जलसंधारण, प्रगतिशील शेतीतून मांडाखळी प्रगतीपथावर

परभणी जिल्ह्यातील मांडाखळी येथील युवा शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून सिंचन स्रोतांचे बळकटीकरण केले. पाण्याचा काटेकोर वापर व आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून फळपिकांवर भर दिला. शाश्वत उत्पन्नातून गावच्या अर्थकारणाला गती मिळून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. सक्रिय लोकसहभाग, महिला तसेच शेतकरी सक्षमीकरण उपक्रमांतून गावाची वाटचाल भरीव विकासाच्या दिशेने सुरु आहे.
training to  women's self help group
training to women's self help group

परभणी जिल्ह्यातील मांडाखळी येथील युवा शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून सिंचन स्रोतांचे बळकटीकरण केले. पाण्याचा काटेकोर वापर व आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून फळपिकांवर भर दिला. शाश्वत उत्पन्नातून गावच्या अर्थकारणाला गती मिळून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. सक्रिय लोकसहभाग, महिला तसेच शेतकरी सक्षमीकरण उपक्रमांतून गावाची वाटचाल भरीव विकासाच्या दिशेने सुरु आहे. परभणी जिल्ह्यात परभणीपासून सुमारे १२ किलोमीटरवरील मांडाखळी गावाचे नाव मांडव्य ऋषींच्या नावारुन पडले असल्याची आख्यायिका आहे. गावात त्यांचे हेमांडपंथी मंदिर आहे. त्यांच्याच नावाने १९६७ मध्ये स्थापन झालेली शैक्षणिक संस्था आहे. संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

मांडाखळीची ओळख

  • गावाजवळील माळावर इंद्रायणी देवी मंदिर आहे. नवरात्रात या ठिकाणी यात्रा भरते. शैक्षणिक, सामाजिक वारसा लाभलेल्या या गावचे शेतकरी पूर्वी पारंपारिक पद्धतीने मूग, उडीद, कापूस, तूर, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके घेत असत. गावशिवारात हलकी, मध्यम, भारी सर्व प्रकारची जमीन आहे. पाच वर्षापूर्वी ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असे. उन्हाळ्यात टॅंकरवर अवलंबून राहावे लागे.
  • जलयुक्त शिवार अभियानात पहिल्याच वर्षी (२०१५) गावाचा समावेश करण्यात आला. ग्राम पाणलोट समितीने लोकसहभागातून गावाचा जलआराखडा तयार केला. त्यानुसार कामांची ठिकाणे निश्चित करण्यात आली. कृषी विभाग तसेच लोकसहभागातून नाल्यावरील सिमेंट बंधारे खोलीकरणाची कामे करण्यात आली. इंद्रायणी देवीच्या माळावर ४० हेक्टरवर खोल सलग समतल चर खोदण्यात आले. शिवारात ढाळीचे बांध टाकून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात आले.
  • मृदा जलसंधारणामुळे फळक्षेत्रात वाढ राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी २४ सामुहिक शेततळ्यांची निर्मिती केली आहे. संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहू लागले. त्यातून ठिबकव्दारे संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरु, लिंबू आदी फळपिकांचे उत्पादन गावातील शेतकरी आता घेत आहेत. गावात जुनी ४० हेक्टर फळबाग लागवड आहे. तीन- चार वर्षांत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर योजनेंतर्गत ३० हेक्टरवर फळपिकांची लागवड करण्यात आली. संत्र्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे. अनेक शेतकरी हळद, आले, कांदा, टोमॅटो आदींचे चांगले उत्पादन घेत आहेत. त्यातून गावाच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे.

    दुग्धव्यवसायाला चालना परभणी शहर जवळ असल्याने गावातील अनेक शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय सुरु केला. म्हशीचे दररोज सुमारे ५०० लीटर दूध परभणी शहरात विक्रीसाठी जाते. काहींनी शेळीपालनाची जोड दिली आहे. एका शेतकऱ्याने डाळनिर्मिती सुरु केली आहे.

    विकास अभियान गावातील शैक्षणिक,सामाजिक अशा विविध क्षेत्रातील तरुण मंडळी एकत्र आली, त्यांच्या पुढाकारातून मांडाखळी विकास अभियान संकल्पना पुढे आली. त्यातून ग्रामस्थ, नोकरदार श्रमदान करतात. यंदाच्या उन्हाळ्यात इंद्रायणी देवीच्या माळावरील खोदण्यात आलेल्या खोल सलग समतळ चरातील गाळ काढण्यात आला. त्यामुळे माळावरून वाहून जाणारे पाणी चरामध्ये मुरत आहे. शिवारातून वाहणाऱ्या नाल्याची लांबी सुमारे १२ किलोमीटर आहे.

