agriculture news in marathi success story mango, coconut and Arecanut grower farmer from ratnagiri district | Agrowon

कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ, सुपारी बाग

राजेश कळंबटे
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि. रत्नागिरी) येथील राजेंद्र उमाजी विचारे यांनी ओसाड जमिनीत आंबा, काजू, नारळ बाग फुलवली आहे. कुटुंबीयांच्या पाठबळावर नियोजन व कष्टपूर्वक बागायतदार म्हणून ओळख निर्माण केली.

शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि. रत्नागिरी) येथील राजेंद्र उमाजी विचारे यांनी ओसाड जमिनीत आंबा, काजू, नारळ बागायती फुलवली आहे. कुटुंबीयांच्या पाठबळावर त्यांनी नियोजन व कष्टपूर्वक बागायतदार म्हणून ओळख निर्माण केली. एकात्मिक पाणलोटातून वीस एकरांत बागायती विकसित केल्यानंतर घरच्या घरी जनावरांचे संगोपन करताना जनावरांचे पालन करून सेंद्रिय खताची सोय केली आहे. 

वरवडे (ता. जि. रत्नागिरी) येथील राजेंद्र उमाजी विचारे यांच्या वडिलांचे रेशन दुकान होते. घरची परिस्थिती बेताची होती.  दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर राजेंद्र यांनी घरच्या शेतीत लक्ष घातले. वडिलोपार्जित एकत्रित आंबा शेतीत त्यांनी काम सुरू केले. सन २००५ मध्ये कर्ज काढून वीस एकर ओसाड जमीन त्यांनी विकत घेतली. डोंगराळ आणि कातळात लागवड करण्याचे आव्हान होते. मात्र शेतीत करिअर करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर हापूस कलमे लावण्याचा निर्णय झाला.  तत्कालीन कृषी सहाय्यक विनायक अव्हेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिले पाऊल उचलले. पत्नी रिना, वहिनी अर्पणा विचारे, अनिल विचारे, रोहन राजेंद्र विचारे यांनी मोठी साथ दिली.   

 पाण्याचा प्रश्‍नही सुटला
शेती बागायती करायची म्हणजे पाणी हवं. तोही प्रश्‍न सोडवला. गावातून जाणाऱ्या छोट्या नदीवर राष्ट्रीय गतिमान पाणलोट अभियानातून साडेचार लाख रुपये खर्च करत सिमेंट नाला बंधारा बांधला. पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेतून याच नदीवर अनेक साखळी बंधारे बांधण्यात आले. पावसाळा संपल्यानंतर बंधाऱ्यांमध्ये पुरुषभर उंचीचे पाणी कायमस्वरूपी साठून राहते. ही विचारे यांच्यासाठी जमेची बाजू होती. त्या पाण्यावर फलोत्पादनाला सुरवात केली. 

आंबा लागवडीने आरंभ
पहिल्या वर्षी आंब्याच्या सुमारे ३५० हापूस झाडांची लागवड केली. त्यासाठी रोजगार हमी योजनेतून शंभर टक्के अनुदान मिळाले. दोन वर्षानंतर वेंगुर्ला ४ व ७ या रोपांची ८०० झाडे लावली. त्यासाठी बंधाऱ्यातील पाणी एक किलोमीटर डोंगरात ‘लिफ्ट'' केले आहे. आंबा, काजूसोबत नारळ, सुपारी बागेकडेही लक्ष केंद्रित केले. सन २०११ मध्ये नारळाच्या १५० झाडांची लागवड केली. रत्नागिरी जवळील भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रातून रोपे आणली. येथील डोंगराळ जमिनीत उत्पादन देतील अशी बाणवली, टीडी आणि महाराजा जातीची रोपे निवडली. सन २०१९ मध्ये श्रीवर्धन गोठा जातीच्या सुपारीची १०० झाडे लावली. यंदा घरगुती आंबा पल्प तयार करून विकण्यास सुरवात केली आहे.

सेंद्रिय खतांचा वापर
रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यासाठी १०० गावठी कोंबड्या तर सहा दुधाळ जनावरे पाळली आहेत.  त्यात चार म्हशींचा समावेश आहे.  सर्व बागांमध्ये या सेंद्रिय खतांचा वापर होतो. लेंडीखत, शेण आणि मासोळीखत एकत्रित करून जून, जुलैमध्ये झाडाच्या मुळांमध्ये वापरले जाते. एका वेळेला एकूण सुमारे पाच ते सहा टन खत लागते. शंभर किलो शेणात दहा किलो कोंबडीखत, १५ किलो लेंडीखत, १० किलो कुटी असे मिश्रण केले जाते. त्यामुळे झाडांचे आरोग्य चांगले राखले जाते. किडी-रोगांना झाडे प्रतिकारक करण्याचा प्रयत्न केला आहे. जून महिन्यात हंगाम संपला की बागांची सफाई शंभर मजूरांकरवी करवून घेण्यात येते. दहा कायमस्वरूपी कामगारांना रोजगार मिळाला आहे. रोजगार हमी योजनेतून शंभर टक्के अनुदान मिळाले. शासनाच्या योजनेतून बंधारा बांधत बागेजवळ पाणी साठवले. मंडळ कृषी अधिकारी विनायक अव्हेरे यांचे  सहकार्य लाभले.  

