agriculture news in marathi success story of nagvade farmer family from shirur district pune | Agrowon

पीक नियोजनातून बसवले कुटुंबाचे आर्थिक गणित

संदीप नवले
सोमवार, 20 जुलै 2020

बाभूळसर (ता. शिरूर) येथील रामचंद्र नागवडे व कुटुंबीयांनी वार्षिक पिके, हंगामी पिके आणि फळबाग यांचे नियोजन केले आहे.

बाभूळसर (ता. शिरूर) येथील रामचंद्र नागवडे व कुटुंबीयांनी वार्षिक पिके, हंगामी पिके आणि फळबाग यांचे नियोजन केले आहे. वार्षिक ठोक रक्कम, दरमहा खर्चासाठी आवश्यक रक्कम यानुसार आर्थिक नियोजन बसवले आहे. आधुनिक यंत्रे व तंत्रासह कुटुंबीयांच्या आरोग्याला अधिक महत्त्व देत त्यासाठी खास गुंतवणूक केली जाते.

पुणे जिल्ह्यातील बाभूळसर बु. (ता. शिरूर) येथील रामचंद्र व कै. विलास बाजीराव नागवडे यांची एकत्रित कुटुंबाची एकूण ५० एकर शेती आहे. त्यांच्या एकत्रित कुटुंबातील २१ सदस्य शेतीतील कामामध्ये सहभाग देतात. संपूर्ण शेती बागायती असून, मुख्य पीक ऊस आहे. ऊस पिकातून वर्षाला एकरकमी उत्पन्न मिळते. मात्र, त्यासोबत दैनंदिन आणि मासिक खर्च यासाठी खरबूज, दोडका, फ्लॉवर, टोमॅटो अशा फळभाज्या आणि डाळिंब फळबाग यांचे नियोजन केले जाते. उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतानाच आवश्यक तिथे खर्च कमी राखण्याचा प्रयत्न नागवडे कुटुंबीय करतात.

निश्चित वार्षिक उत्पन्नांसाठी...
बागायती शेतीमध्ये ऊस हे मुख्य पीक असून, दरवर्षी सुमारे २० एकर क्षेत्रावर लागवड आहे. दरवर्षी आडसाली उसावर प्रामुख्याने भर असतो. त्यासाठी जुलै महिन्यात उसाची पाच बाय दोन फूट अंतरावर पट्टा पद्धतीने लागवड करतात. लागवडीपूर्वी किंवा आंतरपीक म्हणून हिरवळीच्या ताग, धैंचा अशा पिकांची लागवड करून सेंद्रिय खतांची पूर्तता केली जाते. हे शेणखत विकत घेऊन घालण्यापेक्षा स्वस्त पडते. सोबतच चार ते पाच एकरमध्ये फ्लॉवर हे आंतरपीकही असते. काटेकोर जलसिंचनासाठी सुमारे ७० टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचन केले आहे. उसाचे एकरी ७५ टनापर्यंत उत्पादन मिळते. उसाचे गाळप झाल्यानंतर प्रती टन साधारणपणे २२०० ते २५०० रुपये इतका दर मिळतो. वर्षाला एक ठरावीक निश्चित रक्कम हाती येते.

फळबाग लागवडीचा अवलंब 
ऊस शेतीला डाळिंब फळबागेची जोड दिली आहे. दीड एकरापासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने डाळिंबाची सात एकरपर्यत लागवड वाढवली आहे. फळबागेसाठी सेंद्रीय व रासायनिक खतांचा संतुलित वापर केला जातो. गत साडे तीन वर्षापासून जुन्या बागेतून एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळत आहे. बाजारभावानुसार प्रति किलो ४० ते ५० दर मिळतो.

दरमहा खर्चासाठी फळभाज्या
कुटुंबाच्या दरमहा खर्चासाठी भाजीपाला पिकांची लागवड करतात. आडसाली उसाचे गाळप झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी महिन्यापासून ८ ते १० एकरावर टप्प्याटप्प्याने टोमॅटो, खरबूज, दोडका या फळभाज्यांची लागवड केली जाते. या पिकांसाठी ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर व क्रॉप कव्हर (खरबुजासाठी) अशा आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. या तंत्रासाठी एकरी साधारणपणे १८ ते २० हजार रुपये खर्च अधिक होतो. मात्र, तण नियंत्रण, पीक संरक्षण खर्चात बचत, पाणी बचत होते. यासोबत उत्पादनात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होते. फळभाज्यांचा दर्जा चांगला मिळतो. परिणामी बाजारात दर चांगला मिळतो. एकावेळी लावलेल्या क्रॉप कव्हर आणि मल्चिंग पेपरवर साधारण दोन पिके निघू शकतात. म्हणजे खर्च निम्म्यातून खेळते भांडवलही हाती राहते.

