध्ये संघर्ष समाज विकास मंडळाचा मोलाचा वाटा आहे. मंडळाला आदर्श गावाची ‘प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा’ म्हणून जबाबदारी देण्याचा ठराव गावाने एकमताने केला. मंडळाचे काम पाहून शासनाने नेहरू युवा केंद्राचा जिल्हा युवा मंडळाचा पुरस्कार दिला. राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक म्हणूनही मंडळाकडे जबाबदारी आहे. कापशीच्या जवळील रामेश्वर गावात राहणारे सामाजिक कार्यकर्ते विष्णू शेवाळे यांनी मंडळ स्थापन केले आहे.

मंडळाची सामाजिक बांधणी
मंडळाची बांधणी सामाजिक अंगाची आहे. सन २००५ ते २००८ काळात दारिद्रय रेषेखालील महिला व दिव्यांगासाठी आम्ही ४५० गट स्थापन केले. पुण्याच्या यशदा संस्थेमार्फत पाणलोटासंदर्भात जागृती व प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे गावात विकासकामे करण्यात अडचण आली नाही. सर्वांत जास्त प्रोत्साहन आदर्श गाव प्रकल्पाचे कार्याध्यक्ष व हिवरेबाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्याकडून मिळाले. त्यांनी गावात दोन बैठका घेतल्याने दिशा मिळाली असे शेवाळे सांगतात.

विकास आराखडा
पोपटराव पवार यांनी गावाला एक कोटी तीन लाख रुपये मंजूर केले. सर्वांगीण विकास आराखडा २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा तयार झाला. त्यात अन्य सरकारी यंत्रणांचा सहभाग होता. सरपंच बाळू माळी, उपसरपंच रमण भदाणे, ग्रामकार्यकर्ता बळिराम भदाणे, कृषी पर्यवेक्षक शांताराम भोये, ग्रामसेविका वासंती देसले, आदर्श गाव समितीचे अध्यक्ष प्रकाश भदाणे, माजी पोलीस पाटील अशोक भदाणे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश भदाणे व तुषार भदाणे आणि स्वतः शेवाळे यांनी परिश्रम घेतले. डॉ.राहुल दौलतराव आहेर, माजी आमदार शिरीष कोतवाल, सध्याचे तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी वेळोवेळी पाहणी करीत येणारे प्रश्न सोडविले. राज्याच्या आदर्श गाव योजना कक्षाचे प्रमुख गणेश तांबे म्हणाले की बदलण्याचा ध्यास घेतला की विकास आपोआप दारात येतो. चार वर्षे सतत कष्ट घेतल्याने आदर्श होण्याचा बहुमान मिळाला.

पाझर तलाव पुन्हा खोदला
गावाने केलेली मोठी कामगिरी म्हणजे जुना पाझर तलाव पुन्हा खोदला. हा तलाव तयार करताना १९८४ मध्ये गैरव्यवहार झाला होता. त्यामुळे चौकशीसाठी ताब्यात गेलेली कागदपत्रे सापडत नव्हती. पोपटराव पवार यांनी तलावाची पाहणी केली. समस्या शासन दरबारी मांडत कागदपत्रे उपलब्ध केली. त्यानंतर २५ लाख रुपये तलावाच्या दुरुस्तीसाठी मिळाले. ग्रामस्थांनी तलावाची उंची आणि खोली वाढविली. त्याद्वारे हक्काचे पाणी मिळाले. आजूबाजूच्या विहिरींची पातळी वाढली. गाव टॅंकरमुक्त झाले.

रायजिरचा किल्ल्याचे वैभव
गावची विकास कामे बघण्यासाठी ग्रामस्थ आवर्जून भेटी देतात. भेट देण्याचे आणखी कारण म्हणजे रायजिरचा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेची लूट करून स्वराज्यात परत येत असताना या किल्ल्यावर मुक्काम केल्याचे येथील गावकरी सांगतात. हा किल्ला पाणलोटाची हद्द देखील समजला जातो. डोंगराच्या एका बाजूच्या माथ्यावरचे पाणी कापशीकडे तर पाणलोटाचा दुसरा भाग रायगीर गावाकडे जातो.

डोंगर ठरला वरदान
रायजिर डोंगरामुळे गावच्या शिवारात दुपारी बारा वाजेपर्यंत सूर्यकिरणे येत नसल्याने जमीन तापत नाही. कांदा घेण्यास भौगोलिक हवामान अनुकूल ठरून अन्य भागापेक्षा दीडपट उत्पादन घेणे शक्य होत असल्याचे येथील कांदा उत्पादक सांगतात.

