शिक्षण, आरोग्य अन् पूरक उद्योगांसाठी मार्गदर्शक

ग्रामीण महिलांना  फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण
ग्रामीण महिलांना फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण

राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील राशिवडे कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गावशिवारात २००१ पासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील युवक, युवतींना पूरक उद्योगातील प्रशिक्षण, आर्थिक सहाय्याबरोबरच पीडित महिला, विद्यार्थ्यांना समुपदेशन, आरोग्य शिबिरांचे आयोजन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्थेतर्फे केले जाते. परिसरातील शेती, शिक्षण आणि ग्रामविकासामध्ये संस्थेने वेगळी ओळख तयार केली आहे.

राधानगरी तालुक्‍यातील राशिवडे या गावात आनंदा शिंदे यांनी २००१ मध्ये राशिवडे कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ संस्थेची स्थापना केली. २००३-०४ ला संस्थेची नोंदणी करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून गाव परिसरात विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेने प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक, युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. समुपदेशनाच्या माध्यमातून पीडित महिलांना पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. गेल्या अठरा वर्षांपासून संस्थेने ग्रामविकासामध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.  प्रशिक्षणातून व्यवसायाची सुरवात  संस्था स्थापन झाल्यानंतर बेरोजगार युवक, युवतींना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले. सुरवातीला संस्थेने स्वत: पुढाकार घेऊन शिलाई प्रशिक्षण आणि यंत्राचे वाटप, बांबू लागवड तसेच प्रक्रिया, संगणक ओळख, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण देण्यासाठी सुरवात केली. या उपक्रमांना शासनाच्या विविध विभागांचे सहकार्य मिळत आहे. संस्थेतर्फे कापडी बॅग, रेक्‍झीन बॅग, फळप्रक्रिया, दुग्धप्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येते. या उपक्रमाला परिसरातील युवक युवतींचा चांगला प्रतिसाद मिळतो. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना शासनाच्या वतीने मानधन देण्यात येते. आतापर्यंत राधानगरी, करवीर तालक्‍यांतील २,८१६ युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात आले, यापैकी ९८१ युवक-युवतींनी प्रशिक्षणाचा फायदा घेऊन व्यवसाय सुरू केला, हे संस्थेचे मोठे यश आहे. विद्यार्थी, महिलांना समुपदेशन विद्यार्थ्यांना शिक्षणासंबंधी मोफत समुपदेशन करण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यास पद्धती सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. तसेच परीक्षेतील ताणतणाव कसा कमी करावा याबाबातही संस्थेतील सदस्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. अनेक अडचणी, वाददिवाद आणि अन्य कारणांमुळे महिलांचे संसार मोडण्याच्या स्थितीत असतात. अशा महिलांना समुपदेशन करून त्यांच्या संसाराची घडी नीट बसविली जाते. आतापर्यंत तब्बल एक हजारांपेक्षा अधिक महिलांचे संसार संस्थेच्या सदस्या वर्षा कदम, माधुरी कांबळे यांच्यासह स्वत: आनंदा शिंदे यांनी सुरळीत केले आहेत. ज्या महिला संस्थेकडे येऊ शकत नाहीत, त्या महिलांच्या घरी जावून मार्गदर्शन केले जाते.  स्पर्धा परीक्षेची मोफत सुविधा  अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षांकडे ग्रामीण विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. अनेक संस्था त्यांना सशुल्क प्रशिक्षण देतात. परिणामी, मोठा आर्थिक भार विद्यार्थ्यांना सोसावा लागतो. हे टाळण्यासाठी संस्थेने राशिवडे येथे स्पर्धा परीक्षेसाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. २०११ पासून एका इमारतीत संस्थेने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा तसेच ग्रंथालयाची सोय केली. ग्रंथालयात सुमारे तीन हजार पुस्तके आहेत. या सुविधा केंद्राचा लाभ घेतलेले तीसहून अधिक विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत.  शासकीय कागदपत्रांची माहिती  सध्या सर्व बाबींचे व्यवसायिकरण होत आहे. अगदी रेशनकार्ड जरी काढायचे झाले, तरी मध्यस्तांकडून पैसे उकळले जातात. हे प्रकार बंद करण्यासाठी संस्थेने सुमारे दोन हजार पुस्तिकांच्या माध्यमातून एजंटाकडे न जाता रेशनकार्ड कसे काढावे याची माहिती प्रसिद्ध केली. याचबरोबरीने कोणत्या शासकीय अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर कोणती कागदपत्रे द्यावीत याची सविस्तर माहितीदेखील या पत्रिकेतून दिली जाते. यामुळे ग्रामीण भागातील अनेक लोकांना बसणारा आर्थिक फटका थांबला आहे. दिव्यांगांना साहित्य वाटप संस्थेच्या वतीने अंध, अंपग लोकांना पावणे तीन लाख रुपयांच्या साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या मार्फत शिबिरांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून आतापर्यंत तीस जणांना व्हील चेअर, कर्णबधिरांसाठी यंत्र, अंधांसाठी काठी, लहान मुलांच्या खुर्च्या आदी साहित्य देण्यात आले आहे. 

