Agriculture news in marathi success story of kotamgaon village from nashik district | Agrowon

कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच कोटमगावचे वैभव

मुकुंद पिंगळे
शुक्रवार, 17 जुलै 2020

कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व पर्यावरणपूरक अशी बिरुदावली मिरवली आहे. गावाच्या या वैभवात स्वच्छ परिसर, सुंदर रस्ते, दुतर्फा झाडे यांची भर पडते. एकदिलाने लोकसहभागातून प्रगतीचे नवे अध्याय गावाने साकारले आहेत.

कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व पर्यावरणपूरक अशी बिरुदावली मिरवली आहे. गावाच्या या वैभवात स्वच्छ परिसर, सुंदर रस्ते, दुतर्फा झाडे यांची भर पडते. एकदिलाने लोकसहभागातून प्रगतीचे नवे अध्याय गावाने साकारले आहेत. केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयानेही गावाची दखल घेतली आहे.

नाशिक शहराजवळ कोटमगाव हे छोटेसं गाव. एके काळी एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या उभारणीमुळे जमिनी गेल्याने हे गाव प्रकल्पग्रस्त झालेले. ग्रामपंचायतीचे आर्थिक स्रोत मर्यादित असताना प्रतिकूल परिस्थितीत इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे दुर्दम्य इच्छाशक्तीतून गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. लोकसहभागातून ग्रामविकास शक्य असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली.

तरुणाई पुढे सरसावली
सन २०१० चा काळ. गावातील तरुणाई एकत्र आली. राज्यातील आदर्श गावांना भेटी देत ग्रामविकासाच्या संकल्पना त्यांनी समजून घेतल्या. चिमुकल्यांना सोबत घेऊन ‘स्वच्छतादूत’ संकल्पना राबवून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोचविला. लोकसहभागाची वज्रमूठ घट्ट होऊन विकासाचे अनेक टप्पे पार होत गेले. त्यामुळेच स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, महिला सक्षमीकरण व कृषी या क्षेत्रात गावाने गती साधली आहे.

आपले हक्क मिळवले
एकलहरे औष्णिक विद्युतनिर्मिती प्रकल्पात स्थानिकांच्या १२५ हेक्टर बागायती शेतीचे भूसंपादन झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्याबदल्यात स्थानिकांना नोकरीचे आश्वासन देण्यात आले, पण लाभ मिळाला नव्हता. ग्रामस्थांनी शासनाकडे पाठपुरावा करून शंभर बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून दिला. यासह संबंधित प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचा वापर करून वीटनिर्मितीसाठी शेतकऱ्यांना २० टक्के आरक्षण मिळवले. त्यातून वीट निर्मिती उद्योग उभे राहिले. एकीकडे ग्रामपंचायतीचे उत्पन्न दोन लाखांच्याखाली असल्याने अनेक अडचणी होत्या. मात्र इच्छाशक्तीच्या बळावर येथील प्रत्येक घटक गावासाठी तन, मन, धनाने झपाटून काम करतो. यातूनच परिवर्तनाला चालना मिळाली आहे.

शेतीत मिळवली ओळख
गावाची मुख्य अर्थव्यवस्था पूर्वी शेतीवर अवलंबून होती. मात्र प्रकल्प भूसंपादनात अनेकजण भूमिहीन झाले. त्यामुळे मोलमजुरी हेच उदरनिर्वाहाचे साधन राहिले. ज्या जमिनी कसण्यायोग्य होत्या त्यात नवे प्रयोग करून त्या बागायती केल्या. आज ऊस व गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादनात गाव आघाडीवर आहे. नाशिक शहराची जवळ असलेली बाजारपेठ ही जमेची बाजू आहे. कांदा, कोबी फ्लॉवर, टोमॅटो यांच्या जोडीला सोयाबीन, गहू, भात ही हंगामी पिके घेतली जातात. यासह अल्पभूधारक व भूमिहीन घटक दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुकूटपालनातून प्रगती साधत आहेत. त्यातून अर्थकारण उंचावण्यास मदत झाली आहे.

कृषी विकासासाठी पुढाकार- ठळक बाबी

 • ग्रामसभांच्या माध्यमातून कृषिविकासावर चर्चा
 • कृषी विषयक तंत्रज्ञान व विस्तारासाठी चर्चासत्र व परिसंवाद
 • पतपुरवठा होण्यासाठी बँकेच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन
 • शेतमाल विपणनासाठी पाच कृषी गटांची निर्मिती
 • युवकांना पूरक व्यवसायांसाठी मार्गदर्शन

लोकसहभाग हीच ताकद 
शासनाकडील निधी व लोकसहभागातून गावाच्या वैभवात भर घालणारी सुविधा युक्त २४०० चौरस फूट आकाराची दुमजली इमारत उभारली. आता कार्यालय इंटरनेट जोडणीसह संगणकीकृत आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, सभागृह, छोटे प्रतीक्षालय असून संपूर्ण कार्यालय सीसीटीव्ही निगराणीखाली आहे. सरपंच बाळकृष्ण म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी, ग्रामसेवक बालासाहेब कदम, आरोग्य कामासाठी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शिक्षक असे सर्वांचे सहकार्य लाभते. सरपंच आपल्याकडील उपलब्ध साधने विकासासाठी मोफत उपलब्ध करून देतात.

