फिरत्या प्रक्रिया उद्योगाची राबवली अभिनव कल्पना

लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा जिल्ह्यातील जुनोना येथील पहाडे कुटुंबीयांनी फिरत्या प्रक्रिया उद्योगाची संकल्पना साकारली आहे. त्यांनी दालमिल व प्रक्रिया केंद्र गावोगावी नेत परिसरातील अनेक गावांमध्ये थेट सेवा दिली.
prajwal pahade with his mobile processing unit
prajwal pahade with his mobile processing unit

लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा जिल्ह्यातील जुनोना येथील पहाडे कुटुंबीयांनी फिरत्या प्रक्रिया उद्योगाची संकल्पना साकारली आहे. त्यांनी दालमिल व प्रक्रिया केंद्र गावोगावी नेत परिसरातील अनेक गावांमध्ये थेट सेवा दिली. गेल्या चार महिन्यामध्ये तब्बल ८६ हजार रुपयांचा निव्वळ नफा या उद्योगातून मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यातील जुनोना येथील प्रज्वल नरेंद्र पहाडे यांच्याकडे १६ एकर शेती असून, त्यात कापूस-तूर आंतरपीक, सोबत सोयाबीन; तर रब्बी हंगामात गहू घेतात. कापूस लागवड चार एकर; तर उर्वरित क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करतात. या सर्व पिकांच्या सिंचनासाठी विहीर आहे. त्यातून संपूर्ण शिवारात तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. मोबाईल दालमिल उद्योगात भरारी पहाडे कुटुंबीयांकडे छोटेसे वर्कशॉप असून, त्यात वेल्डिंगसह यंत्रांची कामे केली जातात. परिसरातील अनेक गावांमध्ये छोट्या मोठ्या दालमिल असल्या, तरी विजेच्या उपलब्धतेची समस्या आहे. अशावेळी शेतकऱ्यांना त्यांच्या मालावर प्रक्रियेसाठी दूरपर्यंत जावे लागते. यात वाहतूक खर्च आणि वेळही खर्च होतो. परिसरातील बहुसंख्य गावांमध्ये खरिपात तूर आणि रब्बीमध्ये गहू ही पिके आहेत. या दोन्ही पिकांमध्ये प्रतवारी व प्रक्रियेला वाव आहे. ही प्रक्रिया प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या गावी जात केल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विचार पहाडे कुटुंबीयांच्या मनात डोकावत होता. प्रक्रिया यंत्रे अन्य गावांपर्यंत नेण्याच्या संकल्पनेवर त्यांनी काम सुरू केले. असे आहे सयंत्र कृषी विभागाच्या प्रक्रिया सयंत्रासाठी उपलब्ध अनुदान योजनांची माहिती घेतली. उन्नत शेती अभियानातून अनुदानातून शेतमाल प्रक्रिया सयंत्र एक लाख ४८ हजार रुपयांना खरेदी केले. त्यासाठी सुमारे ८४ हजार २८६ रुपये अनुदान मिळाले. या यंत्रामध्ये स्वतःचा अनुभव, अभ्यासातून काही बदल करून गहू प्रतवारी व अन्य कामांसाठी योग्य ते बदल स्वतःच्या वर्कशॉमध्ये करून घेतले. त्यांच्याकडे तीन वर्षांपासून असलेल्या २७ एचपी ट्रॅक्टरचा वापर वाहतुकीसाठी किंवा यंत्र चालवण्यासाठी केला जात असल्याचे प्रज्वल पहाडे यांनी सांगितले. ट्रॅक्टरचलित हे सयंत्र सुरुवातीला ८ ते ९ आरपीएमवर वापरण्यात आले. मात्र, प्रक्रियायुक्त शेतमालाचा दर्जा अपेक्षेप्रमाणे मिळत नव्हता. ट्रॅक्टरचे सेटिंग बदलत सहा ते सात आरपीएम करण्यात आले. त्यामुळे सयंत्र योग्यप्रकारे चालत असून, गव्हाची प्रतवारी आणि सफाई त्यासोबतच तुरीची प्रक्रिया करता येते. या प्रक्रियायुक्त शेतीमालाचा दर्जाही चांगला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रक्रियेसाठी प्रतिक्विंटल दाळीला १०० मि.लि. तेल, पाणी आणि हळद यांचाही वापर होतो. उपविभागीय कृषी अधिकारी अजयकुमार राऊत, तालुका कृषी अधिकारी राधिका बैरागी, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी रवींद्र राऊत, कृषी सहायक एस. बी. खराटे यांनी या फिरत्या प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन दिल्याचे नरेंद्र पहाडे यांनी सांगितले. थेट गावागावांत होते प्रक्रिया हंगामामध्ये परिसरातील गावांत जाऊन शेतकऱ्यांच्या शेतीमालावर प्रक्रिया करून दिली जाते. दहेगाव, खापरी, आजनगाव, चारमंडळ, धापकी, बोनसुला, जुनोना, पूजई, सेवाग्राम, वर्धा शहर आणि तालुक्यातील अन्य गावांमध्ये ही सेवा देण्यात आली. कोरोना लॉकडाऊउनमुळे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे फिरण्यात अडचणी येत होत्या. तरीही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असे प्रज्वल सांगतात. उदा. खापरी गावात एका दिवसाला १२ ते १३ क्विंटल कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यात आली. सलग मशिन चालली तरी २५ क्विंटलपर्यंत प्रक्रिया होऊ शकते. असा आहे आर्थिक ताळेबंद

