agriculture news in marathi success story mango, coconut and Arecanut grower farmer from ratnagiri district | Page 2 ||| Agrowon

कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ, सुपारी बाग

राजेश कळंबटे
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि. रत्नागिरी) येथील राजेंद्र उमाजी विचारे यांनी ओसाड जमिनीत आंबा, काजू, नारळ बाग फुलवली आहे. कुटुंबीयांच्या पाठबळावर नियोजन व कष्टपूर्वक बागायतदार म्हणून ओळख निर्माण केली.

शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि. रत्नागिरी) येथील राजेंद्र उमाजी विचारे यांनी ओसाड जमिनीत आंबा, काजू, नारळ बागायती फुलवली आहे. कुटुंबीयांच्या पाठबळावर त्यांनी नियोजन व कष्टपूर्वक बागायतदार म्हणून ओळख निर्माण केली. एकात्मिक पाणलोटातून वीस एकरांत बागायती विकसित केल्यानंतर घरच्या घरी जनावरांचे संगोपन करताना जनावरांचे पालन करून सेंद्रिय खताची सोय केली आहे. 

वरवडे (ता. जि. रत्नागिरी) येथील राजेंद्र उमाजी विचारे यांच्या वडिलांचे रेशन दुकान होते. घरची परिस्थिती बेताची होती.  दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर राजेंद्र यांनी घरच्या शेतीत लक्ष घातले. वडिलोपार्जित एकत्रित आंबा शेतीत त्यांनी काम सुरू केले. सन २००५ मध्ये कर्ज काढून वीस एकर ओसाड जमीन त्यांनी विकत घेतली. डोंगराळ आणि कातळात लागवड करण्याचे आव्हान होते. मात्र शेतीत करिअर करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर हापूस कलमे लावण्याचा निर्णय झाला.  तत्कालीन कृषी सहाय्यक विनायक अव्हेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिले पाऊल उचलले. पत्नी रिना, वहिनी अर्पणा विचारे, अनिल विचारे, रोहन राजेंद्र विचारे यांनी मोठी साथ दिली.   

 पाण्याचा प्रश्‍नही सुटला
शेती बागायती करायची म्हणजे पाणी हवं. तोही प्रश्‍न सोडवला. गावातून जाणाऱ्या छोट्या नदीवर राष्ट्रीय गतिमान पाणलोट अभियानातून साडेचार लाख रुपये खर्च करत सिमेंट नाला बंधारा बांधला. पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेतून याच नदीवर अनेक साखळी बंधारे बांधण्यात आले. पावसाळा संपल्यानंतर बंधाऱ्यांमध्ये पुरुषभर उंचीचे पाणी कायमस्वरूपी साठून राहते. ही विचारे यांच्यासाठी जमेची बाजू होती. त्या पाण्यावर फलोत्पादनाला सुरवात केली. 

आंबा लागवडीने आरंभ
पहिल्या वर्षी आंब्याच्या सुमारे ३५० हापूस झाडांची लागवड केली. त्यासाठी रोजगार हमी योजनेतून शंभर टक्के अनुदान मिळाले. दोन वर्षानंतर वेंगुर्ला ४ व ७ या रोपांची ८०० झाडे लावली. त्यासाठी बंधाऱ्यातील पाणी एक किलोमीटर डोंगरात ‘लिफ्ट'' केले आहे. आंबा, काजूसोबत नारळ, सुपारी बागेकडेही लक्ष केंद्रित केले. सन २०११ मध्ये नारळाच्या १५० झाडांची लागवड केली. रत्नागिरी जवळील भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रातून रोपे आणली. येथील डोंगराळ जमिनीत उत्पादन देतील अशी बाणवली, टीडी आणि महाराजा जातीची रोपे निवडली. सन २०१९ मध्ये श्रीवर्धन गोठा जातीच्या सुपारीची १०० झाडे लावली. यंदा घरगुती आंबा पल्प तयार करून विकण्यास सुरवात केली आहे.

