agriculture news in Marathi, success story of Madhukar Rane,Kasal,Dist.Sindhudurg | Agrowon

नारळ, सुपारी, बांबू लागवडीतून शेती केली शाश्वत

एकनाथ पवार
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

कसाल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील मधुकर राघोबा राणे हे ८२ वर्षांचे प्रयोगशील शेतकरी. पूर्वी त्यांची आंबा, काजू बाग होती. परंतु वाढता खर्च आणि माकडांच्या त्रासामुळे ही लागवड मर्यादित ठेवून त्यांनी सुधारित तंत्राचा वापर करत नारळ, सुपारी, मिरी, बांबू आणि सागवान लागवड केली. व्यवस्थापन खर्च आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पीक बदलातून त्यांना आर्थिक उत्पन्नाचा शाश्वत मार्ग सापडला आहे. 

कसाल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील मधुकर राघोबा राणे हे ८२ वर्षांचे प्रयोगशील शेतकरी. पूर्वी त्यांची आंबा, काजू बाग होती. परंतु वाढता खर्च आणि माकडांच्या त्रासामुळे ही लागवड मर्यादित ठेवून त्यांनी सुधारित तंत्राचा वापर करत नारळ, सुपारी, मिरी, बांबू आणि सागवान लागवड केली. व्यवस्थापन खर्च आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पीक बदलातून त्यांना आर्थिक उत्पन्नाचा शाश्वत मार्ग सापडला आहे. 

ओसरगाव (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे मधुकर राणे यांची शेती आहे. प्राथमिक शिक्षक असलेले मधुकर राणे हे १९९६ मध्ये निवृत्त झाले. पहिल्यापासून शेतीची आवड असल्याने मधुकर राणे यांनी निवृत्तीनंतर शेतीमध्ये पीक बदलाला सुरवात केली. राणे यांच्याकडे आंबा, काजू फळबाग होती. या बागेचे चांगले व्यवस्थापन केल्याने फळांचेही उत्पादन सुरू झाले. परंतु फळ उत्पादनाच्या काळात आजूबाजूच्या जंगलातील माकडे आंबा, काजूचे नुकसान करू लागली. तसेच कीड, रोग नियंत्रणासाठी व्यवस्थापन खर्च वाढत होता. फळबागेच्या मिळकतीत घट झाल्याने आर्थिक तोटा होऊ लागल्याने त्यांनी पीक बदलाचा विचार केला. उर्वरित लागवड क्षेत्रात आंबा, काजू लागवड करण्यापेक्षा नारळ, सुपारी आणि बांबू लागवडीचे नियोजन केले. यासाठी त्यांना किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले. 

नारळ, सुपारी लागवड
मधुकर राणे यांनी ५५ गुंठ्यांत नारळाची लागवड केली. याबाबत राणे म्हणाले, की बाणावली नारळांना बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने मी वीस वर्षांपूर्वी लागवड केली. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने सुपारीच्या स्थानिक तसेच श्रीवर्धन जातीची २०० रोपे लावली. आता मला नारळ आणि सुपारीचे चांगले उत्पादन मिळते. एका नारळाच्या झाडापासून वर्षाला २०० ते २५० फळे मिळतात. कसाल बाजारपेठेत आकारानुसार एक नारळ सरासरी १५ ते २५ रुपयांना विकला जातो. वर्षाला नारळ बागेचा खर्च वजा जाता वीस हजारांचे उत्पन्न मिळते. सुपारीच्या जुन्या लागवडीतून उत्पादन सुरू झाले आहे. दरवर्षी सुपारीतून दहा हजारांचे उत्पन्न मिळते.  दोन वर्षांपूर्वी नारळ बागेच्या उर्वरित क्षेत्रात सुपारीच्या श्रीवर्धन आणि 
काही गावरान जातीच्या नवीन रोपांची लागवड केली. नारळ आणि सुपारी बागेत तुषार सिंचन, ठिबक सिंचन केले आहे. जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय खतांचा मी वापर करतो, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढत आहे. नारळ, सुपारीचे उत्पादन चांगले मिळते. आंबा, काजूपेक्षा नारळ, सुपारीचा व्यवस्थापन खर्च कमी आहे. काही वेळा व्यापारी थेट बागेतून 
खरेदी करतात. तसेच, स्थानिक बाजारपेठेतच विक्री होत असल्याने चांगला दर मिळतो.