  • गेल्या चार महिन्यांमध्ये परिसरातील गावागावांमध्ये जाऊन १७५ क्विंटल तुरीवर; तर ४३० क्विंटल गव्हावर प्रक्रिया केली.
  • गहू प्रतवारी आणि सफाईसाठी १४० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे दर आकारण्यात आला. तुरीची दाळ तयार करण्यासाठी ४०० रुपये प्रतिक्विंटल असा दर आकारला जातो.
  • चार महिन्यांमध्ये एकूण ३६३ लिटर डिझेल वापरले गेले. त्यासाठी २५ हजार ४०० रुपये खर्च झाला. सयंत्र नवीन असल्याने त्याच्या नियमित देखभालीव्यतिरिक्त फारसा खर्च झाला नाही.
  • ट्रॅक्टरचालक आणि ऑपरेटर ही जबाबदारी एकाच व्यक्तीकडे असल्याने मजुरीवरही अतिरिक्त खर्च होत नाही. तरीसुद्धा स्वतःची आणि एका व्यक्तीची मजुरी धरली असता त्यावर १८ हजार रुपये खर्च झाला, असे म्हणता येईल.
  • एकूण खर्च ४३ हजार ४०० रुपये झाला.
  • तूर आणि गव्हावरील प्रक्रियेतून हंगामात १ लाख ३० हजार २०० रुपयांचे उत्पन्न झाले. अवघ्या दोन महिन्यांच्या हंगामातून खर्च वजा जाता ८६ हजार ६०० रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे पहाडे सांगतात.
  • एका तासामध्ये ३ क्विंटल गव्हावर; तर अडीच क्विंटल तुरीवर प्रक्रिया शक्य होते. ताशी सुमारे दीड लिटर डिझेल वापरले जाते.
  • दर अधिक असूनही होतो शेतकऱ्यांचा फायदा वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात शेतमाल प्रक्रिया उद्योगाची संख्या पंचवीसपेक्षा अधिक आहे. त्यांच्याकडून १२० रुपये प्रतिकिलो दराने प्रक्रिया केली जाते. त्या तुलनेमध्ये पहाडे कुटुंबीयांचा दर थोडा अधिक (क्विंटलमागे २० रुपये अधिक) दिसत असला, तरी ही सुविधा स्वतःच्या गावातच उपलब्ध होत असल्याने अंतिमतः शेतकऱ्यांचा फायदा होतो. कारण शेतकऱ्यांना ज्या गावात दालमिल असेल, तिथपर्यंत आपल्या शेतमालाची वाहतूक करावी लागते. त्यासाठी सरासरी ८०० रुपयांपर्यंत खर्च होतो. त्याचप्रमाणे या साऱ्या वाहतूक आणि प्रक्रियेच्या कामासाठी दिवस मोडतो. १५० शेतकऱ्यांच्या वाहतुकीवरील प्रत्येकी इतका खर्च अपेक्षित धरला, तरी शेतकऱ्यांची एकूण १ लाख २० हजार रुपयांची बचत झाली आहे. संपर्क- प्रज्वल पहाडे, ८९८३२३२९९५ नरेंद्र पहाडे, ९७६७३२८८१५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com