सेंद्रिय खतांचा वापर
रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी १०० गावठी कोंबड्या तर सहा दुधाळ जनावरे पाळली आहेत.  त्यात चार म्हशींचा समावेश आहे.  सर्व बागांमध्ये या सेंद्रिय खतांचा वापर होतो. लेंडीखत, शेण आणि मासोळीखत एकत्रित करून जून, जुलैमध्ये झाडाच्या मुळांमध्ये वापरले जाते. एका वेळेला एकूण सुमारे पाच ते सहा टन खत लागते. शंभर किलो शेणात दहा किलो कोंबडीखत, १५ किलो लेंडीखत, १० किलो कुटी असे मिश्रण केले जाते. त्यामुळे झाडांचे आरोग्य चांगले राखले जाते. किडी-रोगांना झाडे प्रतिकारक करण्याचा प्रयत्न केला आहे. जून महिन्यात हंगाम संपला की बागांची सफाई शंभर मजूरांकरवी करवून घेण्यात येते. दहा कायमस्वरूपी कामगारांना रोजगार मिळाला आहे. रोजगार हमी योजनेतून शंभर टक्के अनुदान मिळाले. शासनाच्या योजनेतून बंधारा बांधत बागेजवळ पाणी साठवले. मंडळ कृषी अधिकारी विनायक अव्हेरे यांचे  सहकार्य लाभले.  

 व्यवसायात नवीन निर्णय
उत्पन्न वाढविण्यासाठी विचारे यांनी ओल्या काजूगरांची विक्रीही करण्यास सुरवात केली आहे. त्याला चांगली मागणी असून दरही अधिक मिळतो. गेल्यावर्षी ओल्या बियांची विक्री प्रति दोन रुपये दराने केली. आंबा रस निर्मिती करून प्रयोग म्हणून यंदा १०० बॉटल्स प्रायोगिक तत्त्वावर तयार केल्या आहेत. अर्धा लिटर पॅकिंगची बॉटल १२० रुपयांना विकली. त्यास मागणी असून लवकरच ब्रॅंड नेमने हा रस बाजारात आणण्याचा प्रयत्न आहे. 

किफायतशीर व्यावसायिक उत्पन्न 
आंबा कलमांमधून हळूहळू आर्थिक उत्पन्न चांगले मिळू लागले. त्यानंतर आणखी सुमारे साडेचारशे कलमांची लागवड केली. पंधरा वर्षानंतर हंगामात सुमारे १५०० पेटी आंबा उपलब्ध होतो. नारळाच्या प्रति झाडामधून १५० ते २००  नारळ मिळतात. वरवडेपासून काही अंतरावर असलेल्या जयगड येथील जेटीवर येणाऱ्या फेरीबोटीमुळे शहाळ्यांना मोठी मागणी आहे. तिथे दिवसाला ५० पर्यंत शहाळी २० रुपये प्रति नग दराने विकली जातात. नारळांची विक्री रत्नागिरी, गणपतीपुळे किंवा वरवडेत गावात २२ रुपये प्रति नग दराने होते. काजूची १२०० झाडे असून वर्षाला सुमारे ४ टन काजू बी मिळते. व्यापाऱ्यांना सरासरी किलोला १२० रुपये दराने विक्री होते. बागेतील एक बाणवली नारळाचे झाड अन्य झाडांपेक्षा वेगळे आहे. त्याचा नारळाचा आकार लहान आहे. परंतु त्याच्या एका पेंडीला ५० नारळ लागतात. 

 आंबा थेट ग्राहकांपर्यंत
पूर्वी विचारे मुंबई- वाशी येथील बाजार समितीकडे आंबा द्यायचे. यंदा कोरोना संकटातील टाळेबंदीत धाडसी निर्णय घेत मुंबई, पुणे शहरातील ग्राहकांपर्यंत थेट आंबा पोचविण्यास सुरवात केली. त्यातून नफ्यात चाळीस ते पन्नास टक्के फायदा वाढला. दर्जेदार आंबा मिळाल्यामुळे ग्राहकांचाही विश्‍वास संपादित झाला. भविष्यात थेट ग्राहकांपर्यंत आंबा पेटी पोचवण्याचे नियोजन केले आहे. 

संपर्क :  राजेंद्र विचारे,  ९४२१६०७५५६ 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...