महिलांना कायद्यांची माहिती  कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार कायदा या विषयी संस्थेच्या पदाधिकाऱ्यामार्फत विविध कार्यालये, शाळा, संस्थांमध्ये मार्गदर्शन केले जाते. किचकट कायद्याची माहिती न देता हे कायदे सोप्या भाषेत सांगून महिलांना या प्रश्‍नी दिलासा देण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात येते. शाळेमध्ये जाऊन किशोरवयीन मुलांसाठी प्रशिक्षण दिले जाते. याचबरोबरीने राज्य महिला आयोगाचे हेल्पलाइन क्रमांक मुलामुलींकडून पाठ करून घेतले जातात. त्याचा चांगला फायदा दिसून आला आहे.  लेक वाचवा मोहिमेसाठी एसएमएस सेवा अंगणवाडी सेविका तसेच अन्य यंत्रणेकडून संस्था गरोदर मातांची माहिती घेते. प्रत्येक मातेचा संपर्क क्रमांक नोंदवून ठेवला जातो. संस्थेतर्फे गरोदर मातांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाते. लेक वाचवा तसेच अन्य शासकीय अभियानाची माहिती संपर्क क्रमांकावर पाठवून मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी जनजागृती केली जाते. दररोज सुमारे शंभर एसएमएस पाठवून लेक वाचवा मोहिमेचा प्रचार केला जातो.  विधवा महिलांना सन्मान अनेक सार्वजनिक कामांत विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना बोलावले जात नाही. ही प्रथा मोडण्यासाठी संस्थेच्या वतीने या महिलांचा सन्मान केला जातो. त्यांच्या हस्ते गुढी उभारणी आणि पूजा केली जाते. त्यांना विविध सामाजिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात येते.

लोकसहभागातून सामाजिक उपक्रमांना चालना  संस्थेचे अध्यक्ष आनंदा शिंदे हे महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक म्हणून काम पहातात. पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यांनी सामाजिक कार्य म्हणून या संस्थेची स्थापना केली. जिल्ह्यातील आठ केंद्रांच्या माध्यमातून ते विविध प्रश्‍नांची सोडवणूक करतात. त्यांना अर्जुन चौगुले, संदीप लाड, उत्तम पाडळकर, अमृत मगदूम, सचिन गुरव, मच्छीद्र लाड आदी सदस्यांची चांगली साथ आहे. विविध उपक्रमात निवास डकरे, बलदेव चौगुले, डॉ. प्रकाश पवार यांचे मार्गदर्शन मिळते. संस्थेच्या माध्यमातून राशिवडे गावात ओंकार वाचनालयाची सुरवात झाली आहे. ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी उपक्रम राबविले जातात. गाव तिथे ग्रंथालय या उपक्रमातही संस्थेचा सहभाग आहे. संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेचे मैदान दुरुस्त करण्यात आले. यासाठी कुबेर चाफेकर, ऋषीकेश गुरव आणि सहकाऱ्यांनी चांगली साथ दिली आहे. चांगल्या प्रकारचे मैदान विकसित झाल्याने तेथे तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून संस्था विविध घटकांसाठी काम करीत आहे.

- आनंदा शिंदे, ९४२११०९४८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com