    ठळक बाबी

  • झाडे, झुडपे वाढल्याने नाल्याचे पात्र अरुंद, वेडेवाकडे झाले होते. परिणामी पुराचे पाणी काठावरील शेतजमिनींमध्ये शिरून पिकांचे नुकसान होत असे. या नाल्यावरील चार सिमेंट नाला बंधाऱ्यातील गाळ लोकसहभागातून काढण्यात आला.
  • जलसंधारण चळवळीतील कार्यकर्ते कृषिभूषण कांतराव देशमुख झरीकर तसेच अन्य व्यक्तींनी सढळ मदत केली. तत्कालीन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी इंधन खर्च तसेच अन्य कामासांठी मदत केली.
  • जलसंधारणाच्या कामामुळे शिवारातील विहिरी, बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली. पाणीटंचाई दूर झाली.
  • खोदकामातील मुरूम शेतरस्ते तयार करण्यासाठी, रस्ते दुरुस्तीसाठी वापरण्यात आला.
  • शेतकरी उत्पादक कंपनीचे उपक्रम

  • शेतकरी गटांच्या माध्यमातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन
  • प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांवर बैठका
  • नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचा अभ्यास दौरा.
  • त्यानंतर यंदाच्या मार्चमध्ये मांडाखळी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना.
  • गावातील १५० शेतकरी सभासद
  • लॉकडाऊनमध्ये महिनाभरात कंपनीतर्फे परभणीत अडीच लाख रुपयांच्या भाजीपाला, फळांची विक्री -कंपनीतर्फे गावात जनसुविधा केंद्र. त्याद्वारे ऑनलाइन पीकविमा प्रस्ताव सादर करणे शक्य
  • शासकीय योजनांचेही असेच प्रस्ताव भरण्याची गावातच सुविधा.
  • येत्या काळात सेंद्रिय शेती व अवजार बॅंक स्थापन करण्यावर भर
  • दृष्टिक्षेपात मांडाखळी लोकसंख्या- सुमारे ५५०० एकूण क्षेत्र- २१०० हेक्टर प्रमुख पिके- सोयाबीन, कापूस, संत्रा, पेरु, सीताफळ, लिंबू जलसंधारण कामे सलग खोल समतल चर- ४० हेक्टर नाला खोलीकरण (लोकसहभागातून)- २ सामुहिक शेततळी- २४ कांदाचाळ- ९ नवीन फळबाग लागवड- ३० हेक्टर अस्तित्वातील जुनी फळबाग- ४० हेक्टर शेडनेटगृह- १० गुंठे शाळा- जिल्हा परिषद चौथीपर्यंत, त्यापुढील इयत्तांसाठी संस्था जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, तालुका कृषी अधिकारी पी.बी.बनसावडे, मंडळ कृषी अधिकारी के.एम.जाधव, कृषी सहाय्यक कृष्णा पाटील यांचे सहकार्य

    महिला सक्षमीकरण

  • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गंत ५० महिला स्वंयसहाय्यत गट
  • -त्यातर्फे मसाले, हळद, मिरची पावडर उत्पादन व्यवसाय
  • -तीन गटांतर्फे दशपर्णी अर्क, निंबोळी अर्काची विक्री
  • उत्तम कापूस उत्पादन प्रकल्प

  • परभणी कृषी विज्ञान केंद्रामार्फत उत्तम कापूस उत्पादन हा प्रकल्प
  • कीड नियंत्रणासाठी घरगुती स्तरावर तयार करण्यात आलेल्या निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यांच्या वापरावर भर
  • ॲग्रोवनतर्फे पुरस्कार गावातील तरुण शेतकरी विठ्ठल सिराळ यांचा शेतीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मागीलवर्षी डिसेंबरमध्ये औरंगाबाद येथे सकाळ ॲग्रोवन तर्फे आयोजित राज्य स्तरीय कृषी प्रदर्शनात सन्मान करण्यात आला.

    प्रतिक्रिया स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांनी गृहउद्योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भरता साधली आहे. महिलांमध्ये तंत्रज्ञानाबाबत जागृती निर्माण केली जात आहे. - संजीवनी लोहट, सरपंच जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करण्यात आली. सौर पथदिवे बसविले आहेत. अंगणवाड्या धूरमुक्त केल्या आहेत. जलसंधारणाच्या कामामुळे पाणी टंचाई दूर झाली. - सचिन लोहट- ९८२३१९२१५३ शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते शेतकरी कंपनीतर्फे शेतमाल विक्रीसाठी गाव ते शहर अशी विपणन साखळी बळकट करणार आहोत. - नितीन लोहट-९४२२१०९०३६ प्रवर्तक, मांडाखळी विकास अभियान

    शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत थेट ग्राहकांना भाजीपाला, फळांची विक्री केल्याचा फायदा झाला. कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. - रमेश राऊत-९७६३०३२६९२ अध्यक्ष, मांडाखळी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी

    वीस वर्षापांसून संत्रा उत्पादन घेत आहोत. यंदा दर कमी झाल्याने ती शीतगृहात ठेवली. दरात सुधारणा झाल्यानंतर विक्री केल्याचा फायदा झाला. गावात संत्रा पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. - शेख मोबीन, संत्रा उत्पादक

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com