कोकणी मेव्यातून मिळाला आश्वासक रोजगार

प्रक्रिया उत्पादने तयार करताना गटातील सदस्या
प्रक्रिया उत्पादने तयार करताना गटातील सदस्या

भंडारपुळे (जि. रत्नागिरी) येथील मोरया स्वयंसहायता महिला समूहाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन विविध प्रकारची लोणची तयार केली. तीन वर्षातच या गटाने व्यावसायिक भरारी घेतली असून, शेतीवर गुजराण करणाऱ्या महिलांना वर्षभर आश्वासक रोजगार मिळाला आहे. गेल्या वर्षीपासून गटाने रत्नागिरी जिल्ह्याबाहेर उत्पादनांच्या विक्रीस सुरवात केली आहे.

भंडारपुळे (जि. रत्नागिरी) येथील चौदा महिलांच्या मोरया स्वयंसहायता महिला समूहाने गेल्या तीन वर्षात लोणचे निर्मितीतून रोजगाराचे साधन तयार केले. गणपतीपुळेसह परिसरातील गावे आणि लोणावळा, डोंबवलीपर्यंत या गटाच्या लोणच्यांना चांगली मागणी आहे. तीन वर्षातच गटाने व्यावसायिक भरारी घेतली असून शेतीवर गुजराण करणाऱ्या महिलांना वर्षभर आश्वासक रोजगार मिळाला. शासनाच्या उमेद योजनेतून ग्रामीण भागात बचत गटाच्या चळवळीला चालना मिळाली. भंडारपुळे येथील हेमलता गिडये यांनी उमेदअंतर्गत बचत गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. गिडये यांचे वडील माजी सैनिक आणि भाऊ आंब्याचा व्यावसायिक. मात्र स्वतःच्या उत्पन्नाचे साधन असावे यासाठी हेमलता गिडये यांनी गावातील चौदा महिलांना एकत्र करून मार्च २०१६ मध्ये मोरया स्वयंसहायता महिला समूह स्थापन केला.       या गटामध्ये सध्या वैशाली वसंत माने (अध्यक्ष), कोमल गिरीश गिडये (उपाध्यक्ष), हेमलता केशव गिडये (सचिव), ऊर्मिला उदय गोताड, दीपिका दिलीप भुते, सानिया सागर माने, वृषाली योगेश माने, सुवर्णा संतोष माने, अरुणा अरुण माने, देवता दीपक माने, ममता महेंद्र रामाणे, आनंदी अनंत रामाणे, सुशीला शंकर रामाणे, दामिनी दशरथ रामाणे यांचा समावेश आहे. लोणचे निर्मितीला सुरवात बाजारात उपलब्ध असणाऱ्या लोणच्यापेक्षा वेगळ्या चवीची लोणची तयार करण्याचे नियोजन गटातील महिलांनी केले. गटातील प्रत्येक महिलेला घरच्या घरी लोणचे बनविता येत होतेच. तरीदेखील गटातील सदस्यांनी बँक ऑफ इंडियातर्फे आयोजित दहा दिवसांचे फळ प्रक्रिया प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गटाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेत आंबा लोणचे, मिरची लोणचे, मिरची ठेचा, आवळा लोणचे, चटणी, तिळकूट, विविध प्रकारची पिठे तयार करण्यास सुरवात केली. गुणवत्तेमुळे मागणीत वाढ  महिला गटाने तयार केलेले पदार्थ सुरवातीला गावामध्येच विक्रीसाठी ठेवले जायचे. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषदेतर्फे गणपतीपुळे येथे भरविलेल्या सरस प्रदर्शनात गटाने विविध प्रकारची लोणची विक्रीसाठी ठेवली. ग्राहकांकडून या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि प्रक्रिया उद्योगाने चांगलीच गती घेतली. पहिल्या वर्षी गटाची २५ हजार रुपयांची उलाढाल झाली. आत्मविश्वासामुळे गटाने रत्नागिरी जिल्ह्याबाहेर उत्पादनांच्या विक्रीचे नियोजन केले. गटाच्या व्यवसाय वृद्धीसाठी अतुल दिगंबर कुलकर्णी यांनी पंधरा हजार रुपये बचत गटाला दिले. ही मदत गटाने अल्पावधीतच उलाढालीतून फेडली. तसेच नफ्याच्या उर्वरित रकमेमधून गटातील सदस्यांना त्यांच्या कामानुसार मोबदलादेखील दिला. सरस प्रदर्शनामध्ये प्रतिसाद मिळाल्यानंतर गटाने भंडारपुळेबरोबरच नेवरे, मालगुंड, गणपतीपुळे परिसरातील दुकानांमध्ये उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यास सुरवात केली. यातून लोणावळा आणि डोंबिवलीतील ग्राहक जोडले गेले. गेल्या दोन वर्षात उत्पादनांचा सर्वाधिक खप लोणावळा आणि डोंबिवलीतील दुकानांमध्ये होतो. चौदा महिलांना पुरेसा रोजगार मिळेल असे व्यवस्थापन गटाने केले आहे. मिळालेला नफा वाटून घेण्यापेक्षा गटातील सदस्यांच्या कामानुसार त्या दिवसाचा रोजगार दिला जातो. हे सगळे व्यवस्थापन बचत गटाच्या सचिव हेमलता गिडये पहातात. बचत गटामुळे शेतीकामाच्या बरोबरीने अधिकचे आर्थिक उत्पन्न सदस्यांना मिळत आहे. गटातील महिला आता पारंपरिक भातपिकाच्या बरोबरीने हळद, भाजीपाला लागवडीकडे वळल्या आहेत. याचबरोबरीने परसातील कुक्कुटपालनालाही गटाने चालना दिली आहे.  दरवर्षी नवीन उत्पादने  कोकणात काजू बोंड मोठ्या प्रमाणात वाया जातात. त्यापासून फक्त काजू सिरप बनविले जाते. या बोंडापासून पापड, काजू फेणी, काजू सांडगे निर्मिती हा गट करणार आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन तेलविरहीत लोणचे गटाने बाजारपेठेत आणले, तसेच तीळ तेलातील लोणचे हा गट तयार करतो. रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांसाठी सैंधव मिठातील लोणचे यंदाच्या हंगामात तयार करण्याचे नियोजन सदस्यांनी केले आहे.  दूध प्रक्रिया उद्योगाला चालना   हेमलता गिडये यांच्याकडे दहा म्हशी आणि दोन गायी आहेत. प्रतिदिन २५ लिटर दूध उत्पादन होते. त्यापासून खवा, तूप निर्मिती केली जाते. खव्याचे पेढे, मोदकांची विक्री गणपतीपुळे येथे होते. यातून दरवर्षी चांगली आर्थिक मिळकत होते. 

