`कोरडवाहू` प्रकल्पातून मिळाली शेती, पूरक उद्योगांना चालना

सिंधुदुर्ग जिल्हयातील खांबाळे गावाचे चित्र कोरडवाहू विकास कार्यक्रमानंतर पालटू लागले आहे. भातशेती असलेल्या गावात कुकूटपालन, गांडूळखत, भाजीपाला लागवड आणि दुग्धव्यवसाय बाळसे धरीत आहेत. गावातील तरूणांना शेतीपूरक व्यवसायातून स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे.
Okra cultivation by using mulching and drip irrigation
Okra cultivation by using mulching and drip irrigation

सिंधुदुर्ग जिल्हयातील खांबाळे गावाचे चित्र कोरडवाहू विकास कार्यक्रमानंतर पालटू लागले आहे. भातशेती असलेल्या गावात कुकूटपालन, गांडूळखत, भाजीपाला लागवड आणि दुग्धव्यवसाय बाळसे धरीत आहेत. गावातील तरूणांना शेतीपूरक व्यवसायातून स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील खांबाळे गाव हे वैभववाडी-फोंडा राज्यमार्गावरील गाव आहे. लोकसंख्या सुमारे एकहजार ६०८ आहे. गावात गांगो आणि भैरी असे दोन तलाव आहेत. पिण्याच्या पाण्याकरीता तीन नळपाणी पुरवठा योजना आहेत. भात हेच गावचे प्रमुख पीक आहे. बहुतांशी शेतकरी खरीपात भातशेती तर काहीजण भातासोबत भुईमुगाचीही लागवड करतात. गेल्या काही वर्षात तरूणांनी शेतीची सूत्रे हाती घेतली आहेत. यांत्रिकीकरणावर त्यांनी भर दिला आहे. काजू लागवडीला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यातून चार-पाच वर्षात गावातील काजू लागवडीखालील क्षेत्र दोनशे हेक्टरच्या जवळपास पोचले आहे. आंबा, बांबू लागवडीवरही भर आहे.

कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम

  • आरोग्य, शिक्षण, पाणीव्यवस्थापन, स्वच्छता या उपक्रमांमध्ये आघाडीवर असलेल्या या गावाने २०१८-१९ या आर्थिक वर्षात कृषी विभागाचा कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम राबविला. सांघिक पध्दतीच्या या उपक्रमाद्वारे ५० तरूणांनी कुकूटपालन सुरू केले.
  • पंधरा जणांनी गांडुळखत युनिट तर काहींनी दुग्धव्यवसाय सुरू केला. प्रकल्पांतर्गत तीन शेतघरे बांधण्यात आली.
  • सुमारे ७५ हून अधिक तरूण प्रकल्पाशी जोडले गेले. त्या माध्यमातून स्वंयरोजगार निर्माण झाला. आत्तापर्यंत भातशेतीच होत असलेल्या गावाचे चित्र पालटले आहे. गावात जागोजागी कुकूटपालन शेडस दिसून येतात. प्रत्येकाने वर्षभरात या व्यवसायातुन सुमारे एक ते दोन लाख रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. परिसरातील ग्राहक कोंबडी खरेदीसाठी गावात येतात.
  • भाजीपाला शेतीत आघाडी

