‘निर्मिती’ची स्वयंरोजगारातून वेगळी ओळख

निम पेंड आणि तेलनिर्मिती हा संस्थेचा प्रमुख उद्योग आहे.
निम पेंड आणि तेलनिर्मिती हा संस्थेचा प्रमुख उद्योग आहे.

नगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांत लोकपंचायत संस्थेने पाणलोट कामामध्ये महिलांचा सहभाग वाढीसाठी बचत गट तयार केले. या गटांनी पुढील टप्प्यात निर्मिती महिला औद्योगिक सहकारी संस्था सुरू केली. संस्थेमार्फत निंबोळी पेंड, निम तेल, निम पावडर तसेच वेगवेगळ्या धान्यांपासून दर्जेदार बिस्किटे निर्मितीचे काम सुरू आहे. ‘निर्मिती’च्या उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अनेक गावांत दुष्काळी स्थिती असते. ही परिस्थिती बदलण्यासाठी लोकपंचायत संस्थेने पंचवीस वर्षांपूर्वी जलसंधारण, पाणलोटाच्या कामांसह महिला विकासासाठी काम सुरू केले. लोकपंचायतीचे पद्मभूषण देशपांडे, उल्हास पाटील, सारंग पांडे, सीताराम राऊत, विजय थोरात, समीर घोष, संजय फल्ले, तुळशीराम जाधव, ज्योती मालपाणी यांच्यासह अन्य कार्यकत्यांनी संगमनेर तालुक्यातील मुंजेवाडी, कुरकुटवाडी, कुरकुंडी, गणेशवाडी, जवळे कडलग, पिंपळगाव, निमज, राजापूर, सायखिंडी, वेल्हाळे, निमोण, पारेगाव, नान्नज, काकणवाडी, चिंचोली गुरव, निळवंडे, खांडगाव, घुलेवाडी आदीसह अन्य गावांत पाणलोटाच्या कामांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी बचतगट चळवळ सुरू केली. सुरवातीला नऊ गावांत नऊ महिला बचत गट केले. रोजगारासोबत सामाजिक विकासावर चर्चा सुरू झाली. महिलांचा सहभाग वाढला, पुढे काही महिन्यात नऊचे अठरा गट झाले. महिला दहा रुपयांपासून बचत करू लागल्या. आता तब्बल ३०० महिला बचतगटांतून पाच हजार महिला जोडल्या गेल्या आहेत.  पतसंस्थेची स्थापना   ‘लोकपंचायत’च्या मदतीने महिलांनी २०१६ साली निर्मिती महिला नागरी सहकारी पतसंस्था सुरू केली. यामध्ये बचतगटातील महिला ठेवी ठेवतात. पतसंस्थेच्या १,५५६ महिला सभासद असून १ कोटी ६ लाखांची वार्षिक उलाढाल आहे. आतापर्यत महिलांना ८० लाखांपर्यत कर्ज दिले आहे. निर्मितीतर्फे संगमनेर महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात खानावळ चालवली जाते. त्यातूनही महिलांना रोजगार मिळाला आहे.   कृषी विभागाची मदत  संस्थेला बिस्किटे निर्मिती साहित्य आणि यंत्रणा उभारणीसाठी चाळीस लाखांचा खर्च आला. त्यातील यंत्रणेसाठी पंचवीस लाखांचा खर्च आला. कृषी विभागाच्या मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेतून ६ लाख १९ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. कृषी विभागाच्या मदतीने कष्टकरी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात, याचा आनंद आहे, असे संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे व आत्माचे प्रकल्प समन्वयक वैभव कानवडे यांनी सांगितले. बिस्किटेनिर्मितीस सुरवात  ‘निर्मिती’ संस्थेने गेल्या वर्षभरापासून नाचणी, खोबरे, गहू, तांदूळ, मका, राजगिरा, ओट्स आणि  गावरान तुपापासून बिस्किटे निर्मितीस सुरवात केली. बिस्किटामध्ये मैदा वापरला जात नाही. गटातील चार महिलांनी बिस्किटे तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. निर्मिती उद्योगात २७ महिला कार्यरत आहेत. सध्या महिन्याला तीनशे किलो बिस्किटे तयार केली जातात. या बिस्किटांची विक्री ‘बाईट फस्ट’ ब्रॅण्डने केली जाते. बिस्किटे पॅकिंगसाठी येत्या काळात आधुनिक यंत्राची खरेदी करण्यात येणार आहे. बिस्किटांची वैशिष्ट्यपूर्ण चव आणि दर्जामुळे नगर जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागातून मागणी आहे. बिस्किटांच्या प्रत्येक पाकिटावर संस्थेत काम करणाऱ्या महिलांचे छायाचित्र असलेला लोगो आहे. 