मिरीचे आंतरपीक 
मधुकर राणे यांनी कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने नारळ, सुपारी बागेत तीन वर्षांपूर्वी मिरीच्या पन्नीयूर जातीची लागवड केली. प्रत्येक झाडावर दोन वेल सोडलेले आहेत. येत्या वर्षीपासून मिरीचे उत्पादन सुरू होणार आहे. आंतरपीक पद्धतीमुळे उपलब्ध क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्याचा राणे यांचा प्रयत्न आहे.
 
कृषी पर्यटनाचे नियोजन
नारळ, पोफळीच्या बागा पर्यटकांना भुरळ पाडतात, त्यामुळे मधुकर राणे यांनीदेखील कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या ठिकाणी पर्यटकांना पारंपरिक जेवणाची सोय करण्यात येणार आहे. पर्यटक जाताना नारळ, सुपारी, भाजीपाल्याची खरेदी करतील, त्यातून शेतमालाच्या थेट विक्रीची सुरवात होणार आहे. 

बांबू लागवड ठरली फायद्याची

नारळ, सुपारी लागवडीच्या बरोबरीने मधुकर राणे यांनी १५ वर्षांपासून टप्प्याटप्प्याने बांबू लागवडीला सुरवात केली. लागवडीपूर्वी त्यांनी कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. याबाबत राणे म्हणाले, की मी बाजारपेठेतील मागणी आणि पीक व्यवस्थापन खर्च लक्षात घेऊन बांबू लागवडीकडे लक्ष दिले. पंधरा वर्षांपूर्वी साडेचार एकर क्षेत्रावर बांबू लागवडीस टप्प्याटप्प्याने सुरवात केली. माझ्याकडे प्रामुख्याने माणगा, भोवर (स्थानिक जात) या बांबू जातींची लागवड आहे. लागवडीचे अंतर जमिनीनुसार १५ फूट बाय ८ फूट आणि १२ फूट बाय १० फूट ठेवले आहे. दरवर्षी मे महिन्यात मी बांबू बेटांना शेणखत, लेंडी खताची मात्रा देतो. पहिले वर्षभर बांबू लागवडीला चांगले पाणी व्यवस्थापन केले. आता चांगली बेटे तयार झाली आहेत. पावसाच्या पाण्यावर बांबूची चांगली वाढ झाली आहे. तिसऱ्या वर्षीपासून बांबू तोडणी सुरू झाली. यंदाच्या वर्षी बांबूसा बल्कोवा जातीच्या बांबूची काही रोपे मी लावली आहेत. हा मोठ्या आकाराचा बांबू आहे. याची वाढही चांगली होते.  बांबूला बाजारपेठ मिळविण्यासाठी मला कोठेही जावे लागत नाही. अनेक व्यापारी खरेदीसाठी येतात. बांबूची लांबी आणि जाडीनुसार दर मिळतो. मोठ्या बांबूला सरासरी ५० ते ९० रुपये, तर लहान बांबूला २५ ते ३० रुपये दर मिळतो. याशिवाय नवीन लागवडीसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच परजिल्ह्यातील शेतकरी बांबूकंदांची खरेदी करण्यासाठी येतात. कंदाच्या विक्रीतूनही आता चांगला नफा मिळत आहे. गेल्यावर्षी बांबू विक्रीतून खर्च वजा जाता दोन लाखांचे उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षी मी तीन एकर क्षेत्रावरील जुन्या आंबा बागेत बांबू लागवडीला सुरवात केली, कारण या कलमांपासून उत्पादन कमी होत चालले आहे. येत्या काळात या नवीन लागवडीतूनही आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. माझी मुले शिक्षक आहेत, त्यांचीही शेती व्यवस्थापनात चांगली मदत होते.

