प्रतिकूल परिस्थितीत सावरले शेतीने

गवारीच्या शेंगा तोडताना इंगोले दांपत्य.
गवारीच्या शेंगा तोडताना इंगोले दांपत्य.

कष्ट व चिकाटीला प्रामाणिकपणाची साथ असेल तर कठीण परिस्थितीतही यश मिळवता येते. आष्टी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील सौ. नंदा बाबूराव इंगोले यांनी कुटुंबाच्या मदतीने शेतीला कुक्कुटपालन, शेळीपालन अाणि पशुपालनाची जोड दिली.काटकसर, मजुरांविना शेती अाणि शेत मालाच्या हातविक्रीतून त्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे.

पंढरपूर-बार्शी रस्त्यावर आष्टी हे ऐतिहासिक गाव वसलं आहे. या गावाला आष्टी तलावाचं वैभव लाभलं असलं तरी या गावाचे सुमारे पन्नास टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. आष्टी-ढेकळेवाडी या मार्गावर आष्टी गावापासून केवळ चार ते पाच किलोमीटर अंतरावर इंगोले परिवाराची साडेअाठ एकर शेती आहे. दहा ते बारा वर्षापूर्वी नंदाताई अाणि बाबुराव या दांपत्याला दोन मुलांसह वाट्याला आलेली एक म्हैस घेऊन वेगळे रहावे लागले. साधारण चार एकर वडिलार्जित जमीन मिळाली. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे शेतीत केवळ पावसाळी पिकेच घ्यावी लागत होती. त्यामुळे नंदाताईंनी दुसऱ्याच्या शेतात काबाड कष्ट केले, तर बाबुरावांनी सायकल दुकान व दवाखान्यात कंपाउंडरची नोकरी करत अत्यंत काटकसरीने प्रपंच उभा केला. कष्टातून मिळालेली थोडीफार मिळकत अाणि शेतीतील उत्पन्नातून त्यांनी साडेचार एकर जमीन खरेदी केली. आता त्यांच्याकडे साडेआठ एकर शेती झाली आहे. दोन्ही मुलं मोठी झाली. शिक्षण घेऊनही नोकरी लागण्याची शक्यता कमी असल्यामुळे नंदाताई व बाबूराव यांनी आपल्या दोन्ही मुलांना शेतीचेच धडे दिले. रविकिरण मोठा तर धाकटा चेतन यांना शेतीची चांगलीच गोडी लागली. या दोघांचीही लग्ने झाल्यामुळे पती, दोन मुले व दोन सुनांच्या मदतीने नंदाताई शेतीची सर्व कामे करतात.  

हातविक्री करण्यावर भर नंदाताई रविकिरण अाणि चेतन सोबत एकाच बाजारात दोन ठिकाणी भाजीपाल्याची विक्री करतात. माढा तालुक्यातील कुर्डूवाडी, मोडनिंब, मोहोळ अाणि आष्टी येथील आठवडे बाजारात दिवसभर बसून शेतमालाची विक्री केली जाते. त्यामुळे अधिक फायदा होतो.  दररोज साधारण ७० ते ८० किलो गवार, १०० ते १२५ नग दुधी भोपळा व चार क्रेट भेंडीचे उत्पादन मिळते. सध्या पितृपंधरवडा असल्यामुळे गवार ४० ते ५० रुपये प्रतिकिलो, भेंडी ३० ते ३५ रू. प्रतिकिलो तर दुधी भोपळा दहा ते बारा रुपये प्रतिनग, पावटा साठ ते सत्तर रु. प्रतिकिलो, अंबाडा भाजी पाच रुपये पेंडी, चवळी ३० ते ४० रुपये प्रतिकिलो या भावाने हातविक्री केली जात आहे. बोराचे उत्पादन नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होईल. दरवर्षी बोरांची विक्री मोडनिंब अाणि एजंटमार्फत हैदराबाद या ठिकाणी केली जाते. बोरांना सरासरी १२ ते १५ रुपये प्रति किलो दर मिळतो.  