वैशिष्ट्ये 

  • अडचणीत असलेल्या, एकल तसेच निराधार महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी गावगावांत जिव्हाळा गट. यामध्ये ७० टक्के महिला व ३० टक्के गावांतील प्रतिष्ठांचा गटात समावेश. 
  •  रोजगारासोबत ग्रामसभा, पाणी, रेशन, दारूबंदी आदीसह विविध विषयांवर चर्चा करून प्रश्नांची सोडवणूक. मुलांचे शिक्षण, रोजगार, घर उभारणीसाठी मदत.  शेतकऱ्यांसाठी वाचनालयाचे नियोजन. 
  •  ‘होम फस्ट’ ब्रॅँडने दिवाळी फराळ निर्मिती.
  • संस्थेची स्थिती 

  •  स्थापना ः ११ सप्टेंबर २००१ 
  •  सभासद ः ८६० 
  •  भागभांडवल ः ४ लाख २५ हजार
  •  वार्षिक उलाढाल ः ८७ लाख ४५ हजार 
  •  उत्पादन ः विविध धान्यांची बिस्किटे, निम तेल, निम पेंड, निम पावडर 
  • निर्मिती महिला औद्योगिक सहकारी संस्थेचा उपक्रम एकवीस गावांतील महिलांनी १९९६ ते २००१ या काळात आपल्या परीने शक्य तेवढी बचत केली. त्याच काळात महिलांना चिंच प्रक्रियेचा आर्थिक आधार मिळाला. बऱ्याच महिला शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे घरच्या झाडांच्या तसेच गरजेनुसार बाहेरूनही चिंच खरेदी करून त्यापासून चिंच चॉकलेट तसेच कुरडया, पापड, शतावरी कल्प तयार करू लागल्या. या दरम्यान लोकपंचायतीच्या मदतीने शेतकऱ्यांनी बळिराजा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली. कंपनीच्या माध्यमातून उत्पादनांची विक्री ‘इर्जिक’ ब्रॅँडने होऊ लागली. लोकपंचायतीच्या मदतीने महिलांनी बचतीतून २००१ साली निर्मिती महिला औद्योगिक सहकारी संस्था सुरू केली. संस्थेत तेरा महिला संचालक असून ८६० सभासद आहेत. संस्थेमध्ये तारा वामन या अध्यक्षा आणि डॉ. सुनीता राऊत उपाध्यक्ष आहेत. कृष्णामाई जाधव मानद सचिव आहेत. शमीम शेख, अलका मुळे, शांताबाई शिरतार, शकुंतला वाघ, सुरेखा उबाळे, मंगल कासार, सविता पगार, वंदना सोनवणे, संगिता जमधडे आणि शालन शेळके कार्यकारी संचालक आहेत.   २००६ मध्ये संस्थेने घुलेवाडी-गुंजाळवाडी हद्दीतील औद्योगिक वसाहतीत १८ गुंठे जागा खरेदी केली. बाजारपेठेची गरज ओळखून निम तेल, निम पेंड, निम पावडर तयार करण्यास सुरवात केली. दरवर्षी संस्था सुमारे चारशे टन निंबोळीची राज्यातील विविध भागातून खरेदी करते. या परिसरातील फळबागायतदार तसेच सेंद्रिय उत्पादकांकडून निंबोळी उत्पादनांची चांगली मागणी असते. वर्षभरात ३०० टन निंबोळी पावडर, ५ हजार लिटर निम तेलाची विक्री करते. - शालन शेळके, ७५८८६०६३९२, ९०११९१०९००,

    (कार्यकारी संचालक, निर्मिती महिला औद्योगिक सहकारी संस्था)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com