शिवण काम, कंपोस्ट खत निर्मितीतून स्वयंपूर्णतेकडे

कापडी पिशव्या शिवताना गटातील महिला सदस्या.
कापडी पिशव्या शिवताना गटातील महिला सदस्या.

सांगली शहरातील नवचैतन्य महिला बचत गटाने बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन विविध आकाराच्या पिशव्या, गोधडी निर्मितीस सुरवात केली. स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत गटाने सांगली शहरातील निवासी सोसायटीमध्ये प्रशिक्षण वर्ग घेतले. याचबरोबरीने निरक्षर महिलांसाठी साक्षरता वर्ग बचत गटातर्फे चालविला जातो. येत्या काळात स्वतःचा ड्रेस निर्मिती उद्योग उभारणीचे त्यांनी नियोजन केले आहे.

सांगली शहरातील शिंदे मळा परिसरात सौ. संजीवनी पवार राहतात. यांना पहिल्यापासून शिलाई कामाची आवड आहे. त्या घरी ब्लाऊज, फॉल-पिको अशी शिवण कामे करतात. शिवणकामाची आवड असल्याने बाजारात विविध प्रकारच्या कापडी पिशव्या, गोधडी पाहिल्यानंतर त्यांनीदेखील कापडी पिशवी, गोधडी शिवण्याचा सराव सुरू केला. नवीन पद्धतीने शिवलेल्या पिशव्या, गोधडी परिसरातील महिलांना दाखविल्या. हळूहळू महिलांकडून पिशव्यांची मागणी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी पिशव्या शिवण्यास सुरवात केली. परंतू भांडवल आणि एकटीला सर्व शिवणकाम काम शक्‍य नसल्याने त्यांनी महिला बचत गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सांगली महानगरपालिकेत दीनदयाळ अंत्याेदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या मार्फत महिला बचत गटाची नोंदणी करता येते, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार सौ. पवार यांनी महानगरपालिकेतील संबंधित विभागाशी संपर्क साधला. योजनेच्या व्यवस्थापक सौ. ज्योती सरवदे, समूह संघटक सौ. वंदना सव्वाखंडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी महिला बचत गटाची सुरवात केली. सध्या या गटामध्ये सौ. संजीवनी पवार, सौ. आशा पाटील, सौ. शैला दळवी, सौ. अरुणा भागवत, सौ. माधवी राक्षे, सौ. अमृता भोकरे, सौ. अश्‍विनी निकम, सौ. लक्ष्मी जगधने, सौ. श्रद्धा देशपांडे, सौ. रंजना भोकरे, सौ. सुनीता गंगधर या महिला कार्यरत आहेत.

जमा झाले भांडवल     बचत गटातर्फे भांडवल उभारण्याबाबत माहिती देताना सौ. संजीवनी पवार म्हणाल्या की, गटातील प्रत्येक सदस्याने पहिल्यांदा तीन हजार रुपयांप्रमाणे तीस हजार रुपये भांडवल जमा झाले. पहिल्या दोन महिन्यात सुमारे ८०० पिशव्या तयार झाल्या. पिशव्यांच्या विक्रीतून ५२ हजार रुपये मिळाले. परंतू भांडवल कमी पडू लागल्याने पुन्हा गटातील सदस्यांकडून पैसे उभे केले. याचबरोबरीने महानगरपालिकेतील दीनदयाळ अंत्याेदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या सौ. ज्योती सरवदे, सौ. वंदना सव्वाखंडे यांच्याकडे कर्ज कसे उपलब्ध करता येईल याबाबतची माहिती घेतली. सध्या कर्जासाठी प्रकरण तयार केले आहे. पिशव्यांना मागणी वाढली असल्याने मोठा प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे.