रोपवाटिकेतून अवलंब
शेतीपूरक व्यवसाय म्हणून साधारणपणे १५ कि.मी. अंतरावरील गिरीम (ता. दौंड) येथे आदर्श हायटेक नर्सरी तीन वर्षापूर्वी सुरू केली. दीड एकर क्षेत्रावरील या रोपवाटिकेमध्ये ऊस, खरबूज, कलिंगड, टोमॅटो, पपई व अन्य पिकांची दर्जेदार रोपे तयार केली जाते. दरवर्षी भाजीपाला, ऊस व अन्य पिकांच्या २० लाख रोपांची विक्री होते. त्यातून आत्तापर्यंत परिसरातील २०० ग्राहक जोडले गेले आहे. रोपवाटिकेसाठी होणारा प्रती माह खर्च वजा जाता ५० हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.

गांडूळ खताचा वापर
दरवर्षी शेतीतील वाढता खर्च कमी करतानाच सेंद्रिय खतांची उपलब्धता करण्यासाठी गांडूळखत निर्मिती सुरू केली. दर दोन महिन्याला दीड टन इतके टन गांडूळखत उपलब्ध होते. त्याचा वापर शेती आणि रोपवाटिकेसाठी केला जातो. पिकांसाठी जिवामृताचा वापर ते करतात.

शेतीचा एकरी ताळेबंद

पीक उत्पादन उत्पादन खर्च उत्पन्न (खर्च वजा जाता एकरी)
ऊस ७५ टन ४० ते ५० हजार रु. १ ते १.२५ लाख रु.
डाळिंब जुनी बाग -१० ते १२ टन,नवी बाग ६ टन ७० ते ८० हजार रु २ ते २.५० लाख रु.
भाजीपाला पीकनिहाय वेगवेगळे ६० हजार रु. ८० हजार ते १ लाख रु.

यावर दरवर्षी होतो खर्च
मजुरी, खते, डिझेल..............१० लाख
कौटुंबिक खर्च.....................६ लाख
शैक्षणिक खर्च......................३ लाख
आरोग्य खर्च........................२ लाख

उत्पन्नातील ठरावीक गुंतवणूक नव्या तंत्रासाठी
नागवडे यांच्या शेतीतून मिळालेल्या एकूण उत्पन्नातील एक ठरावीक हिस्सा (५० टक्के पर्यंत) आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन यंत्रे व अवजारे, ट्रॅक्टर, स्प्रेअर पार्ट, शेततळे यासाठी खर्च केला जातो. ५ लाख रुपये इतका खर्च करून ऊस रोपांच्या निर्मितीसाठी १५ गुंठे क्षेत्रावर शेडनेट गृह उभारले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना रोपांबरोबरच ट्रे व कोकोपीट इ. साहित्याची विक्री केली जाते.

शिक्षणाकडे दुर्लक्ष नाही...
नागवडे कुटुंबात शेतीला प्राधान्य असले तरी प्रत्येक मुलांचे किमान शिक्षण झालेच पाहिजे, याकडे लक्ष असते. कुटुंबातील किशोर (बीए), सचिन (बीएस्सी अॅग्री), अमित (एलएलबी), जितेंद्र ( बीई, एमबीए) आणि विकास याने फूड टेक्नॉलॉजीची पदवी इंग्लंड येथून प्राप्त केली आहे. पदवीनंतर सर्वजण शेती आणि शेतीपूरक व्यवसायात कार्यरत आहेत. विकासने आदर्श अॅग्रीटेक या नावाने फळे व भाजीपाला (डाळिंब, कांदा, कलिंगड) निर्यातीचा व्यवसाय सुरू केला आहे. नागवडे कुटुंबीय हे शेती ज्ञानासाठी कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे याबरोबर प्रशिक्षणे, चर्चासत्र व प्रदर्शन यांना भेटी देतात. कृषी विभागामार्फत शेतीविषयक परदेशी दौराही केला आहे. यामुळे आपली शेतीकडे पाहण्याची दृष्टी बदलते, असा अनुभव आहे. कुटुंबातील सहा नातवंडांचे प्राथमिक शिक्षण सुरू आहे.

आरोग्यासाठी वेगळी तरतूद 
कुटुंबात २१ व्यक्ती असल्याने वर्षभर आरोग्यावर मोठा खर्च होतो. आरोग्याच्या दृष्टीने जागरूक राहून सर्व कुटुंबाचा आरोग्य विमा काढला आहे. त्यासाठी वार्षिक सुमारे दोन लाख रुपये वेगळे काढले जातात. दरवर्षी हा खर्च होत असला तरी कुटुंबीयांच्या अचानक उद्भवणाऱ्या आजारांची चिंता राहत नाही. चांगले उपचार मिळू शकतात.

संपर्क- सचिन नागवडे, ९०११०४१११२


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...