नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारण

Brinjal cultivation
Brinjal cultivation

आसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळून शेतीमध्ये भरताची वांगी आणि कापसाचे उत्पादन घेत आहेत. यंदा वांग्याची आगाप लागवड करून त्यांनी चांगला दरही मिळविला. कौटुंबिक जबाबदारी, नोकरी सांभाळून वेगवेगळे पीक प्रयोग करीत शेती किफायतशीर करण्याचा प्रयत्न केला आहे.

अभियांत्रिकी विषयातील पदवी घेतलेले नीलेश माळी सध्या चाळीसगाव (जि. जळगाव) येथे ते एका खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्राचार्यपदी कार्यरत आहेत. नीलेश यांची आसोदे (जि. जळगाव) येथे १२ एकर वडीलोपार्जित काळी कसदार जमीन आहे. बरडा भागात त्यांनी १५ एकर हलकी, मुरमाड जमीन भाड्याने घेतली आहे. जळगाव शहरापासून आसोदे शिवार जवळ आहे. नीलेश हे जळगावात राहतात. सुरवातीला ते जळगावमध्ये पाइप, ठिबक, केळी रोपे आदींचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत काम करीत होते. त्यांचे वडील नारायण बाबुराव माळी हे वीज मंडळात अभियंता पदावर कार्यरत होते. त्यांना शेतीची आवड होती परंतु, २००८ मध्ये त्यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यावर्षी नुकतेच घराचे बांधकाम झाले होते आणि नीलेश यांचे शिक्षण सुरू होते, त्यामुळे आर्थिक बाजू कमकुवत झाली होती. त्यातूनही नीलेश यांनी शिक्षण घेत शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीचे विशेष ज्ञान नव्हते परंतु नातेवाईक आणि कुटुंबीयांचे मार्गदर्शन घेऊन, जवळच्या मार्केटचा आभ्यास करून पिकांची निवड केली. गरजेतून शेतीमध्ये आवड निर्माण होत गेली आणि नीलेश यांचा नोकरीबरोबर शेतीतील प्रवास सुरू झाला.  

बाजारानुसार पीकपद्धती  नीलेश जवळपासच्या मार्केटचा अभ्यास करून पिकांची निवड करतात. त्यामुळे चांगले दर मिळतात. यंदा कापूस हे प्रमुख पीक असून, मे मध्ये पूर्वहंगामी कपाशीची लागवड करतात. १० एकरात कापूस पीक असते. यापाठोपाठ ज्वारी व इतर रब्बी पिके ते घेतात. भरताच्या वांग्यांची लागवड ते अनेक वर्षांपासून करीत आहेत. काही वेळेस अर्धा एकर तर काही वेळेस पाऊण एकरात लागवड केली जाते. याशिवाय ऊस, मका, भुईमूग, भेंडी, सोयाबीन इ. पिकेही ते घेतात.

भरीताचे वांगी ठरले फायद्याचे नीलेश हे दरवर्षी भरताच्या वांग्याची लागवड करतात. रोपे घरच्या बियाण्यापासून तयार करतात. यंदा पावसामुळे रोपवाटिका खराब झाली. यामुळे काही रोपे त्यांना इतरांकडून खरेदी करावी लागली. मे महिन्यात सुमारे २५ गुंठ्यांवर तीन बाय तीन फूट अंतरावर वांग्याची लागवड केली. लागवडीनंतर पिकाचे योग्य व्यवस्थापन ठेवले. वांग्याचा दर्जा चांगला राहावा, यासाठी पिकाला जीवामृत दिले जाते. काही वेळेस पाट पद्धतीने पाणी देऊन तर काही वेळेस ठिबकमधून जीवामृत गाळून सोडले जाते. यामुळे टप्याटप्याने चमकदार, लुसलुशीत वांग्यांचे उत्पादन सुरू झाले.  यंदा लागवडीनंतर ऑगस्टच्या अखेरीस काढणी सुरू झाली. सप्टेंबरमध्ये दर चार दिवसांत एक ते दीड क्विंटल आणि ऑक्‍टोबरच्या मध्यानंतर दर चार दिवसाला पाच ते सहा क्विंटल वांग्याचे उत्पादन मिळत होते. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून दर चार दिवसाआड सहा क्विंटल वांग्यांची काढणी सुरू आहे.