विक्रीचे नियोजन   पिशव्यांच्या विक्रीबाबत सौ. आशा पाटील म्हणाल्या की, सुरवातीला ओळखीचे लोक तसेच गटातील सदस्यांच्या पाहुण्यांकडे कापडी पिशव्या घेऊन गेलो. त्यांना विविध आकाराच्या तसेच फॅन्शी पिशव्या दाखविल्या. त्यांना या पिशव्या पसंत पडल्या. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्येच सुमारे ५०० पिशव्यांची विक्री झाली. यामुळे गटातील महिलांचा आत्मविश्‍वास वाढला. पुढे सांगली शहरातील विविध भागात जनसंपर्क वाढविण्याचे ठरवले. त्यासाठी रोटरी क्‍लब, भजनी मंडळ यासह शहरातील महिला गटांना भेटी दिल्या. विविध गटांतील महिलांना आम्ही तयार केलेल्या पिशव्यांचे नमुने आणि दर सांगितले. याचबरोबरीने कोल्हापूर शहरात झालेल्या गृहिणी महोत्सवामध्ये आमच्या बचत गटाचा स्टॉल लावला होता. त्यामुळे पिशव्या आणि गोधडींची मागणी वाढू लागली आहे.

पिशव्या आणि गोधडी निर्मिती

व्हेजिटेबल बॅग -   ६५  ते १५० रुपये साधी बॅग -   पाच ते ३० रुपये फॅन्सी बॅग-    ५० ते ७५ रुपये लहान मुलांसाठी गोधडी-    १५० ते ४५० रुपये मोठी गोधडी -   ७०० ते १६०० रुपये

स्वच्छ भारत अभियानात सहभाग 

स्वच्छता अभियानाविषयी सौ. संजीवनी पवार म्हणाल्या की, शासनातर्फे सांगली शहरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानाची सुरुवात आमच्या कॉलनीपासून झाली. घर तसेच परिसरात स्वच्छता राखणे, ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण याबाबत नागरिकांना बचत गटातर्फे माहिती देण्यास सुरवात केली. महानगरपालिकेतर्फे कंपोस्ट खत निर्मिती आणि त्यासाठी लागणारे साहित्य पुरवठा करण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. ते टेंडर आमच्या गटाला मिळाले. त्यानुसार ओला कचरा बाहेर टाकून न देता त्याचे कंपोस्ट खत कसे करायचे याचे प्रात्यक्षिक गटातर्फे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना देण्यास गटाने सुरवात केली आहे. या उपक्रमातून गटाला आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळाले.

कंपोस्ट खत निर्मिती

बचत गटातील महिला केवळ एकाच वस्तूची निर्मिती न करता इतर नावीन्यपूर्ण गोष्टींचा अभ्यास करण्यात कायम अग्रेसर राहिल्या आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातून कंपोस्ट खत निर्मितीची माहिती गटातील सदस्यांनी घेतली. टप्प्याटप्प्याने बचत गटातर्फे कंपोस्ट खताची निर्मिती होऊ लागली. महानगरपालिकेतर्फे ‘स्वच्छेतून स्वावलंबनाकडे` हे अभियान शहरात राबविण्यात आले होते. या अभियानात बचत गटाने सहभाग घेतला. अभियानाच्या माध्यमातून तयार केलेल्या कंपोस्ट खताची प्रति किलोस वीस रुपये प्रमाणे गटाने विक्री करण्यास सुरवात केली.

प्रौढ साक्षरता वर्गाला सुरवात   महिला बचत गट स्थापन झाला तेव्हा गटातील दोन महिलांना फारसे लिहिता वाचता येत नव्हते. यामुळे गटातील तसेच कॉलनीतील निरक्षर महिलांना चांगल्या पद्धतीने लिहिता वाचता आले पाहिजे हा दृष्टिकोन सौ. आशा पाटील यांनी डोळ्यासमोर ठेवला. त्याचप्रमाणे परिसरातील महिलांची आर्थिक व्यवहारातील होणारी फसवणूक थांबावी, यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून बचत गटाने महिलांसाठी प्रौढ सारक्षरता अभियान सुरू केले. दररोज सायंकाळी सहा ते सात या वेळेत महिलांसाठी शिकवणी वर्ग घेतले जातात. 

सौ. आशा पाटील यांना सुवर्णपदक बचत गटातील सदस्या सौ. आशा पाटील या दिव्यांग आहेत. मात्र, त्यांची खिलाडूवृत्ती आजही  महिलांना प्रेरणा देणारी आहे. सौ. पाटील यांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर थाळीफेक, गोळा फेक स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर त्यांनी १७  सुवर्णपदके आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन सुवर्णपदके मिळविली आहेत.

- सौ. संजीवनी पवार (अध्यक्षा), ९४२०९३३२५०. 

- सौ. आशा पाटील (सचिव), ९११२६०७०९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com