 व्यवसायात नवीन निर्णय
उत्पन्न वाढविण्यासाठी विचारे यांनी ओल्या काजूगरांची विक्रीही करण्यास सुरवात केली आहे. त्याला चांगली मागणी असून दरही अधिक मिळतो. गेल्यावर्षी ओल्या बियांची विक्री प्रति दोन रुपये दराने केली. आंबा रस निर्मिती करून प्रयोग म्हणून यंदा १०० बॉटल्स प्रायोगिक तत्त्वावर तयार केल्या आहेत. अर्धा लिटर पॅकिंगची बॉटल १२० रुपयांना विकली. त्यास मागणी असून लवकरच ब्रॅंड नेमने हा रस बाजारात आणण्याचा प्रयत्न आहे. 

किफायतशीर व्यावसायिक उत्पन्न 
आंबा कलमांमधून हळूहळू आर्थिक उत्पन्न चांगले मिळू लागले. त्यानंतर आणखी सुमारे साडेचारशे कलमांची लागवड केली. पंधरा वर्षानंतर हंगामात सुमारे १५०० पेटी आंबा उपलब्ध होतो. नारळाच्या प्रति झाडामधून १५० ते २००  नारळ मिळतात. वरवडेपासून काही अंतरावर असलेल्या जयगड येथील जेटीवर येणाऱ्या फेरीबोटीमुळे शहाळ्यांना मोठी मागणी आहे. तिथे दिवसाला ५० पर्यंत शहाळी २० रुपये प्रति नग दराने विकली जातात. नारळांची विक्री रत्नागिरी, गणपतीपुळे किंवा वरवडेत गावात २२ रुपये प्रति नग दराने होते. काजूची १२०० झाडे असून वर्षाला सुमारे ४ टन काजू बी मिळते. व्यापाऱ्यांना सरासरी किलोला १२० रुपये दराने विक्री होते. बागेतील एक बाणवली नारळाचे झाड अन्य झाडांपेक्षा वेगळे आहे. त्याचा नारळाचा आकार लहान आहे. परंतु त्याच्या एका पेंडीला ५० नारळ लागतात. 

 आंबा थेट ग्राहकांपर्यंत
पूर्वी विचारे मुंबई- वाशी येथील बाजार समितीकडे आंबा द्यायचे. यंदा कोरोना संकटातील टाळेबंदीत धाडसी निर्णय घेत मुंबई, पुणे शहरातील ग्राहकांपर्यंत थेट आंबा पोचविण्यास सुरवात केली. त्यातून नफ्यात चाळीस ते पन्नास टक्के फायदा वाढला. दर्जेदार आंबा मिळाल्यामुळे ग्राहकांचाही विश्‍वास संपादित झाला. भविष्यात थेट ग्राहकांपर्यंत आंबा पेटी पोचवण्याचे नियोजन केले आहे. 

संपर्क :  राजेंद्र विचारे,  ९४२१६०७५५६ 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
देशमुखांची फळबागकेंद्रित प्रयोगशील शेती झरी (ता. जि. परभणी) येथील कृषिभूषण सूर्यकांतराव...
कोकणातील कातळावर ड्रॅगनफ्रूटपूर्णगड (ता. जि. रत्नागिरी) येथील डॉ. श्रीराम...
विविध तंत्रांचा वापर सांगणारी लंबे...बुलडाणा जिल्ह्यातील माळखेड येथील गणेश लंबे यांनी...
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
मार्केटिंग, ब्रॅंडिंगद्वारे अळिंबी...बेलखेड (जि. अकोला) येथील विलास व छायाताई या कुयटे...
ऐंशी प्रकारचा प्रक्रियायुक्त कोकणमेवासिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबाव (ता.देवगड) येथील...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
संशोधनवृत्तीला सातत्याची जोड शेतीउपयोगी...प्रत्येक माणसात एक संशोधक दडलेला असतो. अगदी खेळणी...
पशुपालनाने दिली आर्थिक प्रगतीला साथकोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील देवानंद...
दुग्ध व्यवसायातून अल्पभूधारक शेतकऱ्याची...वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये कुटुंबाचा...
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्डकोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर...
शेती, आरोग्य अन् महिला विकासाची शक्तीगोमेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील ग्रामीण...
लोकसहभागाच्या बळावर मुळेगाव बनले...पाणी, वीज, रस्ते या मूलभूत सोई-सुविधा...
हिवरेबाजार शिवारात सीताफळांचा गोडवाआदर्श गाव हिवरेबाजार (ता.जि. नगर) गावासह...
बारमाही भाजीपाला उत्पादनातून नियमित...सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या...
शाश्वत उत्पन्नासाठी फळबाग ठरतेय फायदेशीरकेवळ पारंपरिक पिकातून शाश्वत उत्पन्न हाती येत...