सर्वधर्मसमभाव जपणारे गाव
हनुमान मंदिरासाठी सहा लाख, खंडेरायाच्या मंदिरासाराठी पाच लाख, शिवमंदिरासाठी चार लाख तर पीरबाबा प्रार्थनास्थळासाठी दोन लाख रुपये वर्गणी जमा करून गावकऱ्यांनी एकीचा आदर्श दर्शविला आहे. गावात महादेव मंदिराच्या कळसाचे काम करणारा कारागीर पीरबाबांचे स्थानही उभारतो. गावात एकही मुस्लीम कुटुंब नसताना गावकऱ्यांनी श्रद्धेने पीरबाबा स्थान उभारले आहे.

शितलदास महाराजांची समाधी
गावचे श्रद्धास्थान असलेल्या शितलदास महाराजांची जिवंत समाधी रायजिर डोंगरावर आहे. गावकऱ्यांनी तेथे सुंदर मंदिर बांधले आहे. बाबांच्या समाधीजवळ खोटे बोलता येत नाही असे गावकरी सांगतात. गुढीपाडव्याला महाराजांच्या ध्वजांची मिरवणूक निघते. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल तसेच लोककलावंतांचे कार्यक्रम असतात.

अर्थकारण उंचावलेले गाव
गावाने अर्थकारणही उंचावले आहे. विविध कार्यकारी सोसायटीच्या कर्जाची वसुली १०० टक्के होते. सहा वर्षांपूर्वीच सोसायटीने स्वमालकीची २० लाखांची इमारत बांधली. तसेच पंधरा लाखांची ग्रामपंचायतीची इमारत असून शाळा व अंगणवाडीला स्वतंत्र इमारत आहे. महिलांचे आठ बचत गट तर दिव्यांगांचा एक गट आहे. ४६ कुटुंबांना प्रत्येकी दहा हजारांची तर ३० कुटुंबांना २४ हजार रुपयांची भांडवली मदत झाली आहे. त्यामुळे कौशल्य, व्यवसायावर आधारित अर्थचक्र वाढीला लागले. त्यातून आर्थिक कमजोर कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागला.

आदर्श गाव योजनेतून साकारलेली कामे (रुपयांत)

 • पाणलोटाची विविध कामे- ४६.१३ लाख
 • प्रवेश प्रेरक उपक्रम – ३.३० लाख
 • क्षमता बांधणी व प्रशिक्षण – ४.१३ लाख
 • कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपक्रम- १५.६८ लाख

सरकारी संलग्न यंत्रणेतून साकारलेली कामे

 • राष्ट्रीय पेयजल योजनेतून ४० लाखांची पाणी पुरवठा योजना
 • जिल्हा परिषद समाजकल्याण निधीतून सात लाखांचे सभागृह
 • सामाजिक सभागृहासाठी पाच लाखांचा आमदार निधी
 • खासदार निधीतून शाळा व पटांगणासाठी पाच लाखांचे काम
 • वन विभागाकडून २० लाखांचे वनतळे
 • कृषी विभागाकडून विविध योजनांसाठी २५ लाखांचा निधी
 • चौदाव्या वित्त आयोगातून दहा लाखांची भूमिगत गटार बांधणी
 • पाच लाख खर्च करून दलित वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण
 • चार लाखांचे शौचालयगृह
 • दोन लाख खर्च करून हायमास्ट
 • अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी वीस हजारांचा निधी
 • जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल वर्गासाठी दोन लाख रू.

संपर्क- विष्णू शेवाळे-९६७३७ ६०६७४
अध्यक्ष, संघर्ष समाज विकास मंडळ


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा ‘मृदगंध’सोलापूर जिल्ह्यात पांगरी (ता.बार्शी) येथील मृदगंध...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
एकात्मिक शेतीतून वरूडकरांची शाश्‍वत...हंगामी पिकांसह फळबागा, पूरक उद्योगांची जोड,...
प्रयत्नवादातून उभारले फळबागांचे नंदनवननव्या पिढीतील शेतकरी बदलत्या काळाची व बाजारपेठेची...
सहा गुंठ्यात पंचवीसहून अधिक सेंद्रिय...मखमलाबाद (जि. नाशिक) येथील सुनील दराडे घराशेजारील...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
उच्चशिक्षित युवा महिला झाली व्यावसायिक...पळशी (जि. सांगली) येथील शैला शिंदे या उच्चशिक्षित...
दुग्धव्यवसायातून साधली गाडेकरांनी भरभराटशेळकेवाडी (अकलापूर) (ता. संगमनेर. जि. पुणे) येथील...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा...नाशिक शहराजवळ शिवनगर (पंचवटी) येथील क्षीरसागर...
बेरड जातीच्या कोंबडीपालनाने अर्थकारण...प्रयत्नवाद, सातत्याने प्रयोग करण्यातला उत्साह,...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...