सागवान लागवड 
राणे यांनी नारळ, सुपारी, बांबू लागवडीच्या बरोबरीने गेल्यावर्षी दीड एकर आणि यंदा दीड एकर क्षेत्रावर सागवान लागवड केली आहे. या रोपांना ठिबक सिंचन केले आहे. वनशेतीमुळे पडीक जमीन लागवडीखाली आली. तसेच, पुढील काही वर्षांनी उत्पन्नाचा चांगला स्रोत तयार होणार आहे.

शिवारफेरीत मार्गदर्शन
किर्लोस (जि. सिंधुदुर्ग) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकरी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जाते. याबाबत केंद्रातील कृषी विस्तार विशेषज्ञ डॉ. विलास सावंत म्हणाले, की आम्ही पहिल्यापासून मधुकर राणे यांना फळबाग, वनशेती, तसेच मसाला पिकांच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करीत आहोत. जीवामृत, घनजीवामृताचा वापर राणे यांनी सुरू केला आहे. आंतरपीक पद्धती, वनशेतीमुळे राणे यांनी परिसरात वेगळी ओळख तयार केली आहे. आम्ही राणे यांच्या शेतीवर नारळ, सुपारी, बांबू , मिरी लागवडीबाबत शिवारफेरीचे आयोजन करत असतो.

शेतीमुळे आरोग्य ठणठणीत
मधुकर राणे यांनी वयाची ८२ पार केली आहे. त्यांचे घर आणि शेती यामध्ये ८० फूट रुंदीचे पात्र असलेली नदी आहे, त्यामुळे त्यांना दररोज शेतीवर जाण्यासाठी पाच किलोमीटर रस्ता पार करून जावे लागते. आजही राणे दररोज दुचाकीवरून शेतीवर जातात. परंतु ज्या दिवशी दुचाकी बंद पडते, त्या दिवशी इतका वळसा मारून जाण्याएवजी नदीतून पोहोत पलीकडे असलेल्या शेतीवर ते जातात. पोहण्याचा छंद असल्याने या वयातही त्यांना नदी पार करून जाण्यामध्ये कसलीही अडचण येत नाही. आजही ते कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित शिवारफेरीमध्ये बांबू, नारळ, सुपारी लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जातात. शेतात दिवसभर काम करणे, सतत चालणे, वेळच्यावेळी आहार, आहारात विविध भाज्यांचा वापर यामुळे वयाची ८२ पार केली असली तरी अजूनही त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. टीटीचे इजेंक्शन वगळता दवाखान्यात कधीही गेलो नाही, असे ते आवर्जून सांगतात.

 

 - मधुकर राणे, ९४०३९५२३८२

 

 

 

 

 

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
फिरत्या प्रक्रिया उद्योगाची राबवली...लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा...
पोल्ट्रीसह खाद्यनिर्मितीतून व्यवसायात...परभणी येथील प्रकाशराव देशमुख यांनी केवळ शेती...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...
सेंद्रिय भाजीपाला, केळीसह मूल्यवर्धित...कोल्हापूर जिल्हा म्हटलं की ऊस आणि भात शेती समोर...
विदर्भामध्ये कडधान्य, फळबाग, भाजीपाला...विदर्भात कापूस, सोयाबीन, संत्रा या पारंपरिक...
सिंधुदुर्गात काजू लागवड, प्रक्रिया...डोंगर-उताराची जमीन, पोषक वातावरण, काजू बीचे...
विदर्भातील शेतकऱ्यांनाही खुणावताहेत...संत्रा, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही विदर्भाची...
भाजीपाला थेट विक्रीतून युवा माउली गटाने...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगाव (ता. पैठण) येथील...
कापूस पट्ट्यातील लाडलीला भेंडीने दिली...जळगाव जिल्हा कापसासाठी ओळखला जातो. येथील लाडली (...
नाशिक पट्ट्यात वाढतोय 'शेवगा' पिकाचा...नाशिक जिल्ह्यात कसमादे पट्ट्यात डाळिंबाखालील...
सुगंधी जिरॅनियम शेतीसह प्रक्रियेलाही...ऊस, आले, हळद, भात, बाजरी, स्ट्रॅाबेरी इ. प्रमुख...