बचत गटाची विविध उत्पादने  बहुतेक जण गावरान कैरीचे लोणचे तयार करतात, परंतू मोरया गटाने हापूस आंब्याच्या कैरीचे लोणचे प्रायोगिक तत्त्वावर तयार केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हापूस कैरीची चव इतर कैरीपेक्षा वेगळी लागते. आवळा लोणचे, मिरची ठेचा, तिळकूट, शेंगदाणा-लसूण चटणी, करवंद लोणचे, कारले लोणचे, मिश्र भाजीपाला लोणचे, आवळा सरबत, कैरी पन्हे, काजू सीरप, कोकम आगळ, आवळा कॅण्डी त्याचबरोबर घावन पीठ, वडा पीठ आणि खव्याचे मोदकही मागणीप्रमाणे गटातील सदस्या करून देतात. हापूस कैरी लोणचे आणि आवळा लोणच्याची १७५ ते २५० रुपये प्रति किलो दराने विक्री होते. याचबरोबरीने २०० ग्रॅम लोणचे ५० रुपये, अर्धा किलो लोणचे १२५ रुपये या दराने विकले जाते. चटणीदेखील विविध पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे.

कुळीथ पीठ 

सगळीकडे साल काढलेल्या कुळीथाचे पीठ तयार करण्याची पद्धत आहे; परंतू कुळीथाच्या सालीचेही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असल्यामुळे त्याचा वापर करूनच पीठ तयार केले जाते. या पिठालादेखील ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. प्रति किलो २५० रुपये असा विक्री दर ठेवलेला आहे. 

कोळंबी लोणच्याला आगाऊ नोंदणी  एकच उत्पादन न घेता दरवर्षी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन विविध प्रकार बनविण्यावर बचत गटातील सदस्यांचा प्रयत्न असतो. मांसाहारी खवय्यांची मागणी लक्षात घेऊन गटाने कोळंबी लोणचे निर्मितीला सुरवात केली. खास मद्रासी पद्धतीने हे लोणचे तयार केले जाते. यासाठी मध्यम आकाराची कोळंबी निवडली जाते. शंभर ग्रॅम बाटलीत लोणचे पॅकिंग केले जाते. सरासरी १२०० रुपये किलो या दराने या लोणच्याची विक्री होते. बाजारपेठेत १०० ग्रॅम कोळंबी लोणचे १२० रुपये दराने विकले जाते. गट वर्षाला सरासरी २५ ते ३० किलो लोणचे तयार करतो. मात्र यासाठी आगाऊ मागणी गटाकडे नोंदवावी लागते.

दृष्टिक्षेपात व्यवसाय  

  • हापूस कैरी, करवंद, मिरची लोणचे, कोळंबी लोणचे, ठेचा, पिठे अशी एकूण ५४ उत्पादने.
  • सोहम ब्रॅंडने उत्पादनांची विक्री. 
  • रत्नागिरी जिल्ह्याच्या बरोबरीने लोणावळा, डोंबवलीतून उत्पादनांना वाढती मागणी.
  • यंदाच्या वर्षी १ लाख २५ हजारांची उलाढाल.
  • उमेद अभियानात रत्नागिरी तालुक्यात गटाचा पहिला क्रमांक.
  • - हेमलता गिडये, ९०४९९८३४१९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com