  • काही तरूणांनी भाजीला पिकांवर लक्ष केंद्रित केले. लॉकडाऊन कालावधीत त्यांनी उत्पादीत केलेल्या भाजीपाल्याची स्थानिक पातळीवरच चांगल्या दराने विक्री झाली आहे. गावात बचत गटाची संख्याही मोठी आहे. काही गट कुळीथ, त्याचे पीठ, नाचणी, त्याचे पापड, तांदळांचे पापड, देशी तांदूळ, कणगर, सुरण यांची विक्री करतात. बचत गटांचा ग्रामसेवा संघ स्थापन करण्यात आला आहे. त्या माध्यमातून कृषी प्रदर्शनामध्ये आपल्या उत्पादनांचे स्टॉल मांडले जातात.
  • गावातील प्रयोगशील शेतकरी मंगेश कदम यांनी ग्रीनहाऊसमध्ये टॉमेटो व मिरची लागवड केली. त्यानतंर दीड एकरांत मल्चिंग, ठिबक सिंचनाचा वापर करून कलिंगड लागवड केली. त्यानंतर त्याच जागेत भेंडी लागवड केली. त्यातून चांगला नफा झाला. कलिंगड व टॉमेटोतून एकूण सुमारे ६० हजार रूपये नफा मिळविला. एक मेपासून भेंडीचे उत्पादन सुरू झाले आहे. लॉकडाऊनमुळे त्यांच्या सर्व मालाला स्थानिक पातळीवरच उठाव मिळाला. शेतीतून मिळालेल्या पैशांतूनच विविध प्रयोग त्यांनी यशस्वी केले आहेत. कारली,दोडका, काकडी अशी पिके घेतली आहेत. शेतीतील उत्पन्नातून मुलीला उच्चशिक्षण दिले आहे.
  • गायकवाड यांची प्रगतीशील शेती गावातील प्रवीण गायकवाड यांनी गांडुळखताचा प्रकल्प सुरू केला आहे. वीस गुंठ्यात मल्चिंग, ठिबक सिंचनाचा वापर करीत जानेवारीमध्ये वांगी लागवड केली. आतापर्यत पाच टनांहून अधिक मालाची विक्री केली आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांना घाऊक दर किलोला २० रूपये तर किरकोळ विक्रीला ४० रूपये दर मिळाला. लागवडीसाठी ५० हजार रूपये खर्च आला. आत्तापर्यत २० गुंठ्यातून ७५ हजार रूपये उत्पन्न मिळाले आहे. अजुन चार ते पाच महिने उत्पादन मिळेल. सात ते आठ टन गांडूळळखत निर्मिती केली आहे.

    कुकूटपालनातील अनुभव गावातील लवु पवार सांगतात मी रिक्षाचालक असून भातशेतीदेखील करीत होतो. कोरडवाहु प्रकल्पांतर्गत कुकूटटपालन व्यवसाय सुरू केला. वर्षभरात सहा बॅचची वाढ करून स्वतःच विक्री केल्यामुळे १७० ते ४०० रूपये प्रति कोंबड्याला दर मिळाला. प्रति बॅचमधून सरासरी ७६ हजार रूपये मिळाले. प्रत्येक बॅचला ३५ हजार रूपये खर्च आला. सहा बॅचचा सर्व खर्च जाऊन हाती एक लाख ३३ हजार, ५०० रूपये निव्वळ नफा झाला आहे. या व्यवसायात वाढ करण्याचा प्रयत्न आहे. गणेश पवार यांनी देखील आपल्याला कुकूटपालनातून हमखास स्वंयरोजगार मिळाला असल्याचे सांगीतले. प्रति बॅच ३०० कोंबड्यांची त्यांनी घेतली आहे.

    यांत्रिकीकरणाकडे वाटचाल शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा गावातील अऩेकांनी लाभ घेतला आहे. गावातील पॉवर टिलर, पॉवर विडर यांची संख्या १०० च्या वर पोचली आहे. फवारणी पंप खरेदीचे प्रमाणही वाढले आहे.

    गावाला मिळालेले पुरस्कार निर्मल ग्राम, तंटामुक्त अभियान, पर्यावरण संतुलित समृध्दी पुऱस्कार, शाहू,- फुले- आंबेडकर स्वच्छता वस्ती, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तालुक्यात प्रथम क्रमांक

    प्रतिक्रिया सन २०१८-१९ मध्ये खांबाळे गावात राबवलेला कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम ५६ लाखांचा होता. यात लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान होते. त्याअंतर्गत ५० कुकूटपालन, १५ गांडूळखत, ४ दुग्धव्यवसाय युनिटस तर तीन पॅकहाऊस उभारण्यात आली. गावाने प्रकल्प अतिशय उत्तमपणे राबविला असून अन्य गावांसाठी तो दिशादर्शक ठरत आहे. - अमोल आगवान, तालुका कृषी अधिकारी, वैभववाडी

    शेतीतील यांत्रिकीकरण, फळबाग, बांबू लागवडीवर गावचा भर आहे. शेती व पूरक व्यवसायांच्या आधारे गावच्या विकासाचा आलेख वर्षागणिक वाढत आहे. अर्थ आयोगातील निधीसोबत, डोंगरीविकास तसेच खासदार निधी, जिल्हा नियोजन यासह मोठ्या प्रमाणात निधी गावच्या विकासकामांसाठी प्राप्त झाला. ग्रामपंचायत इमारतही नव्याने बांधण्यात आली. - मंगेश लोके, पंचायत समिती सदस्य, खांबाळे

    संपर्क- प्रवीण गायकवाड- ९४०३३६७१२२ (कोरडवाहू विकास प्रकल्प)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com