योग्य नियोजन दिवाळीला वांग्यांना चांगली मागणी असते. जिल्ह्यात अतिपावसामुळे वांगी पिकाचे नुकसान झाले. काही भागात शेंडे अळीचा प्रादुर्भाव झाला. परंतु, हलकी जमीन व उत्तम व्यवस्थापनामुळे आता चांगले उत्पादन मिळत आहे. ऑक्‍टोबरमध्ये काढणी बऱ्यापैकी सुरू होती. यामुळे सुरवातीचे चांगले भाव मिळाले. ऑक्‍टोबरमध्ये बाजार समितीत प्रति किलो ३० ते ४० रुपये दर मिळाला. तर नोव्हेंबरमध्ये देखील सरासरी प्रति किलो ३५ रुपये दर मिळाला. अनेक वर्षात यंदा वांग्यांना चांगला दर मिळाला.आगाप लागवडीमुळे दराचा लाभ होत असल्याचे नीलेश सांगतात.

जमीन सुपिकतेवर भर रासायनिक खते आणि कीडनाशकाचा वापर कमीत कमी करण्यावर माळी यांचा भर असतो. शेण, गूळ, बेसन पीठ, गोमूत्र आंबवून जीवामृत बनविले जाते. जीवामृताच्या निर्मितीसाठी विहिरीजवळ एक हौद बांधला आहे. पॉलिहाउस शेतीकडेही वळण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासंबंधी एका खासगी संस्थेत त्यांनी प्रशिक्षणही घेतले आहे. एक गीर गाय, एक बैलजोडीसह त्यांच्याकडे ट्रॅक्‍टरही आहे.

किफायतशीर दर मिळवण्याचा प्रयत्न वांगी पिकातून माळी यांना चांगला फायदा मिळाला आहे. सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यातील काढणीची मजुरी तसेच लागवड, फवारणी, खतांसह ६० हजार रुपये खर्च झाला. दर चांगला असल्याने दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. थंडी कायम राहील तोपर्यंत म्हणजेच जानेवारीपर्यंत पीक राहील. तोपर्यंत नफा वाढू शकतो. मागील हंगामातही सरासरी २० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाले होते. वांग्यांची विक्री बाजार समितीमध्ये एका अडतदारातर्फे करतात. या अडतदाराकडून त्यांच्या दर्जेदार वांग्यांना पहिली पसंती असते.

कापूस पिकाचे उत्तम नियोजन कापसाची ठिबक सिंचनावर पूर्वहंगामी लागवड केली जाते. एकरी कमाल १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. कापसाची विक्री व्यापाऱ्याला जागेवरच करतात. मागील वर्षी माळी यांना सरासरी ५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नोव्हेंबरपर्यंत कापसाखालील क्षेत्र रिकामे करून त्यात ज्वारी, हरभरा, मका, भुईमूग आदी पिकांची पेरणी केली जाते.

ॲग्रोवन झाला मार्गदर्शक शेतीला सुरुवात केल्यानंतर नीलेश यांनी पहिल्यांदा घरी ॲग्रोवन पेपर घेण्यास सुरुवात केली. त्यातून मार्केट, पीकपद्धती, कीड, रोग आणि पीक व्यवस्थापनाची माहिती मिळण्यास मदत झाली आणि शेती सुकर झाली असे नीलेश सांगतात. 

उच्चशिक्षित कुटुंब नीलेश यांचे बंधू धीरज हे पुणे येथे संगणक अभियंता आहे. धीरज यांची पत्नी सुनीता यादेखील पुण्यात अभियंता म्हणून खासगी संस्थेत नोकरी करतात. शेती नियोजनात नीलेश यांना धाकटे बंधू भूषण यांची मदत होते. भूषण हेदेखील वीज कंपनीत नोकरीला आहेत. दैनंदिन शेती व्यवस्थापनात चुलतबंधू पुंडलीक माळी व आत्या इंदूबाई माळी यांची मोठी मदत नीलेश यांना होते. नीलेश यांची पत्नी रिनल यांनी देखील अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली आहे. नीलेश यांना शेतीमध्ये पत्नी रिनल आणि आई आशा यांची चांगली साथ मिळाल्याने प्रगती सुरू आहे.  

 - नीलेश माळी, ८४२१७७५५९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com