विकासातील ठळक बाबी

 • प्रत्येक घरापर्यंत नळांद्वारे पाणीपुरवठा होण्यासाठीचे काम ८० टक्‍क्‍यांपर्यंत
 • सन २०११ मध्ये भारत निर्माण योजनेच्या माध्यमातून २५ हजार लीटर क्षमतेचा जल शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित
 • प्रति ताशी ५०० लीटर पाणी शुद्ध करणारा आरओ पाणी प्रकल्प नीलवसंत फाउंडेशन यांच्या माध्यमातून कार्यान्वित
 • शहरी भागातील शैक्षणिक सुविधा गावात मिळवण्यासाठी ग्रामस्थ आग्रही
 • लोकवर्गणीतून डिजिटल शाळा. सातवीपर्यंत शाळा अर्ध इंग्लिश माध्यमाची.
 • इ-लर्निंग पद्धतीची सुविधा
 • कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम
 • तीन वर्षांत कला व क्रीडा उपक्रमांत शाळा तालुक्यात आघाडीवर
 • शाळा व दोन अंगणवाड्या डिजिटल. त्यास आयएसओ ९००१-२००८ मानांकन तसेच पुरस्कार
 • महिला रोजगारनिर्मितीसाठी ११ बचत गटांची स्थापना
 • महिलांसाठी विशेष ग्रामसभा आयोजन. त्याद्वारे संघटित होऊन त्यांच्यात आर्थिक साक्षरता रुजविण्यात ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे.
 • तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत मंदिरांचा विकास. त्यांना क-दर्जा प्राप्त
 • शासनाकडे पाठपुरावा करून गौण खनिज योजनेतून शिवार रस्त्यांवर खडीकरण व डांबरीकरण
 • रमाई आवास, शबरी आवास व पंतप्रधान घरकुल योजनेमार्फत गरजू ग्रामस्थांना निवारा
 • सौर ऊर्जेचा वापर वाढण्यासाठी पथदिवे
 • लोकसहभागातून अमरधाम विकास व सुशोभीकरण.

निरोगी आरोग्यासाठी पुढाकार 
आरोग्य हा महत्त्वाचा विषय असल्याने वैद्यकीय संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी ईसीजी, हिमोग्लोबीन, मोतीबिंदूसह आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन होते. गरजू व निराधार घटकांच्या मोफत शस्त्रक्रिया होतात. प्रत्येकाच्या रक्तगटाची नोंद करण्यात आली आहे. महिलांच्या आरोग्यासाठी अल्पदरात एटीएम पद्धतीचे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविले आहे. वापरानंतर योग्य विल्हेवाट लावण्यासाठीही यंत्र बसवले आहे. गरोदर माता संगोपन कार्यक्रमातून वेळोवेळी मार्गदर्शन होते. कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी गावाच्या मध्यवस्तीत सामूहिक सॅनिटायझर व हात धुण्याची व्यवस्था आहे.

स्वच्छ सुंदर गावासाठी पुढाकार

 • पर्यावरण ग्राम संतुलित योजना’ माध्यमातून श्रमदान उपक्रमातून वृक्षलागवड
 • तरुणांच्या श्रमदानातून सप्तपर्णी, गुलमोहर, कडुनिंब,वड, पिंपळ, जांभूळ, काशिद बदाम या प्रकारच्या दोनहजार झाडांची लागवड
 • हरित गावासाठी ‘एक व्यक्ती १७ झाडे’ उपक्रमासह कुऱ्हाडबंदी, चराईबंदी
 • ग्रामपंचायत निधी व सामाजिक संस्थांच्या मदतीने संरक्षक जाळी
 • प्रत्येक घराला पाच रोपांचे वितरण. यात शेवगा, आंबा, सीताफळ आदींचा समावेश
 • प्रत्येक गल्लीत कचराकुंडी. गावात प्लॅस्टिकबंदी
 • ओला व सुका कचरा वर्गीकरण. कचऱ्यापासून नाडेप पद्धतीने खतनिर्मिती
 • सर्व उकिरडे गावाबाहेर
 • बंदिस्त गटारी व शोष खड्ड्य़ांच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापन

दृष्टिक्षेपात कोटमगाव

 • दारणा तीरावर वसलेले गाव
 • एकूण क्षेत्रफळ- ४९१ हेक्टर, लोकसंख्या १५७५
 • प्रसिद्ध दारणेश्वर व मांगिरबाबा मंदिर
 • त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात ४५ वर्षांपासून हरिनाम सप्ताह आयोजन
 • आध्यात्मिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात अग्रेसर
 • लोक प्रबोधनातून मानपानाच्या खर्चीक प्रथांवर बंदी
 • पारंपरिक संस्कृती जपण्यासह परिसरात आदर्श यात्रा आयोजन

सन्मान

 • हागणदारी मुक्त गाव- निर्मल ग्राम- २०१२-१३
 • नाशिक जिल्हा परिषदेचा साने गुरुजी स्वच्छ सुंदर शाळा- २०१३
 • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता- २०१४
 • पंचायत समितीचा आदर्श अंगणवाडी- २०१४
 • स्वच्छ भारत कक्ष अंतर्गत स्वच्छता दर्पण- २०१९
 • केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सक्षमीकरण- २०२०

संपर्क- बाळकृष्ण म्हस्के, ९८२२०७७५१७ (सरपंच)
बालासाहेब कदम, ९४०३१६४०१२ (ग्रामसेवक)


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...