निटनेटकेपणा अाणि योग्य व्यवस्थापन   नंदाताई घर अाणि शेतीची स्वच्छता ठेवण्याच्या कामात माहिर आहेत. त्याच्या शेतात कुठेच कचरा दिसत नाही. शेतात तणनाशकाचा वापर न करता वेळेत खुरपणीची कामे केली जातात. गवताचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होतो. बांधावर शेळ्यांसाठी चाऱ्याची सोय व्हावी यासाठी शेवरीची लागवड केली अाहे. घरातच शेतीला लागणारे साहित्य व खते ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. नंदाताई व त्यांचा परिवार शेतातील कामात खूपच व्यस्त असतो. सगळेच पडेल ती कामे करतात. मात्र कामाची वाटणी केल्यामुळे सर्व कामे वेळेत होतात, असा नंदाताईंचा अनुभव आहे.  

शेतीतून मिळाली प्रगतीची वाट   नंदाताईंना वर्षाला शेती, शेळीपालन, कुक्कुटपालन अाणि जनावरांच्या संगोपनातून किफायतशीर उत्पन्न मिळते. शेतीत प्रामाणिक कष्ट करून मिळालेले चांगले उत्पन्न, काटकसर अाणि योग्य नियोजनामुळे नंदाताई व बाबुरावांनी दोन्ही मुले अाणि एका मुलीचे लग्न थाटात लावून दिले. शाश्‍वत पाणी पुरवठ्यासाठी शेततळे खोदले. गतवर्षी शेतामध्ये रहाण्यासाठी चांगला बंगला बांधला. नंदादीप बंगल्यामुळे नंदाताईंचे स्वप्न साकार झाले आहे.

शेतीचे नियोजन

इंगोले परिवाराच्या साडेआठ एकर क्षेत्रापैकी दोन एकर क्षेत्रावर बोराची बाग, दोन एकर तूर, एक एकर गवार, अर्धा एकर मिरची व त्यात आंतरपीक म्हणून गवार लागवड केली आहे. अर्धा एकर भेंडी व बोराच्या बागेतच साधारण पाऊण एकरात दुधी भोपळ्याची लागवड केली आहे. गवार, भेंडी व मिरचीच्या जोडीला वाफा-दोन वाफ्यात पावटा, अंबाडी, चवळी इ. भाज्यांची त्यांनी लागवड केली आहे. गवार, भेंडी, मिरची व बोरीच्या बागेला ठिबक सिंचन संचाने पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पावसाचे पाणी शेततळ्यात भरून घेतले जाते. इतरवेळी मात्र शेतातील चार-पाच कुपनलिकांचे पाणी एकत्र करण्यासाठी या शेततळ्याचा उपयोग होतो. बोरांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी भाजीपाल्याचा हंगाम संपेल असे नियोजन असते. दरवर्षी पावसाळ्यात गवारची लागवड केली जाते. साधारण चार महिन्याचे हे पीक त्यांना एकरी ऐंशी ते एक लाख रुपये मिळवून देत आले आहे. गवार निघाली की त्या शेतात ज्वारीची लागवड केली जाते.

कुटुंब राबतेय शेतीत... नंदाताईं कामासाठी शेतात कधीच मजूर घेत नाहीत. शेतातील अगदी सर्वच कामे घाईवर अाली तरच मजुरांकडून आंतरमशागतीची कामे करून घेतली जातात. गतवर्षी गवारीतून साधारण एक लाख रुपये उत्पन्न मिळाले, मात्र मजुरी केवळ चारशे रुपये इतकी नाममात्र आली होती. शेतातील गवार, मिरची, भेंडी व इतर भाजीपाला तोडणीची कामे नंदाताई सर्वांना सोबत घेऊन करतात. त्यामुळे मजुरीवर त्यांचा फारसा खर्च होत नाही.

पूरक उद्योगांची जोड

नंदाताईंनी शेतीला शेळीपालन, कुक्कुटपालन अाणि जनावरे संगोपनाची जोड दिली अाहे. त्यांच्याकडे विविध जातीच्या ४० शेळ्या अाणि साधारण चारशे देशी कोंबड्या अाहेत. जागेवर कोंबडी अाणि अंड्यांची विक्री केली जाते. शेतीकामामुळे दुग्धव्यवसाय करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी लहान जनावरे विकत घेऊन ती मोठी करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. शेतातील गवताचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होतो. शेळीपालन, कुक्कुटपालन अाणि जनावरांच्या संगोपनामुळे शेतीची लेंडीखत, कोंबडीखत अाणि शेणखताची गरज भागते. त्यामुळे रासायनिक खतावरील खर्च वाचतो. जनावरे व शेळी पालनाची जबाबदारी बाबूराव सांभाळतात. 

- सौ.नंदा बाबूराव इंगोले , ९६६५९२४६५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com